फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग १६

Submitted by Theurbannomad on 29 January, 2021 - 13:47

बगदादच्याच एका प्रतिष्ठित श्रीमंताच्या मुलीच्या लग्नात उदेला सामील होण्याचं आमंत्रण मिळालं होतं. उदे याह्यासह तिथे गेला. त्याच्या नजरेस पडली एक अतिशय सुस्वरूप तरुण मुलगी, जी वधूवेशात सजलेली होती. तिचा होणारा नवरा कासीम - जो इराकच्याच सैन्यदलात कामाला होता - तिच्या बाजूला बसलेला होता. कोवळ्या वयाच्या तारुण्याने मुसमुसलेल्या त्या सुंदर तरुणीवर उदेची नजर पडली आणि जे व्हायला नक्को तेच घडलं. उदेला ती ' एका रात्रीसाठी ' सुयोग्य वाटली आणि त्याने याह्याला आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवली.
" दोस्ता, काय वाटतं? तिचं शरीर बघ.....कसली जवान पोरगी आहे ना? " उदेने याह्याला विचारलं.
" युवराज, तिचं आज लग्न आहे. आपण तिच्याबद्दल तरी आदराने बोला..."
" आदर आहे ना...खूप आहे....पण एका रात्रीसाठी ही नक्कीच उदेकडे येऊ शकते ना? मग खुशाल तिने आपल्या नवऱ्याबरोबर संसार करावा..." उदेने दात विचकत त्या मुलीकडे बघून स्मितहास्य केलं. तिला बिचारीला इराकचे युवराज आपल्याकडे बघून हसत असल्याचं दिसल्यावर ते आपली विचारपूस करण्यासाठी आपल्याला बोलावत आहेत असं वाटलं आणि ती उदेकडे आली.
उदेने तिच्या हाताचं चुंबन घेतलं. तिला थोडं संकोचल्यासारखं झालं.
उदेने आपल्या खास अंगरक्षकांना इशारे केले. मेजवानीत जमलेल्या त्या सगळ्या पाहुण्यांमधून हळूच ती मुलगी अंगरक्षकांनी गायब केली. प्रत्यक्ष वधू मेजवानीतून हरवल्याचं समजल्यावर पळापळ सुरु झाली. इथे उदे शांतपणे आपल्या महालाच्या त्या खास दालनात आला. समोर बिछान्यात अर्धवट बेशुद्धावस्थेत ती नववधू पडलेली होती. उदेने त्या कोवळ्या कुमारिकेवर मनसोक्त अत्याचार करून घेतले. तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. तिने प्रतिकार करण्याचा निष्फळ प्रयत्न केलाही, पण उदेसारख्या विकृत राक्षसासमोर तिचा निभाव लागणं अशक्यच होतं. अखेर उदेची मनसोक्त रासक्रीडा झाल्यावर त्याने तिला सोडून दिलं. तिने या सगळ्याचा धसका घेतला आणि आत्महत्या करून आपलं ' कलंकित ' आयुष्य संपवलं.
याह्यासाठी हा प्रसंग उंटाच्या पाठीवरच्या शेवटच्या काडीसारखा ठरला. त्याच्या मनात आपल्या कामाबद्दल, उदेबद्दल आणि इराकबद्दल कमालीचा तिरस्कार निर्माण झाला. त्याच्या समोरच त्या मुलीचा बाप उदेशी भांडायला आला. उदेला त्या म्हाताऱ्याची काही पर्वा नव्हतीच...
" राक्षसा, माझ्या मुलीवर बलात्कार करण्याची तुझी हिम्मत कशी झाली? मी थेट सद्दाम हुसेन यांच्याकडे तुझी तक्रार करेन..." तो मुलीचा बाप कडाडला.
" काय झालं? उदे हुसेनबरोबर तुझी मुलगी होती…. उदे हुसेनबरोबर.. इराकचे भावी राष्ट्राध्यक्ष उदे हुसेन...काय? तशीही ती वेश्या व्हायचाच लायकीची होती...माझ्यामुळे तर उलट तिला प्रतिष्ठा मिळाली...पण ती अशी मूर्ख निघेल वाटलं नव्हतं....कशासाठी आत्महत्या करायची? मला तिच्यात एका रात्रीपुरताच रस होता..." उदेने निर्लज्जपणे उत्तर दिलं.
