एम फॉर मिंत्रा

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 February, 2021 - 06:10

जेव्हा एका मोठ्या ब्रेकनंतर माझी बायको वेळ घालवण्यासाठी म्हणून किंवा काहीतरी वेगळे करावे म्हणून आपले शिक्षिकेचे काम सोडून एका कंपनीत जॉबला लागली तेव्हा तिच्यासोबत काम करणारे मुलेमुली सारेच नुकतेच कॉलेज पासआऊट झालेले युवा होते. छान होते. तिचे त्यांच्याशी छान ट्युनिंग जमले होते. पण बरेचदा असे व्हायचे की तिने काही अमुकतमुक म्हटले की ती मुलेमुली खिदळायची. माझ्या बायकोला आधी काही कळायचे नाही. आधी मजा वाटायची, मग एकदा चिडली त्यांच्यावर. तेव्हा त्यातली एक मुलगी म्हणाली की तिने उच्चारलेल्या काही शब्दांचा डबल मिनींग निघतो जो सेक्स वगैरे गोष्टींशी संबंधित असतो.
तिने जेव्हा हे मला सांगितले तेव्हा मी तिला माझ्याकडचे थोडे शब्द सांगितले, जसे की ..... चला राहू द्या.

जसे हे शब्दांबाबत तसेच चित्रांबाबतही झाले आहे. व्हॉटसपवर एखादा चित्ररुपी मेसेज येतो, त्यात एक फोटो असतो, तो बघताच आपल्याला अश्लील वाटते, किंवा तसले काही भलतेच डोळ्यासमोर येते. आणि मग त्या फोटो खाली लिहिले असते की जे तुमच्या मनात आहे ते तसे नसून त्या फोटोत अमुकतमुक आहे. मग आपण पुन्हा तो फोटो बघतो आणि खरेच की, हा साधासाच फोटो आहे म्हणत स्वतःशीच हसायला लागतो.

यातच एक दुसरा प्रकार असतो, त्यात फोटो पाहताक्षणी नॉर्मलच भासतो. त्यावरचे कॅप्शन मात्र असे असते की फक्त सो कॉलड पोहोचलेल्या लोकांनाच यातला गभितार्थ समजेल, ज्यांना नाही समजणार त्यांनी पोगो बघा. आणि मग आपण त्यात निरखून पाहिल्यावर, वेगवेगळे अ‍ॅगलने त्यात काय दुसरा अश्लील अर्थ अभिप्रेत असेल हे चेक केल्यावर वा मग कोणीतरी तो उलगडून सांगितल्यावर, त्याच्या नजरेतून तो फोटो पुन्हा बघितल्यावर आपल्याला तो दुसरा अर्थ दिसतो, आणि मग पुन्हा पुन्हा जेव्हा ते चित्र पाहू तेव्हा मग त्याच नजरेतून बघितले जाते आणि तसाच तो अश्लील भासतो.

मिंंत्राच्या लोगोबाबत नेमके हेच झाले आहे !

ज्यांनी हे केलेय त्यांचा हेतू नक्की समाजाचे / स्त्रियांचे भले आहे की आणखी काही हे ठाऊक नाही
पण येत्या काळात असे बरेच वाद बघायचे आहेत, त्यासाठी तयार राहा.

दरम्यान मिंत्राने आपला लोगो बदलायचा निर्णय घेत त्याची तयारीही सुरू केली आहे. त्यांनी आपल्या बिजनेस मॉडेलचा विचार करता त्यादृष्टीनेच हा निर्णय घेतला असेल, त्यामुळे तो त्यांच्यासाठी योग्यच असेल.

सोशलसाईटवर मात्र आता ईंग्लिश मूळाक्षर "एम" सुद्धा बाद करायचे का म्हणत यानिमित्ताने काही नवनवीन लोगो शेअर केले जात आहेत. खाली काही उदाहरणे दिली आहेत, शोधल्यास आपल्यालाही सापडतील.

असो, तर एकूणच या मिंत्रा प्रकरणावर चांगली वाईट चर्चा करायला हा धागा.

