एकटी

Submitted by रूपाली विशे - पाटील on 12 February, 2021 - 11:02

एकटी ...!!
______________________________________

ती स्टेशनवर उतरली तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेलेले. तिच्या रेल्वे प्रवासादरम्यान एका स्टेशनवर ओव्हरहेड वायर तुटल्याने सगळा घोटाळा झाला ..आणि तिची गाडी पाच तास उशिराने तिच्या इच्छित स्थळी पोहचली. गाडीतून उतरल्यावर तिने सभोवताली नजर फिरवली. त्या सुनसान स्टेशनवर गाडीतून तिच्याशिवाय एकही प्रवासी उतरला नाही. संपूर्ण स्टेशनवर दिव्यांचा उजेड होता, तरीही ते स्टेशन तिला भकास जाणवलं. तशी ती खूप धैर्यवान होती. पण अश्या मध्यरात्रीच्या वेळी एकटीने त्या भयाण शांततेत एकाकी उभ्या असलेल्या स्टेशनवर असणं हे नक्कीच धोकादायक होतं. भीती म्हणावी तर भुताखेतांची भीती तिला कधी वाटत नव्हतीचं. परंतु जर अश्या अवेळी एकटी स्त्री एखाद्या पापी नजरेस पडली , तर पापी वृत्तीच्या माणसातलं भूत जागं होऊन एखादं संकट आपल्यावर ओढवू शकतं या विचाराने ती धास्तावली. पण मुळातच ती हिंमतवान असल्याने तो विचार तिने मनातून झटकन उडवून लावला. यदा-कदाचित दुर्दैवाने असं संकट जर तिच्या पुढ्यात उभं ठाकलं असतं तरीही ती एक-दोघांना नक्कीच भारी पडू शकली असती, कारण राष्ट्रीय पातळीवरची कराटेपटू होती ती. खूप पदके जिंकली होती तिने कराटे स्पर्धेत!... तरीही शेवटी भीती हा माणसाच्या स्वभावाचा नैसर्गिक गुण आहे. नाही म्हटलं तरीही भीतीची पुसटशी रेषा तिच्या मनात उमटली. ती प्लॅटफॉर्मवरून चालू लागली. समोर रेल्वेपूल होता. ती पूलाच्या पायऱ्या भरभर चढू लागली. वातावरणात गारवा भरलेला. ते स्टेशन एका अनामिक गूढ वलयात असल्यासारखं तिला भासलं. जणू एखाद्या गूढकथेत असतं तसं..! गूढकथा, भयकथा वाचल्याचा परिणाम आहे हा सगळा..! ती मनातल्या मनात हसली. पायऱ्या चढत असताना तिला कोपऱ्यात हलकीशी हालचाल जाणवली. तिने तिथे नजर टाकली. दोन गर्दुल्यासारखे दिसणारे इसम दारू पीत, विड्या ओढत बसलेले. त्यांना पाहून तिला जरा हायसं वाटलं. त्या एकाकी स्टेशनवर कुणीतरी आपल्यासारखं सजीव आहे, हे पाहून तिला जरा बरं वाटलं. पण अचानक तिच्या मनात विचार आला की, हया नशेखोर गर्दुल्ल्यांचा काही भरोसा नाही. पेपरात नेहमी त्यांनी केलेल्या गुन्हांच्या बातम्या वाचनात येतात. परंतु आता तिला घाबरून चालणार नव्हतं, कुठलंही संकट आलं तरी त्याला तोंड द्यायची तयारी होती तिची. नशेच्या गुंगीत असलेल्या गर्दुल्ल्यांचं लक्ष अचानक समोरून येणाऱ्या पांढराशुभ्र वस्त्रातल्या सावलीवर गेलं. त्‍यांची नशा एका झटक्यात उतरली. ते धडपडत, पडत, ठेचाळत पुलावरून धावत सुटले. त्यांना तसं पळताना पाहून तिला खूप हसायला आलं. आपल्याला पाहून रात्रीचा भटकता आत्मा समजले की काय? एखादया भयपट सिनेमात असतं तसं गाणं जोरात म्हणावं का बरं? त्या दोन गर्दुल्ल्यांची फिरकी घेण्याची तिला हुक्की आली. पण तिने स्वतःला आवरलं. ती हसत-हसत पूलाच्या पायऱ्या उतरत असतानाच अचानक एक काळं, मरतुकडं कुत्रं तिच्या अंगावर येऊन भेसूर आवाजात रडू लागलं. ती दचकली. तिने प्रसंगावधान दाखवत पर्समधून बिस्कीटचा पुडा काढून त्यातली बिस्किटे त्या कुत्र्यासमोर फेकली. ते काळं कुत्रं शांत झालं. बिचारे...!! उपाशी असेल.! ....माणसं पण ना उगाच रडणाऱ्या कुत्र्याला दुषणं देतात. त्याचं रडणं अशुभ मानतात. रडू काय फक्त माणसालाचं येतं काय? पोटात उसळणारा भूकेचा डोंब साऱ्या प्राण्यांना रडवणारचं.. नैसर्गिक आहे ते...! ती विचारातच पुढे चालू लागली. तिला आठवलं, आईला फोन करायला हवा. तिने मोबाईल पर्समधून बाहेर काढला. अरे देवा! मोबाईल बंद पडलेला. तिला तिच्या वेंधळेपणावर राग आला. आपण गाडीमध्ये मोबाईलवर मायबोलीवरचे वाचन करत बसलो आणि इथे फोनच्या बॅटरीने मान टाकलेली..!. काय बरं करावं आता? आईचा जीव काळजीने वर - खाली होत असेल! तरी दादा आपल्यासोबत येत होता आपल्याला पोहचवायला..! पण आपण त्याला आपल्यासोबत येण्यास विनाकारण हट्टाने मनाई केली. ती मनातल्या मनात स्वतःला दोष देऊ लागली.

