फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग २४

Submitted by Theurbannomad on 2 February, 2021 - 08:35

या काळात याह्याने आपल्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहायला घेतलं होतं. त्याच्या मनात सहा-सात वर्षांपासून इतकं काही साठलेलं होतं, की ते कुठूनतरी बाहेर पडल्याशिवाय त्याला मनःशांती मिळणं अशक्य होतं. त्याने डॉक्टर वूल्फगॅन्ग यांच्या सल्ल्याने हळू हळू व्यक्त व्हायलाही सुरुवात केली होती. १९९२ साली काही दिवसांतच लिहून पूर्ण झालेलं त्याचं ' द डेव्हील्स डबल ' हे जवळ जवळ हजार पानी पुस्तक म्हणजे इराकच्या वीस वर्षांच्या काळाचा सखोल लेखाजोखा होता. हे पुस्तक त्याने अर्थात अरबी भाषेत लिहिलं असल्यामुळे त्याच्यासाठी ते भाषांतरित करणारा कोणीतरी मिळेपर्यंत त्याला ते प्रकाशित करणं कठीण होतं. बऱ्याच खटपटीनंतर अखेर हे पुस्तकं भाषांतरित होऊन बाजारात आलं. ( पुढे अर्कानम मीडिया ग्रुप या प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचे हक्क विकत घेऊन २०११ साली हे पुस्तक बाजारात आणलं. त्यांच्या संकलकांनी १००० पानांचा मजकूर काटछाट करून ३०० पानांमध्ये बसवून हे पुस्तक प्रकाशित केलं. याह्याने पुढे ' द ब्लॅक होल ' आणि ' आय वॉज सद्दाम्स सन ' या नावांनी अजून दोन पुस्तकं लिहून आपल्या अनुभवांना जगासमोर खुलं केलं. या कामात त्याला मदत करणाऱ्या कार्ल वेंडेल या प्रतिथयश लेखकाने याह्याच्या आयुष्यच वर्णन ' अद्भुतरम्य ' अशा शब्दात केलं आहे.)
त्याच्या या सगळ्या कृतींमुळे दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे, याह्याने आपल्या मनावरचं ओझं उतरवल्यामुळे त्याच्या स्वभावात बराच फरक पडला. आपल्यावर हल्ला होऊ शकतो या शक्यतेला घाबरत जगण्यापेक्षा त्याने ' जे होईल ते बघितलं जाईल ' अशा सकारात्मक विचाराने पुढे जायला सुरुवात केली. त्याच सकारात्मकतेतून त्याने व्हिएन्नामध्ये आपला आयात-निर्यातीचा छोटासा व्यवसाय सुरु केला. काहीतरी करून त्याला आता आपला जम बसवायचा होता. या कामात त्याला त्याच्या भावाने बरीच मदत केली. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्याने तारा आणि नुसा यांच्याशी संबंध पूर्ववत करण्याच्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली, ज्यामुळे त्याच्या घरातले वाद आता आटोक्यात येऊ लागले.
हे सगळं होतं असताना सीआयए आणि ऑस्ट्रियन सरकारला आपली डाळ न शिजल्याचा जळफळाट होत होता. सीआयएने त्याच्या तोंडून इराकमधल्या तथाकथित संहारक अस्त्रांबद्दल याह्याच्या तोंडून अनेकदा आपल्याला हवं ते वदवून घ्यायचा प्रयत्न केला होत. केस्लर आणि ऑस्ट्रियन सरकारने त्याला अनेकदा भरभरून पैसाही पुरवला होता, पण याह्या आपल्या बोलण्यावर ठाम होता. जे खोटं आहे, ते आपण कदापि मान्य करणार नाही हा त्याच सूर काही केल्या बदलला नाही. एका अर्थाने त्याचे हे सद्दामवर झालेले उपकारच होते, अन्यथा २००३ साली जे काम धाकट्या जॉर्ज बुश यांनी केलं, ते दहा वर्षांआधीच थोरल्या जॉर्ज बुश यांनी करून दाखवलं असतं.