तळटीप - मी सुद्धा माझ्या लेखात ईंग्रजी मूळाक्षर "एम" असे देवनागरीत लिहून संभाव्य वाद टाळला आहे. मागाहून मलाही लफडे नकोत. आधीच माझे धागे सतत वादाच्या भोवर्‍यात असतात Happy

logo.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजवर इतक्यांदा मिंत्रावर खरेदी केली, टीपी करते पण लोगो मात्र हे प्रकरण कळल्यावर गूगलून बघितला.
धन्य लोक आहेत जगात.

या लोगोवरून मॅकडोनाल्ड टीशर्टचा विनोदी विडिओ आठवला. मिंत्रासंबंधी जो आक्षेप आहे अगदी त्याच स्वरूपाचा सन्दर्भ असणारा टीशर्ट घालून एक आई आपल्या पोराला शाळेत पाठवते. जादा माहिती विडिओ डिस्स्क्रिप्शनमध्ये वाचा. एकेक पालक असतात Proud
https://youtu.be/oupyDO0zI8g

स्वतःला वूमन ऍक्टिव्हिस्ट म्हणवणार पण स्युडो फेमिनिस्ट आहे...
कायच्या काय लॉजिक दिलेय लोगो कसा वूमन ऑफेंसिव्ह आहे त्याचे...

असो, तर एकूणच या मिंत्रा प्रकरणावर चांगली वाईट चर्चा करायला हा धागा.>>> आता कशाला चर्चा करायची? लोगो बदलणार आहेत ना.. मग संपला विषय!

तो एक जोक आहे ना मानसोपचारतज्ञ एका रुग्णाला एक वर्तुळ व एक बिंदू काढून दाखवतात व विचारतात काय दिसते यात. तो म्हणतो "काय हे डॉक्टरसाहेब काय अश्लील चित्र दाखवताय. लाज नाही वाटत तुम्हाला रुग्णांना अशा चित्रांना एक्स्पोझ करायला? तुम्हालाचह मानसोपचाराची गरज आहे ..." .....
............... त्या टाईपचं हे मिंत्रा प्रकरण वाटतय.

मला वाटते सतत पॉर्न बघायची सवय असणार्‍या पुरुष/बायकांना असे जळी-स्थळी फॅलिक शेप्स दिसू लागतात. या 'अ‍ॅक्टिव्हिस्ट' बाईंची वेब "अ‍ॅक्टिव्हिटी" चेक केली पाहिजे.
कदाचित झटपट प्रसिद्धी मिळवण्याचा उद्देशही असू शकतो. यांच्यापायी उत्पादकांना मात्र लाखोंचं नुकसान झेलावं लागतं. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत काही बायकांनी या खेळण्यावर बंदी आणवली होती.

मिंत्राच्या लोगोची सर्वात प्रथम तक्रार केली होती ती ओवेस्ता फाऊंडेशच्या कार्यकर्त्या नाझ पटेल यांनी. डिसेंबर २०२० मधे मिंत्राचा लोगो महिलांविषयी अपमानजनक व आक्षेपार्य असल्याचे समजल्यामुळे त्यांनी तक्रार केली होती. यानंतर सोशल मिडीयातील रिकामटेकड्यांनी इतर कंपन्यांचे लोगो कसे महिला/पुरुष विरोधी/अपमानजनक आहेत, हे दाखवून देण्याची मोहिम हाती घेतली.

आता कशाला चर्चा करायची? लोगो बदलणार आहेत ना.. मग संपला विषय!
>>>>>>>

सोनाली, विषय संपला नाही तर यामुळे सुरू झालाय असे मला वाटते.
जर हे प्रकरण पेल्यातले वादळच ठरले असते, लोकांनी चार दिवस गॉसिपिंग करून सोडून दिले असते तर मग हे प्रकरण सौम्य ठरले असते.
पण यामुळे मिंत्राला लोगो बदलावा लागला म्हणजे हे प्रकरण सोडून देण्यासारखे नक्कीच नाही. हे पुढेही आता होऊ शकते. असा फटका ईतर कोणालाही पडू शकतो. जाणकारच सांगू शकतील की यामुळे मिंत्राला किती आर्थिक फटका पडला असावा..

