फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग १२

Submitted by Theurbannomad on 26 January, 2021 - 15:11

इजिप्तने होस्नी मुबारक यांच्या काळात अरब देशांशी आपले बिघडलेले संबंध पुन्हा एकदा पूर्ववत करायला सुरुवात केली होती. १९८२ पासून इजिप्तने सौदी अरेबिया, इराक, लेबनॉन, सीरिया अशा आपल्या जुन्या शेजाऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चेच्या माध्यमातून हातमिळवणी सुरु केली होती. इराकसाठी इराण युद्धानंतर इजिप्तसारख्या तगड्या अरब देशाशी संबंध सुधारणं महत्वाचं झालेलं होतं. होस्नी मुबारक यांच्या अरब-ब्रिटिश पत्नी सुझान यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ सद्दामने जी मेजवानी आयोजित केली होती, तिचा उद्देश होता मुबारक कुटुंबियांशी घरोबा वाढवणं.
महिना ऑक्टोबर. साल १९८८.
मेजवानीमध्ये इराकचे अनेक अमीर-उमराव आणि इजिप्तचे इराकी वकिलातीतले महत्वाचे अधिकारी सामील होते. या मेजवानीच्या आयोजनाची जबाबदारी कमाल हाना याच्यावर सद्दामने सोपवली होती. त्याने मेजवानीचं आमंत्रण पाठवताना मुद्दाम उदेला निमंत्रितांच्या यादीत सामील करून घेतलं नव्हतं...उद्देश हा, की महाशय योग्य त्या अवस्थेत नसले तर सद्दामची बदनामी होईल...पण उदेने हा त्याचा जाणूनबुजून झालेला अपमान असल्याची समजूत करून घेऊन आगंतुकासारखं त्या मेजवानीत सामील व्ह्यायचा निर्णय घेतला.. उदे आपल्या सुविख्यात पद्धतीने अतिशय उंची कपडे घालून मेजवानीत हजर झाला....याह्यासकट ! उपस्थितांशी तो बऱ्यापैकी बोललादेखील....वास्तविक उदेचा वरचा जबडा जन्मतःच आकाराने मोठं असल्यामुळे त्याच्या बोलण्यात एक प्रकारचा हेल होता....त्याचे शब्द बऱ्याचदा स्पष्ट ऐकू येत नसत...तशात अती नशेबाजीमुळे त्याची जीभ जड झालेली होती...त्यामुळे त्याला स्वतःबद्दल एक प्रकारचा न्यूनगंड होता. तरीही आज स्वारी उपस्थितांशी बोलली हे बघून समस्तास अचंबा झाला.
पण तो अचंबा टिकला केवळ काही काळ. झालं असं, की या मेजवानीत कमाल हाना नेमका यजमानाची भूमिका बजावत होता. उदेचा बऱ्याच दिवसांपासून कमालवर राग होताच... मेजवानीच्या काही दिवस आधीच सद्दामने गुपचूप समीराशी दुसरं लग्न केलं होतं. आपल्या आईला सवत आली ती याच माणसाच्या हलकटपणामुळे, हे त्याच्या मनावर कोरलं गेलं होतं. एव्हाना उदेने भरपूर मद्य रिचवलं होतं....तेव्हा आधीच मर्कट आणि तशात मद्य प्याला अशी त्याची अवस्था झालेली होतीच. कमाल हाना याने नेहेमीप्रमाणे हसून उदेशी हस्तांदोलन केलं. त्यालाही थोडीफार नशा झालेली होतीच...त्याने गमतीच्या सुरात उदेची थट्टामस्करी केली. उदेच्या मनात दडपलेल्या संतापाचा उद्रेक व्हायला इतकं कारण पुरेसं होतं.
अचानक उदेने जोरजोरात कमालवर अपमानास्पद शब्दांमध्ये टीकाटिप्पणी करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या सगळ्या लोकांना अचानक उदेचा हा रौद्रावतार बघून आश्चर्य वाटलं.
