फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग २३

Submitted by Theurbannomad on 1 February, 2021 - 08:52

याह्याला ऑस्ट्रियामध्ये आणि विशेषतः व्हिएन्नामध्ये फिरताना सतत इराकी हस्तक आपल्या पाठीशी असल्याची भीती जाणवत राहायची. घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपासून ते रस्त्यावर त्याच्याकडे बघणार्या प्रत्येकाकडे तो सुरुवातीला संशयित नजरेनेच बघत असे. व्हिएन्ना ही जागाच अशी आहे, जिथे शहराच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रस्त्यांवरूनच जावं लागे. शिवाय व्हिएन्नामध्ये कॉफी शॉप्स हा त्या शहराच्या संस्कृतीचा भाग असल्यामुळे कधीही आणि कशासाठीही बाहेर पाडाव लागलं तर एखादी कॉफी सहज व्हायची. याह्या असाच एकदा एका कॉफी शॉपमध्ये बसलेला असताना त्याला एका तरुण वेटरने हटकलं.
" तुम्ही इराकचे आहात का? " याह्या कानावर पडलेल्या प्रश्नामुळे चपापला. त्याने प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीकडे बघितलं. विचारणारी व्यक्ती होती एक सुंदर, सुडौल तरुणी, जी चेहेरेपट्टीवरून आणि वर्णनावरून मध्यपूर्वेकडच्या देशाची असावी याचा अंदाज येत होत. ही मुलगी जेमतेम विशीतली दिसत होती.
" तुम्हाला कसं समजलं? " याह्याने प्रश्न केला.
" तुमच्या बोलण्यातून अरबी लहेजा माझ्या कानावर पडला....माझ्याही घरी अशाच पद्धतीचं इंग्रजी बोलतात...मीसुद्धा इराकी आहे..." तिने उत्तरं दिलं. " मला तुमच्याकडे बघून काही क्षण वाटलं की मी उदे हुसेनकडेच बघतेय....तुमची चेहेरेपट्टी अगदी उदेसारखीच आहे..."
याह्या तिच्या या थेट बोलण्याने हबकून गेला. जी गोष्ट त्याला कटाक्षाने लपवायची होती, ती इतक्या सहज एका कॉफी शॉपमधल्या वेटरने ओळखावी याचं त्याला आश्चर्य वाटलं. ऑस्ट्रियामध्ये किती इराकी शरणार्थी आहेत, हे त्याला माहित होतं. त्याची ओळख पटून जर एखाद्याकडून उदे हुसेनला खबर पोचली तर त्याच्यावर ऑस्ट्रियामध्ये जीवघेणा हल्ला होऊ शकतो हे त्याला व्यवस्थित ठाऊक होतं.
त्याने अखेर त्या वेटर मुलीशी मैत्री वाढवायचा निर्णय घेतला. तिने आपली ओळख सांगितली. तिचं नाव ज्युलिएट होतं. तिच्यामुळे नुसा आणि ताराला एखादी मैत्रीण मिळेल या उद्देशाने त्याने तिची ओळख घरच्यांशीही करून दिली. ताराची तिच्याशी चांगली गट्टी जमली. त्याला हे माहित नव्हतं, की त्याच्यावर ऑस्ट्रियन हेरखात्याचं बारीक लक्ष होतं...पण त्यांनीही या मुलीकडे दुर्लक्ष केलं. एका कोवळ्या वयाच्या मुलीकडून कोणाला कसला धोका असू शकतो, या विचाराने त्यांनी या वाढत्या मैत्रीकडे कानाडोळा केला.
ज्युलिएट धर्माने ख्रिस्ती होती. तिचं स्वप्न होतं काहीही करून अमेरिकेत प्रवेश करून तिथे सुखाचं आयुष्य जगायचं. तिच्याशी नुसासुद्धा हळू हळू चांगलीच मिळून मिसळून वागायला लागली. बऱ्याच काळानंतर याह्याला समजलं, की ज्युलिएट रात्री ' व्हीव्हीआयपी एस्कॉर्ट ' म्हणून कामं करायची. नुस आणि तिच्यात हे साम्य असल्यामुळे कदाचित त्यांचे सूर जुळले असावेत, कारण हळू हळू त्या दोघी सख्ख्या मैत्रिणी झाल्या.
तिच्यामुळे याह्याने बरेच वर्षांनी एके दिवशी व्हिएन्नाच्या एका नाईटक्लबमध्ये प्रवेश केला. तो परागंदा झाल्यावर मौजमजा करणं जवळ जवळ विसरलाच होता. या नाईटक्लबचा मालक होता इजिप्शियन. या क्लबमध्ये अरबी लोकांचा चांगलाच राबता होता. इथे जुलिएटने याह्याची ओळख करून दिली आपल्या एका मित्राशी. हा तिचा ' बॉयफ्रेंड ' होता विल्यम नावाचा मूळचा इजिप्शियन पण पुढे कामानिमित्त ऑस्ट्रियामध्ये स्थायिक झालेला एक छायाचित्रकार, जो ऑस्ट्रियाच्या एका वर्तमानपत्रासाठी काम करत होता.
तिने याह्याला त्याच्या आयुष्याचे अनुभव वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करायची गळ घालायला सुरुवात केली. याह्यासाठी हे संकट अनपेक्षित होतं. त्याने तासाला काहीही उद्योग केला असता तर त्याला सीआयए आणि ऑस्ट्रियन सरकारने दिलेला आसरा आणि सुरक्षा कवच त्याच्या या कृतीमुळे एका झटक्यात कोलमडून पडलं असतं. त्याने या सगळ्याला साफ नकार दिला.
या जुलिएटमुळे याह्याच्या घरातही वादळ निर्माण झालं. तिच्यामुळे तारा बराच काळ घराबाहेर मौजमजा करण्यात मश्गुल राहू लागल्यावर नुसा तिचा जळफळाट करायला लागली. तिच्यासाठी तिची मुलगी तिचा जीव की प्राण होती. एकटी राहून तिचा मुलीवर प्रचंड जीव लागला होता. त्यामुळे तिच्या बाजूने जुलिएटबद्दल सतत त्रागा व्यक्त होऊ लागला होता. त्यातून याह्या आणि तिच्यात चांगलीच वादावादी व्हायला लागलेली होती. दोघांची भांडणं अनेकदा इतकी विकोपाला जाऊ लागली, की याह्याच्या तोंडून अनेकदा तिला अद्वातद्वा शिव्या बाहेर पडू लागल्या.
याह्या या काळात मूळचा जर्मन असलेल्या डॉक्टर वूल्फगॅन्ग यांच्याकडे मानसोपचार करून घ्यायला जायला लागलेला होता. त्याच्या मनावर त्याने बघितलेल्या सगळ्या गोष्टींचा, इराकमध्ये त्याच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचारांचा, त्याच्यावर इराकमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यांचा आणि ऑस्ट्रियामध्ये सुरुवातीला आलेल्या वाईट अनुभवांचा परिणाम त्याच्यावर झाला होता की त्याच्यात नकळत एक प्रकारचा हिंस्रपणा आलेला होता.
एकाच वेळी अनेक आघाड्यांवर याह्याची कुचंबणा होता होती. एकीकडे त्याच्या आयुष्यात आलेल्या या बदलांशी तो सामना करत असताना दुसरीकडे केस्लर आणि सीआयए वेगळ्याच दिशेने काम करत होते. त्यांना काहीही करून याह्याकडून आपल्याला हवं ते वदवून घ्यायचं होतं...त्याचबरोबर ज्युलिएट आपल्या बाजूने याह्याला राजी करण्याचा प्रयत्न करत होती. याह्याला हे कळायला खूप वेळ लागला, की ती इराकच्या गुप्तहेर खात्यासाठीही काम करत होती.....उदे हुसेनपर्यंत याह्याची खबर पोचवण्यासाठी इराकच्या गुप्तहेर खात्याचे अनेक जण जीव तोडून काम करत होते...त्यांच्यापैकीच काहींनी तिला अचूक हेरलं होतं.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>त्याची ओळख पटून जर एखाद्याकडून उदे हुसेनला खबर पोचली तर त्याच्यावर ऑस्ट्रियामध्ये जीवघेणा हल्ला होऊ शकतो हे त्याला व्यवस्थित ठाऊक होतं.

