फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग २०

Submitted by Theurbannomad on 31 January, 2021 - 10:27

याह्या काही दिवसांतच त्या शरणार्थींच्या वस्तीला वैतागला. तिथलं अन्न अतिशय निकृष्ट दर्जाचं असे. रोज रोज कसलीतरी पेज, सुकलेले पाव आणि पाणीदार सूप इतकंच अन्न तिथल्या सगळ्यांना मिळे. तेलाच्या तवंगाने माखलेल्या ताटल्या घासून घासूनही साफ होत नसत. सुरुवातीला पाच दिवस याह्या आणि नुसा उपाशीच राहिले. शेवटी पोट खपाटीला गेल्यावर त्यांना केवळ नाईलाज म्हणून ते अन्न कसंबसं गिळावं लागलं. पाणीही स्वच्छ नसे. त्या वस्तीत एक कुबट वास सर्वत्र भरलेला होता. लहान मुलांच्या रडण्याचे आवाज कधी कधी असह्य होत...पण त्या अभागी जीवांवर डाफरायलाही याह्याला कसंतरी वाटे.
तिथल्या लोकांनी त्याच्याशी हळू हळू संभाषण करायला सुरुवात केल्यावर त्याला तिथल्या परिस्थितीचा अंदाज आला. ही वस्ती अशीच होती...अगदी सुरुवातीपासून. अशाच अनेक वस्त्या युरोपात कुठे कुठे उभ्या राहिलेल्या होत्या. अरब देशांमध्ये सतत चालू असलेल्या संघर्षाचा परिणाम असा झालेला होता, की तिथल्या देशांमधल्या शरणार्थींचे तांडे युरोपमध्ये येत होते. युरोपीय देशांनी जगासमोर ' मानवतेच्या उदात्त कार्यासाठी ' या पाहुण्यांना जरी आश्रय दिला असला, तरी त्या उपकारांचं स्वरूप हे असं होतं. तुमच्या देशांमध्ये जीव कधीही जाऊ शकतो, खायला प्यायला काही मिळण्याची शाश्वती नाही, कामधंदा नाही तेव्हा आमच्या देशात हे असं जगणंदेखील तुमच्यासाठी वरदान आहे अशा थाटात हे युरोपीय देश या ' पाहुण्यांना ' आश्रय देत. त्याशिवाय त्यांच्याबद्दल स्थानिक लोक बिनधास्त वर्णभेदात्मक अथवा वंशभेदात्मक टिप्पण्या करत....युरोपमध्ये या शरणार्थींबद्दल एक प्रकारचा द्वेषच सर्वसामान्यांमध्ये होता.
याह्याला तिथल्या काही जुना जाणत्या लोकांनी हळू हळू त्या वस्तीच्या ' आतल्या ' बातम्या सांगायला सुरुवात केली. वस्ती भिंतींनी वेढलेली असली तरी चिरीमिरी देऊन त्या भिंतीतून बाहेर जाणं अशक्य नव्हतं...त्या वस्तीतले अनेक जण त्या भिंतींमधल्या छुप्या मार्गाने संध्याकाळची उन्हं कळल्यावर वस्तीबाहेर जात असत. जवळच्या एका निमशहरी भागात असलेल्या खाणावळींमध्ये कमी दर्जाची कामं करून ते चार पैसेही मिळवत. त्याच पैशांमधून कधीतरी आपल्या पोराटोरांना अथवा बायकोला वाढदिवसानिमित्त एखादं सॅन्डविच अथवा चॉकलेट घेऊन ये अशा पद्धतीने ते बिचारे त्यातल्या त्यात आनंद साजरा करत. शरणार्थींचं पुनर्वसन म्हणजे त्यांना निवारा आणि अन्न देणं इतकी साधी सोपी व्याख्या या युरोपीय देशांची असल्यामुळे त्या बिचाऱ्या लोकांना पुढच्या आयुष्याच्या दृष्टीने काहीही करणं अशक्य होतं ! ज्या अरब देशांना लुबाडून युरोपीय वसाहतवादी देशांनी आपापली तिजोरी भरली, ते देश किमान माणुसकीसुद्धा या शरणार्थींना दाखवत नव्हते...पण अरब जगाला मिळालेला दुहीचा शाप ही परिस्थिती बदलूही शकत नव्हता.
