फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग १९

Submitted by Theurbannomad on 30 January, 2021 - 12:09

येन केन प्रकारेण इराकच्या बाहेर जायचा प्रयत्न करत असताना याह्याची गाठ पडली एका अमेरिकन एजंटशी. या एजंटने मात्र याह्याची चांगली मदत केली. वास्तविकतः याह्याचा तुरुंगात झालेला अनन्वित छळ ज्यांच्या आशीर्वादाने झाला होता, ते सोशालिस्ट पार्टीचे महत्वाचे नेते - महमूद अली ओथमान या काळात सद्दामच्या कुर्दिस्तानातल्या ' एजंट्स ' ना वेचून वेचून ठार मारण्याच्या महत्वाच्या कामगिरीत जातीने लक्ष घालत होते. त्यांची मर्जी फिरली, तर याह्यासुद्धा सद्दामचा एजंट असल्याच्या नावाखाली प्राणाला मुकला असता....अशा परिस्थितीत इराकच्या भूमीवर कुठेही तो सुरक्षित नव्हता.
हा अमेरिकन एजंट ( ज्याचं नाव कधीही बाहेर आलं नाही ) अशा कामांमध्ये तरबेज होता. त्या काळात अमेरिकेची अनेक हेलीकॉप्टर्स कुर्दिश प्रांतात ये-जा करत असत...त्यातल्याच एका हेलिकॉप्टरच्या चालकाशी त्याने संधान बांधलं. त्या चालकाला नेहेमींचीच कामगिरी पार पडायची होती - इराकच्या आणि विशेषतः कुर्दिस्तानच्या भागातून ' शरणार्थींना ' सुरक्षितपणे देशाबाहेर घेऊन जायचं. हे शरणार्थी देशाबाहेर काढायला सोयीचं ठिकाण होतं तुर्कस्तान देशाच्या इराक सीमेजवळचा प्रदेश.
अमेरिकेच्या ' सीआयए ' चे काही एजंट्स अशा ' शरणार्थींना ' योग्य त्या ठिकाणी पोचवायचा कामासाठी तुर्कस्तानात तळ ठोकून होते. इराकच्या भूमीवरून याह्या आणि नुसा हेलिकॉप्टरमध्ये बसून निघाले, तेव्हा याह्याला हे पक्कं ठाऊक होतं, की आता आपण आपल्या देशात पुन्हा कधीही येऊ शकणार नाही...एकीकडे सद्दाम आणि दुसरीकडे महमूद अली ओथमान असे दोघे दोघे त्याचा जीव घ्यायला टपलेले असल्यामुळे त्याच्यासाठी ऑस्ट्रियामध्येच आसरा शोधून सुरक्षित राहणं गरजेचं होतं.
तुर्कस्तानात अमेरिकेच्या तळावर याह्या आणि नुसा उतरले तेव्हा याह्याने आपल्या परीने नुसाची काळजी घेतली. तिची इराकमधली ' ख्याती ' होती उदे हुसेनची ' रखेल ' अशी. तिने अर्थात ते काम आपणहून स्वीकारलं नव्हतं....जिवाची आणि कुटुंबीयांची काळजी असल्यामुळे तिला ते स्वीकारावं लागलेलं होतं. कोणत्याही स्त्रीसाठी अशी ओळख मृत्यूहून वाईट...पण इराकच्या त्या वातावरणात ती ओळख घेऊन का होईना, पण जिवंत राहता येत होतं....याह्याने तुर्कस्तानच्या त्या अमेरिकी तळावरून थेट संयुक्त राष्ट्रसंघाच्या पदाधिकाऱ्यांना गाठलं. संयुक्त राष्ट्रसंघ अमेरिकेच्या शब्दाबाहेर नव्हताच....( आणि आजही नाहीये...). अमेरिकेच्या एजंट्सनी याह्याला बसवून घेतलं आणि त्याच्यासमोर आपला प्रस्ताव ठेवला.
याह्याकडे असलेली सद्दाम हुसेनच्या आतल्या वर्तुळातली गोपनीय माहिती तपशीलांसकट त्याने सीआयएला पुरवावी आणि त्याच्या बदल्यात सीआयएने आपल्या वशिल्याने त्याला युरोपमधल्या एखाद्या देशात (अमेरिकेत नव्हे ) आसरा मिळवून द्यावा असा टोप्रस्ताव अर्थात याह्याला मान्य करावाच लागला. त्याला या सगळ्या राजकारणापासून लांब अलिप्त जगायचं होतं,पण त्याच्या नशिबात ते सुख काही येणार नव्हतं. त्याने आपला पसंतीचा देश म्हणून निवड केली ऑस्ट्रियाची. तिथे त्याचा एक डॉक्टर चुलतभाऊ होता, ज्याची तिथल्या वरिष्ठ वर्तुळात चांगली ऊठबस होती. त्याच्या मदतीने व्हिएन्नामध्ये शांतपणे उर्वरित आयुष्य घालवावं, असा याह्याचा विचार होता. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर अखेर याह्या आणि नुसा यांच्या हाती संयुक्त राष्ट्रसंघाचा पासपोर्ट आला. हा पासपोर्ट फक्त तुर्कस्तान ते व्हिएन्ना या प्रवासापुरताच मर्यादित होता. त्यानंतर व्हिएन्ना येथे शरणार्थी म्हणून त्याला आसरा मिळणार होता आणि पुढे त्याच्या वर्तणुकीवर ऑस्ट्रियाच्या सरकारकडून त्याला ऑस्ट्रियन पासपोर्ट मिळू शकणार होता. ऑस्ट्रियाची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेलं व्हिएन्ना हे शहर तसं सुखवस्तू. जगभरातल्या अनेक महत्वाच्या संस्थांची मुख्यालयं या शहरात आहेत. खुद्द ओपेकचं मुख्यालय याच शहरात आहे.
९ मार्च १९९२ या दिवशी अखेर याह्या आणि नुसा व्हिएन्ना येथे उतरले. याह्यासाठी हा क्षण बरेच वर्षांनी मोकळा श्वास मिळण्याचा होता. नुसासाठी तर उदेच्या ' जनानखान्यातून ' झालेली ही मुक्तता म्हणजे पुनर्जन्मच होता. याह्याला चिंता होती तर हीच, की आपला चुलतभाऊ आपल्याला ओळखेल की नाही...एक तर उदेसारखं दिसण्यासाठी त्याच्या जबड्यावर शस्त्रक्रिया केली गेली होती, ज्यामुळे त्याच्या मूळ चेहेऱ्यात जाणवण्याइतपत फरक पडलेला होता. शिवाय हे दोघे भाऊ शेवटचे भेटले होते याह्या नऊ वर्षांचा असताना. विमानतळाच्या बाहेर पडताना याह्यची नजर आपल्या भावाला शोधत होती....
