फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग २२

Submitted by Theurbannomad on 1 February, 2021 - 08:51

याह्या आणि नुसा यांच्यात आता एक वेगळंच नातं तयार झालेलं होतं. एकमेकांच्या सहवासात दोघांनी आपापल्या भूतकाळाचे अनेक पदर उलगडले होते. नुसा बगदादच्या एका सर्वसामान्य घरात जन्माला आलेली होती. घरच्या परिस्थितीमुळे आणि विशेषतः तिच्या आरस्पानी सौंदर्यामुळे तिला नाखुशीनेच वेश्याव्यवसाय स्वीकारावा लागलेला होता. बगदादच्या अनेक उच्चपदस्थांकडे तिची ये - जा होती. उदेची नजर तिच्यावर पडल्यावर ती उदेच्या जनानखान्यात सामील झाली होती. अशाच कोण्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कृपेने तिला एक मुलगीही झालेली होती. ही मुलगी नुसाच्या बापाबरोबर बगदादला राहत होती. तिचं नाव होतं तारा.
" जर तुझी हरकत नसेल तर आपण ताराला बगदादहून व्हिएन्नाला आणून तिला एक चांगलं आयुष्य देऊ शकतो का? " चाचरत चाचरत तिने याह्याला विचारलं.
याह्याची त्याला काहीच हरकत नव्हती. त्याच्या मनात नुसाबद्दल अतिशय स्वच्छ प्रेमाची भावना होती. एका वेश्येचा नवरा म्हणून इराकमध्ये त्याची अवहेलना झाली असती, पण इथे युरोपमध्ये दोघांच्या भूतकाळाबद्दल कोणाला कसलीही माहिती नसल्यामुळे त्याला नुसालाही चांगलं आयुष्य देणं शक्य होतं. त्याने खटपटी करून तारालाही व्हिएन्नाला आणलं. ताराला त्याने आपल्या मुलीसारखं स्वीकारून लवकरात लवकर नुसाशी लग्न करायचीही घाट घातला. या सगळ्यामुळे त्याला हक्काचं घर आणि हक्काचा परिवार मिळणार होता.
काही दिवसांनी त्याच्या अपार्टमेंटमध्ये त्याचा चुलतभाऊ आला, तो याह्यासाठी एक छोटा पोर्टेबल टीव्ही घेऊन. शिवाय त्याने पाकिटातून याह्याला ३०० शिलिंग्सही दिले. याह्याने त्याचे आभार मानून त्याला त्याचे सगळे पैसे परत देण्याचं वचनही दिलं, पण तो याह्याकडून ते पैसे कधीच घेणार नव्हता. काही दिवसांनी ऑस्ट्रियन सरकारचे काही अधिकारीही त्याची विचारपूस करून गेले. शेजारच्या शरणार्थींना याह्या आणि नुसा यांनी हळू हळू मैत्रीच्या नात्यात बांधलं आणि त्यांच्यात कॉफीपानाच्या निमित्ताने भेटीगाठी होऊ लागल्या.
एके दिवशी अचानक याह्याच्या अपार्टमेंटच्या दारावर बाहेरून जोरदार थाप पडली. दार बसवलेल्या भिंतीतून याह्याला हादरा जाणवला आणि तो सावध झाला. त्याने हळूच दार उघडलं. समोर उभा होता सहा फूट उंचीचा, निळ्याशार डोळ्यांचा आणि तगड्या अंगकाठीचा एक तरुण. त्याने आपली ओळख करून दिली.
" मी ऑस्ट्रियन सरकारच्या मध्यपूर्व आशियाच्या हेरखात्याचा विभागाचा प्रमुख केस्लर. " त्याच्या आवाजात जरब होती. त्याच्या मागून पंधरा सुटाबुटातली माणसं घरात आली आणि त्यांनी दार लावून घेतलं. त्यांच्यापैकी दोघातिघांनी याह्याच्या घराची पाहणी केली. एकाने याह्याच्या कपड्यांमध्ये कुठे काही शस्त्र नाही न याची चाचपणी केली. शेवटी सगळ्या गोष्टींची खात्री झाल्यावर केस्लरपुढे याह्या येऊन उभा राहिला.
" कपडे काढ. " याह्या केस्लरच्या या आदेशामुळे चपापला. पण त्याच्या आज्ञेचं पालन करण्यावाचून त्याच्याकडे पर्यात नव्हता. उदेनंतर त्याने या केस्लरपुढे आपल्या अंगावरचा एक एक कापड उतरवून स्वतःला नग्न केलेलं होतं. सुटाबुटातल्या एकाने त्याच्या शरीराच्या अवयवांचं बारकाईने निरीक्षण केलं. शस्त्रक्रिया केल्याच्या खुणा तपासल्या. त्याचं डीएनए सॅम्पल घेतलं. शेवटी सगळ्या गोष्टी मनासारख्या झाल्यावर केस्लरने याह्याला पुन्हा एकदा कपडे चढवायला सांगितले.
