मोसाद - इस्राएलचा तिसरा डोळा - भाग २

Submitted by Theurbannomad on 7 February, 2021 - 02:52

मोसाद. इस्राएलच्या गुप्तचर खात्याला जग ज्या नावाने ओळखते, ते हे नाव. इस्राएलसाठी हे गुप्तचर खातं म्हणजे आजवरच्या असंख्य मोहिमांना तडीस नेणारं एक गुंतागुंतीचं रसायन. जगभरात कुठेही, कशाही आणि कितीही जोखमीच्या मोहिमा - ज्यात बरेचदा ' कोव्हर्ट ऑपरेशन्स ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतिशय गुप्त मोहिमांचाच भरणा जास्त असतो - बेमालूमपणे पार पाडण्यात मोसादच्या हातखंडा आहे. इस्राएलचे लष्कर आणि राजकारणी हे या देशाचे जगाला दिसू शकणारे दोन डोळे असले, तरी पडद्याआडून काम करणारा हा ' मोसाद ' रुपी तिसरा डोळा उघडला कि भल्या भल्यांना धडकी भरते.
मुळात ' मोसाद' चा पाया आहे ' आलिया ' च्या रूपाने ' घरवापसी ' करणाऱ्या ज्यू लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेऊन अहोरात्र काम करणारी ' पाल्माक ' ही संघटना. या संघटनेची स्थापना झाली १९४१ साली. तेव्हाच्या स्फोटक परिस्थितीत ' इस्राएल ' ला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून जागतिक मान्यता मिळालेली नसताना स्वगृही परतलेल्या ज्यू लोकांचं संरक्षण करण्यासाठी काही करणं भाग होतं. १९२० साली ब्रिटिशांनी प्रशिक्षित केलेल्या काही ज्यू लष्करी मंडळींनी एकत्र येऊन ' हगानाह ' नावाची एक निमलष्करी संघटना तयार केली होती. या संघटनेच्या पाठिंब्याने ' यिजतक सदेह ' या धडाडीच्या लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली खास ब्रिटिश लष्कराकडून प्रशिक्षित झालेले तरुण एकत्र करून ' पाल्माक ' आकाराला आली.
ज्यू तरुणांना प्रशिक्षित करण्यामागे ब्रिटिशांची चाल दुहेरी होती. एकीकडे पॅलेस्टिनी अरबांवर या संघटनेमुळे अंकुश राहील आणि दुसरीकडे ब्रिटिशांच्या बाजूने लेबनॉनमध्ये फ्रेंच आणि जर्मन लष्कराशी दोन हात करायला या संघटनेची मदत होईल अशी ही खास ब्रिटिश रणनीती. लेबनॉनच्या भूमीवर प्रत्यक्ष युद्धाचा आणि अस्त्रशस्त्रांच्या डावपेचांचा भरपूर सराव या निमित्ताने पाल्माकला करता आला. पाल्माक व्यतिरिक्त इरगुन आणि स्टर्न गॅंग या दोन अति जहाल आणि कडव्या झिओनिस्ट विचारांच्या उपसंघटना होत्याच. बरेचदा पाल्माकचे युद्धाला चटावलेले तरुणच या संघटनांमध्ये सामील होऊन आपली मर्दुमकी गाजवायची हौस भागवून घ्यायचे. आजूबाजूच्या देशांमधल्या ज्यू लोकांना जमेल त्या मार्गाने आणि जमेल तशा पद्धतीने इस्राएलमध्ये आणून त्यांच्या वस्त्या तयार करणे, पॅलेस्टिनी अरबांना हुसकावून ' इस्राएल' च्या भूमीच्या सीमा रुंदावत नेणे, पॅलेस्टिनी अरबांशी सतत सुरु असलेल्या संघर्षापासून सर्वसामान्य ज्यू नागरिकांना सुरक्षित ठेवणे, जमेल तशा पद्धतीने शत्रूची माहिती काढून त्यांच्या संभाव्य कारवायांवर अंकुश लावणे अशा अनेक कामांमध्ये पाल्माकने मोलाची कामगिरी बजावली.
अखेर १९४८ साली इस्रायलला जगमान्यता मिळाल्यावर महत्वाच्या इस्रायली नेत्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाइतकंच; किंबहुना त्याहून जास्तच महत्व देशाच्या सुरक्षेला दिलं. डेव्हिड बेन गुरियन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं हातात घेताच आपल्या एका खास दोस्ताला आपल्या कार्यालयात पाचारण केलं. या खास दोस्ताचं नाव होतं रेऊवेन शिलोह. ऑटोमन जेरुसलेममध्ये जन्मलेल्या, अमेरिकेत उमेदीची वर्षं घालवलेल्या आणि अनेक देशांमधल्या महत्वाच्या व्यक्तींशी सलोख्याचे संबंध असलेल्या या शिलोह महाशयांनीच गुरियन यांना केंद्रीय गुप्तचर संघटनेची महती पटवून दिलेली होती.
या कामात एक महत्वाची अडचण या दुकलीला सोडवणं भाग होतं. इस्राएलच्या सैन्यदलाच्या गुप्तहेर खात्याला - अमानला आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेचं काम करणाऱ्या संघटनेला - शिन बेत ला एकत्र करून त्यांच्यातून देशाची केंद्रीय गुप्तचर संघटना तयार करावी हे शिलोह यांचं म्हणणं गुरियन यांना जरी पटत असलं, तरी मूळच्या पाल्माकमधून जन्माला आलेल्या या दोन संघटनांमधले वजनदार ज्यू अधिकारी या एकत्रीकरणाच्या विरोधात होते. शेवटी या राजकारणातून मार्ग काढता काढता १९५१ साल उजाडलं, तेव्हा कुठे मोसाद खऱ्या अर्थाने बाळसं धरू लागली.