कि या प्रकरणातून मिळणार्‍या पब्लिसिटीचा फायदाही होईल त्यांना ??? जो आर्थिक फटक्यापेक्षा जास्त फायद्याचा ठरेल?

त्या दृष्टीने पाहिस्तोवर यातला एकही लोगो अश्लील वाटत नव्हता. दूरदर्शनच्या लोगोत काय दिसलं? मला तो अजूनही समजलेला नाही.

दूरदर्शनच्या लोगोत काय दिसलं? >>>>> त्यावर खराखुरा आक्षेप नाही तर ट्विटरवर गंमतीने/उपरोधाने ट्रेंड होतेय की तो लोगो ६९ सारखा आहे तर त्यालाही बॅन करा.

कालच वाचलं हे प्रकरण. मला जुन्या लोगोतला आक्षेपार्ह भाग कळायला वेळ लागला.
बाईंनी तक्रार केली ठिके, पण मिंत्रा ने सुमडीत बदलून का दिला लोगो?
प्रत्येक ब्रँड चा लोगो ठरवताना त्यामागे एक वेगळा विचार, भावना असते.असंच मनात आलं आणि गिरगीटलं आणि झाला लोगो असं नसतं.
आणि तरीही मिंत्रा ने लोगो मागची त्यांची काही वेगळी भूमिका असेल ती स्पष्ट न करता थेट बदलून टाकला.त्यामुळे बाईंच्या म्हणण्यात तथ्य होतं का असं वाटायला लागतं.
खरं तर तसं असेल लोगो मध्ये तरी हे जाणवून देऊन त्यामागच्या विचाराला अजून प्रसिद्धी दिल्या सारखी होईल.
शोधलं तर बऱ्याच लोगो मध्ये अश्लीलता दिसेल.ही पंडोराची पेरी उघडून त्यातली भुतं बाहेर न काढणं शहाणपणाचं.

आणि तरीही मिंत्रा ने लोगो मागची त्यांची काही वेगळी भूमिका असेल ती स्पष्ट न करता थेट बदलून टाकला
>>
हा मुद्दा योग्य आहे, पण समजा मिंत्रा नावातला ईंग्रजी एम एवढाच त्यामागे अर्थ असेल तर त्यात वेगळे स्पष्ट काय करणार?

त्यामुळे बाईंच्या म्हणण्यात तथ्य होतं का असं वाटायला लागतं.>>>>>> बाकी बाईने काढलेला अर्थ कायच्या काय आहे, पॉर्नसाइट वा तत्सम प्रौढांसाठीचे प्रॉडक्टची साईट असती मिंत्रा तर समजू शकले असते, पण जे मिंत्राचे टारगेट कस्टमर आहे ते पाहता कोण अश्या विचारांनी जाणूनबुझून आपला लोगो असा ठेवेल.

प्रत्येक ब्रँड चा लोगो ठरवताना त्यामागे एक वेगळा विचार, भावना असते.असंच मनात आलं आणि गिरगीटलं आणि झाला लोगो असं नसतं.
आणि तरीही मिंत्रा ने लोगो मागची त्यांची काही वेगळी भूमिका असेल ती स्पष्ट न करता थेट बदलून टाकला.त्यामुळे बाईंच्या म्हणण्यात तथ्य होतं का असं वाटायला लागतं.>>
मी ही हेच लिहीणार होते.. logo is more than just an image.. लोगो बनवताना डिझायनरला त्यात वापरले जाणारे कलर्स, त्याचा शेप, तो एम त्याच प्रकारे लिहीण्यामागची कारणे , अशा बऱयाच गोष्टी ध्यानात घेऊन स्टोरी टेलिंग करावं लागतं.
मिंत्राकडेही त्यांच्या लोगोच्या डिझाईनचं स्पष्टीकरण असलेच, त्यांनी ते स्पष्टीकरण न देता लोगो चेंज केला का स्पष्टीकरण तितकंस convincing नव्हतं, कोणास ठाऊक

