मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग १६

Submitted by Theurbannomad on 14 February, 2021 - 16:22

सीरिया.
अरब जगतातील एक अतिप्राचीन संस्कृती लाभलेला, दमास्कससारख्या प्राचीन आणि भरभराटीला आलेल्या शहरामुळे शतकानुशतकं दूरदूरच्या प्रांतांशी व्यापार करत असलेला आणि अनेक धर्मियांची वस्ती अंगाखांद्यावर बाळगणारा एक चिमुकला पण महत्वाचा देश. पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटिश आणि फ्रेंचांनी या देशाच्या सीमा नव्याने आखल्या आणि हा देश एकामागोमाग एक वेगवेगळ्या लष्करशहांच्या हाती जाऊन पार ढासळला. या देशाची ओळख एक कटकट्या, हडेलहप्पी आणि विधिनिषेधशून्य देश म्हणून व्हायला लागली ती अल असाद कुटुंबियांच्या हाती सत्ता आल्यानंतर. कुरापती काढण्यात, सतत कोणाशी ना कोणाशी तंटे करण्यामध्ये धन्यता मानण्यात आणि आपल्यामागे इतर अरब देशांना फरफटत यायला भाग पाडण्यात या देशाने आपली सगळी शक्ती खर्ची घातली आणि सरतेशेवटी या देशाचं जे व्हायचं तेच झालं...एका कुटुंबाच्या हाती सत्ता एकवटून या देशात हुकूमशाही सुरु झाली.
या देशाचं वैशिष्ट्य हे, की आपल्या स्वार्थासाठी या देशाने दीर्घकाळ रशियाच्या कह्यात जाऊन पुढे पुढे इराणच्या जहाल धर्मसत्तेशीही जुळवून घेतलं. आजूबाजूचे अरब बंधू या दोन्ही देशांच्या विरोधातले...त्यामुळे सीरियाशीही त्यांचं नातं जेमतेम राहिलं. तशात इस्राएलबरोबर अरबांनी जी जी युद्धं केली, त्यातही असद कुटुंबीयांनी आपल्या लष्कराला आघाडीवर पाठवलं. शेजारच्या लेबनॉनमध्ये पॅलेस्टिनी निर्वासितांसाची सोय व्हावी म्हणून जाहीरपणे लेबनॉनला सुंवायलाही या असाद कुटुंबीयांनी मागेपुढे पाहिलं नाही. दुसरीकडे थोरल्या असाद यांनी रशियाप्रमाणेच अजून दोन पाताळयंत्री देशांशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी पावलं उचलली होती...हे दोन देश म्हणजे शेजारचा शियाधर्मिय इराण आणि दूर अतिपूर्वेकडचा उत्तर कोरिया. एक जहाल धर्मवादी तर दुसरा कम्युनिस्ट आणि म्हणून शत प्रतिशत निधर्मी...पण असाद यांच्यासाठी हे मुद्दे कधीच मैत्रीआड आले नाहीत.
जगाची साम्यवादी आणि भांडवलशाही अशा दोन ध्रुवांमध्ये विभागणी होतं असताना जे जे देश साम्यवादाच्या लाल रंगात रंगले, त्यातला एक महत्वाचा देश म्हणजे कोरिया. चीनच्या शेजारचा आणि जपानच्या समोरचा हा देश खरं तर निसर्गसंपन्न. पण १९१० साली जपानच्या इंपिरियल आर्मीने या देशाचा पाडाव करून तो आपल्या साम्राज्याला जोडला आणि या देशासाचे दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले. दुसऱ्या महायुद्धात जपानचा पाडाव झाल्यावर हा देश तेव्हाच्या दोन जागतिक महासत्तांनी दोन तुकड्यांमध्ये विभागून घेतला. उत्तरेकडचा भाग कम्युनिस्ट रशियाने आपला अंकित करून घेतला आणि दक्षिणेकडचा भाग अमेरिकेने आपल्या पंखांखाली घेतला. तेव्हापासून उत्तर कोरिया साम्यवादाच्या लाल रंगात रंगला तो आजतागायत. उत्तर कोरियामध्येही वर्चस्व होतं किम इल सुंग यांचं...ज्यांनी पुढे आपल्याच घराण्यात या देशाची सत्ता ठेवली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचाच मुलगा किम जोंग इल या देशाचा सर्वेसर्वा झाला आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा किम जोंग ऊन.
इराणमध्ये राहणीमानाने संपूर्णपणे पाश्चात्य असलेला गुलछबू वृत्तीचा राजा शाह मोहम्मद रेझा पहलवी याची सत्ता १९७९ मध्ये अयातोल्ला रुहल्ला खोमेनी याने उलथवून टाकली आणि हा बऱ्यापैकी आधुनिक असलेला देश एकदम इस्लामी मूलतत्ववाद्यांच्या हातात गेला. खोमेनी शिया असल्यामुळे या देशात शियाधर्मियांचा वरचष्मा निर्माण झाला. या खोमेनींचे दोन मोठे शत्रू म्हणजे ' मोठा सैतान ' अमेरिका आणि ' छोटा सैतान ' इस्राएल.
