मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग १२

Submitted by Theurbannomad on 10 February, 2021 - 12:05

इस्राएलच्या वकिलातीने ब्रिटिश वर्तमानपत्राकडून आलेल्या या अहेराच्या पाकिटाचा स्वीकार करायलाच नकार दिला. ' नो कंमेंट्स ' इतकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. अर्थ साधा होता....या सगळ्या प्रकाराचा काय अर्थ लावायचा तो लावा, पण सर्वस्वी तुमच्या जबाबदारीवर तो लावा असा तिढा या प्रतिक्रियेने संडे टाइम्सच्या वाट्याला आला. हे सगळं होत असताना तिथे तेल अवीवस्थित मुख्यालयात पंतप्रधान पेरेझ ब्रिटनमध्ये होत असलेल्या प्रत्येक घडामोडींवर बारीक नजर ठेवून होते. मोसादप्रमुख अडमोनी यांनी आपली हस्तकांची आणि हेरांची फौज कामाला लावलेली होतीच. अखेर मोसाद्ला हवा असलेला मोहोरा त्यांच्या पदरात पडला ब्रिटिशांच्या गाफीलपणामुळे.
ब्रिटिशांची स्वतःची अशी एक विशिष्ट कार्यशैली असते...त्यांचा स्वतःवर इतका पराकोटीचा आत्मविश्वास असतो की बरेच वेळा आपल्या पायाखाली काय सुरु आहे हे बघण्याची तसदीही ते घेत नाहीत. पीटर हौनाम यांनी या सगळ्या प्रकाराचा इतका गाजावाजा केला, की त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचवणारा ऑस्कर गरेरो बाजूलाच पडल्यासारखा झाला. त्याला संडे टाइम्सने या बातमीसाठी साडेतीन लाख डॉलर्स देण्याचं कबूल केलं होतं...त्यातले काही डॉलर्स त्याच्या पदरात पडलेही होते...पण पत्रकाराला लक्ष्मीबरोबर सरस्वतीही प्रिय असते....ऑस्करला या शोधपत्रकारितेचं योग्य ते श्रेय हवं होतं. संडे टाइम्स आपल्याला बाजूला पाडतंय हे बघून त्याच्या मनात शंकाकुशंका यायला लागल्या. पुढे जाऊन आपल्याला कबूल केलेले पैसेही त्यांनी दिले नाहीत, तर काय करा ही शंकाही आता त्याच्या डोक्यात घर करायला लागली.
संडे टाइम्सने वानूनूला जगापासून सुरक्षित ठेवायला जितकी काळजी घेतली, तितकी तत्परता त्यांनी ऑस्करबद्दल दाखवली नाही आणि याच बारीकशा फटीतून पुढे मोसादने या प्रकरणात शिरकाव केला. झालं असं, की ऑस्करने आपल्याकडचा ऐवज घेऊन इंग्लंडमधल्याच ' संडे मिरर ' ला गाठलं. हेही संडे टाईम्ससारखं प्रतिष्ठित वर्तमानपत्र. हेही शोधपत्रकारितेसाठी प्रसिद्ध. १९६१ साली ' प्रोफुमो अफेयर ' सारख्या खळबळजनक वृत्तांतासाठी या वर्तमानपत्राला बरेच पुरस्कारही मिळाले होते. त्यांच्या दारात ऑस्करसारखा मोहोरा स्वतःहून उभा राहिल्यावर त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचं ठरवलं....फक्त हा फायदा ते घेणार होते इस्राएल आणि मोसादसाठी. हे वर्तमानपत्र मूळचं ' संडे पिक्टोरियल ' - लॉर्ड रॉथमेअर यांचं. हे इंग्लंडमधले लब्धप्रतिष्ठित ज्यू. या वर्तमानपत्राच्या कार्यालयात ज्यू लोकांचा राबता नेहेमींचाच. या वर्तमानपत्राचे सर्वेसर्वा रॉबर्ट मॅक्सवेल यांनी हातात ऑस्करच्या सगळ्या ऐवजाचं बाड पडल्यावर सरळ इस्राएलच्या आपल्या जुन्या परममित्राला दूरध्वनी लावला.
