व्हिलेज रॉकस्टार या आसामी भाषेतील चित्रपटाचा रसास्वाद

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 2 February, 2021 - 11:45

व्हिलेज रॉकस्टार

Blessed are the poor in spirit, for theirs is the kingdom of heaven… Jesus Chirst

“व्हिलेज रॉकस्टार” २०१७ सालचा आसामी भाषेतील चित्रपट. (लेखिका, दिग्दर्शक, एडीटर आणि सहनिर्माती रीमा दास ) ६५ व्या national film awards मध्ये बेस्ट फिचर फिल्मचे “स्वर्ण कमल” त्याचप्रमाणे, best child artist, best location sound artist आणि best editing अशा वेगवेगळ्या परितोषका बरोबरच दुसरी सन्मानाची गोष्ट 91ST ACADEMY AWARD मध्ये आपल्या देशातर्फे या चित्रपटाच्या प्रवेशाची अधिकृतपणे निवड करण्यात आली होती.

दिग्दर्शिका रीमा दास, त्यांच्या करिअरच्या सुरवातीला अभिनेत्री बनण्यासाठी मुंबईला आल्या होत्या. पण दुर्दैवाने त्यांना अभिनय क्षेत्रात फारसे यश मिळू शकले नाही. म्हणून दिग्दर्शनासह त्यांनी इतर क्षेत्रात प्रवेश केला. पण यातील कोणत्याही क्षेत्रात, त्यांनी औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नाही. रीमा दास यांनी जागतिक पातळीवरील सिनेमे बघून, त्याचा अभ्यास करून, स्वत:च्या बळावर सर्व ज्ञान संपादन केले. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर “ The fact that I am not trained and I did not go to a film school in a way helped to explore more and to be true with my vision. … Watching world cinema inspired me and gave perspective of global film making” व्हिलेज रॉक्स्टार स्वबळावर केलेली अशीच उत्तम निर्मिती.

“व्हिलेज रॉकस्टार” रीमा दास यांनी अर्पण केला आहे त्या लोकांना, त्या गावाला, ज्या वातावरणात त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. या क्षेत्रात प्रवेश केल्यावर मुंबईहून काही कारणास्तव त्या एकदा आपल्या गावी गेल्या होत्या.त्यावेळी खेड्यात काही मुले हातात नकली गिटार, वाद्ये घेऊन लुटुपुटूची कॉन्सर्ट करत आहेत असे दृश्य त्यांनी बघितले. त्यांची निरागसता, आनंदी वृत्ती रीमा दास यांना भावली. “ व्हिलेज रॉकस्टारचे” बीज त्यांना तेथे सापडले आणि या आगळ्या वेगळ्या कलाकृतीची निर्मिती झाली.

चित्रपटाची नायिका आहे एक दहा ते बारा वर्षाची मुलगी धुनु. ( भनिता दास ) एका गरीब घराण्यातल्या त्या मुलीने तिला गिटार पाहिजे आहे एवढाच ध्यास घेतला आहे. संपूर्ण कथानकाचे हे मूळ बीज. पण केवळ धुनुला गिटार मिळते किंवा नाही इतपत हि कथा मर्यादित नाही. धुनु हे एक भाव विश्व आहे आणि ते वेगवेगळ्या प्रसंगातून आपल्यापुढे व्यक्त झाले आहे. या भाव विश्वाबरोबर खेडेगावातील संस्कृती, तिथले दारीद्य, संस्कारक्षम मने या सर्व गोष्टी समर्पकपणे आपल्यासमोर येतात.

