मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग ७

Submitted by Theurbannomad on 8 February, 2021 - 05:56

२० मे हा दिवस अर्जेंटिनासाठी अतिशय महत्वाचा होता. देशाचा १५०वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी अर्जेन्टिना देश सज्ज झालेला होता. जगभरातल्या अनेक देशांमध्ये निमंत्रणं धाडली गेली होती. या निमंत्रितांपैकी एक होते इस्राएलचे शिक्षणमंत्री अब्बा एबान. इस्राएलच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व त्यांच्या हाती दिलेलं होतं. इस्सर यांनी 'अल एल ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इस्राएलच्या राष्ट्रीय विमान कंपनीतर्फे या शिष्टमंडळाची खातरदारी म्हणून अर्जेन्टिना येथे जाण्यासाठी एक खास विमान दिलं. ब्रिटानिया ' व्हिस्परिंग जाएंट ' या नावाने ओळखलं जाणारं हे विमान. यामागचं खरं कारण अब्बा एबान यांना सांगण्यात आलं नसलं, तरी या आदरातिथ्याने स्वारी चांगलीच सुखावलेली होती. या सगळ्यामागे हेतू हा होता, की एचमनसारखं महत्वाचं ' सामान ' सुरक्षित आणि सुखरूप इस्राएलपर्यंत पोचावं...
फ्लाईट ६०१ अखेर ११ मे रोजी तेल अवीव येथून निघणार हे नक्की झालं. इस्सर यांनी सर्वप्रथम अल एलमध्ये आपल्या दोन विश्वासू सहकाऱ्यांना - मोर्डेकाई बेन अरी आणि एफ्रेम बेन आर्टझी यांना - सगळ्या कामगिरीची कल्पना दिली. वैमानिक म्हणून निवडलेल्या झ्वी तोहर याला त्यांनी एक तंत्रज्ञ बरोबरीला दिला. अचानक अर्जेन्टिनाच्या विमानतळावरच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय विमानोड्डाण करायचं झालं, तर त्याची वैमानिकाला मदत होणार होती. विमानात खाद्यपदार्थांचा साथ पुरेसा ठेवण्याची सूचना दिली गेली. शिवाय वैमानिकाला सतत सजग राहण्याचीही आठवण करून देण्यात आली.
या सगळ्या सरंजामानंतर इस्सर स्वतः १ मे रोजी ब्युनोस आयर्स येथे आले. त्यांच्या हाती होता युरोपचा पासपोर्ट. त्यांनी वेगवेगळ्या अपार्टमेंट्समध्ये आणि हॉटेलांमध्ये उतरलेल्या सगळ्या सहकाऱ्यांना एका खास अपार्टमेंटमध्ये एकत्र केलं. १२ जणांनी प्रथमतः अर्जेन्टिनामध्ये अख्ख्या ' ऑपरेशन टीम ' ला एकत्र पाहिलं. ही इस्सर यांची खास शैली. शेवटपर्यंत सगळ्या चमूला एका ठिकाणी न येऊ देण्यामागे हेतू हाच, की दगाफटका झालाच तर सगळ्यांवर संक्रांत येणार नाही. बरेचदा त्यांचे सहकारी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या असण्याबद्दलही अनभिज्ञ ठेवले जायचे. इस्सर यांच्या मोहिमा यशस्वी होण्यामागे त्यांची ही अशी काटेकोर आखणी असायची.
इस्सर यांनी आपल्या सहकाऱ्यांना एकमेकांशी संपर्क ठेवण्याची एक जगावेगळी युक्ती सांगितली. अर्जेन्टिनाच्या सॅन फर्नांडो आणि आजूबाजूच्या भागातल्या अडीचशे-तीनशे कॉफी शॉप्सचे पत्ते त्यांनी गोळा करून एका छोट्याशा डायरीत लिहिले. इस्सर रोज सकाळी बाहेर पडायचे ते पायपीट करत एकेका कॉफी शॉपमध्ये थोडा थोडा वेळ बसायचे. ते कधी कोणत्या कॉफी शॉपमध्ये असतील, याची आदल्या रात्री व्यवस्थित आखणी व्हायची. त्या त्या वेळी त्यांचे सहकारी त्या त्या कॉफी शॉपमध्ये इस्सर यांना नव्याने मिळालेली माहिती पुरवायचं काम करायचे. या सगळ्या माहितीची साखळी जोडत इस्सर यांनी आपल्याला हवे असलेले सगळे तपशील गोळा केले. त्याचं वेळी आपल्या काही सहकाऱ्यांना सांगून त्यांनी विमानतळाच्या वाटेवरचा एक बंगला भाड्याने घेतला. मोसादचेच दोन हेर पर्यटक म्हणून त्या बंगल्याच्या मालकाकडे गेले आणि त्यांनी हे काम केलं. हा बांगला नागरी वस्तीपासून लांब आणि बऱ्यापैकी निर्जन परिसरात होता. याशिवाय वेगवेगळ्या नावाने गाड्या भाड्याने घेणं हेही सुरु होतंच. बारा जणांपैकी एक गट सतत ऎचमन यांच्यावर नजर ठेवून होता. शेवटी १० मे रोजी ऎचमन यांना पकडायचं, ११ मे रोजी शिष्टमंडळाला घेऊन येणारं अल एलचं खास विमान ब्युनोस आयर्सला अल की वैमानिकाला संपारख करायचा आणि १२ मे रोजी ऐचमनचं गाठोडं घेऊन तेल अवीवला उड्डाण करायचं अशा पद्धतीचा ' फायनल प्लॅन ' इस्सर यांनी आखला.