त्यांचे हे परममित्र म्हणजे इस्राएलचे उपपंतप्रधान यित्झाक शमीर. शमीर यांनी आपल्या काही खास लोकांना ते सगळं बाड तपासायला सांगितलं. खरोखर डिमोना प्रकल्पाच्या एक एक महत्वाच्या जागेची खास माहिती त्या सगळ्या कागदपत्रांमध्ये आणि छायाचित्रांमध्ये होती. या सगळ्यातून इस्राएलला वानूनूकडच्या माहितीची सत्यता पडताळता आली. हा ऐवज संडे टाइम्सकडे आधीच होता, त्यामुळे तो नष्ट करणं आता अशक्य होतं...शेवटी मोसादने आपल्या चाणाक्ष बुद्धीने एक जबरदस्त चाल केली.
सगळ्यात आधी ' संडे मिरर ' ने आपल्या पहिल्या पानावर एक मोठी बातमी छापली. इस्राएलच्या अण्वस्त्रांबद्दल बोगस माहितीच्या आधाराने एका ' सामान्य टॅक्सी ड्राइवर ' ने उगीच सनसनाटी निर्माण केली आहे आणि या बातमीत काहीही तथ्य नसून या सगळ्या प्रकारचा मूळ हेतू फक्त खोडसाळपणाचा आहे असा लेख या वर्तमानपत्राने छापला. पुढे याच विषयावर अनेक लेख छापून त्यांनी जनमानसात खळबळ उडवून टाकण्याची क्षमता असलेल्या या प्रकरणातले हवाच काढून घेतली. ' संडे टाइम्स ' ने ही बातमी पूर्णत्वाला नेण्यात अक्षम्य वेळकाढूपणा केला होताच, पण काहीही गरज नसताना इस्राएलच्या वकिलातीपासून अनेकांना यात गोवण्याचा प्रयत्न केला होता. हा घाव त्यांच्या वर्मि बरोब्बर लागला. इस्राएलच्या वकिलातीने दिलेल्या ' नो कंमेंट्स ' या दोन शब्दांच्या आधाराने ही सगळी बातमीच किती तथ्यहीन आहे हे आता संडे मिररने जाहीरपणे सांगायला सुरुवात केली.
या सगळ्यामुळे भांबावून संडे टाइम्सने एक वेगळाच पवित्र घेतला. त्यांनी आपल्याकडची छायाचित्र पाठवली अमेरिकेत राहत असलेल्या आणि खुद्द ओपेनहायमार यांचे नावाजलेले शिष्य म्हणून प्रख्यात असलेल्या अणु - भौतिकशास्त्रज्ञाकडे .त्यांचं नाव थिओडोर टेलर. उद्देश हा, की त्यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीच्या हवाल्याने आपल्याकडच्या ऐवजाची सत्यता पडताळून दिली की लोकांमध्ये पसरलेल्या गैरसमजाविरुद्ध समर्थ प्रतिवाद उभा करता येईल. परंतु त्यांना हे शेवटपर्यंत समजलं नाही, कि मोसादच्या उद्देश केवळ माहितीचं खंडन करण्याचा नव्हताच...त्यांना वानूनू हवा होता. जी बातमी फुटलेली आहे, ती कधी ना कधी बाहेर येणारच, तेव्हा एकीकडे त्या बातमीवर शक्य तितका धुरळा उडवत ठेवायचा आणि दुसरीकडे वानूनूला पकडून इस्राएलला न्यायचं, जेणेकरून त्याच्याकडून अजून कसली माहिती फुटून नवा कोणता धोका निर्माण होणार नाही, हा मोसादच्या खरा ' प्लॅन ' होता. मोसादच्या कामाचं हे एक मोठं वैशिष्ट्य - समोरच्या सावजाला चहूबाजूंनी घेरून त्याला भंडावून सोडायचं आणि आपला कार्यभाग साधायचा.
मुख्य बातमीचं प्रकाशन अशा प्रकडे लांबणीवर पाडल्यावर मोसादने आता दुसऱ्या महत्वाच्या कामावर लक्ष केंद्रित केलं - वानूनू याला जेरबंद करून इस्राएलमध्ये परत आणायचं. या कामाची सुरुवात तशीही खूप आधी झालेली होतीच... निवडलेलं स्थळ होतं इटली. आपलं ' नोगा ' नावाचं नौदलातलं एक छोटं जहाज त्यांनी भूमध्य समुद्रातून हलवलं आणि इटलीच्या फ्युमिचिओ बंदरात नांगरून ठेवलं. जहाजाच्या कप्तानाला आदेश होता, की काही दिवसांमध्ये ' काही महत्वाच्या लोकांना ' इटलीहून इस्राएलला आणण्याची कामगिरी त्याला पार पाडायची आहे.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users