या सगळ्याची किंमत लवकरच याह्याला चुकवावी लागली. त्याच्यावर व्हिएन्नामध्येच सद्दामच्या ( खरं तर उदे हुसेनच्याच ) हस्तकांकडून पहिला प्राणघातक हल्ला झाला. इराकमध्ये त्याच्यावर जवळ जवळ नऊ वेळा प्राणघातक हल्ले झालेले होते. त्याच्यावर एकूण सत्तावीस वेळा गोळीबार झालेला होता. पण इराकबाहेर मात्र त्याच्यावरचा हा पहिलाच हल्ला होता. इराकशी ऑस्ट्रियाच्या सरकारचे चांगले संबंध होते. आंतरराष्ट्रीय भाषेत यालाच मुत्सद्दीपणा म्हणतात....एकीकडे अमेरिकेच्या साहाय्याने इराकवर आणि सद्दामवर गंडांतर आणण्यासाठी सीआयएला मदत करायची आणि दुसरीकडे त्याचं इराकशी तेलाच्या मार्गाने जाणारा व्यापार करायचा ही ऑस्ट्रियाची दुटप्पी नीती याह्याच्या जिवावर आली. इराकच्या काही भाडोत्री मारेकऱ्यांनी त्याच्यावर केलेल्या हल्ल्यात तो जरी बचावला असला, तरी त्याला आता वस्तुस्थिती व्यवस्थित समजलेली होती. सीआयए आणि ऑस्ट्रियन सरकारचं सुरक्षा कवच आता अभेद्य राहिलं नव्हतं.
याह्याला अजून बऱ्याच दिव्यातून जायचं होतं.... त्याचा व्यवसायही जेमतेमच चालत होत. ऑस्ट्रिया आणि इराकच्या घट्ट संबंधांमुळे त्याला व्यवसायात फारशी प्रगती करता आली नाही. आखाती युद्धानंतर सगळ्या जगणे इराकशी संबंध तोडले असताना युरोपमधले फक्त दोन देश आपली इराकमधली आणि इराकची आपल्या देशातली वकिलाती कायम ठेवून होते. एक होता पूर्वीपासून तटस्थ देश म्हणून ओळखला जाणारा स्वित्झर्लंड, आणि दुसरा होता इराकच्या तेलाकडे बघून त्या देशाशी सबुरीने घेणारा ऑस्ट्रिया.
हळू हळू त्याला परिस्थितीचे चटके बसायला लागले. तशात त्याचे नुसा आणि ताराबरोबरचे संबंधही हळू हळू बिघडायला लागले होते. पुढे १९९५ साली त्याच्या गाडीखालील ' अज्ञात व्यक्तींनी ' बॉम्ब लावून त्याला संपवायचा प्रयत्न केला, पण नशिबाने त्याची साथ दिली. त्याला तो बॉम्ब दिसल्यामुळे जिवावर बेतलं नाही. त्याच्या मते १९९४ साली प्रकाशित झालेल्या त्याच्या ' आय एम सद्दाम्स सन ' या दुसऱ्या पुस्तकात त्याने जी स्फोटक माहिती उजेडात आणली होती, त्याच हा परिणाम होता.
१९९५ साली अमेरिकेच्या सीबीएस वाहिनीसाठी सुप्रसिद्ध मुलाखतकार एड ब्रॅडली याने याह्या आणि कुर्दिश नेता होशियार ज़ेबारी या दोघांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत याह्याने अनेक गोष्टींचा सविस्तर खुलासा केला. त्याने पहिल्यांदा सूचक पद्धतीने अमेरिकेने आपल्याला वापरून घेतल्याची तक्रार मुलाखतीच्या दरम्यान केली. गाडीमध्ये बॉम्ब सापडायचा आधी सीआयएने त्याला जवळ जवळ नऊ महिने ताब्यात घेऊन त्याच्या छळ केला असा आरोप त्याने आपल्या अनेक मुलाखतींतून केला आहे. पुढच्या वर्षी पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला झाला आणि त्याने ऑस्ट्रियाला कायमचा रामराम ठोकायचा ठरवला. हा हल्ला झाल्यावर त्याच्या अमेरिका आणि सीआयए या दोघांवरचा विश्वासही उडाला. तिथे इराकमध्ये उदेने याह्याच्या बापाला अल्लाच्या वाटेवर पाठवून दिल्याची माहिती त्याला मिळाल्यावर तो अजूनच अस्वस्थ झाला. त्याच्या घरच्यांनी देशाबाहेर आसरा शोधण्याचे प्रयत्न सुरु केले होतेच...पण त्यांना ऑस्ट्रियामध्ये बोलावूनही काही विशेष साध्य होणार नव्हतं.
