मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग ४

Submitted by Theurbannomad on 7 February, 2021 - 14:17

हिटलरने आपल्या दहा-बारा वर्षांच्या काळात जर्मनीमध्ये ज्यू लोकांचा जो नरसंहार घडवून आणला, ती घटना म्हणजे जगाच्या इतिहासातला एक काळाकुट्ट अध्याय. आर्यन वंशाचा टोकाचा दुराभिमान, ज्यू लोकांविषयीचा पराकोटीचा राग, पहिल्या महायुद्धात जर्मनीला पत्करावा लागलेल्या मानहानीकारक पराभवाला ज्यू लोकांना जबाबदार ठरवण्याचा एकांगी दुराग्रह अशा सगळ्या वेडेपणाच परिपाक म्हणजे ' होलोकॉस्ट ' या नावाने ओळखला गेलेला ज्यू लोकांचा वांशिक संहार. हिटलर आपल्या ज्यू-द्वेष्ट्या धोरणामुळे समस्त ज्यू लोकांसाठी कर्दनकाळ ठरलेला होता.
हिटलरच्या या ' महान ' कार्यात त्याच्या अनेक सहकाऱ्यांनी आपापल्या परीने हातभार लावला. ऑटो एडॉल्फ ऎचमन हा त्यातलाच एक महत्वाचा शिलेदार. प्रती-हिटलर म्हणून ओळखला जाणारा ' रेनहार्ड हाईडरिच ' याने खास कामगिरीसाठी या ऐचमनची निवड केलेली होती. ज्यू लोकांच्या नरसंहाराची योजना तडीस नेण्याची कामगिरी. ज्यू लोकांना - यात बायकापोरं, तरुण, वृद्ध सगळे आले - एकत्र जमवणं, त्यांच्यातल्या त्यातल्या त्यात हट्ट्याकट्ट्या लोकांना बाजूला काढून त्यांची रवानगी अंगमेहनतीच्या कामासाठी ठरलेल्या ठिकाणी करणं आणि बाकीच्यांना सरळ ओशचोविझसारख्या छळछावण्यांमध्ये रवाना करणं असं या कामगिरीचं स्वरूप होतं. विषारी वायूने भरलेल्या खोल्यांमध्ये कोंडून ' निरुपयोगी ' ज्यू लोकांना यमसदनाला पाठवणं हा या कामगिरीचा कळस.
सरतेशेवटी हिटलर आणि त्याचा नाझीवाद उतरणीला लागला आणि एक एक करत हिटलरचे हे सहकारी आपापल्या परीने जगाच्या कानाकोपऱ्यात आसरा शोधत पळाले. जर्मनीचा दुसऱ्या महायुद्धात झालेला पराभव आणि त्यानंतर दोस्त राष्ट्रांच्या हाती लागलेल्या अनेक नाझी अधिकाऱ्यांना लष्करी कोर्टात उभं करून त्यांना शिक्षा झाल्या असल्या, तरी बरेचसे महत्वाचे नाझी अधिकारी जर्मनीतून बाहेर पळून जाण्यात यशस्वी झाले होते. ऑटो एडॉल्फ ऎचमन त्यातलाच एक.
वास्तविक दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिकेच्या हाती ऎचमन लागलेला होता. त्याने शिताफीने ' ऑटो एकमान ' या नावाने स्वतःची खरी ओळख लपवून कासाबसा युद्धकैद्यांच्या छावणीतून पळ काढला. पुढे ' ऑटो हेनिंजर ' हे आणखी एक नाव धारण करून त्या नावाने बनावटी कागदपत्र तयार करून तो जर्मनीच्या उत्तर - पूर्व दिशेला असलेल्या ' लॉनबर्ग हीथ ' या प्रांतात पळाला. तिथेच अल्तेनसॅल्झकोथ या जागी त्याने १९५० पर्यंत जंगलाने वेढलेल्या प्रदेशात स्वतःला सुरक्षित ठेवलं. तिथे जर्मनीच्या न्युरेम्बर्ग शहरात नाझी अधिकाऱ्यांवर खटले दाखल होऊन जेव्हा सुनावण्या होऊ लागल्या, तेव्हा त्याला जीवाची भीती वाटू लागली.
बिशप अडोईस हूडाल या ऑस्ट्रियाच्या धर्मगुरूने ( जो स्वतः नाझी विचारधारेचा प्रशंसक होता ) आपल्या धर्मादाय संस्थेच्या मार्फत ऎचमन याची ' रेड क्रॉस ' या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वरिष्ठांशी गाठभेट घालून दिली. या वेळी एचमनने ' रिकार्डो क्लेमेंट ' असं नाव घेतलं होतं. या सगळ्या खटपटीतून त्याला अखेरीस अर्जेन्टिना देशात पाय ठेवण्याची संधी मिळाली. रेड क्रॉसच्याच मानवतावादी दृष्टिकोनातून तात्पुरतं पारपत्र देण्याच्या योजनेचा हा एक संधीसाधू लाभार्थी.
अर्जेन्टिनाच्या तुकूमन प्रांतात ऎचमन ' रिकार्डो क्लेमेंट ' म्हणून काही काळ राहिला. पुढे त्याच्या कुटुंबाला अर्जेन्टिनामध्ये प्रवेश मिळाल्यावर त्याने आपल्या बायकोची भेट घेतली. तिच्याशी त्याने या नव्या नावाने पुन्हा लग्न केलं आणि आपल्या भूतकाळाला शिताफीने पुसून टाकलं. पुढे तर चक्क मर्सिडीझ-बेंझ या जगविख्यात कंपनीत तो एका खात्याचा प्रमुख झाला. १४ - गॅरिबाल्डी स्ट्रीट या पत्त्यावर तो आपल्या कुटुंबासह निवांत आयुष्य जगू लागला. या सगळ्याचा सुगावा वास्तविक कोणालाही लागला नसता , पण त्याच्याच चिरंजीवांनी प्रेमाच्या नादात आपल्या खऱ्या आडनावाची वाच्यता आपल्या प्रेयसीकडे केली आणि संशयाची सुई या कुटुंबाकडे वळली.