" लतीफ ? " याह्याच्या कानावर आवाज आला.आवाजाच्या दिशेने बघितल्यावर त्याला एक अरबी चेहेरेपट्टी असलेला मध्यम उंचीचा मनुष्य त्याला दिसला आणि त्याचा जीव भांड्यात पडला. याह्याच्या भावाने त्याला ओळखलं होतं. दोघांनी गालाला गाल लावून अरबी पद्धतीने एकमेकांचं स्वागत केलं. याह्याने नुसाची ओळख करून दिली. युरोपच्या मोकळ्याढाकळ्या वातावरणात मैत्रिणीबरोबर लग्न न करता राहणं सर्वसामान्यांना चुकीचं वाटत नसे, पण अरबी संस्कृतीमध्ये मात्र ते घोर पाप मानलं जाई....अर्थात याह्याच्या भावाच्या कपाळावर नुसाकडे बघून आठ्या पडल्याच...पण त्याने आपल्या भावाची परिस्थिती बघून फार तपशीलात जायचं टाळलं.
भावाच्या आलिशान बीएमडब्ल्यू गाडीत बसताना याह्याला अभिमान वाटत होता. आपल्या भावाने परदेशात येऊन चांगलं नाव कमावलं आहे, हे बघून तो मनातल्या मनात सुखावला होता. गाडीने व्हिएन्ना शहराच्या मुख्य रस्त्यावर प्रवेश केल्यावर याह्याने शहराचं सौंदर्य निरखायला सुरुवात केली. आपल्यालाही इथल्या एखाद्या इमारतीत छोटंसं घर घेऊन राहता येईल का, असे विचार त्याच्या मनात घोळत होते. काही वेळाने मुख्य शहराच्या भागातून गाडी थोडी लांब आल्यावर त्याला आश्चर्य वाटलं. कदाचित आपल्या भावाचं घर शहरी गजबजाटापासून लांब असेल, असा कयास करून त्याने भावाला काही विचारलं नाही...पण शेवटी गाडी जिथे थांबली, ती जागा बघून त्याला धक्का बसला.
" ही कोणती जागा आहे? " याह्याच्या तोंडून आश्चर्याचे उदगार बाहेर पडले.
" त्रयीस्करचेन.....व्हिएन्ना शहराबाहेर तीस किलोमीटर अंतरावर इथल्या सरकारने ही वस्ती वसवलेली आहे....खास कारणासाठी..."
" खास कारण? " याह्याला काही समजत नव्हतं...
" इथे या देशात येणारे शरणार्थी राहतात...माफ कर, पण सरकारचा मला सक्त आदेश आहे...मी तुला घरी घेऊन जाऊ शकत नाही. तुला इथेच राहावं लागणार आहे..."
याह्या आणि नुसा यांनी हताश होऊन ती वस्ती न्याहाळली. अरब देशांमधल्या रेफ्युजी कॅंप्ससारखी गलिच्छ नसली, तरी ती वस्ती जेमतेमच होती...पण आलीय भोगासी असावे सादर म्हणत त्यांनी तिथल्या त्यांच्यासाठी ' राखून ठेवलेल्या ' एका खोलीवजा घरात प्रवेश केला. आता हेच त्यांचं वसतीस्थान राहणार होतं....जोवर त्यांच्या कपाळावर शरणार्थी असल्याचा शिक्का पुसला जाणार नव्हता, तोवर त्यांना इथेच राहावं लागणार होतं.
त्या साध्याशा इमारतीचा सुरक्षारक्षक याह्याच्या भावाशी काहीतरी बोलला. आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर त्याने याह्या आणि नुसाला त्यांचं किडूकमिडूक सामान घेऊन खोलीत जायला सांगितलं. तासाभरात त्यांना बोलवायला एक जण आला. त्याने या दोघांना एका कचेरीत नेलं. ही कचेरी होती शरणार्थी लोकांच्या व्हिएन्नामधल्या वास्तव्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या सरकारी संस्थेची. इथे त्या दोघांना अनेक कागदपत्रांवर सह्या कराव्या लागल्या. शेवटी त्यांच्या हातात एक एक ब्लॅंकेट, ताटवाट्या आणि थोडं खाण्यापिण्याचं जिन्नस दिल गेलं आणि त्यांची बोळवण करण्यात आली.
कधी काळी सुखवस्तू घरात आरामात आयुष्य जगत असलेला लतीफ याह्या ऑस्ट्रियामध्ये एका गचाळ वस्तीत शरणार्थी म्हणून एका कोंदट घरात राहायला आलेला होता. नशिबाने त्याच्याशी खेळलेला खेळ त्याला उध्वस्त करून गेला होता...सोबतीला होती नुसा, जिच्यासाठी याह्या हा एकमेव आधार उरला होता.
याह्या आपल्या त्या खोलीत परतल्यावर त्याला पुढचा धक्का बसला. ही खोली त्याची आणि नुसाची नव्हती, तर त्यांच्याबरोबर तिथे चार-पाच कुटुंबं राहणार होती. त्या दोघांच्या वाट्याला आलेला एक मोठा बेड आणि एक कपाट. सद्दाम, इराक आणि सद्दामचे निकटवर्ती यांची माहिती पुरवण्याच्या मोबदल्यात अमेरिकेच्या सीआयएने अक्षरशः मदतीची भीक याह्याच्या झोळीत टाकली होती. याह्या हे सगळं बघून चांगलाच हताश झाला.
त्या शरणार्थींपैकी काहींना याह्या उदे हुसेनच वाटला. ते बिचारे घाबरून याह्यापासून लांब राहू लागले. आपली खरी ओळख पटवून द्यायला याह्याला बराच काळ त्यांच्याबरोबर संभाषण करण्याचा प्रयत्न करावा लागला. उदेची दहशत ही अशी होती....देशाबाहेर शरणार्थी वस्तीतही त्याच्या नावाचा हा असा दरारा होता !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थरारक!
एक रिक्वेस्ट आहे, सगळ्या भागांची लिंक एकत्र देता येईल का?