"आपल्याला जायचंय...." केस्लरने आज्ञा दिली.
" मी आतून जरा चांगले कपडे घालून..."
" नाही, काही गरज नाही. आहेत ते कपडे ठीक आहेत, लगेच चल..." केस्लरने पुन्हा एकदा आदेश दिला.
काही वेळात त्या अपार्टमेंटच्या बिल्डिंगखाली उभ्या असलेल्या चार -पाच गाड्या वेगाने तेथून निघाल्या. केस्लरने गाडीत याह्याबरोबर संभाषण करायला सुरुवात केली.
" आम्हाला तुझ्याकडून उदे हुसेन, सद्दाम हुसेन आणि इराकच्या अंतर्गत वर्तुळाची खडान्खडा माहिती हवी आहे. " केस्लरने आपल्या करड्या आवाजात सांगितलं.
" देईन...नक्की देईन. मी आलोच आहे इथे तुमच्या साहाय्यासाठी...पण माझी एक विनंती आहे..." याह्याने उत्तरं दिलं. केस्लर त्याच्याकडे एकटक बघायला लागला.
" माझ्या मुलीला - ताराला व्हिएन्नात आमच्याबरोबर राहायचं आहे...तिलाही तुम्ही शरणार्थीचा दर्जा देऊन इथे कायमचं राहू द्यावं..." याह्याने शब्द टाकला.
केस्लरने जराही खळखळ न करता याह्यची विनंती मान्य केली. याह्या आता मनातून सुखावला. एकदा लग्न केलं की कागदोपत्री नुसा त्याची बायको आणि तारा त्याची मुलगी होणार होती. त्याने दोघींची ओळखही ' नुसा लतीफ याह्या ' आणि ' तारा लतीफ याह्या ' अशी करून द्यायला सुरुवात केली होती. त्या दिवशी त्याला अपार्टमेंटखाली सिडताना केस्लरने त्याच्या हातात तीनशे शिलिंग्सचं पाकीट ठेवलं. हातखर्चासाठी न्यायखात्याने त्याला ही मदत देऊ केली होती.
दोन दिवसांनी पुन्हा एकदा केस्लर आपल्या काही सहकाऱ्यांसह आला आणि याह्याला त्याने आपल्या बरोबर चलायला सांगितलं. ताफा निघाला तो व्हिएन्नाच्या मध्यभागातून पुढे जात थेट शहरापासून लांब एका निसर्गरम्य जागी आला. तिथे एका उंची रेस्टोरंटमध्ये केस्लर, त्याचे सहकारी आणि याह्या आले. केस्लरने आधीपासूनच तिथल्या लोकांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. हे सगळे जण बसले त्या जागेच्या आजूबाजूच्या टेबलांवर कोणीही बसलं नव्हतं.
" आम्हाला तू सगळं काही सांगशील या तुझ्या शब्दाखातर आम्ही तुला शरण देत आहोत. तुझ्या शब्दाला तू जागशील याची आम्हाला तुझ्याकडून खात्री हवी आहे...आणि अमेरिकेलाही तुझ्याकडून अनेक गोष्टी हव्या आहेत. त्यांनाही तू सहकार्य करावंस अशी आमची इच्छा आहे..."
" मी माझ्या शब्दाचा पक्कं आहे. जे जे मला माहित आहे, ते ते तुम्हाला मी सांगेन. सगळ्या तपशीलांसकट सांगेन...पण मला तुम्ही अजूनही शरणार्थीचा दर्जा दिलेला नाही. माझी इच्छा आहे, की तुम्ही कागदपत्रांची पूर्तता करून मला आणि माझ्या कुटुंबाला शरणार्थी म्हणून ओळख द्यावी, इथल्या वर्तमानपत्रांमधून तशी घोषणा करावी आणि आम्हाला पुढचं आयुष्य सुरु करण्यासाठी मदत करावी....मला वाटतं मी येत जास्त काही मागत नाहीये..."
याह्याने ठाम शब्दात उत्तरं दिलं.
" हे सगळं केल्यावर तू शब्द फिरवलास तर? "
" गरजच काय मला तसं करण्याची? इराकमध्ये मी पाय ठेवला की माझी रवानगी छळछावणीत होईल. इराकबाहेर मी तसाही परागंदाच आहे...मी काय मिळवणार खोटं बोलून? माझ्या कुटुंबाच्या ख्यालीखुशालीचा प्रश्न आहे हा...." याह्याने पुन्हा एकदा विनंतीवजा मागणी केली.
