फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग १४

Submitted by Theurbannomad on 27 January, 2021 - 09:43

सद्दामने शेजारच्या कुवेतबरोबर बऱ्याच काळापासून उभा दावा मांडलेला होता. वास्तविक इराक आणि कुवेत हे दोन्ही देश मूळचे ऑटोमन साम्राज्याचे भाग. इराकच्या बसरा प्रांताचाच एक हिस्सा असलेला कुवेत केवळ ब्रिटिश आणि फ्रेंचांच्या राजकारणामुळे एक वेगळा देश म्हणून जन्माला घातला गेला...आणि म्हणूनच सद्दामसारख्यांना कुवेत हा इराकचा भागच वाटायचा. त्याबद्दल अनेकदा सद्दाम जाहीररीत्या व्यक्त झालेला होता. इराण युद्धानंतर इराकला दिलेल्या तीस कोटी डॉलर्सच्या अर्थसाहाय्यावर बोट ठेवत कुवेतने जेव्हा परतफेडीची भाषा करायला सुरुवात केली, तेव्हा सद्दाम चिडला. त्याने कुवेतशी तेलवाटपावरून तंटा उकरून काढला.
सद्दामचा असा दावा होता, की कुवेत आणि इराकच्या सीमाभागात असलेल्या रुमाईला तेलक्षेत्रातून कुवेत ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा जास्त तेल उपसत आहे....हे तेलक्षेत्र दोन्ही देशांमध्ये विभागलेलं होतं. याशिवाय सद्दामसाठी तेलाचा दार १८ डॉलर्स प्रतिबॅरल किंवा जास्त राहणं महत्वाचं होतं, कारण इराकच्या अर्थव्यवस्थेला या दरामुळे टेकू मिळणार होता.परंतु ओपेकने ठरवून दिलेल्या तेलकोट्यापेक्षा कुवेत जास्त तेल बाजारात आणतोय आणि त्यामुळे भाव १० डॉलर्स इतके खाली पडत आहेत हे सद्दामच्या थयथयाटाचं खरं कारण होतं. कुवेत, युएई अशा छोट्या तेलउत्पादक देशांनी ही भूमिका घेतली होती, की इराण युद्धामुळे आधीच डळमळलेली अर्थव्यवस्था पूर्ववत करण्यासाठी जास्त तेल विकणं त्या देशांना आवश्यक होतं.
या काळात इराकमध्ये सुंदोपसुंदी माजलेली होती. अरब देशांनी इराककडे पाठ फिरवलेली होती. इराकमधल्या बेकार इराकी तरुणांनी बाहेरून आलेल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केलेली होती, ज्याचा फटका इजिप्तला सहन करावा लागलेला होता. इराकमध्ये असंख्य इजिप्शियन कामाला होते. मानवाधिकार आयोगाने इराकला फटकारलेलं होतं. इस्रायलशी उभा दावा मांडल्यामुळे अमेरिकेनेही इराकला कोंडीत पकडलं होतं. या सगळ्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीने इराकशी सौदी अरेबियाच्या जेद्दा शहरात वाटाघाटी सुरु झाल्या, तेव्हा इराकने शंभर दशलक्ष डॉलर्सची नुकसानभरपाई म्हणून मागणी केली. कुवेतने उत्तरादाखल प्रस्ताव दिला पाच दशलक्ष डॉलर्सचा. याच क्षणाची जणू काही सद्दाम वाट बघत होते...कारण वाटाघाटी फिस्कटल्याची वार्ता त्याच्या कानी आली आणि आखाती युद्धाचा श्रीगणेशा झाला.
२ ऑगस्ट १९९०.
इराकच्या सैन्यदलाला आदेश मिळताच त्यांनी थेट कुवेतच्या सीमा ओलांडून कुवेत देशाची राजधानी कुवेत सिटीच्या दिशेने आगेकूच केली. कुवेत देश इतका चिमुकला आहे, की काही तासांमध्येच प्रचंड इराकी सैन्याने हा देश गिळंकृत केला. आखातात आता वातावरण अतिशय स्फोटक झालं. या काळात उदे मुद्दाम जातीने सैन्यदलाच्या तुकड्यांसमोर जाऊन वीरश्रीयुक्त भाषणं ठोकायला लागला. कुवेतने इराकच्या वाट्याच्या तेलावर कशा पद्धतीने डल्ला मारला याच्या कहाण्या तो प्रक्षोभक भाषेत तिखटमीठ लावून आपल्या सैन्यदलाच्या तुकड्यांसमोर सांगायला लागला. सद्दामलाही त्याच्यात झालेला हा बदल चकित करून गेला.