सुरवातीलाच धुनुचे खेड्यामधील झोपडीवजा घर, मिणमिणारे दिवे, राबराब राबणारी तिची आई (बसंती दास ) आणि अशा वातवरणातहि आनंदीपणे जगणारी धुनु आणि तिचा भाऊ( मनबेन्द्र) हे सर्व सामान्य कुटुंब आपल्याला पाहायला मिळते. धुनु एकटी नाही तिच्या बरोबर तिचे मित्रही आहेत. सकाळी उठून शेतात जायचे, आईला मदत करायची, दुपारी शाळा , शेतात, झाडावर हुंदडणे, आणि आकाशाकडे पाहत पहुडणे हा त्या सर्व मुलांचा नित्याचा कार्यक्रम. पण तरीही या मुलांना, विषेत: धुनुला संगीत भुलवत असते. गावात जेव्हा काहीमुले हातात खोटी वाद्ये घेऊन गाण्याचा कार्यक्रम करत असतात. तेव्हा धुनु त्यांच्या हातातील गिटारकडे कुतूहलाने बघत असते कारण त्या वाद्याचे तिला आकर्षण आहे. आणि म्हणूनच थर्माकोलचे गिटार करून ती आपल्या मनातली इच्छा तृप्त करत असते. लहान मुलांच्या मासिकामध्ये आलेली मित्रांच्या कॉन्सर्टची काल्पनिक कथा जेव्हा ती वाचते तेव्हा तिच्याही मनात येते आपलाही असाच एक band असावा. एक दिवस बाकीची मुलेही अशीच नकली वाद्ये तयार करतात आणि त्यांचा छोटेखानी band तयार होतो.

धुनुचे आंतरिक भाव विश्व, तिच्या मनात असणारी गिटारची सुप्त इच्छा, आपल्यापुढे वेगवेगळ्या प्रसंगातून व्यक्त होत असते. गावापासून दूर असणाऱ्या नदीमध्ये तिची आई पोहत स्नान करत आहे. आणि धुनुला ती पोहायला शिकवत असते. आईला पोहायला कसे येते याचे आश्चर्य तिला वाटते. आई तिला सांगते जेव्हा एकदा अचानक पाण्यामध्ये जाण्याचा प्रसंग आला तेव्हा पोहण्याशिवाय पर्याय राहिला नाही. धुनुला शिकायचे असेल तर ती सुद्धा शिकू शकते. धुनु आणि तिच्या आईच्या पाठमोऱ्या आकृत्या आणि समोर असणारी नदी आपल्याला दिसते. धुनुच्या मानत पोहणे या विषया पेक्षाहि तिच्या मनात आहे जर पोहायला शिकणे शक्य आहे तर गीटार मिळणे का शक्य नाही ? समोर दिसणाऱ्या नदीकडे बघून जेव्हा दोन आकृत्या विचार करत आहेत तेव्हा आईला दिसत आहे संसाराचे विदारक चित्र आणि धुनुला दिसत आहे गिटार.

त्याचमुळे ती दुसऱ्या दिवशी आपल्या आईला खरे गिटार विकत घेण्याबाबत विचारते. आईकडे स्वाभाविकपणे पैसे नाहीतच त्यामुळे शेळीला विकून आपण गीटार घेऊ असे ती सांगते. पण धुनुचा आपल्या शेळीवर जीव आहे. आईची सूचना तिला मान्य नाही. बराच वेळ ती आपल्याला शेळीला कुरवाळत बसते.
धुनु शेळी सारखी निरागस आहे म्हणूनच आपल्या वयाच्या मुलांबरोबर ती त्याच निरागसतेने खेळत असते . पण एक मुलगी मुलांच्या बरोबर खेळते ते खेडेगावातील संस्कृतीला मानवणारे नसते. त्याचमुळे गावातील बायका धुनु वर रागावतात. धुनुची आई स्वाभाविकपणे धुनुची बाजू घेते. धुनु तिची मुलगी आहे आणि तिला कशी वाढवायची हे ती ठरवणार असे तिचे प्रामाणिक मत आहे. रीमा दास यांनी या प्रसंगाबाबत बोलताना सांगितले त्यांच्या लहानपणी त्या अशाच हूड होत्या आणि मुलांच्यामध्ये खेळत होत्या. तेव्हा त्यांचे वडील त्यांची बाजू घ्यायचे.

त्या छोट्याशा खेडेगावातही एक आजोबा असतात आणि लहान मुलांना संस्कार क्षम गोष्टी आवडीने सांगत असतात. एक दिवस यक्षाने ययुधिष्ठराला विचारलेल्या प्रश्नाची गोष्ट ते मुलांना सांगत असतात.” आकाशापेक्षाही मोठे कोण ? सर्वात वेगवान कोण? सर्वात श्रीमंत कोण?” मुले कुतुहलाने आजोबांचे ऐकत असतात. “ आकाशापेक्षाही मोठी आहे आई. सर्वात वेगवान आहे माणसाचे मन आणि ज्याला कसलाही हव्यास नाही तो माणूस श्रीमंत आहे.” धुनु तशीच आहे. तिचे आईवर निरतिशय प्रेम आहे. मन वेगवान आहेच म्हणूनच आईला शेतात मदत करत असतानाहि ती गिटारचा विचार करत बसलेली असते. आणि गरीब असूनही श्रीमंत आहे कारण तिला श्रीमंतीचा हव्यास नाही. तिला गिटार हवे आहे कारण तिचे ते बालवयातील निरागस स्वप्न आहे तो तिचा हव्यास नक्कीच नाही. धर्मराजाने दिलेल्या त्या उत्तरामध्ये धुनुच्या व्यक्तिमत्वाचे निरागस प्रतिबिंब आपल्यला दिसते.