शेवटपर्यंत व्यवस्थित आखणीप्रमाणे घटना घडत गेल्या आणि अचानक इस्सर यांना एक वाईट बातमी मिळाली. अर्जेन्टिनाच्या सरकारने बाहेरून येणाऱ्या आपल्या महत्वाच्या पाहुण्यांची गर्दी बघून एक निर्णय घेतला - एकदम इतक्या मोठ्या व्यक्तींना मोठ्या संख्येने देशात आणण्यापेक्षा थोड्या अंतराने त्यांना येऊ दिलं, तर त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था अधिक सक्षमतेने करता येईल या उद्देशाने त्यांनी पाहुण्यांच्या आगमनाच्या तारखा बदलल्या. आता अब्बा एबान आणि त्यांचं शिष्टमंडळ ११ मे ऐवजी १९ मे रोजी अर्जेन्टिनाला येणार होतं. आठवडाभराने मोहीम पुढे ढकलायला लागणार अशी चिन्ह इस्सर यांना दिसायला लागली. त्यांना भीती एकच होती - ऎचमन नेमका या आठवडाभरात हातचा निसटला तर काय? दुसऱ्या बाजूला त्यांना हेही कळत होतं, की मूळ मोहिमेच्या तारखा तशाच्या तशा पाळल्या तर आठ-नऊ दिवस ऎचमन याला एका परक्या देशात सुरक्षित ठेवण्याची जोखीम पत्करावी लागणार होती. ऎचमन नाहीसा झाल्यावर कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली, तर अर्जेन्टिनाच्या पोलिसांचा ससेमिरा मागे लागायचा धोकाही होताच.
इथे पुन्हा एकदा इस्सर यांनी आपल्या ' अंतर्मनाचा आवाज ' ऐकला. मूळ तारखेप्रमाणेच मोहीम पूर्णत्वाला न्यायची आणि तेल अवीवहून विमान येईपर्यंत ऐचमनला लपवून ठेवण्याचा धोका पत्करायचा निर्णय त्यांनी घेतला. सहकाऱ्यांच्या आग्रहामुळे १० मे ऐवजी ११ मे या दिवशी ही कामगिरी पार पाडायचा निर्णय झाला आणि सगळ्यांनी त्या दृष्टीने तयारी सुरु केली. इस्सर यांनी योजनेला पूर्णरूप दिलं. योजना काहीशी अशी होती - ऎचमन दररोज संध्याकाळी पावणे आठ - आठच्या सुमारास २०३ क्रमांकाच्या बसने केले गॅरिबाल्डी रस्त्यावरच्या एका बस थांब्यावर उतरतो आणि तिथून सावकाश पावलं टाकत अंधाऱ्या रस्त्याने चालत चालत आपल्या घराकडे जातो, तेव्हा त्याच अंधाऱ्या रस्त्यावर त्याला पकडायचं. चार-चारच्या दोन गटांमध्ये विभागलेले मोसादचे शिलेदार रस्त्याच्या कडेला दोन गाड्या लावून ऐचमनची वाट बघतील, त्यापैकी एक गाडी दुरुस्त करण्याचा अभिनय करत एक जण बाहेर उभा राहील, ऎचमन दिसताच तो आपल्या सहकाऱ्यांना इशारा करेल, ऎचमन गाडीजवळ येताच उघडलेल्या बोनेटच्या आडून गाडीत बसलेले दोघेजण ऐचमनला पकडतील, त्यापैकी एक त्याच्या तोंडावर क्लोरोफॉर्मचा कपडा दाबून त्याला बेशुद्ध करेल आणि शेवटी दोन्ही गाड्यांमधून हे सगळे जण त्या बंगल्याकडे जातील. ही योजना इस्सर यांनी सगळ्या बारीकसारीक तपशिलाचा विचार करून तयार केली होती. गाडीमध्ये डॉक्टर योना एलियन असणार होताच...क्लोरोफॉर्मच्या गुंगीतून जर ऎचमन सावरला तर त्याला गुंगीचं औषधं द्यायची कामगिरी त्याच्याकडे होती.
बंगल्यात पर्यटक म्हणून येऊन चार-पाच दिवस मुद्दाम हिरवळीवर ऊन खात पडून राहायचं काम होतं मिदाद आणि येहुदिथ निसीन्याहू यांचं. उद्देश हा, की हे दोघे खरोखरचे पर्यटक वाटावेत. शिवाय ऐचमनला बंगल्यावर आणल्यावर पुढे त्याला आठ-दहा दिवस बाहेरच्यांच्या नजरेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी बंगल्यात हव्या त्या सोयी करून ठेवणं ही महत्वाची कामगिरीही त्यांच्याकडे होती. औषधांचा आणि खाद्यपदार्थांचा साठा त्यांनी बंगल्यात तयार ठेवायचा होता.
