फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग २६ - अन्तिम

Submitted by Theurbannomad on 2 February, 2021 - 08:36

याह्याची आजची ओळख मानवाधिकार कार्यकर्ता आणि लेखक अशी आहे. त्याच्या ' द डेविल्स डबल ' या पुस्तकावर २०११ साली एक चित्रपटही निघाला होता. त्याशिवाय याह्याने सीआयएने त्याच्या कसा कसा छळ केला यावरही ' द ब्लॅक होल ' नावाने एक पुस्तकं लिहिलं, ज्यावर आजही अमेरिका आणि आयर्लंडमध्ये बंदी घातलेली आहे. याशिवाय ' द हँगमॅन ऑफ अबू घारेब ' हे कुप्रसिद्ध अबू घारेब तुरुंगावरचं पुस्तक , ' फोर्टी शेड्स ऑफ कॉन्स्पिरसी ' हे आंतरराष्ट्रीय राजकारणावर टोकदार भाष्य करणारं पुस्तक त्याने लिहून प्रकाशित केलं आहे. त्याच्या अधिकृत वेबसाईटवर त्याने त्याच्यावर अमेरिकन प्रसारमाध्यमांनी केलेल्या आरोपांची उत्तरंही दिलेली आहेत. अनेक ' टॉक शो ' मध्ये मानवाधिकाराच्या विषयावर थेट मत मांडण्यासाठी तो हजेरी लावत असतो.
नॅशनल जिओग्राफिक चॅनलने त्याच्यावर २०१२ साली ' लॉक्ड अप अब्रॉड ' हा चाळीस मिनिटांचा माहितीपट प्रसारित केलेला होता. पॅट्रिक बेत - डेव्हिड , जॉर्ज गल्लोवे अशा अनेकांनी त्याची दीर्घ मुलाखत घेतलेली आहे. आयरिश सरकारने त्याच्यावर केलेल्या अन्यायाला प्रसारमाध्यमांनीच अशा प्रकारे लोकांसमोर आणलेलं आहे. त्याला २०१०-११ च्या सुमारास ' मल्टिपल स्क्लेरॉसीस ' झाल्यावरही आयरिश सरकारने त्याला झुलवत ठेवलं असल्यामुळे त्यांना टीकाही सहन करावी लागलेली आहे.
याह्याने बरेच वेळा आपल्या टोकदार भाष्याने पत्रकारांना सणसणीत चपराक दिलेली आहे. उदे हुसेन मारला गेल्यावर त्याला प्रतिक्रिया विचारली गेली, तेव्हा त्याने या घटनेचं आपल्याला दुःख झाल्याचं सांगितलं. उदे अमेरिकेच्या हल्ल्यात मारला गेल्यामुळे तो इराकी लोकांच्या नजरेत ' शहीद ' झाला, ज्यामुळे त्याच्या काळ्या कृत्यांना हवी तशी शिक्षा मिळाली नाही हे त्याचं रोखठोक मत अनेकांच्या मनाला भिडलं होतं. सद्दामला तो कधीही क्रूरकर्मा मानत नाही. किंबहुना इराकसारख्या देशात हजारो वर्षांपासून रक्तपात आणि राजेशाह्यांमधल्या साठमाऱ्याच झालेल्या असल्यामुळे तिथली जनता अमेरिका अथवा युरोपची लोकशाही स्वीकारूच शकत नाही हे त्याचं ठाम मत आहे. सीआयए आणि युरोपीय देशांकच्या गुप्तचर संस्था लोकशाहीच्या नावाखाली इतर देशांमध्ये करत असलेला हिंसाचार सद्दामसारख्यांच्या तानाशाहीपेक्षा घटक आहे, हे तो निक्षून सांगतो.
इराणच्या गुप्तचर संस्थेने अनेक आत्मघातकी तरुणांना युरोपमध्ये घातपातासाठी पाठवलेलं आहे हे त्याने आपल्या वेबसाईटवरच्या एका ध्वनिफितीतून सांगितल्यावर बरीच खळबळ उडालेली होती. सद्दामच्या पाडावानंतर इराकमध्ये आलेली नवी शासनव्यवस्था अमिरिकेच्या हातातलं बाहुलं झालेल्या काही मूठभर लोकांच्या हातात असल्यामुळे ती सद्दामच्या राजवटीहून घाणेरडी असल्याची त्याची टीका अगदीच अवास्तव मानता येत नाही. आज इराकमध्ये मूलतत्ववादाने आणि इस्लामच्या नावाखाली अतिरेकी कारवाया करणाऱ्या आयसिससारख्या संघटनांनी डोकं वर काढलं असल्याचा दाखला देऊन तो अनेकदा पाश्चात्य देशांचा चांगुलपणाचा बुरखा टराटरा फाडतो. त्याच्या या स्पष्टवक्तेपणामुळे त्याला वयाच्या साठीतही संघर्ष करावा लागत असला, तरी त्याला त्याची पर्वा नाही.
शरीरावर सत्तावीस जखमांच्या खुणा वागवणारा, पोटावर बारा टाके घातलेल्या जखमेचा आणि चेहऱ्यावर कपाळापंपासून डोळ्यापर्यंत गेलेला खोल घावाचा व्रण अभिमानाने बाळगणारा,परिस्थितीशी अविरत संघर्ष करून आपली ओळख बनवणारा आणि इराकच्या इतिहासातल्या एका माथेफिरू राजपुत्राचा 'तोतया' म्हणून काही वर्षं इराकच्या महत्वाच्या वर्तुळात वावरलेला लतीफ याह्या एक विलक्षण मनुष्य आहे हे नक्की. नियतीने त्याला ' फिदायी ' ची ओळख देऊन पुढे मानवाधिकार कार्यकर्ता म्हणून जगायची संधी दिलेली असली, तरी अवहेलनेचा शाप घेऊनच त्याचं अख्ख आयुष्य गेलेलं आहे.
आज आयर्लंडमधल्या आपल्या घरात बसून तो आपल्या बाजूने खिंड लढवत आहे. घरी कामाच्या टेबलामागे भिंतीवर त्याने लावलेली इराकी युद्धतलवार त्याच्या लढाऊपणाचं प्रतीक आहे.कुर्दिस्तानाला देश म्हणून अस्तित्व नसलं, तरी कुर्दिस्तान प्रांत आज स्वायत्त आहे. याह्याही तसाच आहे....कोणत्याही देशाचा शिक्का कपाळी नसूनही स्वायत्त असलेला अस्सल कुर्दिश इराकी योद्धा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंटरेस्टिंग होती ही सीरीज. याह्याबद्दल ( आणि उदे बद्दलही) फार्से आधी कुठे वाचलेलं नव्हतं. काय बोलावे कळत नाही.
म्हणजे अजूनही त्याचा संघर्ष संपलेला नाहीच. सॅड.

