फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग १८

Submitted by Theurbannomad on 30 January, 2021 - 12:09

इराकमध्ये १९९२-१९९५ च्या काळात अनेक उलथापालथी होत होत्या. सद्दामने याच काळात धाकट्या कुसेला आपला उत्तराधिकारी म्हणून तयार करायला घेतलं होतं. उदे एक तर नामधारी राष्ट्रप्रमुख तरी राहावा किंवा त्याला सगळ्या जबाबदारीतून मुक्त करून नजरकैदेत ठेवावं यावर सद्दामचं आणि त्याच्या खास लोकांचं एकमत झालं होतं. तशात दुसरी पत्नी समीरा हिलाही सुरक्षित ठेवणं सद्दामसाठी महत्वाचं झालेलं होतं. उदे तिच्यावर आणि तिच्या जवळच्या लोकांवर खार खाऊन होताच !
१९९५ साल इराकसाठी चांगलंच धामधुमीचं गेलं. एव्हाना इराकच्या अर्थव्यवस्थेचं चांगलंच बंबाळं वाजलं होतं. संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या निर्बंधांमुळे आणि एकंदरीतच जगाने अव्हेरल्यामुळे इराकची कोंडी झाली होती. या सगळ्यामुळे सद्दाम चांगलाच कावला होता. कुसे या काळात अनेकदा बापाला उदेबद्दल सावध करायचा प्रयत्न करत होता. उदेचं वर्तन नियंत्रणाबाहेर जात चाललेलं होतं....त्याच्यात दिवसेंदिवस एक प्रकारचा खुनशीपणा वाढत चाललेला दिसत चालला होता. हे सगळं कुसे सद्दामच्या कानावर घालत होता, पण सद्दामला या सगळ्यात लक्ष घालणं कठीण होत होतं. त्याच्या आपल्या थोरल्या चिरंजीवांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय शेवटी त्याच्या चांगलाच अंगलटी आला....
सद्दामचा चुलतभाऊ जनरल हुसेन कामेल अल माजिद आणि त्याचा सख्खा भाऊ सद्दाम कामेल यांनी सद्दामच्या दोन मुलींशी लग्न केलं होतं. हे सद्दाम हुसेनचे भाऊ त्याचे जावईही झालेले होते. त्यांच्यात आणि उदे हुसेनमध्ये विस्तवही जात नसे. उदेच्या अनेक ' शत्रूंपैकी ' हे दोघे महत्वाचे...सद्दामच्या जवळच्या लोकांच्या मेजवानीत भडक माथ्याचा उदे आणि त्याला सतत विरोध करणारे हे दोघे भाऊ अखेर हमरीतुमरीवर आले आणि उदेने त्यांचा चांगलाच पाणउतारा केला. त्यांच्यावर जेवण फेकण्यापासून त्यांना सगळ्यांसमोर ' सद्दामच्या तुकड्यांवर जगणारे कुत्रे ' अशा गलिच्छ शब्दात अपमानित करण्यापर्यंत उदेची मजल गेली.
दोघे भाऊ त्या मेजवानीतून निघाले ते संतापाने थरथरतंच...सद्दामने आपल्या दिवट्याला लगाम न घालण्यामुळेच हे सगळं होतं आहे हे त्यांना समजत होतं.
" त्या हरामखोर आणि माजोरड्या उदेला धडा शिकवलाच पाहिजे...." हुसेन कामेल लालबुंद होतं बोलला.
" ते काही शक्य नाही.....ना बाप आपल्या मुलाला थांबवणार, ना मुलगा बापाला जुमानणार....आणि मधल्या मध्ये आपल्यासारखे लोक असा अपमान सहन करत राहणार...." सद्दामने भावाला दुजोरा दिला.
दोघा भावांनी अखेर एक टोकाचा निर्णय घेतला.
७ ऑगस्ट १९९५.
इराकच्या इराणवरच्या ' विजयाचा ' ( हा खास सद्दामसारख्या हुकूमशहांचा प्रचारतंत्राचा भाग - आपण हरलो नाही हे लोकांच्या मनावर बिंबवत राहायचं आणि त्याआड आपल्या अपयशावर पांघरून घालत राहायचं हा त्यामागचा उद्देश ) जंगी उत्सव इराकमध्ये साजरा होत होता. तिजोरीत ठणठणाट असूनही या उत्सवावर वारेमाप पैसा खर्च होत होता....आणि अशा या वातावरणात सुरक्षा प्रणाली थोडीफार ढिली पडलेली असताना दोघे भाऊ आपल्या पत्नींसह शेजारच्या जॉर्डनला पळून गेले. जॉर्डनचे राजे हुसेन यांनी त्यांना आश्रय दिला - अर्थात या सगळयात अमेरिकेचा छुपा पाठिंबा होताच. सद्दामच्या आतल्या गोटातले हे महत्वाचे मोहोरे अमेरिकेला हवेच होते.
