फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग १७

Submitted by Theurbannomad on 29 January, 2021 - 13:51

" गाडीत उदे हुसेन आहे....युवराज उदे हुसेन...." सुरक्षारक्षकाने आरोळी ठोकली.
सुरक्षाप्रमुखांची आता चांगलीच धावपळ उडाली. आपल्या हातात खुद्द इराकचा युवराज आपणहून चालून कसा येऊ शकतो, याचंच त्यांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं. त्याच्या ' कर्तृत्वाची ' माहिती कुर्दिश लोकांना व्यवस्थित होती. बंदुका गाडीकडे रोखल्या गेल्या. काही सुरक्षासैनिकांनी दुर्बीण घेऊन दार कुठे काही संशयास्पद दिसतं का याची चाचपणी करायला सुरुवात केली. काहींनी आकाशाकडे डोळे रोखले.
" अस्सलाम वालेकुम, मी उदे हुसेन नाही....कृपया मला तुमच्या प्रमुखांशी बोलू द्या.. " याह्याने विनंती केली.
सुरक्षारक्षकांच्या प्रमुख गाडीपाशी आला. याह्या गाडीतून उतरला. सुरक्षारक्षकांनी त्याच्या खिशात, गाडीत अथवा कपड्यांमध्ये शस्त्रं नाहीत ना याची खातरजमा केली.
" मी कुर्दिश सैनिक लतीफ याह्या आहे. सद्दामच्या मोठ्या मुलाचा - उदे हुसेनचा ' फिदायी ' म्हणून मला जबरदस्तीने सद्दामच्या नजरकैदेत राहावं लागलं होतं....गेली तीन-चार वर्षं मी फिदायी म्हणून वावरलो असलो तरी मला त्या नरकातून काहीही करून निसटायचं होतं....आज तशी संधी मिळाली..."
" तू कुर्दिश आहेस? पुरावा काय? "
" अरबील येथे माझे घरचे राहतात....आजही....मी तुम्हाला माझा पत्ता देऊ शकतो..."
" पुरेसा पुरावा नाही...."
" मी उदे असतो तर असा एकटा शत्रूच्या प्रांतात का आलो असतो? "
" तुझ्यासारख्या माणसाच्या मेंदूत काय शिजतंय आम्हाला काय माहित...."
" कृपा करून मला एखाद्या सुरक्षित जागी घेऊन जा....मी सगळं सविस्तर सांगेन..."
एव्हाना गाडीची तपासणी पूर्ण झालेली होती. सुरक्षारक्षकांनी कुर्दिश सैन्याच्या प्रमुखाला लगोलग संदेश पाठवले. चार-पाच गाड्यांच्या गराड्यातून याह्याची गाडी निघाली ती थेट कुर्दिश सैन्यदलाच्या मुख्यालयात.
मुख्यालयातही कुर्दिश सुरक्षारक्षकांनी दस्तुरखुद्द ' उदे हुसेन 'ला पकडून आणलं की काय, अशी कुजबूज सुरु झाली. जो तो या पाहुण्याकडे आश्चर्यमिश्रित नजरेने बघत होता. या पाहुण्याबरोबर बरोबर असलेली सौंदर्यवती त्यांच्या आश्चर्यात भर घालत होती.
अखेर कुर्दिश सैन्यदलाच्या ( की बंडखोरांचा ? ) प्रमुख याच्यासमोर येऊन बसला.
" तू उदे हुसेन नाहीस याचा कोणता पुरावा तू देऊ शकतोस सांग..." त्याने आपल्या भरदार आवाजात जरब आणत याह्याला प्रश्न केला.
" मी याह्या....लतीफ याह्या. सद्दामच्या लोकांनी मला तीन-चार वर्षांपूर्वीच उचलून नेलं....माझा चेहरा उदे हुसेनसारखाच असल्यामुळे मला त्यांनी जबरदस्तीने त्याचा फिदायी बनवलं. माझ्या घरच्यांना त्यांनी इराण युद्धात शहीद झाल्याची खोटी बातमी पोचवली. बाहेरच्या जगासाठी मी कधीच मेलेलो आहे....पण उदे हुसेन म्हणून जगणं मरणातून वाईट असेल हे मला माहित नव्हतं...."
" तू फिदायी आहेस की नाही, यापेक्षा आम्हाला तू उदे हुसेन नाहीस हे पटवून दे....अशा अनेक कहाण्या आम्ही ऐकलेल्या आहेत आजपर्यंत..."
" माझी उंची उदेहून कमी आहे....हे बूट बघा, मुद्दाम उंच टाचांचे बनवून घेतलेले आहेत हे. माझी वैद्यकीय चाचणी करा....माझ्यावर केल्या गेलेल्या शस्त्रक्रियांच्या खुणा तपासा....मी तुम्हाला माझ्या घरचा, मी जिथे वाढलो त्या जागेचा, शाळेचा, महाविद्यालयाचा...सगळ्या सगळ्याचा पत्ता सांगू शकतो....माझ्या पूर्वायुष्याची माहिती देऊ शकतो..."