अर्थात बगदादमधल्या सैन्याला संबोधित करण्यात कसलाही धोका नसला, तरी बसरा प्रांतात जाऊन असली भाषणं देण्यामध्ये मात्र जोखीम मोठी होती. उदेने या कामगिरीवर याह्याला पाठवलं. उदे हुसेन म्हणून याह्याने त्याला पढवलेली भाषणं उदेच्याच थाटात तिथल्या सैन्यदलाच्या तुकड्यांसमोर दिली. तेव्हाच्या काळी इंटरनेट अथवा थेट प्रक्षेपणाचं तंत्र आजच्याइतकं प्रगत नसल्यामुळे एकच वेळी दोन ठिकाणी ' उदे हुसेन ' भाषणं देत असला तरी कोणाला फारसं काही समजलं नाही.
याच्याच दुर्दैव असं, की याच बसरा प्रांतात भाषणं देत फिरत असताना त्याच्यावर अचानक काही अज्ञात इसमांनी हल्ला केला. त्याच्या ताफ्यावर जोरदार गोळीबार झाला. प्रत्युत्तरादाखल इराकी सैन्यानेही गोळीबार केला आणि हल्लेखोरांना नेस्तनाबूत केलं...पण या सगळ्या रणधुमाळीत याह्याच्या करंगळीला अतिशय मोठी इजा झाली....लगोलग त्याला बगदादच्या इस्पितळात आणलं गेलं. त्याची करंगळी वाचवता आली नाही, तर उदे आणि तो वेगवेगळे समजणं सहज शक्य होणार होतं....उदे आपल्या मैत्रिणींसह एका क्लबमध्ये मौजमजा करण्यात गुंग असताना त्याला ही खबर मिळाली. त्याने लगोलग इस्पितळात धाव घेतली. इथे पुन्हा एकदा सगळ्यांना जुना उदे बघायला मिळाला. डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकी देऊन आणि आपल्या पिस्तुलाने अंदाधुंद गोळीबार करून त्याने कोणत्याही परिस्थितीत याह्याची करंगळी जोडली गेलीच पाहिजे असं इस्पितळातल्या प्रत्येकाला निक्षून सांगितलं.
" उदे हुसेनच्या हाताला करंगळी उरली नाही तर उदे हुसेन एकेकाचा मुडदा पाडेल..." उदेने हवेत गोळ्या झाडत अख्ख्या इस्पितळालाच इशारा दिला. त्याच्या सुदैवाने आणि अर्थातच इस्पितळातल्या सगळ्यांच्या प्रार्थनेमुळे याह्याची करंगळी वाचली....अन्यथा उदेने काय काय केलं असतं हे त्या अल्लालाच ठाऊक !
उदे पुन्हा आपले जुने रंग दाखवायला लागला होता. आखाती युद्धात अमेरिकेने पाऊल ठेवताच सद्दामला या आततायीपणाची मोठी किंमत मोजावी लागणार, हे स्पष्ट झालं. माघार घेतानाही सद्दामने कुवेतच्या तेलविहिरींना आग लावूनच सैन्य परत बोलावलं. तेलाचे भाव पुन्हा एकदा चढले. या युद्धात कुवेतनंतर कुवेतच्या सीमेपाशी असलेल्या सौदीच्या तेलविहिरींवरही सद्दामने डोळा ठेवलेला होता...तेव्हा सौदीलाही आता इराकची डोकेदुखी जाणवायला लागलेली होती. इराकने जर सौदीच्या तेलक्षेत्राला आपल्या ताब्यात आणलं असत, तर इराकच्या आधिपत्याखाली सौदीच्या बरोबरीचा तेलसाठा आला असता आणि सद्दामने तेलउत्पादक देशांनाच वेठीला धरायला सुरुवात केली असती...पण अमेरिकेने हस्तक्षेप करून सद्दामच्या मनसुब्यांवर पाणी फिरवलं.
लतीफ याह्या या सगळ्या प्रकारामुळे चांगलाच धास्तावला. इराकची भविष्यात चांगलीच धूळधाण उडणार आहे हे त्याच्या मनाने हेरलं. आततायी राजकारणामुळे सद्दाम कुटुंबीयांच्या हाती कदाचित इराकची धुरा राहणार नाही हेही त्याला समजलेलं होतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याने अखेर एक महत्वाचा निर्णय घेतला - काहीही करून इराक देशातून पळून जाऊन कुठेतरी आसरा शोधायचा. हा त्याचा निर्णय त्याने आजवर घेतलेल्या निर्णयांमधला सगळ्यात शहाणपणाचा निर्णय ठरणार होता.