हा मुद्दा योग्य आहे, पण समजा मिंत्रा नावातला ईंग्रजी एम एवढाच त्यामागे अर्थ असेल तर त्यात वेगळे स्पष्ट काय करणार? >> प्रत्येक लोगो मागे काही ना काही कारण/अर्थ असतोच किंवा मी म्हणेन असलाच पाहिजे.. जर कुठलंच कारण किंवा अर्थ नसेल तर सध्या जो वाद निर्माण झालाय त्याला तोंड देणं मिंत्रासाठी कठीण आहे.

प्रत्येक लोगो मागे काही ना काही कारण/अर्थ असतोच किंवा मी म्हणेन असलाच पाहिजे..
>>>>
रुल आहे का कायद्याने तसा? मला याबाबत कल्पना नाही म्हणून विचारतोय

कायदा, रूल ह्याची मला कल्पना नाही. पण हे माहित आहे की logo communicates a lot about a company or product. मिंत्राच्या लोगो मागचा अर्थ देखिल केवळ “इंग्रजीतला M” इतकाच मर्यादीत नाही. कारण तसं असतं तर मिंत्राने तो हुबेहूब M सारखाच लिहिला असता. त्यांना काही तरी अश्लील communicate करायचं होतं असं माझं म्हणणं नाही..but they want to communicate something more than just letter “M”.

मिंत्रा ने लोगो मागची त्यांची काही वेगळी भूमिका असेल ती स्पष्ट न करता थेट बदलून टाकला.त्यामुळे बाईंच्या म्हणण्यात तथ्य होतं का असं वाटायला लागतं.
>>>सिरियसली??

क्रॅप्स, समजा तुम्ही एक मोठी कंपनी आहात.तुमच्याकडे लीगल टिम्स आहेत.तुमची बाजू घेणारे बरेच लोक आहेत.असं असताना एका बाईच्या दाव्याला लक्षात घेऊन तुम्ही गुपचूप लोगो बदलून टाकता.म्हणजे बाई कडे अजून काहीतरी शक्तिमान सिक्रेटस आहेत,उपद्रव मूल्य जास्त आहे, किंवा तुम्हाला अजिबात कायदेशीर लढ्यात पडायचं नाहीये(किंवा लॉकडाऊन मध्ये आर्थिक नुकसान होऊन जास्त पुढे जायला पैसे नाहीत.)
किंवा एम च्या तिरक्या बाजूंचा स्किन कलर लक्षात घेता बाईला काहीतरी असं माहीत आहे जे लोकांना माहीत नाही.

सध्याच्या आक्रस्ताळ्या दिवसात, कुठली गोष्ट कुठंच वळण घेईल याचा भरवसा नाही - दिसलं की ठोकलं वृत्ती मुळे अनेक उद्योग वादात न पडणं श्रेयस्कर समजतात -

समाज प्रबोधन करणे, आपल्या पवित्र्याचं समर्थन करणे यात जी आर्थिक /वैचारीक /कायदेशीर शक्ती जाते आणि शिवाय ब्रँड नेम वर जी चिखल फेक होते त्याचा धोका पाहता मोठे उद्योग त्यात पडत नाहीत

तनिष्क च्या जाहिरातीं मध्ये झालेले वाद आणि तनिष्कने लगेचच घेतलेली माघार पण अशीच होती

हे असं का होतंय, आपण खरंच दुसऱ्याचं बोलणं ऐकून घेतो की झुंडशाही च्या ताकदीचा उन्माद मिरवतो? समाज म्हणून आपण कुठे चाललोय? याचा विचार प्रत्येकाने करायला हवाय...