“जर तिची इच्छा खरी असेल तर ती नक्की पूर्ण होईल” या आजोबांच्या वाक्याची सत्यता पटवून देणारा अजुनी एक प्रसंग लगेच घडतो. एक दिवस फाटक्या वर्तमानपत्राचा तुकडा तिच्या हातात येतो. त्यात लिहिलेलं असते जर विचार सकारात्मक असतील तर त्याचे परिणामही सकारात्मक होतात. सकारात्मक विचाराने माणसाच्या मनात जी सुप्त इच्छा असते ती पूर्ण होतेच. धुनुच्या मनात तर गिटार पाहिजे हि इच्छा रुजलेली असतेच. वर्तमान पत्राचा तो तुकडा वाचल्यावर अर्थातच तिच्या आशा पल्लवित होतात आणि तीला गिटार मिळणार याची खात्री वाटू लागते. पण तरीही पैसे कुठून आणायचे हा प्रश्न तिला असतोच. गावातील आजोबाना मनातले विचार ती बोलून दाखवते आणि पैसे उभे करण्याचे मार्ग आजोबा तिला सांगतात. खूप अभ्यास करून स्कॉलरशिप धुनु मिळवू शकते , तिच्या लाडक्या शेळीचे दुध काढून ती विकू शकते, शेतातली भाजी गावात विकू शकते. आणि त्या पैशातून ती गिटार विकत घेऊ शकते. दुसऱ्या दिवसापासून धुनु काम करू लागते. आणि सगळे पैसे ती बांबूला एक छिद्र पाडून त्यात साठवू लागते. त्या साठलेल्या पैशाने तिला गिटार विकत घ्यायचे आहे. धुनु तिच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करत असते.

धुनुचे निरागस भाव विश्व आणि त्यात गढून जाणारे आपण प्रेक्षक. पण काहीच दिवसात दरवर्षी प्रमाणे त्याही वर्षी गावात पाउस येतो. सर्व मुले जाता येता आनंदात बागडत असतात. पण एक दिवस हा पाउस रौद्र रूप धारण करतो आणि पुराची परिस्थिती निर्माण होते. मुलांचे निरागस खेळ आपोआप थांबतात. स्वत:चे घर वाचवणे, घरातील सामान बाहेर काढणे या गोष्टीत गावातील लहान मुलांच्या सह प्रत्येक जण रुदवलेला आहे.संपूर्ण गावावर नैराश्येचे सावट पसरते.

पण पुराचे पाणी एक दिवस ओसरते. पाण्यामध्ये वाहून गेलेल्या शेताकडे धुनु आणि तिची आई निराशेत बघत असतात. धुनु आईला विचारते “ दरवर्षी पाउस येतो आणि दरवर्षी आपले शेत पुरात जाते तरी आपण शेती का करतो?” आई म्हणते “ काम करणे हाच आपला धर्म आहे.” आईची निराश अवस्था आणि गावातील पुराचे भयानक वातावरण यात धुनुच्या स्वत:च्या गीटारचे स्वप्न मात्र बाजूला राहत असते. घरची अधिकच बिघडलेली परिस्थिती बघून धुनुने स्वत:च्या गिटारसाठी साठवून ठेवलेले पैसे ती आपल्या आईला देते. निरागस धुनु अचानक मोठी झाल्यासारखी वाटते.