आई ग. लतीफ सांगतो तेव्हढा धुतल्या तांदळाइतका स्वच्छ नसणार नक्कीच. वाहत्या गंगेत त्यानेही हात धुवून घेतलेच असणार. तरीही त्याच्या आणि नुसाच्या कथेचा शेवट And they lived happily thereafter व्हावा असं वाटतंय. सोसलंय तेव्हढं पुरे.

@स्वप्ना राज
जिथे लोकशाही नसते असाच प्रकार होतो नेहेमी. धुतल्या तांदळासारखे कोणीच नसतात....ज्याच्या हाती सत्ता तो सगळ्यात प्रबळ.

भागाबरोबरच रंजकता ही वाढत चालली आहे.

वाचनात विसावा नको त्यामुळे विसाव्वा लवकरच येऊ देत.

पु ले शु / पु भा प्र

>>जिथे लोकशाही नसते असाच प्रकार होतो नेहेमी. धुतल्या तांदळासारखे कोणीच नसतात....ज्याच्या हाती सत्ता तो सगळ्यात प्रबळ.

लोकशाही असेल त्या देशातही हेच होतं हो. फक्त एव्हढ्या उघड उघड होत नाही एव्हढंच. जिसकी लाठी उसकी भैंस हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

@ स्वप्ना राज
लोकशाहीमध्ये तुम्ही vote न देता अशा माजलेल्या लोकांना घरी बसवू शकता. कोर्टात केस टाकून त्यांना अद्दल घडवू शकता. हुकुमशाही असेल तर तुम्ही फक्त सहन करू शकता.