मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग ६

Submitted by Theurbannomad on 8 February, 2021 - 05:55

आहारोनी स्वतः जातीने १९६० च्या फेब्रुवारी महिन्यात ब्युनोस आयर्स येथे उतरले.त्यांनी आपल्या काही जवळच्या विश्वासू सहकाऱ्यांना जमा केलं आणि केले चाकाबुको येथे त्या घराची नव्याने पाहणी करण्याचे आदेश दिले. ते सहकारी आले रिकाम्या हाताने...एव्हाना त्या घरात नूतनीकरणाचं काम सुरु झालेलं होतं. काही गवंडी आणि रंगारी सोडले, तर त्या घरात कोणीच दिसत नव्हतं. आहारोनी यांनी वेगळ्या पद्धतीने पुढचं काम करायचं ठरवलं. त्यांनी एका सहकाऱ्याला महागडं सिगारेट लायटर आणि सुगंधी शुभेच्छापत्र घेऊन त्या घराकडे पाठवलं. निकोलस उर्फ निक याच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्याच्या एका खास मैत्रिणीने हे पाठवलेलं आहे अशी बतावणी त्या सहकार्याने केली आणि त्या निमित्ताने निकचा नवा पत्ता विचारला.
त्या रंगाऱ्यांपैकी एकाने जवळच एका वर्कशॉपमध्ये निकचा भाऊ काम करतो, अशी माहिती पुरवली. निकचा नवा पत्ता कोणालाच ठाऊक नव्हता. हा निकचा भाऊ डिएटर चांगलाच बडबड्या स्वभावाचा निघाला. त्याने आपलं कुटुंब टुकूमान भागात वस्तीला गेल्याची माहिती दिली, पण त्याहून जास्त काही सांगितलं नाही. आहारोनी यांनी आपल्या सहकाऱ्यांना सतत त्या कामगारांकडे भुणभुण करत राहण्याचे आदेश दिले. शेवटी एकाने ऎचमन कुटुंबाचा नवा पत्ता एकदाचा सांगितला.
जवळच्याच सॅन फर्नांडो भागात अविजेन्डा नावाच्या वस्तीत एका घरात ऎचमन कुटुंब राहायला गेलेलं होतं. त्यांचं घर ओळखायची खूण होती त्या वस्तीतील एकमेव असं बाहेरून विटांचं बांधकाम दिसणारं घर. आहारोनी यांचं हे पथक मग तिथे गेलं. केले गॅरिबाल्डी नावाच्या रस्त्यावरचं ते घर ओळखायला विशेष प्रयास करावे लागले नाहीत.अखेर स्वतः आहारोनी जातीने तिथे गेले. त्यांच्या अंगावर होता छानसा सूट आणि हातात होती एक बॅग. बॅगेच्या हॅण्डलमध्ये दडवलेला होता एक छोटासा पण शक्तिशाली कॅमेरा. ' क्लेमेंट हाऊस ' च्या विरुद्ध बाजूला असलेल्या घराकडे आहारोनी गेले आणि तिथल्या एका बाईशी त्यांनी संवाद सुरु केला. आपण अमेरिकेच्या एका शिवणयंत्र तयार करणाऱ्या कंपनीकडून आलेलो आहोत आणि या भागात आपला कारखाना उभा करायला आपल्याला काही घरं हवी आहेत, अशी त्यांनी आपली ओळख करून दिली.
हा संवाद सुरु असताना त्यांनी एक्का बाजूला शिताफीने बॅगेच्या हॅण्डलमध्ये लपवलेल्या कॅमेऱ्याने ' क्लेमेंट हाऊस ' चे भरपूर फोटो काढले. दुसऱ्याच दिवशी त्यांनी थेट शहराच्या सरकारी दफ्तरात जाऊन ' क्लेमेंट हाऊस ' च्या जमिनीसंबंधी कागदपत्रं शोधून काढली. त्या कागदपत्रांवर दिसलेल्या नावामुळे ते एकदाचे सुखावले. नाव होतं ' वेरा लिबल दे ऎचमन'. फक्त रिकार्डो क्लेमेंट या नावाचा उल्लेख कुठेही नव्हता. यावरून एक गोष्ट आहारोनीच्या मनात पक्की झाली - ऎचमन आणि रिकार्डो क्लेमेंट हा एकच मनुष्य आहे.
