मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग १७

Submitted by Theurbannomad on 14 February, 2021 - 16:22

०४.०२ - साक्षात्कार
सीरियासारख्या वाचाळ आणि आक्रस्ताळी देशाने अणू-प्रकल्पाबद्दल पाळलेली गुप्तता खरोखर वाखाणण्यासारखी होती. किंबहुना सीरियाच्या या आक्रस्ताळ्या इतिहासामुळेच मोसादला अणुभट्टीसारखी मोठी गोष्ट सीरिया कधीही लपवू शकेल हे खरं वाटलं नव्हतं. अमेरिकेच्या सीआयएला आणि मोसादला अधून मधून सीरियाच्या वाळवंटात काहीतरी संशयास्पद सुरु असल्याच्या बातम्या आल्याही होत्या, पण त्यांना त्यात फारसं महत्वाचं काही दिसलं नाही. इतकंच काय, पण २००५ साली इस्राएलच्या समुद्री सीमेजवळ अंदोरा नावाचं मालवाहू जहाज बुडालं तेव्हा या जहाजात ' सिमेंट ' असल्याची बतावणी झाली तरी मोसादच्या कान टवकारले गेले नाहीत...पुढच्याच वर्षी स्वयंचलित रडार यंत्रणा आणि ' सिमेंट ' घेऊन पनामा देशात नोंद झालेलं कोरियाचं जहाज सायप्रसने कागदपत्रांच्या अनियमिततेमुळे पकडलं तरी मोसादला धोक्याची जाणीव झाली नाही...पण २००६ च्या शेवटी शेवटी इराणच्या अणू-अभियंत्यांची तुकडी सीरियामध्ये आहे हे कळल्यावर मात्र मोसादचे डोळे किलकिले झाले. ही माहिती मोसादला कळली एका महत्वाच्या कामगिरीमध्ये आलेल्या यशामुळे. २००६ सालच्या डिसेंबर महिन्यात एक महत्वाचा सिरियन अणू-तंत्रज्ञ ( काही शोधपत्रकारांच्या माहितीप्रमाणे हा मनुष्य म्हणजे खुद्द सिरियाच्या आण्विक ऊर्जा आयोगाचा प्रमुख इब्राहिम ओथमान ) लंडनमध्ये काही कामाच्या निमित्ताने येणार असल्याची खबर मोसादकडे आली. त्यांनी लगेच आपले १० निष्णात हेर वेगवेगळ्या नावाने लंडनला पाठवले. या १० जणांमध्ये मोसादच्या किडोन युनिटमधले सावजाला टिपण्यात निपुण असलेले काही जण होते आणि बाकीचे नेव्हीओत युनिटमधले तंत्रज्ञानातले निष्णात हेर होते...त्यांचं काम होतं अतिशय किचकट अशा सॉफ्टवेअर प्रणालींपासून घरच्या टेहळणी उपकरणांपर्यंत कशालाही ' हॅक ' करून आपल्या साथीदारांच काम सोपं करणं.
या दहा जणांनी तीन गट तयार केले. एक गट लंडनच्या हीथ्रो विमानतळावर आपल्या सावजाची ओळख पटवण्यासाठी डोळ्यात तेल घालून उभा राहिला. दुसऱ्या गटाच्या हेरांनी सावज ज्या हॉटेलमध्ये राहणार आहे, तिथे आधीपासून मोक्याच्या खोल्या पटकावला. तिसऱ्या गटाने सावज जिथे जिथे जाईल आणि ज्यांना ज्यांना भेटेल, त्याची व्यवस्थित माहिती टिपण्याचं काम अंगावर घेतलं. अखेर हा सीरियन अणू-तंत्रज्ञ काही कामामुळे हॉटेलमधून बाहेर गेला असता दोघा -तिघांनी त्याच्या खोलीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यातला एक जण होता संगणक तज्ज्ञ. त्याने या सीरियन अणू-तंत्रज्ञाच्या लॅपटॉपमध्ये एक ' सॉफ्टवेअर प्रोग्राम ' इन्स्टॉल केला आणि शांतपणे खोलीतून काढता पाय घेतला. या ' प्रोग्राम ' मुळे त्यांना त्या लॅपटॉपमध्ये असलेली सगळी माहिती व्यवस्थित चोरता आली. यातूनच सीरियाच्या कुठल्याशा भागात बांधकाम सुरु असलेल्या अवस्थेतला एक प्रकल्प, त्या प्रकल्पाचे काही आराखडे - नकाशे आणि प्रत्यक्ष प्रकल्पाची काही छायाचित्रं असा ऐवज मोसादला मिळाला. शिवाय एक अजून महत्वाची माहिती त्यांना मिळाली - चों चिबू हा उत्तर कोरियाचा अणू - तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि इब्राहिम ओथमान यांचं हस्तांदोलन होतं असतानाचं छायाचित्रं. मोसादने लगेच ही माहिती पंतप्रधान ओल्मर्ट यांच्या कार्यालयात पोचती केली.