वैद्यकीय अधिकारी म्हणून स्टेशनजवळ असणाऱ्या खेड्यातील सरकारी रुग्णालयात तिची नियुक्ती झालेली. शहरापासून लांब... शहरातले प्रदूषण, गोंगाट यापासून दूर ... स्वच्छ हवा व शांत, निसर्गरम्य ठिकाणी नोकरीनिमित्ताने राहता येईल आणि गाव आदिवासी वस्तीचे असल्याने आदिवासींचे राहणीमान, त्यांची संस्कृती जवळून अनुभवता येईल ह्या दुहेरी उद्देशाने तिने घरच्यांचा विरोध डावलून ही नोकरी स्वीकारलेली..!
ती चालत होती आपल्याच विचारात. ती स्टेशनबाहेर आली. बाहेर शुकशुकाट होता. त्या एकाकी स्टेशनच्या आसपास शहरीकरणाचे वारे वाहत नसल्याचं तिच्या ध्यानात आलं. दुसरा दिवस उजाडल्याशिवाय आपल्याला स्टेशनबाहेर पडता येणार नाही हे तिला कळून चुकलं. ती पुन्हा मागे फिरली. चौकशी करावी म्हणून ती स्टेशनमास्तरच्या केबिनच्या दिशेने चालू लागली. तिने हळूच केबीनचा दरवाजा उघडला. स्टेशनमास्तरने मस्तपैकी खुर्चीत ताणून दिलेली होती. त्याच्या घोरण्याच्या आवाजाने तिथली भयाण शांतता भंग पावत होती. तिने केबिनच्या दरवाज्यावर टकटक केलं. स्टेशनमास्तर गाढ झोपेत होता. त्याने काहीही प्रतिसाद दिला नाही. तिने एक दोन- वेळा हाका मारल्या. पण हाय रे कर्मा !! स्टेशनमास्तर कुंभकर्णाच्या वंशातला असावा असं मनातल्या मनात म्हणत ती तिथून निघून गेली. अचानक थंड हवेच्या झोताने व कुणीतरी हाका मारतेयं असा भास झाल्याने स्टेशनमास्तर खुर्चीत खडबडून जागा झाला. त्याने दरवाज्याबाहेर नजर टाकली. परंतु त्याच्या नजरेस कुणीही पडलं नाही. एवढ्या रात्री इथे कोण येऊ शकणार असा विचार करत तो पुन्हा खुर्चीत आरामात झोपून घोरू लागला. ती प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूने चालू लागली. प्लॅटफॉर्मच्या शेवटच्या टोकाला असणाऱ्या बाकड्यावर कुणीतरी बसलेलं तिला लांबून दिसलं. ती मनातून थोडीशी घाबरली. एवढ्या रात्री कोण असेल बरं? आपल्यासारखंच कुणीतरी प्रवासी असू शकेल! विचारातच ती बाकड्याजवळ पोहचली. काळा चष्मा लावलेली एक वयस्कर स्त्री तिथे बाकड्यावर बसलेली होती. तिच्या हाताशी काठी होती. त्या स्त्रीच्या अवतारावरून तिने ताडलं की, ती स्त्री नक्कीच भिकारी असावी. रात्रीच्या वेळी... भयाण शांततेत... गूढरित्या उभ्या असलेल्या त्या स्टेशनवर कुणी भिकारी असो किंवा इतर कुणी.. सोबतीला आपल्यासारखं माणूस आहे ना मग पुरे झाले की..!! ती मनात म्हणाली. बाकड्यावरच्या स्त्रीला पाहून तिच्या जीवात जीव आला. कदाचित ती आंधळी असावी हेही तिच्या नजरेने ओळखलं. ती तिथे पोहचताच अचानक तिथलं वातावरण थंड झालं. कुणाची तरी येण्याची चाहूल लागली तशी ती स्त्री बाकड्यावर अंग चोरून बसू लागली.