याह्याबद्दल खूप वाईट वाटले. त्याला काय न्याय मिळणार देव जाणे. इराकमध्ये परतायचे त्याचे स्वप्न असेल तर निदान ते तरी पुरे होवो.

लेखमाला आवडली.

लेखमाला आवडली भाग २३ मध्ये १ २ विषयाबद्दल लिहिण्यास अनेकांनी सुचवले आहे, त्याबद्दल लिहावयास घ्यावे ही विनंती...__/\__

छान लेखमाला.

सीआयए आणि युरोपीय देशांकच्या गुप्तचर संस्था लोकशाहीच्या नावाखाली इतर देशांमध्ये करत असलेला हिंसाचार सद्दामसारख्यांच्या तानाशाहीपेक्षा घटक आहे.
>> याह्याचे हे मत, त्याचे अनुभव आणि त्याच्यासोबत होत असलेला भेदभाव बघता तंतोतंत पटते.

तुमची लेखनशैली उत्कंठावर्धक आहे, असेच अज्ञात गोष्टींवर लिहीत रहा. शुभेच्च्छा!

interesting लेखमाला.
फक्त चेहरा त्या उदे सारखा इतकाच काय तो याचा दोष. किती तो संघर्ष. सॅड.

लेखमाला मस्त जमली होती. तुम्ही भागही पटापट टाकलेत त्यामुळे उत्सुकता खिळून होती. उदे हुसेन आणि याह्याबद्दल काहीच माहिती नव्हती ती तुमच्यामुळे कळली.

याह्याचा जीवनपट तुमच्या लेखनशैली मूळे डोळ्यासमोर उभा राहिला, आणि भाग पटकन टाकले त्यामुळे लिंक तुटली नाही.. मस्तच असेच लिहीत रहा...

छान

भाग पटापट टाकल्याने वाचायला मजा आली.
तुमचे विश्लेषण वाचून 'There are no free lunches' ची पुन्हा एकदा खात्री पटली.

याह्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो आजही जिवंत आहे. असे कितीतरी याह्या कमनशिबी असतील ह्याचा विचार करून डोके सुन्न होते.

@ चंबू
शेवटचे भाग पटापट उरकले असं वाटू शकतं नक्कीच .... पण मागच्या दहा - पंधरा वर्षात याह्याने जे काही केलेलं आहे, ते उघड उपलब्ध आहे. त्याची पुस्तकं, लेख , मुलाखती आणि वेबसाईट यावरून कोणालाही ते समजणं सोपं आहे. मला त्याचा १७७८ ते २००५ चा प्रवास जास्त खोलात जाऊन आणि जास्त माहिती काढून लिहावासा वाटला कारण तोच प्रवास थक्क करणारा आहे. हा माणूस किती खरा, किती खोटा आणि किती कमनशिबी हे त्याचं त्यालाच माहीत, पण त्याचं आयुष्य विलक्षण आहे हे नक्की.

सही.. खुप दिवसांनी चांगली लेखमालिका वाचायला मिळाली.
त्याचं आयुष्य विलक्षण आहे हे नक्की.>>> +१००

लेखमालिका खूप आवडली. लेख पटापट टाकल्या बद्दल धन्यवाद.
याह्या बद्दल वाचून फार वाईट वाटलं.

थरारक आहे सगळंच. आपले आयुष्य इकडे एकीकडे अतिशय सुरळीत, सुरक्षित चालू असताना जगात दुसरीकडे इतकी लोकं इतक्या भीतीखाली, वाईट अवस्थेत जगत असतात/आहेत ही कल्पनाच त्रासदायक आहे.

संपूर्ण लेखमाला आवडली.

किती विचित्र प्रसंग यावेत एखाद्याच्या आयुष्यात. इतकं सगळं होऊन तो अजूनही उभा आहे यावरून तो किती कणखर आहे हे लक्षात येतं. यापुढे त्याला आयुष्यात नेहमीच शांती लाभो.

या लेखमालेकरीता धन्यवाद. फार सुरेख लिहिली आहे.

रंजक लेखमाला

भाग योग्य गॅप देऊन टाकलेत तुम्ही म्हणून सलग वाचताही आले.

पु ले शु

Pages