" हे सगळं शोधून काढणं नाही उदे सारख्यासाठी...."
" होय...पण जर उदेला हे सगळं माहित असत, तर तो कुर्दिस्तानला का आला असता? "
" म्हणजे? "
" मी लतीफ याह्या आहे...कुर्दिश वंशाचा लतीफ याह्या. उदेसारखा माणूस कुर्दिस्तानात कोणत्याही सुरक्षेविना शिरायचं धाडस का करेल? इराकचा भावी राजा, सद्दाम हुसेनचा मोठा मुलगा आणि हजारो कुर्दिश लोकांचा खून पडणारा उदे काहीही झालं तरी इथे असा येणार नाही...मी आलो. तुम्ही बघताक्षणी मला मारलं असत तरी मला ते चाललं असतं, कारण माझा मृत्यू उदेचा फिदायी म्हणून न होता कुर्दिश सैनिक म्हणून कुर्दिश सैनिकांच्या हातून झालेला मला चालणार होता...मला जन्नत मिळाली असती अशा मृत्यूने..."
याह्याच्या या बोलण्याचा सगळ्यांवर चांगला परिणाम झाला. त्याचा युक्तिवाद बिनतोड होता. कुर्दिस्तानात कोणत्याही कामगिरीसाठी स्वतः उदे येणं अशक्य होतं. शिवाय काही कारणामुळे सद्दामशी त्याने उभा दावा मांडला तरी त्याला पळून जायला आजूबाजूचे अनेक देश उपलब्ध होते. शिवाय उदे किती भडक माथ्याचा आहे, त्याच्या वागण्या-बोलण्यात किती अरेरावी आणि बेदरकारपणा आहे आणि तो कसा सतत नशेच्या अंमलाखाली असतो हे एव्हाना अख्ख्या इराकला माहित झालेलं होतं. लतीफ याह्या या सगळ्या ' कसोट्यांवर ' सपशेल 'अनुत्तीर्ण ' होतं होता.
अखेर याह्याला कुर्दिश प्रांतात प्रवेश मिळाला. कुर्दिस्तानच्या ' पश्मरगा ' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लष्कराच्या खास तुरुंगात त्याला काही काळ ठेवलं गेलं. उदे हुसेनची ख्यातीच अशी होती, की याह्या उदे हुसेन नसल्याची १००% खात्री पटेपर्यंत त्याला लष्कराने मोकळं सोडलं नाही. या काळात सद्दामच्या सेनेमध्ये आणि पश्मरगा सेनेमध्ये कुर्दिश प्रांतात असंख्य चकमकी होत होत्या. कुर्दिस्तानचा प्रांतच तसा संपन्न...निसर्गाने भरभरून दिलेलं असल्यामुळे येथे डोंगरदऱ्या, सुपीक जमीन, उन्हाळा - पावसाळा - हिवाळा असे तीन ऋतू, नद्या, नैसर्गिक साधनसंपत्तीची उपलब्धता या सगळ्यामुळे हा प्रांत हातचा घालवणं सद्दामसाठी अशक्य होतं. अमेरिकेने आणि संयुक्त राष्ट्रसंघाने या भागात ' ऑपरेशन प्रोव्हाइड कम्फर्ट ' सुरु केलेलं होतं. अखेर १९९१ च्या ऑक्टोबर महिन्यात सद्दामच्या सेनेने या भागातून काढता पाय घेतला. मसूद बारजानी हे कुर्दिस्तानचे नेते म्हणून नावारूपाला आले. अमेरिकेच्या साहाय्याने इराकच्याच सीमारेषेअंतर्गत कुर्दिस्तानला स्वायत्तता मिळाली.
कुर्दिस्तानच्या भागात तेव्हा सत्ता होती ' कुर्दिश सोशालिस्ट पार्टी ' ची. त्यांच्या ' सोशालिस्ट ' वानरसेनेचा त्या भागात धुमाकूळ चाले. याह्या आणि नुसा या वानरसेनेच्या तावडीत सापडले. त्यांनी या दोघांकडे असलेल्या सगळ्या वस्तुंवर डल्ला मारला. याह्या आणि नुसा यांना बराच काळ तुरुंगात राहावं लागलं आणि शेवटी त्यांची तिथून सुटका झाल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडलं गेलं. त्यांच्यावर सुरक्षारक्षकांची करडी नजर होतीच. त्याने इराकबाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरु केले. या काळात बगदादमध्ये त्याच्या नातेवाईकांना बराच त्रास सहन करावा लागला. उदेने काहींचा बराच काळ छळ केला तर काहींनी कंटाळून बगदादमधून काढता पाय घेतला. कधी ना कधी उदेचे हस्तक आपल्याला टिपणार ही भीती याह्याला होतीच. कुर्दिस्तानमध्ये त्यातल्या त्यात तो काहीसा सुरक्षित असला, तरी इराकबाहेर पडणं त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं झालेलं होतं.