" कोण ....कोण आहे?" ती स्त्री कापऱ्या आवाजात म्हणाली.

"मी ..मी आहे मावशी..!!" ती उत्तरली.

" एवढ्या रात्री... इथे ?" त्या स्त्रीच्या आवाजात थरथर जाणवत होती.

आपल्याला पाहून ती स्त्री घाबरली आहे, हे बघून तिला भारी गंमत वाटली. आपल्याला सगळे भूत समजतात की काय ? या विचाराने पुन्हा एकदा तिला हसू आलं. तिने त्या बाकड्यावर आपली बॅग ठेवत सगळी कहाणी त्या स्त्रीला ऐकवली. तिच्या अंदाजाप्रमाणे ती स्त्री आंधळी तसेच भिकारी होती. ती स्त्री चुकून ह्या स्टेशनवर उतरली आणि तिला आता तिच्या राहत्या ठिकाणी जायला पहाटेच्या गाडीशिवाय पर्याय नव्हता. मग नाईलाजाने ती स्त्री त्या एकाकी स्टेशनवर बसून राहिली. चला..! आता उजाडेपर्यंत कुणीतरी आपल्या सोबतीला आहे ह्या विचाराने ती निश्चिंत झाली. बसल्याजागी थोड्या वेळासाठी तिचा डोळा लागला.

अचानक तिला जाग आली. मघासचं काळं कुत्रं बाकड्याजवळ येऊन भेसूर आवाजात रडू लागलं. एक काळी सावली तिच्यासमोर उभी राहिली. तिने डोळे ताणून पाहीलं.. बापरे..!!!... त्या... त्या काळ्या सावलीला शीरच नव्हतं. तिला त्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत दरदरून घाम फुटला. जीवाच्या भीतीने ती बाकड्यावरून उठत धावत सुटली. अचानक तिला ठेच लागली आणि ती प्लॅटफार्मवर जोराने आदळली. ती मोठ-मोठ्या आवाजात रडू - ओरडू लागली.. आणि अचानक तिचे डोळे झोपेतून खाडकन उघडले. तिचं सर्वांग घामाने डबडबले. तिला भयानक स्वप्न पडलं होतं. ती जोर-जोराने श्वास घेऊ लागली. तिने बाजूला पाहीलं. ती भिकारी स्त्री बाजूला नव्हती. तिने घाबरून आजूबाजूला पाहिलं. तिने घड्याळात पाहिलं तर रात्रीचे तीन वाजून पंधरा मिनिटं झालेली. हवेतल्या गारव्याने तिला थंडी वाजू लागली. तिचे हात-पाय थंड पडू लागले. दात कडाकडा वाजू लागले. तेवढ्यात तिला समोरून ती भिकारीण येताना दिसली. तिला पाहून तिची भीती जरा कमी झाली. ती स्त्री तिच्या शेजारी येऊन बसली.

"तुला भीती वाटत नाही का इथे?" भिकारीणीने तिला विचारलं. तिने त्या भिकारीणीच्या प्रश्नावर काहीही उत्तर दिले नाही.