कामगिरी फत्ते केल्यावर या चमूपैकी मागे राहिलेल्या प्रत्येकाला कोणत्या मार्गाने इस्रायलला पोचायचं आहे, याची पूर्ण माहिती इस्सर यांनी दिली होती. त्याचप्रमाणे कोणाला पोलिसांनी पकडलंच, तर तोंड न उघडण्याची ताकीद जरी इस्सर यांनी प्रत्येकाला दिली असली, तरी आपले हे कट्टर देशाभिमानी ज्यू शिलेदार कोणत्याही दबावाला अथवा छळाला बळी पडणार नाहीत याची त्यांना खात्री होती.
अखेर ११ मेचा तो दिवस उजाडला आणि इस्सर आणि त्यांच्या या जिगरबाज सहकाऱ्यांना आपलं सावज समोर दिसू लागलं. प्रत्येकाने आपल्या चेहेऱ्यावर खोट्या दाढीमिशा चिकटवला. डोक्यावर केसांचा टोप घातला. चेहऱ्यावर आवश्यक तास मेक-अप चढवला. आधीचे बारा जण - ज्यांनी ऎचमनवर पाळत ठेवण्यापासून घरं भाड्याने घेण्यापर्यंत सगळं काही केलं होतं, ते जणू काही नाहीसे झाले होते आणि त्यांची जागा पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या बारा जणांनी घेतली होती. इस्सर यांनीही आपलं राहतं हॉटेल सोडलं आणि आपलं सामान शहराच्या रेल्वेस्टेशनवर सामानाच्या खोलीत नेऊन ठेवलं. आज ते शहराच्या गजबजलेल्या बाजाराच्या भागात आले होते. इथे कॉफी शॉप्स अगदी पाच-पाच मिनिटांच्या अंतरावर असल्यामुळे त्यांना आपल्या सहकाऱ्यांना भेटणं सहज शक्य होतं. बरोबर त्यांना साथ देण्यासाठी आजूबाजूला होते रफी ईटन.
दुपारचे दोन वाजलेले होते. आखणी केल्याप्रमाणे हालचालींना सुरुवात झाली. सर्वप्रथम वेगवेगळ्या जागी पार्क केलेल्या दोन गाड्या ठरलेल्या मिनिटाला एरपोर्टजवळच्या त्या बंगल्याकडे निघाल्या.बरोब्बर साडेतीन वाजता बंगल्यासमोर या गाड्या बंगल्यासमोर उभ्या राहिल्या. बंगल्यात पुन्हा एकदा कोणी कोणी काय काय करायचं आहे, याची उजळणी झाली. झ्वी अहरोनी यांनी एक गाडी आपल्या हातात घेतली. त्यांच्याबरोबर होते रफी ईटन, मोशे तवॊर आणि झ्वी मालकीन. दुसऱ्या गाडीत आवराम शालोम, याकोव्ह गात आणि डॉक्टर योना एलियन बसले. दोन्ही गाड्या बंगल्यासमोरून निघाल्या आणि वेगवेगळ्या मार्गाने ऎचमन यांच्या घराजवळच्या चौकापर्यंत आल्या. सगळ्यांनी आजूबाजूच्या परिसरात त्या दिवशी पोलीस बंदोबस्त नाही ना किंवा पोलिसांची गस्त सुरु नाही ना याची खात्री करून घेतली.
केले गॅरिबाल्डी रस्त्यावर दोन्ही गाड्या आडोशाला आल्या. ठरल्याप्रमाणे काळ्या रंगाची शेव्हरोले गाडी ऎचमन यांच्या घरासमोर जवळच उभी केली गेली. दुसरी ब्यूक गाडी जवळच पार्क करून त्यात चौघेजण दबा धरून बसले. झ्वी अहरोनी चालकाच्या जागी बसून होते. बाकीच्या तिघांपैकी दोघांनी गाडीचं बॉनेट उघडून आत काहीतरी खुडबुड करायला सुरूवात केली. साडेसात वाजलेले होते. परिसरात आता अंधार पसरलेला होता. २०३ क्रमांकाची ती बस त्या थांब्यावर ठरलेल्या वेळेप्रमाणे पावणेआठ वाजता आली खरी, पण त्यातून ऎचमन काही उतरला नाही. इस्सर यांनी जास्तीत जास्त आठ वाजेपर्यंत थांबायची परवानगी दिली होती. अजून एक-दोन बस येऊन गेल्या, पण ऎचमन यांचा पत्ता नव्हता.
अखेर रफी ईटन यांनी अजून तासभर थांबायचं निर्णय घेतला आणि सगळे जण पुन्हा एकदा आपल्या सावजाची वाट बघायला लागले. रफी यांचा हा निर्णय किती योग्य होता, हे सगळ्यांना अवघ्या पाच मिनिटात कळलं. पुढची २०३ क्रमांकाची बस थांब्यावर आली आणि त्यातून एक आकृती अंधारात उतरताना आवराम शालोम यांना दिसली. ' क्लेमेंट...ऎचमन...' त्यांच्या तीक्ष्ण नजरेने सावज हेरलं होतं. खाणाखुणा झाल्या आणि झ्वी अहरोनी सावध झाले. क्लेमेंट उर्फ ऎचमन शांतपणे पावलं टाकत आपल्या घराकडे निघाला होता. अचानक त्याच्या समोर उभ्या असलेल्या गाडीआडून झ्वी मालकीन पुढे आला. स्पॅनिश भाषेत त्याने क्लेमेंटशी बोलायला सुरुवात केली. क्लेमेंट थांबला आणि त्याने आपल्या खिशात हात घातला. अंधारात कोणीही नीट दिसत नसल्यामुळे त्याला खिशातली बॅटरी काढायची होती.