त्यानंतर अनेक दिवस वाट बघूनही आहारोनींना क्लेमेंट उर्फ ऎचमन काही या घरात येताना दिसला नाही. त्यांनी मग ऎचमन यांचा इतिहास तपासून बघितला. २१ मार्च रोजी ऎचमन दाम्पत्याचा लग्नाचा वाढदिवस असल्याचा त्यांना सुगावा लागला. त्यांनी त्या दिवशी डोळ्यात तेल घालून क्लेमेंट हाऊसवर नजर ठेवली. अखेर त्यांना घरासमोरच्या हिरवळीवर एक बारीक मिशा,मध्यम उंची, तरतरीत लांब नाक, पातळ जिवणी अशा स्वरूपाचा चष्मा घातलेला एक माणूस दिसला.
" ऎचमन...." त्यांच्या मानाने अखेर त्यांना ऎचमन सापडल्याचा कौल दिला. त्यांनी लगोलग तेल अवीव येथे खुशखबर पाठवली. " ऎचमन जिवंत आहे आणि त्याचा ठावठिकाणा सापडलेला आहे..." त्यांनी निस्संदिग्ध ग्वाही दिल्यावर इस्सर आनंदले. त्यांनी गाठलं पंतप्रधान बेन गुरियन यांना.
" काहीही झालं, तरी तो इस्राएलमध्ये जिवंत आणला गेला पाहिजे आणि त्याने केलेल्या कृष्णकृत्यांची कबुली देण्यासाठी आपण त्याला इथल्या कोर्टासमोर उभा केला पाहिजे..." गुरियन यांनी आपला निर्णय सुनावला.
इस्सर आणि आहारोनी आता पुढच्या कामगिरीसाठी सज्ज झाले. पंतप्रधानांनी जे काही सांगितलं, ते किती महत्वाचं आहे हे त्यांना माहित होतं. आपल्या पूर्वजांना आणि धर्मबांधवांना हालहाल करून मारणाऱ्या एका नराधमाला कायद्याने शिक्षा कशी होऊ शकते, हे देशाच्या पुढच्या पिढीला बघता येणं गरजेचं होतं....याच हेतूने ऎचमन जिवंत इस्रायलला आणला जाणं महत्वाचं होतं.
इस्सर यांनी मोहिमेची तयारी करण्यासाठी कंबर कसली. त्यांनी या कामगिरीसाठी निवडली एकूण बारा माणसं. यातली बरीचशी हिटलरने जर्मनीमध्ये केलेल्या अत्याचारांमधून वाचलेली, त्या अनुभवांमुळे तावून सुलाखून निघालेली आणि आपल्यावर झालेल्या त्या अत्याचारांचा बदला घेण्यासाठी आसुसलेली मंडळीच होती. काहींच्या हातावर अजूनही नाझी छळछावण्यांमध्ये तापलेल्या सळईने गोंदवलेला त्यांचा ' ओळख-क्रमांक ' तसाच होता...किंबहुना तो त्यांनी तसाच ठेवला होता.
या मोहिमेचं नेतृत्व इस्सर यांनी सोपवलं रफी ईटन याच्याकडे. त्याचा सहाय्यक होता झ्वी मालकीन. हे दोघे ' शबाक ' चे मुरलेले आणि अनुभवी अधिकारी होते. विशेषतः हेरांचा मागोवा काढून त्यांना पकडण्यात त्यांचा हातखंडा होता. झ्वी जन्माने पोलिश ज्यू, पण हिटलरने पोलंडचा घास घेतल्यावर त्याचं कुटुंब ज्यू वंशसंहाराचा बळी ठरलं. कसाबसा इस्राएलमध्ये पळून आलेला झ्वी हैफा येथे आला आणि किबुट्झमध्ये राहू लागला. पुढे इस्राएलच्या निर्मितीनंतरच्या अरब-इस्राएल संघर्षात तो प्रत्यक्ष युद्धात उतरला. याची अजून एक ओळख अशी, की त्याने काही वर्षं अमेरिकेत न्यूयॉर्कमध्ये काढली होती आणि त्या वास्तव्यात तो ' मेथड ऍक्टिंग ' चे जगविख्यात प्रणेते ली स्ट्रासबर्ग यांच्याबरोबर रंगभूमीवरही वावरला होता. त्याने आपल्या या कौशल्याचा उपयोग आपल्या कामात पुरेपूर करून घेतला. एक हेर म्हणून वेगवेगळी सोंगं घेऊन समोरच्याच्या हातावर तुरी देत आपलं इप्सित साध्य करण्यात त्याचा हातखंडा होता.
