अलविदा ! आमुच्या प्रिय नील सुंदरीस

Submitted by रेव्यु on 31 January, 2021 - 04:06

32235.jpg
अलविदा ! आमुच्या प्रिय नील सुंदरीस
आम्ही आमची झेन काल विकली कारण तिला चांगली किंमत मिळाली तसं पाहू गेलं तर ती जुनी (म्हातारी??) झाली होती. किती सरळसोट हिशेब आहे ना? आणि प्रॅक्टिकल सुध्दा पण त्याबरोबर माझ्यासाठी मात्र यात भावनाशील होण्यासारखं काय आहे हो? एक निर्जीव कार, वय वाढलेली नाही म्हातारीच आणि त्यात नितिन गडकरीसाहेबांची घोषणा की 20 वर्षांहून जुन्या गाड्यांवर कर लादणार, कोण हे ओझे वाहणार?? पण तसे पाहू गेल्यास एकदम चकचकीत, टुणटूणित होती ताई! पण तिची विल्हेवाट लावलीच पाहिजे! अगदी सूज्ञ बुध्दिमान निर्णय
अन, तरीही तिला ’ते’ लोक घेऊन गेले तेव्हा वाईट वाटलं हो ~ नव्हे थोडसं पाणी देखील आलं आम्हा दोघांच्याही डोळ्यात!
बरोब्बर 19 वर्षांपूर्वी, ती आमच्या घरी आली. बॅंकेचं कर्ज घेतलं होतं ! त्या काळात तिचा तो आगळावेगळा निळा रंग, काय शान होती! मुद्दाम महिनाभर वाट पहायला लावून बाईसाहेब घरी आल्या होत्या. त्या काळात हिची थोरली बहिण मारुती 800 मध्यमवर्गियांच्या मनावर राज्य करणारी साम्राज्ञी होती. अन त्यातल्या त्यात ही आमच्या सारख्या मध्यमवर्गियांकरिता झेन म्हणजे उच्चभ्रू होती, तिला 5 ... होय 5 गियर्स होती. पॉवर स्टियरिंग होते, एसी होता, रिमोट लॉक होतं.... काय ऐषोआराम महाराजा! आजच्या पिढीला हे उमगणार नाही कारण आता सगळ्याच गाड्या ही फिचर्स घेऊन येतात. आन हो ! माझ्या गाडीत ऑटो सर्च वाला रेडियो कम ऑटो रिव्हर्स कॅसेट प्लेयर होता. (ज्यानी गाडी घ्यायच्या आधी निरिक्षण केलं तो या कॅसेट प्लेयरला अन बरोबर असलेल्या कॅसेट्स पाहून चाट पडला अन त्याने विचारले... आमचे बाबा ज्याबद्दल बोलत होते ते हेच असावे!!). हा कॅसेट प्लेयर कालबाह्य झाला होता अन तो मध्यंतरी खराब झाला तेव्हा त्या मेकॅनिकने त्या ऐवजी मी ब्लु-टूथ अन युएसबी ड्राइव्ह बसवून घ्यावी असे सुचवले होते पण मी नकार दिला होता. मला त्याचे ते मूळचे रुपडे प्यारे होते.
गाडी आल्या आल्या आम्ही राजस्थानची ट्रीप केली... एकदम झकास.... मागची बॅकरेस्ट पाडायची .. त्यावर एक मुद्दाम बनवलेली गादी टाकायची अन मग मुली तिथे झोपायच्या. टपावर कॅरियर पण लावायचो... लॉंग ड्राईव्हवर जाताना. अनेक सुखद कौटुंबिक क्षणांची ती साक्षी होती. मुलींबरोबर ती देखील मोठी झाली आणि आम्ही मुलींएवढीच तिची काळजी घेतली होती अन प्रेमसुध्दा दिले होते.
माझी झेनबाई रस्त्यावर कधीच आक्रमक नव्हती, तिच्या धाकट्या ’डिझायर’ भावासारखी. तो दहा वर्षाने ’झाला’ होता! ती तशीच शालीन होती, वेगाची मर्यादा बाळगायची. अन हो अलिकडच्या काळात ती गावातल्या गावातच फिरायची!