१९५७ साल. दुसऱ्या महायुद्धानंतर बारा वर्षाचा काळ लोटलेला. इस्सर आपल्या कार्यालयात कामात गढलेले असताना त्यांना अचानक एक बातमी कळली....डॉक्टर फ्रित्झ बाउअर यांना एक खास खबर मोसादपर्यंत पोचवायची आहे ही ती बातमी. डॉक्टर बाउअर हे जर्मनीच्या हॅस्से प्रांताचे सरन्यायाधीश. धर्माने ज्यू. दुसऱ्या महायुद्धानंतर नाझी अधिकाऱ्यांना न्यायालयात उभं करून त्यांच्या कृष्णकृत्यांबद्दल त्यांना योग्य ती शिक्षा ठोठावणं हे एकमेव काम त्यांनी आयुष्याचं ध्येय म्हणून स्वीकारलं होतं. अशा महत्वाच्या व्यक्तीकडून नक्की काय खबर आलेली आहे, हे बघायला इस्सर जातीने कामाला लागले.
त्यांनी आपल्या एका विश्वासू सहकाऱ्याला - शौल दारोम नावाच्या अधिकाऱ्याला जर्मनीला पाठवलं. त्याने बाउअर यांची भेट घेतली आणि ती खबर घेऊन घाईघाईने परतीचं विमान गाठलं. खबर तशीच होती - बाउअर यांनी त्याला ऑटो एडॉल्फ ऎचमन जिवंत असल्याची माहिती पुरवलेली होती. साठ लाख ज्यू ठार मारणाऱ्या या नरराक्षसाचं जिवंत असणं इस्राएलसाठी अवमानकारक होतं. इस्सर यांनी ही बातमी मिळताच ते जातीने आपल्या पंतप्रधानांना आणि राष्ट्राध्यक्षांना जाऊन भेटले. पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांच्या खास आतल्या वर्तुळातले असल्यामुळे इस्सर यांच्या शब्दाला मान होताच.
बाउअर यांनी सांगितल्याप्रमाणे दक्षिण अमेरिकेच्या अर्जेन्टिना देशात स्थलांतरित झालेल्या एका जर्मन ज्यू दाम्पत्याने त्यांना ऎचमन वेगळ्या नावाने अर्जेन्टिनामध्ये रहात असल्याची खबर दिलेली होती. या दाम्पत्याची तरुण मुलगी सिल्विया ज्या तरुणाच्या प्रेमात पडलेली होती, त्या तरुणाने आपलं नाव ' निक ऎचमन ' असं सांगितलं होतं. या दाम्पत्याने ही खबर बाउअर यांच्यापर्यंत पोचवली. बाउअर यांना ऎचमन हवे होतेच....त्यांच्या माहितीनुसार ऎचमन यांनी दुसऱ्या महायुद्धात नाझी लष्कराचा पराभव स्पष्ट दिसायला लागल्यावर आपली बायको वेरा आणि आपले तीन मुलगे अशा सगळ्यांची रवानगी शेजारी ऑस्ट्रियामध्ये केली होती. पुढे काही वर्षांनी हे चौघे अचानक ऑस्ट्रियामधून अर्जेन्टिनामध्ये निघून गेले. थोडी चौकशी केल्यावर बाउअर यांना समजलं, की तिथे वेराने दुसरं लग्न करून नवा संसार थाटलेला होता. या सगळ्या माहितीचे बिंदू जोडल्यावर निष्कर्ष असा निघत होता, की हे दुसरं लग्न तिने ज्याच्याशी केलं, तो दुसरा तिसरा कोणीही नसून बहुदा वेगळ्या नावाने अर्जेन्टिनाला पोचलेला खुद्द ऑटो एडॉल्फ ऎचमन हाच होता.
बाउअर यांना हे ठाऊक होतं, की या सगळ्या गुंत्यामुळे केवळ संशयित म्हणून अर्जेन्टिनासारख्या परक्या देशातून एका नागरिकाला चौकशीसाठी जर्मनीला घेऊन येणं महत्प्रयासाचं काम होतं. शिवाय या सगळ्याचा सुगावा लागल्यावर पुन्हा ऎचमन गायब होण्याचा धोका होताच. त्यांनी शांतपणे आपल्या जुन्या मित्राला - इस्सर यांना ही खबर देणं इष्ट समजलं.
इस्सर यांनी आपल्या महत्वाच्या सहकाऱ्यांना कामाला लावलं. त्यांचं पाहिलं लक्ष्य होतं अर्जेन्टिनामध्ये जाऊन त्या संशयित व्यक्तीची ओळख पटवणं. जर ती व्यक्ती ऎचमन असल्याची खात्री पातळी, तर मात्र इस्सर यांच्या कौशल्याचा कस लागणार होता. परदेशात - तेही पार अटलांटिकपार जाऊन एका व्यक्तीला पकडून मायदेशात आणण्याची अतिशय जोखमीची आणि गुंतागुंतीची कामगिरी त्यांना पार पाडायला लागणार होती

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users