या संघटनेच्या पहिल्यावाहिल्या प्रमुखपदी अर्थात शिलोह यांचीच नेमणूक गुरियन यांनी केली. शिलोह यांनीही आपल्या अनुभवाच्या आणि परिपक्वतेच्या जोरावर मोसादचं अल्पावधीत बस्तान बसवलं. ते स्वतः देशोदेशींच्या महत्वाच्या राजकारण्यांबरोबर इस्रायलला मान्यता मिळवून देण्यासाठी झालेल्या पडद्यामागच्या चर्चांमध्ये महत्वाचे दूत म्हणून सहभागी होतेच, शिवाय तेव्हा ब्रिटिशांनी मध्यपूर्वेच्या राजकारणाचा खेळखंडोबा केल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आकाराला येत असलेल्या गुंतागुंतीच्या भू-राजकीय समीकरणांमध्ये इस्राएलच्या विरोधात होत असलेल्या कटकारस्थानांची माहिती काढण्याचं जोखमीचं कामही त्यांनी केलं होतं.
या संघटनेला पहिला धक्का अल्पावधीतच सहन करावा लागला तो शेजारच्या इराकमध्ये. बगदादमधल्या सक्रिय इस्रायली हेरांच्या गटाची माहिती तिथल्या लष्कराला आणि गुप्तचर खात्याला मिळाल्यामुळे मोसादच्या अस्तित्वाची माहिती आसमंतात वाऱ्यासारखी पसरली. अर्थात मोसाद्ला या नामुष्कीनंतर मिळालेला धडा त्यांनी पुढे कधीही विसरला नाही आणि विसरू दिला नाही, हेही तितकंच खरं...पण या घटनेनंतर खांदेपालट होऊन मोसादच्या प्रमुखपदी आले आईसार हॅरेल. मूळचे शिन बेत संघटनेचे प्रमुख असलेले हॅरेल अतिशय महत्वाकांक्षी आणि तितकेच धडाडीचे होते. त्यांनी आपल्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीत मोसादचा चेहरामोहरा बदलून टाकून या संघटनेची दखल जगाला घ्यायला लावली. त्यांच्या काळात खऱ्या अर्थाने मोसाद्ला अवघड मोहिमा बेमालूमपणे फत्ते करणाऱ्या गुप्तहेर संघटनेचं स्वरूप आलं.
"For by wise guidance you can wage your war" या बायबलमधल्या सुप्रसिद्ध वाक्याला संघटनेचं ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारणाऱ्या मोसादने पुढे ते बदलून "Where there is no guidance, a nation falls, but in an abundance of counselors there is safety." हे ब्रीदवाक्य स्वीकारलं. या शब्दांचा गुंता सोडवला, तर इस्राएलच्या पवित्र भूमीसाठी काहीही करण्याची तयारी आणि या भूमीच्या रक्षणासाठी वेळप्रसंगी साम - दाम - दंड - भेद यापैकी काहीही वापरून इप्सित तडीस न्यायची वृत्ती या भक्कम पायावर मोसाद उभी असल्याचं समजून येतं. या संघटनेमध्ये महत्वाचे आहेत आठ विभाग.त्यात थेट कारवायांच्या दृष्टीने महत्वाचे असलेले दोन म्हणजे ' मेतसादा ' आणि ' किडोन '. ' मेतसादा ' नावाने ओळखला जाणारा विभाग अतिशय खडतर प्रशिक्षणातून निवडलेल्या महत्वाच्या तरुणांच्या छोट्या पण अतिशय घातक तुकड्यांचा बनलेला आहे. या विभागाचं काम आहे थेट हल्ला करून शत्रूला संपवणं. ' किडोन ' नावाने ओळखला जाणारा दुसरा विभाग इतक्या गुप्तपणे काम करतो, की काही निवडक महत्वाच्या व्यक्ती सोडल्या तर बाकी कोणालाही या विभागाची आणि यात काम करत असलेल्यांची माहिती नसते. इस्राएलच्या बाहेर होणाऱ्या ' कोव्हर्ट ऑपेरेशन्स ' मध्ये या विभागाचे खास प्रशिक्षित केलेले लोक सामील असतात. असं म्हणतात, की इस्राएलने याच विभागाच्या जोरावर आजवर २७०० पेक्षा जास्त ' कोव्हर्ट ऑपेरेशन्स ' यशस्वी करून दाखवलेली आहेत. शिवाय सायबर सुरक्षेसाठी मोसादने एक खास विभाग तयार करून आजच्या आधुनिक काळातल्या नवनवीन युद्धतंत्रांपासून स्वतःचा देश सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने आवश्यक ती पावलं उचलली आहेत.
या संघटनेच्या असंख्य ज्ञात आणि अज्ञात कामगिऱ्यांपैकी काही निवडक कामगिऱ्यांचा आढावा पुढच्या काही प्रकरणांमध्ये घेण्यात आलेला आहे.कदाचित युद्धतंत्र, युद्धनीती अथवा युद्धशास्त्राच्या अनुषंगाने जाण्यापेक्षा त्या त्या कामगिरीत मोसादने एक संघटना म्हणून कशा पद्धतीने परिस्थिती हाताळली आणि कामगिरी फत्ते केली, यावर त्या त्या लेखात जास्त भर दिलेला दिसेलही, कारण मोसादच्या तीच ओळख आहे.
रेऊवेन शिलोह यांनी पायाभरणी केलेल्या मोसादची धुरा आज योस्सी कोहेन यांच्या हाती आहे. या प्रदीर्घ प्रवासात या संघटनेने आपल्या चिमुकल्या देशाचं रक्षण प्राणपणाने केलेलं आहे. वेळप्रसंगी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अविभाज्य अंग असलेल्या कूटनीतीलाही लागेल तिथे साथ दिलेली आहे. हे लिहीत असतानाही इराणच्या अणुकार्यक्रमाचे जनक असलेल्या मोहसीन फखरीजादे यांच्या ' अचानक ' झालेल्या हत्येसाठी इराणने मोसाद्लाच जबाबदार धरल्याच्या बातम्या देशोदेशीच्या वृत्तवाहिन्यांवर झळकत आहेत.
चिली या देशाचे एकेकाळचे तानशाह ऑगस्तो पिनोशे यांचं एक वाक्य इथे जाता जाता उद्धृत करावंसं वाटतं -
" The country is safe , because we have a good intelligent service "