ता. क. - मला मिंत्रा, त्यांचा लोगो, त्या लोगो मागची कारणमीमांसा, उघड /छुपी गुपितं /लोगो बदलण्या मागची मानसिकता यातलं काहीही माहीत नाही, वर व्यक्त केलेले विचार हे सर्व साधारण पणे काय होतंय /काय झालं असावं या वरचा माझा कयास /माझं मत आहे

लोगोला आक्षेप घेणाऱ्या बाईला पब्लिक सपोर्ट काहीच नव्हता. त्यामुळे जसा तनिष्कवर दबाव आला, बॉटम लाईन वर फटका बसेल अशी भीती वाटली तसं काही मिंत्राला झालं नसणार.
पण कंपन्या लोगो अधूनमधून बदलत असतात. ब्रँड नेम अगदी नाही बदललं तरी ब्रँड कलर्स बदलत असतात.
तसा यांना एनिवेज बदलायचा असेल. आणि चकटफु पब्लिसिटी भेटली. नवीन लोगोचा प्रचार इझी झाला.

हो सनव, असंही असू शकतं.तसाही त्यांनी केलेला बदल वरवर पाहिलं तर जाणवतही नाही.म्हणजे बाईचं म्हणणं पण राखलं आणि फारसा व्हिजीबल फरकही पडला नाही ब्रँड इमेज लोगो मध्ये

त्यांनीच त्या महिलेला तक्रार करायला तर नाही लावले ना?
बघा, मिंत्राचा लोगो माझ्या लक्षातही नव्हता आता लक्षात राहील, कधी नव्हे ते मिंत्राच्या साईटवर जाऊन आलो, नविन लोगो लावलाय का? काय विकतात हे लोक वगैरे बघुन आलो.
माझ्या सारखे लाखो/ करोड क्लिक्स झाले असतील..
टीव्हीवर जाहिराती देऊनही हे सहज साध्य झालं नसतं, किती खर्च आला असता.

काही प्रतिसाद वाचुन तनिष्कची जाहिरात आठवली. त्यांनीही काहीही फाटे न फोडता ती मागे घेतली होती. पब्लिक तर तेव्हा रतन टाटांना असं टारगेट करत होतं की जसं त्यांनीच ती जाहिरात बनवली.

>>>>त्यांनीच त्या महिलेला तक्रार करायला तर नाही लावले ना?>>>> अगदी अगदी. मलाही हा सेट अप तर नाही ना, कहानीमे ट्विस्ट असा? - असेच वाटले.
मिंत्रा हे नाव पहील्यांदाच वाचले. आता लक्षात रहाणार.

कोणतेही चित्र / दृश्य आपण ज्या दृष्टीने , ज्या कोनातून आणि ज्या दृष्टिकोनातून पाहू, त्यानुसार त्याचे अर्थ आणि प्रतिमा बदलत राहतील. Every piece of art can have thousand interpretations. असे असताना कुणाला तरी एका व्यक्तीला अमुक वाटले म्हणून तात्काळ कोणतीही बाजू न मांडता मिंत्राने लोगो बदलणे हे विलक्षणच वाटले.

वैधानिक इशारा: पुढील विधान आक्षेपार्ह वाटू शकते.

आता पर्यंत मिंत्राचा लोगो त्या बाईंना वाटला तसा कधी वाटला नव्हता. त्यामुळे ह्या शोधक वृत्तीला दाद द्यायला हरकत नाही....ह्या पार्श्वभूमीवर मिंत्राचा नवीन लोगो मला खुर्चीवर बसलेल्या स्त्रीचा वरून फोटो घ्यावा तसा वाटत आहे.

किंवा एम च्या तिरक्या बाजूंचा स्किन कलर लक्षात घेता बाईला काहीतरी असं माहीत आहे जे लोकांना माहीत नाही.
>>>>
हे वाक्य वाचून पुन्हा तिरक्या बाजूंचा कलर बघायला लोगो चेक करावा लागला Happy

बाकी हा स्किन कलर एक वेगळाच विषय आहे. जगात ईतक्या विविध रंगाच्या स्किन आहेत की स्किन कलर कोणत्या एक रंगाला बोलणे हेच पटत नाही...

Pages