पानिपत - नवा विचार

Submitted by Chintan on 7 February, 2021 - 13:28

पुस्तक परीक्षण - पुस्तकाचे नाव "Battle of Panipat in light of rediscovered paintings"

इतके दिवस 'माबो'वर वाचनमात्र होतो, पण आज लिहावंसं वाटलं कारण आज एक जबरदस्त इंग्रजी पुस्तक वाचून हातवेगळे केले, आणि त्या पुस्तकाचे गारुड मनावरून उतरेना. या पुस्तकाचा परिचय करून देण्याचा हा माझा अल्प-प्रयत्न. मायबोलीवर इतिहास आणि पानिपत या विषयावर बरेच धागे आहेत, अगदी काही दिवसांपूर्वी सेनापती यांचा धागाही आला होता. या सर्वाना हे पुस्तक आवडेल अशी अपेक्षा आहे. इतर स्थळे, फेसबुक, आणि वर्तमानपत्रातून या पुस्तकाची प्रसिद्धी झाली आहेच, तरीपण मायबोलीच्या खास वाचकांसाठी ज्यांनी इतर ठिकाणी बातमी वाचली नसेल त्यांच्यासाठी हा प्रयत्न.

पानिपत लढाईवर लिहिलेले साहित्य एका ठराविक चाकोरीत अडकलेले आहे. प्रसंगांची वर्णने, भाऊसाहेब यांना दिलेले ठराविक दोष, पराभवाची करूण गाथा आणि हरलो-तरी-जिंकलो अश्या ठराविक भूमिकेतून अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे वेगळेपण उठून दिसते. प्रथम म्हणजे कालानुक्रमाने दर प्रकरणात थोडा-थोडा भाग सांगायचा हा प्रकार इथे मुळात केलेलाच नाही. प्रमुख व्यक्तींची चित्रे आणि लढाईविषयी नवीन समोर आलेली माहिती यांचे विषयानुसार भाग पाडून एक नवीनच मांडणी आपल्याला केलेली दिसते.

प्रथमदर्शनी पुस्तकाचे मुखपृष्ठ लक्ष वेधून घेते. उत्तम छपाई, सुंदर कागद आणि चित्रांची रेलचेल यामुळे पुस्तक संपूर्ण पाहिल्याशिवाय खाली ठेववत नाही. तरीपण माझ्यामते पुस्तकात मांडलेले विचार आणि समज-गैरसमज यांचे विश्लेषण हे खूप मौल्यवान आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात खंत असते की जागतिक स्तरावर मराठ्यांचा इतिहास का पोचत नाही, विल्यम दालरिम्पल किंवा औद्रे ट्रूशके यांच्यासारखे उपटसुंभ आपल्याला हवे ते लिहितात, त्यांचा प्रतिवाद कुणी का करत नाही. या लेखकांच्या पातळीचे, या लढाईसंबंधीचे गैरसमज पुराव्यानिशी, पण साध्या-सोप्या, सर्वाना समजेल अश्या भाषेत इथे मांडलेले आहेत.

गेल्या वीस-पंचवीस वर्षातील संशोधनाचा समावेश या पुस्तकात असल्याने इतिहासप्रेमींसाठी हे पुस्तक संग्रही असणे आवश्यक आहे. पुस्तकाची किंमत जास्त वाटली तरी अंतिमतः दर्जा, छपाई आणि चित्रांची नुसती संख्या पाहता ती योग्य वाटते. मायबोलीच्या वाचकांसाठी खास सवलतीच्या दरात पुस्तक मिळेल अशी सोय करण्याचा प्रयत्न मी केला आहे. ज्यांना पुस्तक सवलतीच्या दरात हवे आहे त्यांनी +91 92256 12029 (श्री. पुरुषोत्तम) या क्रमांकावर संपर्क करावा, पुस्तक सध्या भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये पाठवले जाऊ शकते.

पुस्तकाचे लोकसत्तामध्ये आलेले परीक्षण अप्रतिम आहेच, त्यात तुम्हाला पूर्ण पुस्तकाची रूपरेषा दिलेली सापडेल.
https://www.loksatta.com/athour-mapia-news/battle-of-panipat-in-light-of...

हे पुस्तक तुम्ही वाचलेले आहे का? त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? आपले विचार प्रतिक्रियेत जरूर मांडा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users