एकदा व्यवहार पूर्ण केल्यावर कार-24 ( विकत घेणारी एजन्सी) ने दोन्ही किल्ल्या मागितल्या. त्याच्या ऑफिस मध्ये मी कागदपत्रांवर सह्या करायला गेलो होतो अन मला वाटले होते की एखादा दिवस आणखी लागेल कारवाई पूर्ण व्हायला. अन मग तो म्हणाला ,” सर! गाडी सोडा इथेच! कागदपत्रं पूर्ण झाली” अन मला अचानक जाणिव झाली की मला तिला खरोखरच निरोप द्यायचा आहे. ती घडी आली होती. माझ्या लक्षात आले की गेल्या काही वर्षांत माझ्यापेक्षा माझ्या पत्नीनेच म्हणजे हिनेच ती वापरली होती. तिच्यावर प्रेम केले होते. तिच्या भजनाच्या वर्गास, शिकवण्या, गायन, खरेदी, मुलींना शाळेत सोडणे, स्वतंत्रपणे नाटकसिनेमांना जाणे इ. उपक्रमांत तिची साथिदार होती झेन बाई! मी हळू हळू व्यस्त होत गेलो तसतशी ही स्वतंत्र होण्यात झेनबाईचा खूप मोठा वाटा होता. अगदी खर्‍या अर्थाने ती हिच्या स्वातंत्र्याचे प्रतिक होती. झेन चालवायला हिला खूप मजा यायची अन आत्मविश्वासदेखील वाटायचा.
काही वर्षे मायलेकींनी ही वापरली. धाकटी हिचा वापर तिच्या ऑफिसला जाण्यासाठी करत असे. मग कधी कधी मैत्रिणींबरोबर डिनर अन लग्न जुळल्यावर होणार्‍या नवर्‍याला बरोबर घेऊन लॉंग ड्राईव्हवर हिंडून आली होती. मला उगीचच अभिमान वाटला होता!
धाकटीच्या लग्नानंतर मात्र हिचा वापर कमी झाला कारण मी निवृत्त झालो. पण तरीही ती आमच्या कुटुंबाचा भाग बनून सात वर्षे आमच्या बरोबर आहे अन आता ’होती’ बनणार आहे....केवळ एक व्यवहार ! अजूनही उत्तम स्थितीत ठेवली होती हिने अगदी मुलींसारखीच.
अन आता तिचा निरोप घ्यायची वेळ आली होती. मी एक अखेरची आत नजर फिरवली अन अचानक लक्षात आलं की अनेक वर्षापासून तिच्या डिक्कीत, स्टेपनीच्या बाजूला एक डफल बॅग पडली आहे. ती धाकट्या कन्येची होती अन शाळकरी मुलाच्या दप्तरात असतात तश्या असंबध्द पण नॉस्टॅल्जिक वस्तूंनी भरली होती. पर्यटन ब्रोशर्स, काही हेअर बॅण्ड्स, काही जुन्या इंग्रजी अन लकी अलीच्या कॅसेट्स (पार त्या राजस्थान प्रवासात गायलेल्या गाण्यांपर्यंत नेणार्‍या), काही सुवेनियर्स त्यात होते. झर्रकन डोळ्यापुढे ती सुंदर वर्षे आली.
मग मात्र मला तीव्रतेने वाटले की मी एकटाच निरोप घेऊ शकणार नाही. मी तिला पुन्हा घरी नेलेच पाहिजे, हिची अन या जीवलग मैत्रिणीची भेट घडवलीच पाहिजे. दोघांनी एकत्र अलविदा म्हटले पाहिजे. त्या कार ऑफिसमधील मित्राने लगेच होकार दिला अन आम्ही एकत्र घरी पोहोचलो. ही खाली आली , तिच्या चेहर्‍यावर घालमेल दिसत होती. नजरेनेच आम्ही कुरवाळले अन मग तो निळा ठिपका नजरेआड होईपर्यंत स्तब्धपणे उभे राहिलो.
मला अपराधी वाटत होते!
काल हिने तिच्या मैत्रिणींना झेनच्या जाण्याबद्दल कळवले आणि त्यांनी देखीन अश्रूपूर्ण इ-मोजींनी प्रतिसाद दिला.
माझ्या हृदयात, माझ्या कुटुंबातील प्रत्येक निर्जीव वस्तूंबद्दल अशाच भावना आहेत किंबहुना मला सजीव अन निर्जीवांत फरक करणे खरोखरच खूप कठीण जाते.
अनेकदा सजीवांना हृदय असल्याचे दिसत नाही पण निर्जीव मात्र आपले हृदय आपल्यापाशी सोडून जातात , जिव्हाळा लावतात!
आयुष्य पुढे सरकत जाते! गतकालविव्हलता म्हणजेच नॉस्टॅल्जिया मात्र शाश्वत असतो!
कालाय तस्मै नम: ।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.