"मावशी, तुम्हांला भीती वाटत नाही का?" तिने तिला वाजणाऱ्या थंडीमुळे कुडकुडत अचानक त्या भिकारीणीला प्रतिप्रश्न केला.

" भीती..? कुणाची भीती?" भिकारीण उदास, कापऱ्या आवाजात म्हणाली.

" चोरांची..... भूतांची...!!! तिने अडखळत विचारलं.

" लुटण्यासारखं काय आहे माझ्याकडे ...तर चोरांची भीती वाटेल मला? आणि भूतांचं म्हणशील तर... जर समजा भूत माझ्यासमोर आलं तरीही मला दिसणार नाही.!! . दरिद्री आणि अंधारमय जीवनाला कुणाची आलीयं भीती?..!" भिकारीण उपहासाने हसली. तिला त्या भिकारी स्त्रीचे उत्तर ऐकून वाईट वाटलं. तिला नेहमीचं असहाय्य लोकांचं जीणं पाहून कणव वाटत असे. दोघी बराच वेळ बाकड्यावर शांत बसून राहिल्या. ती समोर पाहत आपल्याच विचारात गुंतून पडली. पुन्हा एकदा तिने घड्याळात पाहिलं. चार वाजायला पाच मिनिटे बाकी होती. ती जागेवरून उठली. लांबवर दिसणाऱ्या रेल्वेमार्गावर तिने नजर फिरवली. लांबून तिला गाडीची लाईट दिसू लागली. पहाटेची कुठली तरी गाडी असावी असा विचार करत ती जागेवर येऊन बसली. गाडीच्या शिटीचा आवाज कानावर येऊ लागला. गाडी जवळ - जवळ येऊ लागलेली. ती सुपरफास्ट एक्सप्रेस होती. त्या गाडीला त्या स्टेशनात थांबा नव्हता. तेवढ्यात भिकारीण जागेवरून उठली. काठीने कानोसा घेत ती प्लॅटफॉर्मवरून चालू लागली. आता कुठे निघाली असावी बरं ही ? ती विचारात पडली. गाडी स्टेशनात पोहोचतच होती ....तेवढ्यात अचानक त्या भिकारीणीने आपल्या चालण्याची दिशा बदलली आणि ....आणि.... डोळ्यांचं पातं लवते ना लवते तितक्यात भरधाव वेगात समोरून येणाऱ्या गाडीसमोर त्या भिकारीणीने स्वतःला झोकून दिलं. अचानक तिच्या डोळ्यासमोर हे दृश्य घडल्यामुळे भीतीने तिच्या काळजाचा थरकाप उडाला. ती जागेवरच मोठ्यांने ओरडू लागली. तिच्या कंठातून आवाज फुटत नव्हता. तसंपण ओरडून काहीही फायदा झाला नसता कारण आजूबाजूला तिचा आवाज ऐकायला चिटपाखरूही नव्हतं. ती बसल्याजागीच त्या बाकड्यावर कोसळली. पहाटेची गाडी पकडण्यासाठी आलेल्या प्रवाश्यांच्या आवाजाने तिने डोळे उघडले. घाबरलेल्या नजरेने ती इथे-तिथे पाहू लागली. हिवाळ्याचे दिवस असल्याने अजून अंधार होता. उजाडायला अजून वेळ होता. ती बाकड्यावर उठून बसली. रात्रीचा प्रसंग आठवून पुन्हा एकदा तिला रडू कोसळलं. तिला रडताना पाहून एक स्त्री प्रवासी तिच्याजवळ आली. तिची आपुलकीने चौकशी करू लागली. तिने रडत- रडत रात्रीची कहाणी त्या स्त्री प्रवाश्याला ऐकवली. तिचं रडणं पाहून बाजूचे प्रवासी तिच्या आजूबाजूला जमा झाले. तिने सांगितले की, इथे एका भिकारी स्त्रीने गाडीखाली झोकून देत आत्महत्या केली आहे. गाडीखाली रेल्वेमार्गावर अपघात घडला असावा म्हणून सगळ्यांनी सभोवताली शोध घेतला.पण अपघात झाल्याची कुठलीही खूण कुणाच्याही दृष्टीस पडली नाही. तिला घेऊन सारे स्टेशनमास्तरच्या कार्यालयात आले. त्यांनी तिथेही रात्रीच्या अपघाताची चौकशी केली.. परंतु त्या रात्री अपघात घडल्याची तशी कुठलीही नोंद तिथे झालेली नव्हती. स्टेशनमास्तरने अलीकडल्या तसेच पलीकडल्या स्टेशनवर रात्रीच्या अपघातासंदर्भात चौकशीसाठी फोन केले. पण त्यारात्री तसा कुठलाही अपघात रेल्वेमार्गावर घडला नव्हता. तिने सांगितलेली कहाणी ऐकून स्टेशनमास्तरला अचानक काहीतरी आठवलं.