धुनु च्या भाव विश्वात तिच्या शेळीचे महत्व अनन्यसाधारण आहे. तिला भूक लागली तर झाडवर चढून तिला खाऊ घालणे असो किंवा तिला पाण्यातून जपून नेताना कडेवर घेऊन जाणे असो छोट्या गोष्टीमधून धुनु शेळीची काळजी घेत असते. अशा प्रिय शेळीला विकण्याचा व त्या पैशातून गिटार घेण्याचा विषय तिने अमान्य केलेला असतोच. पण अचानक आलेल्या भयानक पुरात ती शेळी कुठेतरी बेपात्ता होते. धुनु तिचा भाऊ आई सर्वजण शेळीचा तपास करतात. रात्रीच्या अंधारात लुकलुकणारे दिवे आणि त्या दिव्याच्या प्रकशात शेळीला शोधण्यासाठी केलेले प्रयत्न. पण दुर्देवाने ती शेळी मिळत नाही.

शेळी गेल्यावर या चित्रपटात अजुनी एक प्रसंग आहे ज्यात खेडेगावातील संस्कृती, वातावरण आपल्या समोर येतातच पण त्याही पेक्षा हा प्रसंग धुनुची निरागसता संपली आणि ती मोठी झाली हे व्यक्त करणारा हा प्रसंग आहे. धुनु वयात आलेली असते. वास्तविक हा निसर्गाचा नियम आहे पण खेडेगावात मुली वयात आल्यावर विधी करण्याची प्रथा आहे तो विधी आपल्याला पाहायला मिळतो.

धुनु इतकीच चित्रपटात महत्वाची भूमिका आहे तिच्या आईची. आपल्या मुलीला प्रसंगी धाक दाखवणारी पण तितकीच तिच्यावर प्रेम करणारी हि अडाणी आई आहे. पण जेव्हा धुनु गिटार बाबत तिला विचारते तेव्हा ती शेळी विकूया म्हणते पण दुसऱ्या दिवशी तीच आई गावात जाऊन जुन्या का होईना गिटारची चौकशी करते.

पुराची परिस्थिती निवळलेली असते. आणि धुनुचे स्वप्न पुन्हा जागृत होते. दूरवरून तिची आई गिटार हातात घेऊन आपल्याला दिसते. धुनु च्या हातात गिटार आहे, त्याचे हलकेसे स्वर ऐकू येतात. तिचे मित्र आनंदात नाचू लागतात आणि चित्रपट संपतो.

रीमा दास यांचे उत्तम दिग्दर्शन आणि तितकेच तितकेच उत्तम एडिटीग यांचा मिलाप या चित्रपटात झाला आहे. चित्रपटात एकामागोमाग येणारे प्रसंग हे एकसंध आणि अर्थपूर्ण वाटतात हे रीमा दास यांच्या उत्तम पटकथेचे श्रेय . भानिती दास आणि बसंती दास यांचा नैसर्गिक अभिनय यामुळे हा चित्रपट मनस्वी भावतो. भानिता दासने धुनुच्या व्यक्तिरेखेचा महत्वाचा पैलू निरागसता हा फार समर्थपणे साकारला आहे हे नि:संशय.
हातात वाद्ये घेऊन कॉन्सर्ट यशस्वी करणारे अनेक चित्रपट आहेत, कलाकारांची स्वप्ने आणि जिद यांच्या कथा साकारणारेहि चित्रपट अनेक झालेत पण हा चित्रपट भावतो कारण तो एका ठराविक चाकोरीतून जात नाही तर तो खेडे गावातील समस्यांना, संस्कारांना सामोरे जात स्वत:च्या इच्छा उराशी बाळगत आंदादाने जगत असणाऱ्या मुलांची कथा सांगतो. आणि त्याचमुळे कोणत्याही कॉन्सर्ट मध्ये हि मुले जातील वा नाही हा प्रश्न नाही. खेडे गावातील हि मुले खऱ्या आयुष्यामध्ये मात्र “ व्हिलेज रॉक स्टार” आहेत हे निर्विवाद.

सतीश गजानन कुलकर्णी
9960796019

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख..
चित्रपटाची ओळख सुंदररित्या करून दिलीयं लेखात...!!

सर, (मी कदाचित लहान असेन तरी) खूप कौतुक करावंसं वाटतं ते एका गोष्टीसाठी. आसामी, बंगाली अशा भाषेतले चित्रपट तुम्ही शोधून पाहता. खरोखर कौतुकास्पद आहे !
शिवाय त्याचा परिचय पण. हेडर मधे परिचय असा शब्द टाकत चला. रसास्वाद मधे इतकी तपशीलवार कथा देत नाहीत.