फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग २१

Submitted by Theurbannomad on 31 January, 2021 - 10:27

त्या अधिकाऱ्याने टेबलासमोर बसायला खुर्चीच ठेवलेली नसल्यामुळे याह्या त्याच्यासमोर तसंच उभा होता. मागे नुसा घाबरून मन खाली घालून उभी होती. त्या अधिकाऱ्याने दोघांना आपादमस्तक न्याहाळलं. त्याच्या दातांमधली सिगरेट त्याने एक खोल झुरका घेऊन बोटांमध्ये घेतली आणि त्या दोघांच्या दिशेने त्याने धूम्रवलयं सोडली. दोघे शांत उभे असल्याचं बघून त्याने अखेर सिगरेट विझवली आणि आपल्या जाड आवाजात याह्याला बघून एक शिवी हासडली.
“Scheißeausländer” या ऑस्ट्रियन - जर्मन भाषेतल्या शब्दाचा अर्थ होतो भिक्कारडा परदेशी मनुष्य.
याह्याला जर्मन भाषा येत नव्हती. त्याची अशी समजूत झाली, की तो अधिकारी शिरस्त्याप्रमाणे संभाषणाची सुरुवात करायच्या दृष्टीने " गुड आफ्टरनून " सारखं काहीतरी बोललेलं आहे....
" धन्यवाद..." याह्याने उत्तर दिलं. तो अधिकारी आजूबाजूच्यांकडे बघून हसला. शरणार्थींपैकी काहींना जे घडत होतं, ते समजल्यामुळे त्यांनी माना खाली घातल्या.
त्या अधिकाऱ्याने याह्याकडे ऑस्ट्रियन - जर्मन भाषेचं ज्ञान नसल्याचं समजल्यावर आपल्या तोडक्यामोडक्या इंग्रजीत त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. याह्याने आपल्या परीने ते समजून घेत प्रश्नांची उत्तरं द्यायला सुरुवात केली...पण त्याच्या प्रत्येक उत्तरानंतर तो अधिकारी अधिकाधिक त्रासलेला दिसत होता. अखेर संभाषणाची गाडी योग्य त्या दिशेने जात नसल्याचं बघताच त्याने बाजूचा दंडुका उचलला आणि टेबलावर आपटला.
" कोणीतरी दुभाष्या आणा रे....तुला कोणती भाषा येते? " याह्या चपापला.
" बहिरा आहेस का? तुझी भाषा कोणती? "
" अरबी..." याह्याने चकित होऊन उत्तरं दिलं. त्याचं इंग्रजी चांगलं होतं...अडचण त्या अधिकाऱ्याच्या इंग्रजीची होती !
" अरे दुभाष्या आणा रे....कुठून येतात हे काय माहित....साधं जर्मन येत नाही यांना..."
याह्या आतून धुमसत होता. क्षणभर त्याला वाटून गेलं, की हा मनुष्य जर बगदादमध्ये असता तर एव्हाना त्याची खांडोळी करून स्वहस्ते त्याने गिधाडांना खाऊ घातली असती.
अखेर अरेबिक आणि जर्मन या दोन्ही भाषा जाणणारा कोणी उपलब्ध नसल्याची माहिती त्या अधिकाऱ्याला त्याच्या सहकाऱ्यांनी दिली. त्याने तुच्छ नजरेने याच्याकडे बघून आपल्या तांबारलेल्या डोळ्यांनी त्याला निघून जायची खून केली. याह्याला काही समजलं नाही आणि तो तसंच उभा राहिला.
" हरामजाद्या, आज काही होणार नाही तुझं....चालता हो. तुझी भिकारडी भाषा येणारा कोणीतरी येत नाही तोवर इथे येऊही नकोस..." त्याने याह्याला हाकलायला सुरुवात केली. हाताच्या खुणेने त्याने याह्याला बाहेर जायला सांगितलं आणि समोरच्या कागदांमध्ये त्याने डोळे खुपसले.
याह्याच्या आत कुठेतरी दडून बसलेला उदे हुसेन आता जागा झाला. कितीही झालं, तरी त्याच्यात उदे हुसेनच्या अनेक गुणांचा समुच्चय झालेला होताच...फक्त तो कप्पा त्याने कटाक्षाने आपल्या मनात कुठेतरी खोलवर दडवून ठेवलेला होता. आज मात्र संतापाचा कडेलोट होऊन अचानक तो कप्पा उघडला. पोटातली भूक, न झालेली झोप आणि वाट्याला आलेली अवहेलना या सगळ्यामुळे याह्याच्या अंगात पुन्हा एकदा राक्षस जागृत झाला.