पण ऑस्ट्रियाने याह्याला शरणार्थीचा दर्जा दिल्याची बातमी वर्तमानपत्रांमधून जाहिर झाली होती का? त्यांना अधिकृतपणे दर्जा मिळाला असेल तर उदेपर्यंत ती बातमी आधीच पोचली असेल ना?

@ स्वप्न राज
ऑस्ट्रियामध्ये आलेल्या अनुभवांनंतर याह्याला त्या देशाच्या कोणत्याही नेत्याबद्दल अथवा अमेरिकेबद्दल काहीही विश्वास वाटेनासा झाल्यामुळे त्याने उलटी चाल केली होती. आपण लपून राहिलो आणि इराकच्या एखाद्या एजंटने अथवा अमेरिकेनेच आपला काटा काढला तर कोणाला कानोकानी खबर लागणार नाही, त्यापेक्षा सरळ अधिकृतरीत्या समोर यावं, जेणेकरून अमेरिकेला आणि ऑस्ट्रियन सरकारला आपली सुरक्षाव्यवस्था कडेकोट करावी लागेल आणि आपण त्यातल्या त्यात सुरक्षित राहू असा त्यामागचा विचार होता.

आंतरराष्ट्रीय राजकारण अतिशय गुंतागुंतीचं असत, ते असं. तेव्हा खरोखरच तो ऑस्ट्रियन वर्तमानपत्रांमध्ये आणि चॅनल्समध्ये अधिकृतरीत्या जगासमोर आलेला होता. पुढे उदे हुसेनच्या मृत्यूनंतरही बरंच काही झालं, जे पुढे येईलच.

@ गिरिकंद
असे लोक कुठेही सुरक्षित नसतात. त्यांची उपयुक्तता संपली की ते कोणा ना कोणाकडून संपवले तरी जातात किंवा त्यांना एखाद्या खोट्यानाट्या प्रकरणात अडकवून कायमचं दृष्टीआड तरी केलं जातं. ज्यूलियन असांजेबद्दल वाचलं आहे का?

वाचनाची गोडी वाढत आहे.
येऊ द्या अजून लेख.

तुम्ही किती भाग पुढे आहात?

पु ले शु

ज्यूलियन असांजेबद्दल वाचलं आहे का? >>

जास्त नाही. मराठीत तर अजीबात नाही वाचलेलं काही
पुढची लेखमाला त्याच्यावर येउ दे

>>आंतरराष्ट्रीय राजकारण अतिशय गुंतागुंतीचं असत, ते असं

हे मात्र खरं. ह्या विषयावर नक्की लिहा पुढेमागे वेळ मिळेल तसं.