पुढे काही सेकंदात जे काही झालं, ते क्लेमेंट उर्फ ऎचमनच्या ध्यानीमनीही नव्हतं. मालकीन याने क्लेमेंट खिशात हात घालत आहे, हे बघून त्याच्यावर झडप घातली. कोण जाणे, त्याच्या खिशात पिस्तुल असलं तर, या विचारांनी त्याने एकदम झटापटीचा पवित्र घेतला. क्लेमेंटला बाजूच्याच मातीच्या ढिगाऱ्यावर ढकललं. क्लेमेंटची अस्फुट किंकाळी हवेत विरून गेली. त्याच्या तोंडावर कपडा दाबला गेला आणि त्याची गठडी वळून दोघा-तिघांनी त्याला शेव्हरोले गाडीच्या मागच्या आसनावर टाकलं. दोन बाजूंनी दोघे जण त्याला गच्च आवळून बसले. गाडी सुरु झाली आणि भरधाव वेगाने निघाली. मागोमाग ब्यूक गाडीनेही वेग घेतला. गाडीत ऎचमनच्या डोळ्यांवरचा चष्मा काढून एकाने काळ्या रंगाची पट्टी बांधली. हात पाय बांधले. त्याच्या कानात जर्मन भाषेत कोणीतरी बोलू लागलं. " शांत बस अन्यथा जीव जाईल..." ऎचमन समजायचं ते समजला.
बाजूच्या रफी ईटन यांनी ऎचमनच्या कपड्यांमधून आपला हात आत घातला. ऎचमनच्या डाव्या काखेखाली आणि पोटाच्या उजव्या बाजूला जखमेचे व्रण होते. ते व्रण आहेत याची खात्री झाल्यावर रफी यांनी आनंदाने मालकीन यांच्याकडे पाहिलं. खूण पटली होती. हजारो निरपराध ज्यू लोकांचं हत्याकांड घडवून आणणाऱ्या कलियुगातल्या या नाझी भस्मासुराला अखेर इस्राएलच्या या शूर शिलेदारांनी ताब्यात घेतलं होतं.नाझी अधिकाऱ्यांना सक्तीने आपल्या शरीरावर आपल्या रक्तगटाचं नाव गोंदवून घ्यावं लागे.डाव्या काखेखालचा तो व्रण हे गोंदण पुसून टाकण्याच्या प्रयत्नात ऎचमनच्या शरीरावर आलेला होता.
बंगल्यात बाकीचे आपल्या या पाहुण्याची वाट बघत होतेच. ऎचमन बंगल्यात आल्यावर त्याच्या तोंडात त्याने विषाची गोळी दडवलेला नाही ना, याची खात्री झाली. शरीरावरचे कपडे काढून त्याची तपासणी झाली. डोळ्यांवरचा काळ्या पट्टीमुळे काहीही दिसत नसल्यामुळे त्याला आजूबाजूच्या कोणाची ओळख पटत नव्हती. अखेर एक घोगरा आवाज त्याच्या कानात गुंजायला लागला. बोलणारा अस्खलित जर्मन भाषेत बोलत होता.
" तुझं नाव..."
" तुझ्या वडिलांचं नाव.. "
" तुझ्या आईच नाव..."
" तुझ्या नाझी सदस्यत्वाचा क्रमांक..."
शांतपणे ऎचमन उत्तर देत होता. लपवण्यासारखं काही उरलेलं नव्हतं. त्याने आपलं नाव आधी रिकार्डो क्लेमेंट, त्यानंतर ऑटो हेनिंजर आणि शेवटी विचारणाऱ्याच्या आवाजातली जरब वाढल्यावर ऑटो एडॉल्फ ऎचमन असं सांगितलं.
इथे इस्सर वेगवेगळ्या कॉफी शॉप्समध्ये थोडा थोडा वेळ बसून आपल्या सहकाऱ्यांची वाट बघत होते. अखेर त्यांच्या दोघा सहकाऱ्यांनी त्यांना खुशखबर दिली. इस्सर यांच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक दिसायला लागली. त्यांनी रेल्वे स्टेशन गाठलं आणि आपलं सामान उचललं. आणखी एका वेगळ्याच नावाने ते एका हॉटेलमध्ये उतरले. दुसऱ्या दिवशी बेन गुरियन यांच्या अभ्यासिकेत एक तरुण आला. तो होता इस्सर यांचा खास सहकारी याकोव्ह कारोझ. त्याने मोहीम फत्ते झाल्याची खबर गुरियन यांना दिली. गुरियन यांच्यासाठी हा दिवस आयुष्यभर लक्षात राहील असा होता...त्यांच्या जिगरबाज सहकाऱ्यांनी बाहेरच्या देशात जाऊन एका नराधमाला जिवंत पकडलेलं होतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. काही वर्षांपूर्वी मिसळपाववर अशीच मोसादवर असलेली सिरिज वाचली होती. ती तुम्हीच लिहिली होतीत का?