सीरियन तंत्रज्ञांनी दीर अल झुर नावाच्या शहरात एका वाळवंटी भागात अणुभट्टी उभारायचं काम हाती घेतलं होतं. या कामामध्ये सामील असलेल्या कोणालाही मोबाईल अथवा इतर संदेशवाहक उपकरणं वापरायला मनाई होती. संदेश एकाकडून दुसऱ्याकडे चक्क पत्रव्यवहारामार्फत पोचते केले जात. भट्टी जमिनीखाली उभारलेली असल्यामुळे इस्रायली आणि अमेरिकन उपग्रहांनाही टेहळणी करताना काहीही संशयास्पद दिसत नसे.
७ फेब्रुवारी २००७ च्या दिवशी दमास्कसच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एक महत्वाची व्यक्ती देशाबाहेर निघाली होती. इराणच्या लष्करात जनरल पदावर असलेला आणि इराणच्या कुप्रसिद्ध ' रेव्होल्यूशनरी गार्ड्स ' चा एक सदस्य असलेला अली रेझा असगरी हा तो मनुष्य. हा पूर्वीचा इराणचा उप-संरक्षण मंत्री. त्याचं कुटुंबही त्याच्या बरोबर होतं. ते वेगळ्या विमानाने देशाबाहेर निघाल्याची खात्री झाल्यावर हा असगरी तुर्कीकडे जाणाऱ्या विमानात बसला. विमान इस्तंबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर अल आणि हा बाहेर पडला...यानंतर तो तिथून जो गायब झाला तो झालाच... थेट महिनाभरानंतर त्याच्याबद्दल खबर आली की त्याने अमेरिकेशी आणि इस्रायलशी संगनमत केलेलं आहे. इतका मोठा मासा सीआयए आणि मोसादने गळाला लावलेला होता की त्याच्याकडून त्यांना आतल्या गोटातल्या महत्वाच्या माहित्या बारीकसारीक तपशीलांसकट मिळत होत्या. इस्तंबूलहून हा आणला गेला होता जर्मनीमधल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर. इथे त्याच्या स्वागताला हजार होते मोसादचे खास अधिकारी.
त्याच्याकडून सीरिया - इराण - उत्तर कोरिया या तिघांनी अणुप्रकल्पाचं काम किती पुढे नेलं आहे आणि त्यातून अण्वस्त्र तयार करण्याची सीरियाची योजना आहे ही महत्वाची बातमी मोसादला आणि अमेरिकेला समजली आणि त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. इराणसारख्या देशाने या प्रकल्पात नुसती आर्थिकच नव्हे, तर तांत्रिक मदतही केली आहे आणि प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी इराणी अभियंते - तंत्रज्ञ - शास्त्रज्ञ जातीने पुढाकार घेऊन काम करत आहेत हे समजल्यावर तर मोसाद आणि अमेरिका हबकून गेले. या सगळ्याचा अर्थ साधा होता - अण्वस्त्रांची निर्मिती सीरिया आणि इराणच्या दृष्टीक्षेपात आलेली होती आणि लवकरात लवकर काही ठोस कारवाई करून हा प्रकल्प अयशस्वी करणं जरुरीचं होतं...