या काळात उदे हाताबाहेर गेलेला माथेफिरू असल्यासारखा वागत होता. लहान लहान कारणांवरून संताप करणं, कुवेतच्या नावाने अर्वाच्च्य शिव्या देऊन त्या देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाला संपवण्याच्या धमक्यांचं सतत पारायण करणं आणि हे सगळं करताना ' मौजमजा ' करण्यात काहीही खंड न पडू देणं हा उदेचा दिनक्रम झाला होता. सद्दाम आपल्या सगळ्या महत्वाच्या निर्णयप्रक्रियेत एव्हाना उदेऐवजी कुसेला प्राधान्य देऊ लागला होता. दोघं भावांमध्ये दारी वाढत चाललेली होती. उदेला स्वतःला डावललं गेल्याचा राग होताच, शिवाय त्याच्या मनात दुसराही राग धुमसत होता. सद्दामच्या दुसऱ्या बायकोच्या मुलाला जर उत्तराधिकाऱ्याचा दर्जा मिळाला, तर आपल्याला दुय्यम भूमिका स्वीकारावी लागेल असा संशय त्याच्या मनात बरेच काळापासून होता. एकीकडे सख्खा तर दुसरीकडे बळजबरीने स्वीकारावा लागलेला सावत्र भाऊ आपल्या ' गादीवर ' बसतात की काय ही त्याच्या मनातली सगळ्यात मोठी भीती होती.
सद्दामच्या विरोधात अमेरिकेने आणि युरोपीय देशांनी आता जोरदार आघाडी उघडली होती. या सगळ्याचा व्हायचा तो परिणाम झालाच....प्रकरण इतकं तापलं की संयुक्त राष्ट्रांनी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली इराकवर चढाई केली. सौदीचे सर्वेसर्वा राजे फाहद यांनी आपल्या बाजूने अरब राष्ट्रांचीही ताकद या चढाईमागे उभी केली. १६ जानेवारी १९९१ या दिवशी आखाती युद्धाला तोंड फुटलं. सद्दामच्या विरोधात जमीन आणि आकाश अशा दोन्ही बाजूंनी आघाड्या उघडल्या गेल्या. ४२ दिवस चाललेल्या या युद्धात इराकचा पूर्णपणे नक्षा उतरला. सद्दामची अभूतपूर्व कोंडी झाली. २७ फेब्रुवारी १९९१ या दिवशी अखेर सद्दामने कुवेतमधून काढता पाय घेतला.
सद्दामने कुवेतवर कब्जा केल्यावर कुवेती दिनारची किंमत इराकी दिनारइतकी केल्यामुळे कुवेतच्या चलनाचं जवळ जवळ आठपटींनी अवमूल्यन झालेलं होतं...अखेर सौदीच्या आश्रयाला गेलेल्या कुवेतच्या अमीराने - शेख जाबर अल - अहमद अल - सबा याने कुवेतच्या नोटांना अवैध चलन म्हणून जाहीर केलं. एका झटक्यात त्या नोटांची किंमत कागदाच्या कापट्याइतकी केली. संयुक्त राष्ट्रांनी इराकवर कडक निर्बंध लादण्याची घोषणा केली आणि इराकची चांगलीच कोंडी केली. त्यांच्या फौजांनी इराकवर चढाई करून इराकच्या भूमीत खोलवर मुसंडी मारली. इराकने संयुक्त राष्ट्रांच्या युद्धनौकांना थोपवण्यासाठी अरेबियन आखातात चारशे दशलक्ष गॅलन तेल ओतलं आणि वरून कुवेतच्या सातशे तेलविहिरींना आग लावूनच कुवेतमधून माघार घेतली.
१९९१ चं वर्ष इराकसाठीच नाही, तर समस्त जगासाठी तापदायक ठरलं. आखातात पेटलेल्या तेलाने जग होरपळून निघालं. सद्दामच्या सगळ्या आशाआकांक्षांची राखरांगोळी झाली....एकेकाळी अरब जगताचं नेतृत्व करण्याची स्वप्न बघणाऱ्या सद्दामला कोणीही मित्र उरला नाही. आधी इराण आणि मग संयुक्त राष्ट्रांबरोबर एक दशकभर युद्ध करून शेवटी जराजर्जर झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे सद्दामचं कंबरडं मोडलं.
हे सगळं होत असताना प्रत्यक्ष बगदादमध्ये मात्र वेगळाच प्रकार घडत होतं. उदे आपल्या विक्षिप्त स्वभावामुळे सगळ्यांना डोईजड व्हायला लागलेला होतं. त्याच्या विक्षिप्तपणाचा उद्रेक झाला एका अशा प्रसंगात, ज्यामुळे याह्या बगदादमधून पलायन करण्याला उद्युक्त झाला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users