@ सायो
नाही. मी मिसळपाव वर अजून तरी काही लिहिलं नाहीये.

वाचले सगळे भाग ! मस्त लिहिताय .

आईकमन प्रकरणावर अशोक जैनांच पारध नावाचं पुस्तक आहे.त्यात हे प्रकरण सविस्तरपणे नोंदवलं आहे
Operation Finale नावाचा चित्रपट देखील ह्या प्रकरणावर निघालाय.बेन किंझले आईकमन च्या भूमिकेत आहे त्यात.

@ मोद
या लेखमालेचा उद्देश आहे मोसदने एकेका व्यक्तीला कसं पकडलं ते सांगायचा. बाकीच्या गोष्टी लिहिल्या तर खूप लिहायला लागेल...एकेक लेख आठ - दहा भागांचा होईल...

चांगली आहे लेखमालिका. आईकमनला पकडण्यापर्यंत जो थरार आहे तेव्हढाच थरार या घटनेनंतर त्याला अर्जेंटिनाहून इस्त्रायला आणण्यात सुद्धा आहे. तो भाग सुद्धा आला पाहिजे होता असे वाटते.

FYI
मिसळपाववर बोका ए आझम या नावाने "ओंकार पत्कीं"नी मोसाद ही मालिका लिहिली होती.
https://www.misalpav.com/node/34116

दोन वर्षांपूर्वी ते निवर्तले...

लेखमाला उत्कंठावर्धक, चित्तथरारक, माहितीपूर्ण आणि मॅटर of फॅक्ट अशी झालीय. अतिनाट्यमयता नाही हे एक बरे आहे.