अखेर या भेटीनंतर ऑस्ट्रियाच्या सरकारी दफ्तरांमधली चक्रं चटचट फिरली. योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता झाली आणि अखेर याह्या, नुसा आणि तारा या तिघांना अधिकृतरित्या ' शरणार्थी ' म्हणून ओळख मिळाली. त्याला ऑस्ट्रियाने ' राजनैतिक शरणार्थी ' म्हणून आसरा दिला आणि तसं जाहीर केलं. मानवाधिकाराच्या अनुषंगानेही शरणार्थीचा दर्जा ऑस्ट्रिया देऊ शकत होता, पण मुद्दाम राजनैतिक शरणार्थी म्हणून स्वीकारून त्यांनीही याच्यासमोर राजकारणाचे फासे टाकले. आता माहिती दिली नाही तर ऑस्ट्रिया देश त्याचा दर्जा काढू शकत होता. पुढे काही दिवसांतच तिघांचे पासपोर्ट तयार झाले. नुसाचा पासपोर्ट अगदी लगेच हातात आला, पण याह्याच्या पासपोर्टला मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी थोडा वेळ घेतला.
आता याह्याची पुढची बैठक होती केस्लर,ऑस्ट्रीयाच्या हेरखात्याचे काही महत्वाचे अधिकारी आणि सीआयएच्या खास एजंट्सबरोबर. त्यांनी याह्याला समोर बसवून त्याच्याकडून त्याला आठवेल ती सगळी माहिती अगदी तपशीलांसकट घेतली. त्याचा शब्दनशब्द ध्वनिमुद्रित होत होता. अधून मधून अधिकाऱ्यांकडून अधिक खोलात जाऊन प्रश्न येत होते. इराकच्या सत्तावर्तुळाचे अनेक पदर या भेटीत याह्याने उलगडून दाखवले. समोर बसलेले ऑस्ट्रियन आणि अमेरिकन अधिकारी आता चांगलेच सुखावले होते. त्यांच्यासाठी ही सगळी माहिती सद्दामविरोधी कारवाईसाठी भक्कम पुरावा ठरू शकणार होती. अखेर सीआयएने याह्याला कळीचा प्रश्न केला.
" इराककडे आणि सद्दामकडे संहारक अस्त्रं किती आणि कोणती कोणती आहेत? "
" माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही म्हणताय तशी संहारक अस्त्रं सद्दामकडे नाहीत. अण्वस्त्र, जैविक अथवा रासायनिक अस्त्रं आणि इतर अस्त्रं माझ्या माहितीप्रमाणे तरी सद्दामकडे नक्कीच नाहीत. त्याच्याकडे जी जी जैविक अथवा रासायनिक अस्त्रं होती, ती त्याने कुर्दिश लोकांच्या संहारासाठी वापरली आणि पुढे गल्फ वॉरमध्ये उरली सुरलीसुद्धा वापरली गेली अथवा नष्ट झाली. त्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे तरी कोणतीच संहारक अस्त्रं सद्दामकडे उरलेली नाहीत..."
वास्तविक हे सगळं सांगत असताना खरं सांगूनही याह्याने एक चूक केली होती. सीआयएला अपेक्षा होती याह्याकडून इराकमध्ये संहारक अस्त्रं असण्याच्या त्यांच्या म्हणण्याला दुजोरा मिळेल...त्या पुराव्याच्या आधाराने इराकवर चढाई करून सद्दामचा काटा काढता येईल असे अमेरिकेच्या मनातले मनसुबे होते. त्यांना खरं खोटं करण्यापेक्षा कारण शोधणं जास्त महत्वाचं होतं. याह्याच्या उत्तरामुळे त्यांचा चांगलाच भ्रमनिरास झाला.
याह्याला या सगळ्यातून काही गोष्टी आता स्पष्ट व्हायला लागलेल्या होत्या. सीआयए आणि युरोपीय देशांसाठी त्याचं महत्व होतं एक प्यादं म्हणून. त्यांना अशा एका व्यक्तीची नितांत गरज होती, ज्याच्यावर जगाचा विश्वास बसेल. त्या व्यक्तीकडून सद्दामच्या कृष्णकृत्यांना हवी तशी फोडणी देऊन त्यांना जगाकडून लष्करी कारवाईसाठी पाठिंबा मिळवायचा होता. सद्दामकडे ' शक्तिशाली संहारक अस्त्रं ' असल्याचा बोभाटा करून त्यांना आपल्या स्वार्थाची पोळी शेकून घ्यायची होती. याह्याकडून आलेल्या या अनपेक्षित उत्तरामुळे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.
केस्लरने त्या दिवशी याह्याला घरी सोडलं, तेव्हा त्याच्या हातात त्याने १००० शिलिंग्सचं भक्कम पाकीट ठेवलं. आठवड्याभराच्या खर्चासाठी ही रक्कम मोठी होती, पण आता त्याला काहीही करून कह्यात घेणं केस्लरसाठी महत्वाचं होतं. पाश्चात्य देशांमध्ये पैशांना अवाजवी महत्व दिलं जातं...त्याच्याच अनुषंगाने केस्लरने आपल्या पुढच्या खेळी खेळायला सुरुवात केली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>इथल्या वर्तमानपत्रांमधून तशी घोषणा करावी

अशी घोषणा केल्याने याह्या आणि नुसाच्या जीवाला धोका वाढणार नाही आलं? बाकी भाग पटापट टाकताय हे छान. पुलेशु