त्याने पुढे होऊन त्या अधिकाऱ्याच्या थोबाडावर आपल्या घट्ट वाळलेल्या मुठीचा एक सणसणीत ठोसा हांला. त्या अधिकाऱ्याच्या नाकातून घळाघळा रक्त वाहू लागलं. क्षणार्धात त्याच्या देहबोलीतला माज उतरला आणि त्याने स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत बाजूला व्हायचा प्रयत्न सुरु केला. याह्याला मागून पोलीस धावत धावत येत असल्याची चाहूल लागली आणि त्याने चटकन उडी मरून त्या अधिकाऱ्याच्या कमरेला लटकवलेली पिस्तूल काढली. पिस्तुलाची नळी त्या अधिकाऱ्याच्या डोक्यावर ठेवून याह्याने त्याचे केस धरले आणि खसकन खेचून त्याचा चेहरा वर केला. याह्याच्या एका ठोशात त्याच्या नाकाचा चक्काचूर झालेला होता.
पोलिसांनी आजूबाजूच्यांना खोलीबाहेर नेलं आणि याह्याच्या दिशेने आपली पिस्तुलं रोखली.
" गुमान त्याला सोडून पिस्तुल आमच्या हवाली कर...अन्यथा जीव जाईल..." एका पोलिसाने शक्य तितक्या जरबयुक्त आवाजात याह्याला धमकावलं.
" जवळ यायचा प्रयत्न केला तर याचं डोकं उडवीन मी....मी मेलो तरी हा माझ्याबरोबरच नरकात येईल..." याह्याने अस्खलित इंग्रजीत परतफेड केली.
पोलिसांनाही इंग्रजी भाषेचा विशेष गंध नव्हता...ते बावचळले.
याह्याने आपल्या हाताची पोलादी पकड त्या अधिकाऱ्याच्या मानेभोवती अजूनच घट्ट केली. पिस्तुलाची नळी डोक्यावर अजून घट्ट दाबली. आता त्या अधिकाऱ्याच्या अंगातलं उरलंसुरलं त्राणही निघून गेलं. काही क्षणांपूर्वी आक्रस्ताळेपणा करणारा तो मस्तवाल अधिकारी आता कोकरू होऊन याह्याकडे गयावया करत होता. त्याचा सगळा माज एका ठोशात जमीनदोस्त झाला होता.
अर्धा तास याह्या त्याला तशाच अवस्थेत पकडून बसला होता. पोलीस अधिकारी याह्याकडे पिस्तुल रोखून तसेच उभे होते. कोणीतरी झाल्या प्रकारची वर्दी वरिष्ठांकडे देऊन आला होता. व्हिएन्नाहून पोलिसांचं एक खास पथक त्या वस्तेच्या दिशेने निघालं होतं. वस्तीत झाल्या प्रकारची वार्ता पसरल्यावर सगळ्यांनी इमारतींभोवती गर्दी केली होती. बऱ्याच जणांच्या मनात झाल्या प्रकारामुळे आनंदाचं भरतं आलेलं होतं. नुसा त्या कार्यालयाच्या खोलीबाहेर पोलिसांच्या गराड्यात उभी होती. तिच्या मनातही झाल्या प्रकाराचं समाधान होतं....
कोब्रा पोलिसांची एक खास तुकडी अखेर त्या कार्यालयात शिरली आणि त्यांनी परिस्थितीचा ताबा घेतला. त्यांनी बरोबर एक अरबी भाषा जाणणारा दुभाष्याही आणलेला होता. शिवाय खास गुन्हेगारांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास केलेला मानसोपचारतज्ज्ञही त्यांच्या बरोबर आलेला होता. कोब्रा पोलीस बुलेट - प्रूफ जाकीट घालून आलेले होते. त्या क्षणी याह्याला मनातल्या मनात स्वतःचा अभिमान वाटला. एका शरणार्थी इराकी मनुष्याने काही क्षणांमध्ये व्हिएन्नाचं अख्ख पोलिसखातं हलवून सोडलं होतं....
" उदे असता तर त्याला माझा अभिमान वाटला असता..." याह्याने मनात विचार केला. " आता यांच्याकडून सगळ्या मागण्या मान्य करूनच श्वास घ्यायचा..." त्याने मनाशी निश्चय केला. आता वाटाघाटींमध्ये त्याचं पारडं जड झालेलं होतं. या वर्णद्वेषी आणि वंशद्वेषी ऑस्ट्रियन लोकांना जन्मभर लक्षात राहील असा धडा शिकवायचा त्याने मनाशी पण केला.
" कृपा करून त्याला सोड...." एका पोलिसाने याह्याला विनंती केली.