दोघांमध्ये बराच काळ गरमागरमी झाली. शिवीगाळ करत त्या म्हाताऱ्याने उदेवर हात उचलला. उदेने माशी झटकावी तसा त्याला झटकून टाकला आणि आपल्या कमरेचं पिस्तूल याह्याकडे फेकलं.
" दोस्त, याला मार ना....खूप झालं याचं..." उदे थंडपणे बोलला.
" मी एका निरपराध माणसाला कसा मारणार? मी हे करणार नाही... " याह्याने साफ नकार दिला.
" निरपराध? तुझ्यासमोर त्याने इराकच्या भावी राजाला शिवीगाळ केलीय....हा अपराध नाही? " उदेने नजर याह्याकडे रोखली.
" मुळीच नाही....त्याने शिवीगाळ का केली तुम्हाला माहित आहेच...." याह्याने ठाम सुरात उत्तर दिलं.
उदे आता संतापला. त्याने रागारागात पिस्तूल उचलून थेट याह्यावर गोळ्या झाडल्या. याह्या सैनिकी प्रशिक्षण घेतलेला तरुण होता...त्याने चपळाईने आडोशाला झेप घेऊन गोळ्या चुकवला, एक गोळी त्याच्या खांद्याला चाटून गेली. उदेने आता अंदाधुंद गोळीबार सुरु केला. त्या बिचाऱ्या म्हाताऱ्याच्या शरीरात गोळ्या शिरल्या आणि त्याचा आत्मा मुलीला भेटायला अल्लाहच्या वाटेवर निघून गेला.
आजूबाजूच्या लोकांची आता पळापळ सुरु झाली. याह्याने स्वतःला सावरत दरवाजा गाठला आणि बाहेर पळ काढला. इमारतीबाहेर उदेची गाडी होतीच...याह्याने आपण उदे असल्याचा कांगावा करत गाडी हातात घेतली. त्या मेजवानीत याह्याबरोबर बसलेली नुसा - जिला याह्या आवडत होता आणि जिच्या याह्याबद्दलच्या ' विशेष ओढीची ' कल्पना उदेलाही होती - याह्याबरोबर बाहेर पडली. तिने त्याला आपल्यालाही बरोबर घेऊन जायची गळ घालून याह्याला कसंबसं राजी केलं. ती मागे राहिली, तर उदे तिचा जीव घेईल या कल्पनेने याह्याने तिला सोबत घेतलं.
याह्याच्या गाडीमागे उदेच्या अंगरक्षकांनी आपापल्या गाड्या दौडवल्या. नशिबाने याह्याची गाडी ' बुलेट - प्रूफ ' असल्यामुळे त्याच्या गादीवर चाललेला अंदाधुंद गोळीबार त्या गाडीला विशेष काही करू शकला नाही. याह्याबरोबर गाडीत बसलेली नुसा भेदरून थरथरत होती. याह्याच्या दंडातून रक्त वाहात होतं. त्याने गाडी मिळेल त्या मार्गाने - अगदी वाळू अथवा चिखल तुडवत कच्च्या रस्त्यानेही - कुर्दिस्तानच्या दिशेला दौडवली. तिथे त्याच्या आईच्या बाजूचे काही नातेवाईक राहत असल्यामुळे त्याला तिथे सुरक्षित आसरा मिळू शकणार होता. पुढे अंगरक्षकांना चुकवल्यावर रस्त्यात ज्या ज्या ठिकाणी चेकपोस्ट होते, तिथे तिथे त्याने आपल्या ' उदे हुसेन ' असण्याचा फायदा करून घेतला. त्याला अडवायची कोणाचीही हिम्मत झाली नाही.
बरेच दिवसापासून त्याला ज्या अदृश्य साखळदंडांनी जखडून ठेवलं होतं, त्यांचे पाश आता तुटलेले होते. एका माथेफिरू विकृत मनुष्याचा तोतया बनून राहण्यापेक्षा थेट देश सोडून पळून जावं असा विचार त्याच्या मनात अनेक दिवस घोळत होता...आज तो दिवस प्रत्यक्षात त्याच्या आयुष्यात आला होता. गाडी भरधाव जात होती.