यांच्याशिवाय पुढे शबाकचा प्रमुख झालेला अवराहम शालोम हाही या चमूचा हिस्सा होता. हाही ऑस्ट्रियामध्ये जन्मलेला आणि नरकयातना भोगलेला ज्यू. पॅरिस येथे मोसादचा गुप्तहेर म्हणून काम करणारा याकोव्ह गात, ब्रिटिशांच्या सैन्यात ' एवेन्जर्स ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुप्ततेने काम करणाऱ्या खास तुकडीमध्ये काम केलेला मोशे तवॊर (याची ख्याती ही, की नाझी जर्मन अधिकाऱ्यांना वेचून वेचून पकडण्यात याचा दांडगा अनुभव होता ) , खरीखुरी वाटणारी खोटी कागदपत्रं तयार करण्यात हातखंडा असलेला शालोम डॅनी ( याने नाझी छावणीतून पलायन करताना आपल्या याच कौशल्याचा उपयोग करून घेतलेला होता ) असे एकास एक महाभाग इस्सर यांनी एकत्र आणले होते.
अर्जेन्टिनासारख्या देशात कामगिरी पार पाडायला तिथली खडानखडा माहिती असणारी एखादी विश्वासू व्यक्ती या चमूमध्ये असणं महत्वाचं होतं. ही कामगिरी सोपवली गेली एफ्रेम इलानीकडे. हा अर्जेन्टिनामध्ये बरीच वर्षं मोसादसाठी काम करत होता. शरीराने मजबूत असलेला हा एफ्रेम कोणत्याही प्रकारच्या कुलपांची किल्ली शोधण्यात पटाईत होता. या सगळ्यांमधली एकमेव स्त्री गुप्तहेर असलेली येहुदिथ निसीन्याहू स्वतःहून या कामगिरीमध्ये सामील झाली होती.
या सगळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची व्यक्ती होती डॉक्टर योना एलियन. ऎचमन याला जिवंत पकडून आणायचं तर त्याला बेशुद्ध करणं, त्याचं अवस्थेत दीर्घकाळ ठेवणं आणि त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणं या कामासाठी योनासारखाच एखादा निष्णात डॉक्टर योग्य होता. इस्सर या कामगिरीत जातीने स्वतः सामील होणार होते, पण त्यांच्या अनुपस्थितीत इस्राएलमध्ये निर्णयप्रक्रियेत सुसूत्रता राहणार नाही म्हणून त्यांना आपला हट्ट सोडावा लागला.
या सगळ्यांनी हळू हळू आपलं काम सुरु केलं. अर्जेन्टिनामध्ये ब्युनोस आयर्स येथे त्यांनी एक घरं भाड्याने घेतलं. या घराला त्यांनी ' द कासल ' हे सांकेतिक नाव ठेवलं. एप्रिल महिन्यात वेगवेगळ्या देशांमधून चार जण अर्जेन्टिनाला आले आणि त्यांनी पुढच्या काही दिवसात गुप्तपणे आपल्या कामगिरीसाठी लागणाऱ्या वस्तू आणि उपकरणं ब्युनोस आयर्स येथे आणल्या. काही वस्तू तुकड्या-तुकड्यातून तर काही लोकांच्या नजरेत येणार नाहीत अशा पद्धतीने लपवून आणल्या गेल्या. रेडिओ टेलिफोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणं, औषधं आणि शालोम डॅनीच्या खास उपकरणांचा यात समावेश होता. ही उपकरणं त्याने बनावटी पासपोर्ट, कायदेशीर कागदपत्रं, शिक्के अशा महत्वाच्या गोष्टी तयार करण्यासाठी स्वतः तयार केली होती. शिवाय या घरात त्यांनी भरपूर खाद्यपदार्थ साठवून ठेवले होते. या घरात अर्जेन्टिनामध्ये ऐचमनला पकडायच्या कामगिरीची व्यवस्थित आखणी झाली आणि अखेर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
त्यांच्या प्रयत्नांना इतक्या लवकर यश येईल हे त्यांच्यापैकी कोणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. वेगवेगळ्या गाड्यांमधून त्यांच्यापैकी चार जण सॅन फर्नांडो भागात गस्त घालायला लागले आणि त्यांना प्रत्यक्ष ' रिकार्डो क्लेमेंट ' दिसला. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास जवळच्य एका बसथांब्यावर उतरून क्लेमेंट शांतपणे अंधारात आपल्या घराकडे निघालेला होता. या चौघांना क्लेमेंटला बघून आनंदाचं भरतं आलं. त्यांनी लगोलग इस्राएलमध्ये तेल अवीव येथे आतुरतेने चांगल्या बातमीची वाट बघत बसलेल्या इस्सर यांना सांकेतिक भाषेतला तो मजकूर पाठवला - ' ऑपेरेशन फिसिबल '

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users