याह्याने शांतपणे त्या अधिकाऱ्याच्या कमरेला लटकवलेल्या होल्स्टरमधून गोळी काढली आणि बंदुकीत सरकवली. लष्करी सराव असल्यामुळे त्याने हे इतक्या चटकन केलं की पोलिसांना काही कळायच्या आत पुन्हा पिस्तुल त्या अधिकाऱ्याच्या डोक्याला लागलेलं होतं. आता त्यात गोळीही होती. त्या कोब्रा पोलिसांनी मनातल्या मनात सुरक्षारक्षकांना शिव्यांची लाखोली वाहिली. याह्याने कुत्सित नजरेने पोलिसांकडे बघितलं.
" मला काहीही केलं तर कवटी फोडून याचा मेंदू बाहेर आलेला दिसेल तुम्हाला....आणि हो ,तुमच्या हरामखोर देशाला, पंतप्रधानाला, राष्ट्राध्यक्षाला आणि जे जे म्हणून असतील त्या त्या सगळ्यांना लतीफ याह्याचा निरोप द्या....सांगा गेलात तेल लावत..." याह्याने मनात साठलेला सगळा राग ओकून टाकला.
नाव ऐकून खोलीबाहेर उभ्या असलेल्या काही कोब्रा पोलिसांनी आपल्या मुख्यालयात फोन केला. काही वेळ चक्र फिरल्यावर तिथून निरोप आला. त्या पोलिसाने आत येऊन त्या दुभाष्याला काहीतरी सांगितलं. त्याने सगळं ऐकून घेतलं आणि याह्याकडे बघून इंग्रजीत बोलायला सुरुवात केली...
" मिस्टर लतीफ याह्या, माफ करा पण आमच्या काही अधिकाऱ्यांकडून काहीतरी घोळ झालेला आहे...तुम्हाला इथे कोणी आणलं? आम्हाला तुम्ही कोण आहात ते समजलेलं आहे....ऑस्ट्रियाच्या न्यायखात्याच्या वरिष्ठ मंत्र्यांनी स्वतः आम्हाला आदेश दिलेले आहेत की तुम्ही आमच्याबरोबर व्हिएन्नाला यावं..."
" का विश्वास ठेवू मी? आणि तुमच्यावर तर माझा मुळीच विश्वास नाही....मुळात तुमी आमच्यासारख्यांना समजताच काय? माणूस म्हणूनही तुम्ही आम्हाला स्वीकारलेलं नाही....आम्हाला मरणापेक्षा वाईट पद्धतीचं आयुष्य दिलंत इथे....का? तुमची गरज संपल्यावर आम्ही कोण तुमचे? "
अखेर न्यायखात्याच्या मंत्र्यांचा स्वीय सचिव जातीने तिथे हजर झाला. आता त्याने मोर्चा सांभाळला.
" मिस्टर लतीफ याह्या, गफलत कदाचित तुमच्या भावाकडून झालीय..तुम्हाला इथे आणायचं नव्हतं...."
" थोबाड बंद ठेव.... मी इथे आलेलो होतो संयुक्त राष्ट्रसंघाच्या पासपोर्टवर. मला आता इराकमध्ये परत पाठवा. मेलो तरी माझ्या देशात मरेन मी...आणि तुमच्यासारख्यांसाठी काहीही करणार नाही यापुढे....तुमच्यापेक्षा सद्दाम बरा..."
" कृपा करून थोडे शांत व्हा....आपण बोलू. शांतपणे बोलू. तुम्ही आधी त्या अधिकाऱ्याला सोडा आणि पिस्तुल आमच्याकडे द्या. तुम्हाला कसलीही इजा होणार नाही...तुम्हाला कोणतीही शिक्षा होणार नाही...स्वतः न्यायमंत्र्यांनी हमी घेतलीय तुमची...."
" गेलात उडत. तुमच्या त्या मंत्र्यांकडेच मला घेऊन चला. पण या हलकट अधिकाऱ्याबरोबरच....एकटं नाही..." याह्याने आता पिस्तुलाची नळी त्या अधिकाऱ्याच्या तोंडात खुपसली.
अखेर त्या इमारतीतून याह्या, तो अधिकारी, नुसा, कोब्रा पोलिसांचं ते पथक आणि तो सचिव अशी वरात बाहेर पडली. तिथे याह्याने त्या अधिकाऱ्याला सोडून सचिवाच्या डोक्याला पिस्तुल टेकवली. तो अधिकारी आता अर्धमेला झालेला होता. त्याच्या स्वप्नातही आता तो कोणाशी उर्मटपणे वागू शकणार नव्हता. सगळी वरात व्हिएन्नाच्या दिशेने निघाली. वस्तीतल्या प्रत्येकाने आनंदाने ते दृश्य बघितलं आणि मनातल्या मनात याह्याला दुवा दिल्या. गाड्यांचा ताफा भरधाव वेगाने व्हिएन्नामध्ये आला. तिथे व्हिएन्ना १३ या नावाने प्रसिद्ध असलेल्या भागात ताफा पोचला. हा भाग होता देशोदेशींच्या राजदूतांच्या, वकिलातीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या खास बंगल्यांचा...इथे आल्यावर अखेर याह्याला जाणवलं, की खरोखर ऑस्ट्रियाच्या न्यायखात्याने त्याची व्यवस्था केलेली आहे.