हे तीन देश एकत्र आले एका विशिष्ट कारणामुळे. १९७१ पासूनचे सीरियाचे सर्वेसर्वा झालेले हाफिज अल असाद स्वतः धर्माने शिया...त्यामुळे सुन्नी सौदीला टक्कर देऊ शकेल असा शिया धर्मियांचा प्रबळ देश असलेला इराण त्यांना जवळचा. दोघांच्या मनात इस्राएलला धडा शिकवायची आणि जमल्यास यहुदी देशाचं अस्तित्व पुसून टाकायची खुमखुमी. दोघांवरही जगाने अनेक निर्बंध घातलेले आणि तरीही दोघांमध्ये टोकाचा आडमुठेपणा ठासून भरलेला. इस्राएलने अण्वस्त्र कार्यक्रम तडीस नेल्यामुळे या दोघांच्याही मनात येनकेनप्रकारेण अण्वस्त्र मिळवायची खुमखुमी जागी झाली होतीच...यासाठी सीरियाने आपल्या लौकिकाला अनुसरून एक आततायी पाऊल उचललं. त्यांनी संधान बांधलं थेट उत्तर कोरियाशी, ज्यांच्याकडे अण्वस्त्र असल्याची भुमका समस्त जगाला होती.त्यांच्याकडे चीनच्या आणि रशियाच्या कृपेने अणुभट्टी तयार करण्याचं तंत्रज्ञान होतंच....त्याच तंत्रज्ञानाने सीरियामध्येही गुप्तपणे अणुभट्टी तयार करावी आणि त्यातून अण्वस्त्र तयार करण्याचा कार्यक्रम तडीस न्यावा ही हाफिज अल असाद यांची योजना होती. जर ही योजना सफल झाली, तर सीरिया पुन्हा एकदा अरब जगतातील प्रभावशाली देश होऊ शकणार होता आणि त्याच इस्राएलला नष्ट करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार होतं.
या योजनेमध्ये सामील होते बशर अल असाद - हाफिज अल असाद २००० साली कर्करोगाने निर्वर्तल्यावर त्यांच्या या धाकट्या चिरंजीवांनी घराणेशाही पुढे चालवली होती. १९९१ साली सीरियाने खरं तर चीनकडून न्यूट्रॉन तंत्रज्ञानावर चालणारी छोटी अणुभट्टी घेतलेली होती...पण या प्रकल्पाची जगाला व्यवस्थित माहिती होती आणि अण्वस्त्रबंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्यामुळे जगाकडून या प्रकल्पाची पाहणी दर वर्षी नित्यनेमाने होतं होती. शिवाय सीरियाकडे स्वतः अणू-तंत्रज्ञान विकसित करण्याइतकं कौशल्य नव्हतं. यासाठी असाद यांना गरज होती एखाद्या अशा मित्राची, जो स्वतः हे तंत्रज्ञान देण्यासाठी उत्सुक असेल आणि तेही जगाच्या नजरेआडून. उत्तर कोरियावर जगाने अनेक निर्बंध घातलेले असल्यामुळे हा देश अशा कामासाठी सुयोग्य होता.असाद कुटुंबाचे किम कुटुंबाशी जुने ऋणानुबंध होते - १९९० साली किम इल सुंग दमास्कसला हाफिज अल असाद यांना भेटल्यावर ही अभद्र युती जन्माला आलेली होती. १९९१ सालच्या आखाती युद्धातही प्रगत अशा स्कड क्षेपणास्त्रांचा पुरवठा सीरियाला उत्तर कोरियाकडूनच झालेला होता.
असाद कुटुंबियांना वास्तविक जैवअस्त्र आणि रासायनिक अस्त्रांमध्ये जास्त रुची होती...पण पुढे पुढे अण्वस्त्रांची महती कळायला लागल्यावर त्यांचं मत बदललं. २००० साली तीर्थरुपांच्या दफनानंतर त्यांच्या कबरीवरची फुलं सुकायच्या आत चिरंजीव बशर अल असाद यांनी दमास्कसला पाचारण केलं उत्तर कोरियाच्या अणुतंत्रज्ञांना. उत्तर कोरियन शास्त्रज्ञांच्या मदतीने आणि सीरियन शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली एक गुप्त अणुभट्टी सिनेरियाच्याच वाळवंटी भागात उभारायची योजना या भेटीत शिजली. पुढे २००२ साली या दोघांना सामील झाला इराण. या तीन देशांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्रिसूत्री करार गुप्तपणे जन्माला घातला. ज्यानुसार उत्तर कोरिया सीरियाच्या भूमीवर गुप्तपणे अणुभट्टी बांधून देणार होता आणि या कामात पैसा पुरवण्याचं काम इराण करणार होता. या अणुभट्टीच्या घाट घातला जात होता अण्वस्त्रांसाठी...ज्यामुळे हा करार अतिशय गुप्त ठेवण्याच्या आणाभाका या भेटीत घेतल्या गेल्या होत्या.
सतत वाळवंटावर नजर रोखून असलेल्या अमेरिकी हेरखात्याला आणि शेजारीच सदैव जागरूक असणाऱ्या इस्राएलच्या मोसादला या सगळ्याची गंधवार्ताही नव्हती. नाही म्हणायला उत्तर कोरियाचं आणि सीरियाचं साटंलोटं जुळल्याची कुणकुण या दोघांना लागलेली होती, पण प्रकरण अणुभट्टी उभारण्यापर्यंत पुढे गेलं आहे हे या दोघांनाही माहित नव्हतं. या बातमीला पाय फुटले एका अक्षम्य चुकीमुळे, ज्यातून पुढे घडलेलं रामायण म्हणजेच ऑपरेशन ' आउटसाइड द बॉक्स

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users