लवकरच याह्याने आपल्या बाजूने योग्य त्या लोकांशी घासत वाढवून अखेर त्या वस्तीच्या बाहेर जाण्याची परवानगी मागितली. एका संध्याकाळी नुसा आणि तो कुंपणाच्या भिंतीत असलेल्या एका भगदाडातून हळूच बाहेर पडले. खिशात भावाने दिलेले ३०० शिलिंग्स घेऊन त्याने थेट जवळच्या भागातल्या एका रेस्टोरंटमध्ये प्रवेश केला. भणंग आणि अस्ताव्यस्त अवस्थेतल्या त्या दोघांकडे स्थानिकांनी कुत्सित नजरा वळवल्या. याह्याला त्या नजरा बघून प्रथमच आपल्या दुरवस्थेची प्रकर्षाने जाणीव झाली.
अखेर बऱ्याच दिवसांनी चांगलं अन्न पोटात जावं या हेतूने त्या दोघांनी कबाब आणि सॅन्डविच मागवले. रेस्टोरंटच्या मालकाने आधी त्यांच्याकडे लक्षच दिल नाही. अखेर आपल्याकडचे तीनशे शिलिंग्स याह्याने त्या मालकाच्या डोळ्यांसमोर नाचवले आणि आपल्या खिशात खुर्दा असल्याची त्याला जाणीव करून दिली. शेवटी एका कोपऱ्यात त्या दोघांना बसवून त्यांना त्या मालकाने मागवले पदार्थ आणून दिले.
याह्या आणि नुसा अनेक दिवसांनी भरपेट जेवले. त्यांच्या मनाचं समाधान होईपर्यंत त्यांनी त्या जेवणाचा आस्वाद घेतला. शेवटी पाणी पिऊन दोघे उठले आणि त्यांनी मालकाला बिलाची रक्कम विचारली. २०० शिलिंग्स त्याच्या हातावर टेकवून याह्या नुसासह बाहेर आला आणि त्याने बरेच दिवसांनी आनंदाने दीर्घ श्वास घेतला. त्याची सिगरेट ओढायची इच्छा अधिकाधिक तीव्र होतं गेली आणि उरलेल्या पैशांमधून त्याने सिगरेटचे दोन डबे खरेदी केले. दोन-तीन सिगरेट ओढून मानाचं समाधान झाल्यावर अखेर दोघांनी वस्तीचा रस्ता धरला. खिशातले पैसे संपलेले असले तरी आज अनेक दिवसांनी त्या दोघांना मानसिक समाधान मिळालं होतं.
दुसऱ्या दिवशी आपल्या या अनुभवाबद्दल वस्तीतल्या लोकांशी बोलताना त्याला एकाने अनपेक्षितपणे विचित्र प्रश्न केला.
" तू इथे किती दिवस आहेस? "
" म्हणजे? मी इथून कायदेशीर मार्गाने बाहेर जाऊ शकतो?"
" म्हणजे तुला माहीतच नाही काही? "
" काय? "
" तुझ्याकडून कोणत्या कोणत्या कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे? "
" इथे आल्यावर आम्ही ज्या कागदांवर सह्या केल्या, तितकंच....त्यापुढेही काही असतं का?"
तो प्रश्न विचारणारा तरुण याह्याकडे बघून हसला.
" अरे मित्रा, ती तर प्राथमिक कागदपत्रं झाली....त्याच्या पूर्ततेनंतर तुला फक्त ऑस्ट्रियाच्या आश्रयाला आलेला म्हणून या वस्तीत ठेवलं जाणार....पण पुढेही बऱ्याच गोष्टी आहेत....यानंतर तुला जर हवं असेल तर तू शरणार्थी म्हणून सरकारकडून आश्रय मागू शकतोस...त्यामुळे तुला सरकारकडून अधिकृतरीत्या ' राजनैतिक शरणार्थी ' म्हणून ओळख मिळेल...."
" हे सगळं मला कोणीही सांगितलं नाही...."
" अर्थात....आणि का कोणी सांगेल? तुला हे लोक काय आपला जावई करून घ्यायला इथे घेऊन आलेत का? "
" मला यासाठी कुठे जावं लागेल? काय करावं लागेल? " याह्याला डोळ्यांसमोर आशेची किरणं दिसायला लागली.