"हो.. मॅडम .! तुम्ही सांगत आहात तसा अपघात घडला होता इथे!!. एका आंधळ्या भिकारणीने त्या प्लॅटफॉर्मवरच्या टोकावरून भरधाव ट्रेनखाली स्वतःला झोकून दिले होते... पण ते तीन दिवसांपूर्वी...तशी नोंद आहे रजिस्टरमध्ये..!" स्टेशनमास्तरने रजिस्टर उघडले. त्याचं बोलणं ऐकून तिला अजूनच धक्का बसला. ती भयचकीत नजरेने इथे-तिथे पाहू लागली... आणि अचानक तिची नजर स्थिरावली समोरच्या भिंतीवर ... अपघातात सापडलेल्या मृत व्यक्तींचे फोटो असलेल्या पोस्टरवर..! आणि ती थरथरत्या हाताने बोटं उंचावून सगळ्यांना समोर दाखवू लागली. तिची नजर पोस्टरवरच्या एका फोटोवर खिळली. तिला काहीतरी सांगायचं होतं.. पण .. पण ..तिच्या कंठातून आवाजच फुटत नव्हता. तिचे डोळे अनामिक भीतीने विस्फारले. आता तिला पुन्हा एकदा चक्कर येऊ लागलेली... कारण... कारण की, त्या भिंतीवर चिटकवलेल्या मृत व्यक्तींच्या फोटोंमधल्या त्या आंधळ्या भिकारणीचे धडावेगळ्या झालेल्या शिरावरचे डोळे तिच्याकडेच रोखून पाहत होते..... एकटक...!!

समाप्त...!

धन्यवाद..!

रुपाली विशे - पाटील

____________________ XXX__________________

टिप - सदर कथा काल्पनिक असून वाचकांचे निव्वळ मनोरंजन व्हावे ह्या हेतूने लिहिली आहे.

____________________ XXX__________________

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

बाप रे ।
खरंच भिती वाटली ना रूपाली Happy
आधी वाटलं जी कथा सांगतेय तीच भुतनी आहे का?? मस्त जमलीए भयकथा !!

मृणाली, लावण्या, सामो..!!
प्रतिसादासाठी मनपूर्वक धन्यवाद ..!

खरंच भिती वाटली ना रूपाली Happy>> म्हणजे मी आता घाबरवू शकते तर..! (ह.घे.)

छ्या शेवटपर्यंत ती बाई भूत निघेल म्हणून आशेवर होतो.. पण पोपट झाला Happy

त्यात नुकतेच जब वुई मेट पाहिल्याने सारखी करीना कपूर डोळ्यासमोर येत होती Proud

कथा मात्र छान जमलीय.. लिहीत राहा

गर्दुल्यांना सावली दिसली तेव्हाच भूतकथा असल्याची चाहूल लागली. संदर्भ छान पकडले आहेत. सकाळ लवकर झाल्यामुळे कथा थोडक्यात आटोपली असे वाटले. पुढील कथेसाठी हार्दिक शुभेच्छा.

सिमंतीनी, अस्मिता, ऋन्मेष, च्रप्स, वर्णिता, भाग्यश्री, किशोरजी ...!!
मनपूर्वक धन्यवाद तुम्हां सर्वांना कथा आवडल्याबद्दल आणि आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल..!!

सकाळ लवकर झाल्यामुळे कथा थोडक्यात आटोपली असे वाटले>>> हो किशोरजी...! कदाचित अजून फुलवता आली असती कथा पण थोड्यात गोडी म्हणून लवकर आटोपती घेतली.

छान.