माझा मात्र नाही अडकत जीव निर्जीव वस्तूत.
पहिली कार १७ वर्षांपूर्वी घेतली आता तिसरी आहे. ती पण जाणार होती पण करोनाच्या दणक्याने ते आता लांबलेय.

माझी स्कुटी. माझी स्वकमायीची पहिली गाडीही कदाचित काही वर्षात विकावी लागेल तेव्हा मलाही असेच वाटून जाईल.
तसंही पहिल्या गोष्टी हृदयाच्या अधिक जवळ असतात...
छान लेख.

छान लिहिलयं! नुकतीच माझी २८ वर्षं जुनी कॅमरी विकली त्यामुळे भावना पोहोचल्या. मी इथे आल्याआल्या कर्ज काढून दोघांनी मिळून केलेली पहिली खरेदी. मिडवेस्टात गाडी म्हणजे पाय. तिच्या साथीने इथे रुळले, रुजले. दुसर्‍या गाड्या आल्या तरी ही काढून टाकायचे मनातही आले नाही. जुनी झाली तरी गावातल्या गावात फिरायची. नवर्‍याच्या मित्राने ३-४ वर्षापूर्वी डिमॉलिशन डर्बीसाठी विकत मागितली तेव्हा वरकरणी गोड बोलून नकार दिला तरी पुढे आठवडाभर 'माझी सखी अशी चुरडून टाकायला , तेही करमणूक म्हणून? ' असे म्हणत राग आणि दु:खाने माझी तडतड सुरु होती. गेल्या वर्षी शेजारची मुलगी हायस्कूलला गेल्यावर तिने क्लेम लावला. यावर्षी तिचे लर्निंग परमिट झाल्यावर तिला विकली. आता गाडी डोळ्यासमोरच नांदतेय. Happy

छान आठवणी!
मुद्दाम महिनाभर वाट लावायला पाहून बाईसाहेब घरी>>>>>>इथे वाट पहायला लावून असं हवय का?

आयवर ३ सायकली, ४ स्कूटर आणि ४ कार बदलून झाल्या...त्यामुळे सवय झाली भावनिक अलिप्त रहाण्याची...
६ नोकरीच्या जागा(कंपनी) बदलल्या ...इथे तर आधीच्या जागच्या लिमिटेशन्स मुळे खरं तर आनंदाने बदल स्वीकारला गेला..

>>आयवर ३ सायकली, ४ स्कूटर आणि ४ कार बदलून झाल्या...त्यामुळे सवय झाली भावनिक अलिप्त रहाण्याची...
६ नोकरीच्या जागा(कंपनी) बदलल्या ...इथे तर आधीच्या जागच्या लिमिटेशन्स मुळे खरं तर आनंदाने बदल स्वीकारला गेला..>> खयाल अपना अपना!!!

>>>मुद्दाम महिनाभर वाट लावायला पाहून बाईसाहेब घरी>>>>>>इथे वाट पहायला लावून असं हवय का?>>>
होय...... धन्यवाद ....बदल केला

खयाल अपना अपना!!!>>>
आपण प्रत्येक जण थोड्या फार फरकाने तसेच असतो. फक्त आपल्याला त्यांची जाणीव नसते.
तसं पाहिलं तर आपण आपल्या कित्येक आवडत्या वस्तू लहानपणापासून जुन्या टाकून नवीन घेतच असतो.... कपडे , चपला-बूट , दागिने, पेन, चष्मा, , .. ज्यांचे तर आपले अति घनिष्ट physical नाते असते पण त्याचे आपल्याला काही वाटत नाही...