तिथे इराकमध्ये उदे हुसेनच्या कृष्णकृत्यांमुळे त्यालाही जीवघेण्या हल्ल्याला तोंड द्यावं लागलं. १२ डिसेम्बर १९९६ या दिवशी हे हुसेन बगदादच्या अल मन्सूर भागात गाडीने जात असताना त्याच्यावर अज्ञात व्यक्तींनी जवळ जवळ दीड डझनभर गोळ्या झाडल्या. त्या अंदाधुंद गोळीबारात त्याच्या मणक्यांमध्ये गोळ्या लागून तो अधू झाला. त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करून त्याला डॉक्टरांनी कसाबसा वाचवला असला, तरी त्याच्या मणक्यांमध्ये नाजूक जागी लागलेल्या दोन गोळ्या त्यांना तशाच ठेवाव्या लागलेल्या होत्या. पुढे नशिबाने कमरेखालचा शरीरात थोडाफार जीव आल्यामुळे उदे अगदीच पांगळा झाला नसला, तरी त्या घटनेनंतर तो कायम लंगडत आणि शरीर जमिनीवर घसटत घसटत चालत असे. याचं घटनेमुळे सद्दामने आपल्या राज्यकारभाराची सूत्रं धाकट्या कुसेच्या हाती सोपवायचा निर्णय घेतला होता. याचं काळात अमेरिकेहून संमोहनतज्ज्ञ असलेला लॅरी गॅरेट उदेवर आपल्या विद्येचा प्रयोग करून त्याच्या शारीरिक परिस्थितीत सुधार करण्यासाठी खास बगदादला आला होता. त्याने आपल्या अनुभवांवर लिहिलेल्या ' हिप्नॉटिक नाईट्स इन बगदाद ' या पुस्तकात त्याने उदेबद्दल लिहिलेल्या आठवणी वाचल्या, तर या हल्ल्यानंतर उदे बऱ्यापैकी वरमलेला असल्याची जाणीव होते.
याह्याने अखेर खोट्या पासपोर्टच्या साहाय्याने युरोपमध्ये आसरा मिळवण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. त्याने सांगितल्याप्रमाणे या काळात तो अनेक देशांमधून फिरला. नुसाने एव्हाना त्याच्या पैशांवर डल्ला मारलेला होता. याह्याने रागाच्या भरात कधीकधी नुसावर हात उगारलेला असल्याचा राग तिच्या मनात असल्यामुळे तिने त्याला अशा पद्धतीने धडा शिकवलेला होता. भणंग अवस्थेत त्याला अनेक हलक्यासलक्या कामांमध्ये हात घालावा लागला. रस्त्यावर, रेल्वे स्टेशनांवर, गल्लीबोळात रात्र काढणे, पडेल ती कामं करून कशीबशी पोटाची सोय करणे आणि सतत आपल्यावर कोणी हल्ला तर करणार नाही ना या भीतीखाली जगणे अशा सगळ्या प्रकारांमुळे तो मनातून पूर्णपणे खचून गेला.
याचं काळात त्याच्याकडून अस्तित्वाच्या संघर्षात काही चुकाही झाल्या. अँस्टरडॅममध्ये हिऱ्यांच्या अवैध व्यापारात तो सहभागी झाला. त्यातून चार पैसे कमावल्यावर त्याच्या आयुष्यात आली एक सौदी राजकन्या. ही आपल्या मायदेशाला कंटाळून युरोपमध्ये मुक्त आयुष्य जगत होती. तिच्याच आजूबाजूच्या सौदी लोकांनी याह्याला एका माणसाच्या खुनाच्या मोबदल्यात ब्रिटिश नागरिकत्व आणि बक्कळ पैसाही देऊ केला, पण नशिबाने याह्याने तसला काही उद्योग केला नाही. पुढे या राजकन्येला सौदीमध्ये मृत्युदंड स्वीकारावा लागला ! फ्रांस, इंग्लंड, हॉलंड अशा अनेक देशांमध्ये तो या काळात फिरत राहिला.

एकविसाव्या शतकाची नांदीच झाली अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींवर अल कायदाच्या हल्ल्याने. यानंतर याह्याच्या आयुष्यात अशा काही घटना घडणार होत्या, ज्यामुळे त्याच्या वाट्याला चार सुखाचे क्षण येणार होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users