मोसादचे तत्कालीन प्रमुख होते मीर दगान. त्यांनी लगोलग पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांच्या कार्यालयात धाव घेतली. ओल्मर्ट यांनी असगरीच्या जबानीचा अहवाल बघितला आणि त्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. त्यांनी लष्कर, संरक्षणमंत्री, तिन्ही दलांचे प्रमुख, मोसादचे महत्वाचे लोक आणि विरोधी पक्षनेते अशा सगळ्यांना तातडीने बोलावून घेतलं. सगळ्यांनी अहवाल नजरेखालून घातला आणि एकमताने सीरियाच्या या अणुप्रकल्पाचा सोक्षमोक्ष लावण्याच्या योजनेला पाठिंबा जाहीर केला. ही एकी पूर्वीपासून आजतागायत इस्राएल देशाचं सगळ्यात मोठं बलस्थान राहिलेलं आहे....
मोसाद आपल्या कामाला लागलं आणि त्यांनी सीरियामध्ये आपल्या सगळ्या महत्वाच्या हेरांना सूचना पाठवल्या. हे हेर कामाला लागले आणि त्यांनी सर्वप्रथम लक्ष्य केलं सीरियाच्या अणू - प्रकल्पामध्ये सामील असलेल्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना. त्या अधिकाऱ्यांपैकी काही महत्वाचे वेचून या हेरांनी त्यांच्यावर पाळत ठेवायला सुरुवात केली. अखेर एका मोसाद-वीराने आपली कामगिरी चोख बजावली...त्याने एका महत्वाच्या सीरियन अधिकाऱ्याचा लॅपटॉप ' हॅक ' केला आणि त्यातला सगळा ऐवज सुरक्षितरित्या तेल अवीव येथे मोसादच्या मुख्यालयात पोचता केला. मोसादसाठी हे घबाड अतिशय मौल्यवान ठरलं.
मोसादच्या दुसऱ्या एका हस्तकाने याही पुढची कामगिरी फत्ते केली - खुद्द अणुप्रकल्पामध्ये काम करत असलेल्या एका सीरियन तंत्रज्ञाला त्याने वेगवेगळी आमिषं दाखवून हळूच आपल्या बाजूला करून घेतलं. हा तंत्रज्ञ अपेक्षेपेक्षा भारी निघाला. त्याने थेट प्रकल्पाच्या आतली छायाचित्रं आणि व्हिडीओ यांचं भांडार मोसादच्या त्या हस्तकाकडे आणून दिलं. हा प्रकल्प आतून कसा आहे, तिथे काय काय सुरु आहे, तिथल्या महत्वाच्या जागा कशा आणि कोणत्या आहेत हे त्यात स्पष्ट समजत होतं. त्यात दिसत होत्या उंच काँक्रीटच्या भिंती, ज्याच्या आत लंबगोलाकार रचना असलेल्या काही जागा होत्या. आतून भिंतींना आधार म्हणून भक्कम पोलादी परांच्या होत्या. त्याशिवाय अजून एक छोटी इमारतही त्या छायाचित्रांमध्ये होती, जिच्या आत तेलावर चालणारे भले मोठे पंप दिसत होते. त्याशेजारी पाण्याच्या टाकीसारखं काहीतरी होतं. या सगळ्यातून एक गोष्ट स्पष्ट होतं होती - हा प्रकल्प चांगलाच तयार अवस्थेत होता आणि कदाचित कार्यान्वित व्हायच्या अगदी शेवटच्या टप्प्यात होता.
या सगळ्या माहितीतून त्यांच्या सगळ्या शंकाकुशंका पूर्णपणे नाहीशा झाल्या...पंतप्रधान ओल्मर्ट यांनी हे सगळं घबाड उचललं आणि थेट अमेरिकेत बसलेल्या आपल्या खास मित्राला दूरध्वनी केला. हे खास मित्र म्हणजे अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश. वकुबाने यथातथा असले तरी नुकतेच इराक देशावर हल्ला करून युद्धाची खुमखुमी पूर्ण करून ते जगासमोर अभिमानाने उभे राहिले होते. त्यांचं पुढचं लक्ष्य होतं अफगाणिस्तान....अशा या युद्धखोर नेत्यासाठी सीरियाबद्दलची ही माहिती अतिशय मोलाची होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users