त्याने सर्वप्रथम प्रयत्न सुरु केले युरोपच्या एखाद्या देशात आसरा शोधायचे. इराकमध्ये कितीही कारवाया केल्या, तरी इराकी लोकांना आपल्या देशात आसरा देण्याइतकं अमेरिकेचं इराकवर नक्कीच प्रेम नव्हतं. त्या मानाने युरोपीय देश मात्र युद्धाने पोळून निघालेल्या देशांच्या शरणार्थींना बऱ्यापैकी सहकार्य करायचे. याह्याने देश निवडला ऑस्ट्रिया.हा तसा बऱ्यापैकी उदारमतवादी देश.. जुन्या काळापासून कुर्दिस्तानच्या प्रांताशी जर्मनी - ऑस्ट्रिया देशांचा चांगलाच घरोबा होता. १९७० सालापासून कुर्दिस्तान आणि ऑस्ट्रिया एकमेकांचे चांगले स्नेही होते. १९९२ सालच्या कुर्दिस्तानच्या पहिल्यावहिल्या खुल्या निवडणुकीच्या वेळी ऑस्ट्रियाने कुर्दिस्तानला आपलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाठवून निवडणूक निर्धोकपणे पार पडतील याची काळजी घेतली होती. पूर्वीही कुर्दिश लोक निर्वासित म्हणून ऑस्ट्रियामध्ये गेलेले होते. साहजिकच याह्यासाठी हा देश सुरक्षित होता.
इथे इराकमध्ये उदे आपल्या या फिदायीच्या पळून जाण्याने चांगलाच अस्वस्थ झाला होता. सद्दामने उदेच्या बेलगाम आणि विक्षिप्त वागणुकीला कंटाळून याह्या पळून गेल्याचं पुरेपूर ओळखलं होतं...पण याह्यामुळे सद्दामच्या , त्याच्या कुटुंबाच्या आणि इराकच्या आतल्या वर्तुळातल्या अतिमहत्वाच्या लोकांच्या अनेक गोष्टी जगासमोर उघड व्हायची भीती त्याला होती. प्रत्यक्ष सद्दामच्या महालात याह्या उदे म्हणून वावरलेला होता. सद्दामच्या सगळ्या नातेवाईकांना, सद्दामच्या ' फिदायी ' ला, इराकच्या लष्करातल्या महत्वाच्या व्यक्तींना आणि शाही कुटुंबाच्या अंगरक्षकांना त्याने व्यवस्थित बघितलेलं होतं. बाहेरच्या देशांप्रमाणे इराकच्या जनतेलाही या गोष्टी समजणं सद्दामसाठी धोक्याचं होतं. उदेसाठी मात्र हा प्रकार त्याच्या अहंकाराला लागलेली ठेच होती. त्याला काहीही करून याह्याला संपवायचं होतं.
याह्या एकीकडे ऑस्ट्रियामध्ये आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडे उदे हुसेनच्या मनात वेगळेच कट शिजत होते. सद्दामने इराकचे अनेक भाडोत्री एजंट्स युरोपमध्ये जिथे तिथे पेरलेले होते. या एजंट्सना काम एकंच होतं - युरोपमध्ये शरण घेतलेल्या इराकच्या ' गद्दार ' लोकांना वेचून वेचून मारायचं....अर्थात ते काही इस्राएलच्या मोसादसारखे अथवा इंग्लंडच्या ' MI - ६ ' सारखे मुरलेले प्रशिक्षित एजंट्स नव्हते. त्यांना अनेकदा कामगिरी पूर्णत्वाला नेता नेता त्या त्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेकडून पकडलंही जायचं...पण तरीही उदेने एका अशाच भाडोत्री एजंटला एका खास कामगिरीवर रुजू केलं. कामगिरी होती लतीफ याह्याला संपवणं....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ पुणेकर जोशी -
याह्याच्या कुटुंबासाठी तो कधीच ' मेलेला ' होता....इराकच्या फौजांकडून लढता लढता इराण युद्धात तो शहीद झाला हे उदेच्याच लोकांनी त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं.

पुढे याहयाने उघडपणे आपल्या अनुभवांच्या कहाण्या सांगायला सुरुवात केल्यावर सत्य जगापुढे आलं आणि त्यानंतर याहयाच्या घरच्यांना परागंदा व्हावं लागलं....येईल त्याबद्दल पुढे.