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>Where there is no guidance, a nation falls, but in an abundance of counselors there is safety.
Too many cooks spoil the broth म्हणतात त्याला छेद देतं की हे वचन. हे सगळे counselors साधारण सारखा विचार करत असतील तर ठीक. नाहीतर बैठका, विचारविनिमय करण्यातच वेळ जायचा.

हाही भाग आवडला. लेखमालेच्या शेवटी ह्यावर आधारित पुस्तकांची सूची मिळाली तर सोनेपे सुहागा होईल. Treacherous Alliance by Trita Parsi हे मी वाचलेलं एक सुरेख पुस्तक. हे मोसादबद्दल नाही. पण इस्त्रायल, इराण आणि अमेरिका ह्यांच्या संबंधावर प्रकाश टाकतं.

@ स्वप्ना राज
इस्राएल देशाचं तेच वैशिष्ट्य आहे. कडवे zionist कधीच too many cooks नसतात...उलट ते पाच बोटांच्या मुठीसारखे असतात.

Gideon's Spies लेखक Gordon Thomas ने सुध्दा मोसाद वर पुस्तक लिहिले आहे. वाचनीय आहे. म्युनिच ऑलिम्पिक, एन्टाबे विमानतळावरील धाडसी हायजॅक, अर्जेन्टिनामधून Adolf Eichmann ला इस्राएल ला घेऊन येणे आणि इतर खूप साऱ्या घटना मांडल्या आहेत.