" याच वस्तीच्या त्या बाजूच्या टोकाला ती सरकारी इमारत दिसते? तिथे ' पूर्ण नोंदणी ' करायची. याचा अर्थ हा, की तिथे जाऊन तिथल्या अधिकाऱ्यापुढे हजर व्हायचं आणि त्याला आपली कर्मकहाणी सांगून त्यांच्याकडची कागदपत्र भरून द्यायची. ती एकदा सरकारी कचेरीत गेली आणि त्यावर शिक्का उमटला की तुला अधिकृतरीत्या निर्वासित म्हणून सरकारकडून मान्यता मिळते. त्यानंतर तुला कदाचित एखादं लहानमोठं काम करण्याचा परवानाही मिळू शकतो...."
याह्या हे सगळं ऐकून सुखावला. त्याने अधीर होऊन त्या कार्यालयाची कामकाजाची वेळ विचारली.
" सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच....पण तिथे इतक्या लोकांचं काम अडकून पडलंय, की पहाटे दोनपासून या कॅम्पमधले लोक तिथे रांग लावतात....आणि तिथला तो अधिकारी हे सगळं बघून फिदीफिदी हसतो. हरामजाद्याला आपण लोक भिकारी वाटतो रे...काय सांगू तुला..."
याह्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली.
आपल्याकडून हवं असलेलं काढून घेतल्यावर स्वतःला सुसंस्कृत म्हणवून घेणारे हे पाश्चिमात्य देश कसे घाणेरड्या पद्धतीने वागवतात याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. पण आता त्याला काहीही करून अधिकृतरीत्या शरणार्थी होऊन मुख्य प्रवाहात प्रवेश करायचा होता. त्याने धावत धावत खोलीत येऊन नुसाला सगळी बातमी दिली. दोघांनी पहाटे दोनच्या ठोक्याला बाहेर पडून रांग लावायचा निश्चय केला आणि ते त्या दिवशी रात्री काहीही न खाता पिता तसेच झोपले.
पहाटे दोन वाजता याह्या डोळे चोळत उठला. नुसा आपल्या अंगावर जाडंभरडं पांघरून गुंडाळून याच्याबरोबर खोलीबाहेर आली. दोघांनी त्या इमारतीच्या दिशेने धाव घेतली. इमारतीच्या जवळ आल्यावर त्यांच्या अंगात संचारलेलं बळ अचानक निघून गेल्यासारखं झालं.....तिथे आधीपासूनच लांबलचक रांग लागलेली होती. अखेर त्या रांगेच्या शेवटी या दोघांनी बैठक मांडली आणि अल्लाचा धावा करत दोघांनी तशाच बसलेल्या अवस्थेत डुलक्या काढायला सुरुवात केली.
दुसऱ्या दिवशीपर्यंत अक्षरशः शेकडो लोक याह्या आणि नुसाच्या मागे जमा झालेले होते. या दोघांनी सकाळची न्याहारीही करण्याची तसदी घेतली नाही. त्यांच्या डोळ्यांसमोर फक्त त्या इमारतीच्या त्या कचेरीतील तो अधिकारी होता....अकराच्या ठोक्याला तो अधिकारी आपल्या कार्यालयात आला आणि रांग हळू हळू पुढे सरकायला लागली. छोट्या छोट्या गटांमध्ये विभागलेल्या त्या शरणार्थींना आत सोडलं जात होतं. अखेर संध्याकाळ होतं आली तशी एकदाची याह्या आणि नुसा यांचा त्या इमारतीत प्रवेश झाला. बरोबर गटातले जवळपास सतरा-अठरा लोक होतेच....
अखेर रिकाम्या पोटी अनेक तासांच्या असह्य त्रासानंतर याह्या आणि नुसा त्या कार्यालयातल्या त्या अधिकाऱ्यांसमोर एकदाचे येऊन उभे राहिले. त्या अधिकाऱ्याचा थाट बघण्यासारखा होता. शर्टाची अर्धी बटणं उघडून समोरच्या टेबलावर पाय सोडून बसलेला तो अधिकारी म्हणजे मूर्तिमंत माज होता. त्याच्या चेहऱ्यावर शरणार्थींबद्दल असलेली घृणा ओसंडून वाहताना दिसत होती. बाजूलाच ठेवलेला पोलिसी दंडुका तो कधीही उचलून डोक्यात घालेल अशा पद्धतीचे त्याचे हावभाव होते. याह्याला त्याच्याकडे बघून संताप अनावर झाला. त्याच्या मनात इतके दिवस साठून असलेला लाव्हारस आता उकळायला लागलेला होता. त्या अधिकाऱ्याला याह्या काय चीज आहे, हे लवकरच समजणार होतं....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users