बऱ्याच काळानंतर आज त्याने मोकळा श्वास घेतलेला होता. आपल्या या कृत्यामुळे उदे आपल्या जीवावर उठणार हे त्याला माहित होतं, पण उदेबरोबरच्या अनुभवांमुळे जीव गेला तरी बेहत्तर पण पुन्हा त्या माथेफिरूच्या महालात पाय ठेवायचा नाही असा पण त्याने केला होता. या सगळ्याचा परिणाम आपल्या घरच्यांवरही होणार, हे त्याला माहित होतं. आता पुढची पावलं लवकरात लवकर उचलणं त्याच्यासाठी महत्वाचं झालं होतं.
याह्यासाठी कुर्दिश प्रांत त्यातल्या त्यात सुरक्षित होता. सद्दामने आणि त्याच्या सैन्याने कुर्दिश लोकांशी गेले अनेक वर्षं उभा दावा मांडल्यामुळे कुर्दिश प्रांतातल्या लोकांना सद्दामचा राग होताच. कुर्दिश लोक शूर लढवय्ये म्हणून ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध होते. इराकच्या उत्तर भागात असलेल्या डोंगररांगांच्या भागात कुर्दिश लोक बहुसंख्येने राहात होते. त्या दिशेने याह्याची गाडी भरधाव वेगाने निघाली होती.
१९९१ साली इराक-कुवेत युद्धाची संधी साधून कुर्दिश लोकांनीही आपली स्वतंत्र कुर्दिस्तानची मागणी पुढे रेटली होती. संयुक्त राष्ट्रसंघाने ६८८ व्या ठरावानुसार कुर्दिश लोकांच्या स्वायत्ततेला आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन या भागाला आपली सुरक्षा पुरवलेली होती. हा भाग ' उड्डाणबंदीचा भाग - नो फ्लाय झोन ' म्हणून त्यांनी घोषित केला होता. सद्दामच्या सैन्यात आणि कुर्दिश लोकांच्या सैन्यात सतत चकमकी होत होत्या. सद्दामला अशा प्रकारे घरच्या आणि बाहेरच्या अशा दोन्ही आघाड्यांवर मोर्चे सांभाळावे लागत होते आणि त्यात त्याची चांगलीच दमछाक होत होती. अशा सगळ्या वातावरणात स्वसंरक्षणासाठी याह्या कुर्दिस्तान सोडून कुठे इतरत्र जाऊच शकत नव्हता.
कुर्दिश प्रांताच्या सीमारेषेवर कुर्दिश सुरक्षारक्षकांच्या तुकडीने भरधाव आलेली शाही गाडी बघताच पवित्र घेतला. सुरुवातीला त्यांचा चांगलाच गोंधळ उडाला. एकच भपकेबाज उंची गाडी आपल्या सीमारेषेच्या दिशेने येते आहे हे बघून त्यांनी आपल्या प्रमुखांना पाचारण केलं. ते प्रमुखही हे सगळं बघून गोंधळले. हळू हळू गाडी नजरेच्या टप्प्यात आल्यावर त्यात एक पुरुष आणि एक स्त्री बसलेली दिसल्यावर त्यांनी गाडीला थांबायचं इशारा दिला. गाडीच्या काचा खाली करायला लावल्या आणि त्यांना समोर जे दृश्य दिसलं, ते बघून त्यांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसला घाणेरडा माणूस होता हा उदे. मला एक कळत नाही - त्याची एव्हढी ख्याती असतानाही त्याला मुलीच्या लग्नात बोलवायची काय गरज होती? आ बैल मुझे मार.

@स्वप्ना राज
त्याला बोलावणं कसं टाळणार? सद्दाम हुसेनचा मुलगा आणि इराकचा भावी सर्वेसर्वा होता तो !

मग हे लग्न म्हणजे risk नव्हती तर घरच्यांनी सरळसरळ मुलीच्या आयुष्याशी खेळलेला खेळ होता. हे असलं होण्यापेक्षा मुलगी घरात राहिलेली स्वीकारलं असतं मी. Angry

@स्वप्ना राज
असं कसं बोलता? कोणालाही आधीपासून माहीत कसं असणार उदे काय करेल याबद्दल ? इतरही अनेक जणांची लग्नं झाली ना? हा उदे कधी काय करेल हे त्याच्या बापाला सांगता आलं नाही तिथे इतरांबद्दल काय बोलणार?