सद्दामच्या महालात या बातमीमुळे खळबळ उडाली. त्याच्या दोन्ही मुली राघाध आणि राना याही पळून गेल्या असल्यामुळे सद्दामसाठी ही बातमी नामुष्कीपेक्षा वेगळी नव्हती. उदे तर या बातमीने पिसाळलाच. त्याने महालात थयथयाट केला. आता त्याला काहीही करून या दोघा ' गद्दारांना ' धडा शिकवणं गरजेचं झालेलं होतं...
खरं तर या दोघांच्या जॉर्डनला जाण्यामुळे सद्दामलाच फायदा झालेला होता. अमेरिका, ब्रिटन आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या लोकांना सद्दामच्या विरोधात दणकट पुरावे हवे होते. सद्दामकडे असलेल्या जैवअस्त्रांची आणि रसायनअस्त्रांची माहिती या दोघांकडून त्यांना हवी होती. त्या पुराव्यांच्या आधारे त्यांना सद्दामविरोधात लष्करी कारवाई करायची होती. पण या दोघांनी मात्र सद्दामकडच्या सगळ्या जैव आणि रसायन अस्त्रांची कधीच विल्हेवाट लागलेली असल्याची माहिती अमेरिकेला आणि ब्रिटनला पुरवली. शिवाय बाकीची माहितीही त्यांनी इतकी त्रोटकपणे पुरवली, की त्या माहितीच्या आधारे लष्करी कारवाई तर सोडा, सद्दामला दोष देणंही अमेरिका-ब्रिटन यांना शक्य झालं नसतं. अखेर बराच काळ फुगवून मोठा केलेला हा फुगा फुटला आणि या दोघांची उपयुक्तता संपल्याची खात्री अमेरिका आणि ब्रिटनला पटली.
सीआयए आणि MI -६ यांच्याकडून कबूल झालेली मदत मिळेनाशी झाल्यावर हुसेन आणि सद्दाम कामेल अखेर बिथरले. काही महिन्यांच्या अवधीतच त्यांनी पुन्हा एकदा सद्दामशी संधान बांधलं आणि आपल्याला माफी देऊन इराकमध्ये पुन्हा एकदा परत नेण्याची विनंती केली. सद्दामने त्यांना इराकमध्ये येण्यास सांगितलं, पण त्यामागे माफीची भावना नसून आपल्या या दोघा जावयांना अद्दल घडवायचा कट होता हे त्यांना उशिरा समजलं. १९९६ सालच्या फेब्रुवारी महिन्यात दोघे आपल्या पत्नींसह इराकला परतले आणि सद्दामने त्या दोघांना सगळ्यात आधी आपापल्या पत्नींना घटस्फोट द्यायला लावला. अशा प्रकारे आपल्या मुलींना नात्यातून मुक्त केल्यावर सद्दामने या दोघांना थेट ' गद्दार ' घोषित करून ठार मारलं.
या सगळ्यात जीवाला मुकलेले दोघे भाऊ ' गद्दार ' आणि या दोघांच्या बिथरण्यामागे कारणीभूत असलेला उदे हुसेन ' निरपराध ' हा विरोधाभास सद्दामच्या आतल्या वर्तुळातल्या सगळ्यांना आता समजायला लागलेला होता. त्यांच्या मनात नकळत सद्दामच्या आंधळ्या पुत्रप्रेमाची भीती निर्माण झालेली होती. उदे नावाचा हाताबाहेर गेलेला माथेफिरू उद्या आपला ' सर्वेसर्वा ' झाला तर काय, ही चिंता त्यांना आता सतावायला लागलेली होती.
या घटनेमध्ये कमीत कमी सद्दामच्या या दोघा चुलतभावांनी अमेरिका आणि ब्रिटनशी हातमिळवणी करण्याची आगळीक तरी केली होती, पण सद्दामच्याच सावत्र भावाची - वातबान इब्राहिम याची आणि सद्दामचा मेहुणा असलेल्या लूए याची मात्र इतकी मोठी चूक नसूनही त्यांना उदेच्या माथेफिरूपणाचा फटका बसला.
इब्राहिम सद्दामचा सावत्र भाऊ असला तरी सद्दामला जवळचा होता.इराकच्या इराणवरच्या ' विजयाच्या ' स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या 'एका' शाही मेजवानीत सद्दामच्या जवळच्या वर्तुळातले अनेक जण उपस्थित होते. वातावरणात बराचसा सैलपणा असल्यामुळे दारू धो धो वाहत होतीच... इब्राहिम आणि लूए हे दोघे जण मित्रमंडळींशी थट्टामस्करी करत होते.....आणि त्यांच्या समोर उदे येऊन उभा राहिला. उदेने समोर मामा आणि काका बघून त्यांना मिठी मारली आणि त्यांच्याशी तो अघळपघळ बोलायला लागला. इब्राहिम आपल्या पुतण्याला बघून थोडा जास्तच वाहावत गेला.