अशा प्रकारे बऱ्याच तमाशानंतर याह्या आणि नुसा यांची रवानगी झाली एका तीन खोल्यांच्या सुटसुटीत अपार्टमेंटमध्ये. छोटं असलं तरी हे अपार्टमेंट सगळ्या सुखसोयीनीं सुसज्जित केलेलं होतं. वस्ती उच्चभ्रु होती. खास राजनैतिक शरणार्थींना अशा प्रकारच्या घरांमध्ये ठेवलं जात असे....त्या अर्थाने याह्याला शरणार्थी म्हणून त्याचं हक्काचं घर मिळालं होतं. त्या सचिवाने त्यांना माहिती पुरवली, की हेही घर काही आठवड्यांपुरतं सरकारने याह्याला दिलेलं आहे, कारण त्यानंतर जवळच्याच एका छोट्या बंगल्यात त्याला हलवलं जाणार आहे. याह्याने अखेर सुटकेचा निश्वास सोडून त्या सचिवाची मनापासून माफी मागितली.
" हरकत नाही...तुमच्या जागी कोणीही असतं तरी त्याच्या संतापाचा कडेलोट झालाच असता....आणि तुम्ही केलेलं हे सगळं तर एखाद्या सर्वसामान्य शरणार्थीने केलं असतं तर त्याला कमीत कमी दहा वर्ष सक्तमजुरी झाली असती...."
" तुम्हीही हा विचार करा, की हे टोकाचं पाऊल उचलायची वेळ माझ्यावर का आली....आणि हो....त्या माजोरड्या अधिकाऱ्याला त्या वस्तीतून हलवा. कुठेही दुसरीकडे टाका त्याला किंवा काढून टाका कामावरून...पण तो तिथे नको. त्याच्यामुळे तिथल्या लोकांच्या संतापाचा कधीही स्फोट होऊ शकतो..." याह्याने आवाजातली जरब वाढवत त्या सचिवाला सांगितलं. सचिवाने हसून उत्तरं देण्याचं टाळलं.
याह्याला त्याने एक कागद दल. त्यावर काही नंबर लिहिलेले होते. आठवड्यातून दोनदा सरकारी कर्मचारी त्याची विचारपूस करण्यासाठी येतील अशी माहिती त्याने याह्याला दिली.
या नव्या अपार्टमेंच्या आजूबाजूला याह्यासारखेच खास राजनैतिकदृष्ट्या महत्वाचे शरणार्थी होते. त्याच्या अपार्टमेंटच्या एका बाजूला त्याचा शेजारी होता एक तुर्की राजनैतिक अधिकारी, आणि दुसऱ्या बाजूला होता एक अफगाण. हा अफगाण शरणार्थी पुढे तालिबानची सत्ता उलटल्यावर त्या देशाचा मंत्री झाला यावरून हे शरणार्थी किती महत्वाचे होते हे समजून येतं.
याह्याने या सगळ्या अनुभवानंतर सगळ्यात आधी एक महत्वाचं कामं केलं....त्याने खटपट करून स्वतःसाठी पिस्तुल आणि काडतुसांची सोय केली. इराकी एजंट्सचा ऑस्ट्रियामध्ये सुळसुळाट होता. शिवाय इतक्या महत्वाच्या वस्तीत राहायला आल्यामुळे साहजिकच त्याच्याकडे त्या एजंट्सच्या संशयाची सुई फिरणारच होती. ऑस्ट्रियन पोलिसांवर त्याचा आता काडीमात्रही विश्वास उरलेला नव्हता. स्वसंरक्षणार्थ त्याने आपल्या अपार्टमेंटमध्ये शक्य तितक्या प्रकारे कडेकोट बंदोबस्त करून घेतला. आता तो आणि नुसा या अपार्टमेंटमध्ये शांतपणे राहू शकणार होते. एव्हाना दोघांमध्ये चांगलीच जवळीक निर्माण झालेली होती. दोघांनी पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने विचार करायलाही सुरुवात केली होती.
पण त्यांच्या या सगळ्या सुखावर वाईट नजर होती उदे हुसेनची. कुसे आणि सद्दाम यांनी याह्याला पकडायच्या दृष्टीने ससुरुवातील काही हालचाली केल्याची, पण नंतर त्यांनी तो नाद सोडून दिला. पण उदे मात्र आता याह्याच्या जिवावर उठलेला होता. लवकरच याह्याला त्याचा प्रत्यय येणार होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users