काही वेळाने उदे आपल्या बाकीच्या दोस्तांबरोबर थट्टामस्करी करायला लागल्यावर इब्राहिम आणि लूए पुन्हा एकदा एकत्र आले. उदेच्या चेहेऱ्यात जन्मतःच एक व्यंग होतं. त्याचा वरचा जबडा आणि दात सामान्य माणसांपेक्षा थोडे जास्त पुढे आलेले होते. याचा परिणाम होऊन त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा तोतरेपणा आलेला होता. त्याचे शब्द बरेचदा अस्पष्ट उच्चरले जात...आणि तशात स्वारी दारूच्या नशेत असली तर त्या बोलण्यात अजूनच अस्पष्टता यायची. इब्राहीमने बोलायच्या ओघात उदेच्या या व्यंगावर टिप्पण्या करायला सुरुवात केली. बोलता बोलता त्याने उदेची चांगलीच थट्टा उडवली.
लूए आपल्या भाच्याकडे हे सगळं जाऊन बोलला. उदेच्या भडक डोक्याला सैरभैर व्हायला छोटंसं कारणही पुरात असे...आणि इथे थेट त्याच्या व्यंगावर कोणीतरी बोट ठेवलं होतं. त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तावातावाने तो इब्राहिमसमोर जाऊन उभा राहिला.
" माझ्या बोलण्यात काय व्यंग आहे? " त्याने इब्राहिमला थेट प्रश्न केला.
" अरे...उदे...काय झालं तुला? इतका का चिडलायस? " इब्राहिमवर मद्याचा अंमल जरा जास्तच झालेला होता.
" माझ्या बोलण्याची थट्टा करतोस कुत्र्या? इराकच्या भावी राष्ट्रप्रमुखाशी असा वागतोस? " उदेच्या तोंडून आता शिव्याशाप बाहेर पडायला लागले. शिरस्त्याप्रमाणे इब्राहिमला त्याने यथेच्छ शिवीगाळ केली.
इब्राहिम या अपमानामुळे चांगलाच संतापला. बाचाबाची शेवटी इतकी विकोपाला गेली, की उपस्थित असलेल्या कोणालाही या दोघांना शांत करणं अशक्य झालं.
उदेला काही जवळच्या लोकांनी अखेर खेचून बाजूला नेलं. उदे बाजूला जाऊन थोडा शांत झाला. ही शांतता बघून उपस्थितांना हायसं वाटलं, पण त्यांना माहित नव्हतं की आत धुमसत असलेल्या ज्वालामुखीचा विस्फोट काही सेकंदांतच होणार होता....
उदेने आपली पिस्तूल काढून सरळ आपल्या काकांवर गोळ्या झाडल्या. इब्राहिमला हा हल्ला अनपेक्षित होता. बराच वेळ अंदाधुंद गोळीबार करून पिस्तूल रिकामं झाल्यावर उदे शांत झाला. विक्षिप्तपणाचा कळस हा, की त्यानेच इब्राहिमला शाही इस्पितळात नेलं. झाल्या प्रकाराने उदे इतका अस्वस्थ झाला, की तो थेट कुठेतरी निघून गेला. ही घटना घडत असताना इराकच्या भूमीतून कामेल बंधू सद्दामच्या मुलींसह जॉर्डनला पळून जात होते....पुढे सद्दामने हा प्रकार समजताच संतापून आदेश दिला, की जशा पद्धतीने त्याने इब्राहिमवर गोळ्या झाडल्या, तश्याच पद्धतीने इब्राहीमने उडवर गोळ्या झाडाव्या अशी विनंती खुद्द उदेनेच इब्राहिमला करावी.....पण इब्राहीमने या सगळ्याला नकार दिल्यामुळे उदे वाचला.
तिथे याह्याच्याही आयुष्यात उदेच्या कृपेने असंच एक वादळ येणार होतं. तिथे इच्छा असूनही याह्याचं बरंवाईट करायला उदे थेट समोर येऊ शकणार नसला तरी त्याचा खास हस्तक मात्र याह्यासाठी कर्दनकाळ म्हणून समोर येणार होता....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

हे पिक्चर मध्ये नाही आहे बहुतेक

सद्दामच्या चुलतभाऊनी सद्दामच्याच मुलींशी लग्न केलं ? विचित्र वाटतेय खर.
>>> चुलत भावंडांची लग्न होतात हे माहीत होत पण काका-पुतणीचं ??? खरचं विचित्र आहे.

@जाइ @ आसा

अरब लोक आपल्या वंशाच्या लोकांमध्येच लग्न करतात. त्यामागे ' purity of bloodline ' चा विचार असतो.

हा असला माथेफिरु माणूस समजावून शांत होईल असं वाटणार्या लोकांचंच मला आश्चर्य वाटतंय आता. कुत्र्याचं शेपूट, कडू कारलं ह्या उपमा अगदी यथास्थित लागू पडतात. शेवटी काय तर पेरलेलंच उगवतं. Sad