" उपस्थित लोकहो, हा कमाल....माझ्या वडिलांनी पाळलेला कुत्रा....हा बघा त्याचा उंची सूट...हे बघा त्याचं सोन्याचं घड्याळ....हे सगळं कोणी दिलं याला? माझ्या वडिलांनी....त्यांच्या कृपेमुळे हा तुच्छ मनुष्य इतकी मिजास मारतोय आज....याची लायकी काय होती नाहीतर? "
" युवराज, आवरा....आपण कुठे आहोत याच भान ठेवा...." कमाल राग दाबत हळू आवाजात बोलला.
" आवरा? तू....कुत्र्या, तू आहेस तो मनुष्य ज्याच्यामुळे माझ्या आईला मनस्ताप झाला....माझ्या बापाला ती बाई आणून देणारा तूच आहेस ना? तूच तो, जो माझ्या बापाला मुली पुरवतोस....नीच माणसा, तुझ्यामुळे माझी आई रडली आहे अनेक वेळा...तूच तो..."
अखेर त्याला अंगरक्षकांनी कसंबसं आवरलं. त्याने काही क्षण थांबून पुन्हा आपली पिस्तुल काढली आणि कमालवर रोखली.
" तुला मारल्यावरच मला बरं वाटेल....माझ्या आईला बरं वाटेल...तू मेलाच पाहिजेस..." उदे बरळत होता. अखेर त्याला एका मुलीबरोबर त्याच्या शयनकक्षात ढकलून कोणीतरी प्रसंग कसाबसा निभावून नेला. याह्या हे सगळं बघत शांतपणे उभा होता. दोन पिसाळलेल्या कुत्र्यांच्या झटापटीत पडण्यात त्याला काहीही रस नव्हता.
आता पाळी होती कमालची. त्याने घुश्श्यात दारूचे चार-पाच ग्लास पोटात ढकलले आणि त्याचाही तोल गेला. त्यानेही मोठमोठ्या आवाजात उदेला शिव्यांची लाखोली वाहायला सुरुवात केली. उदेने हा सगळा प्रकार ऐकला आणि तो थेट मेजवानीत आला. त्याने कमालला गप्प बसण्याचा आदेश दिला.कमालने त्याला सरळ उडवून लावलं.
" मी फक्त इराकचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यांचाच आदेश मानतो...बाकी कोणाचाही नाही...बाकी सगळे ऐरेगैरे आहेत माझ्यासाठी..." कमालने उदेला डिवचलं. पुन्हा एकदा दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि.....
समोरच्या टेबलावर ठेवलेली इलेक्ट्रिक सुरी - जिचा उपयोग सामान्यतः मांस, ब्रेड असे खाद्यपदार्थ कापण्यासाठी होतो - उदेच्या नजरेस पडली. त्याने कोणताही विचार न करता सरळ ती सुरी उचलली आणि कमालच्या अंगावर चालवायला सुरुवात केली. कोमलच्या शरीरावर त्या धारदार सुरीचे घाव पडत होते आणि कमाल गुरासारखा ओरडत होता. एक घाव त्याच्या पोटावर लागला आणि त्याचा कोथळा बाहेर पडला. उदे अक्षरशः हिंस्त्र प्राण्यासारखा ओरडत आपल्या संतापला मोकळी वाट करून देत होता. कमालच्या शरीराची चाळणी झाली. उदेने आपल्या आईचा प्रतिशोध घेतला होता....अनेकांच्या मते त्याला आईनेच या ना त्या मार्गाने कमालचा काटा काढण्यासाठी चिथावलेलं होतं....पण तिच्या या सुपुत्राने मुहूर्त चुकीचा निवडला होता.
सद्दामच्या कानावर ही बातमी आली आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांसमोर आपल्या या दिवट्याने आपली चांगली शोभा केली या भावनेने त्याच्या डोळ्यात अंगार पेटला. त्याशिवाय सद्दामच्या अतिशय जुन्या आणि खास अंगरक्षकाचा जीव उदेने घेतला होता, जे सद्दामसाठी कधीही भरून न येणारं नुकसान होतं. हुकूमशहांना विश्वासू अंगरक्षक अतिशय जवळचे असतात....त्यांच्यापैकी एक जरी कमी झाला तरी त्यांच्या जीवाचा धोका वाढतो....अखेर सद्दामने आपल्या या चिरंजीवांना धडा शिकवायचा निश्चय केला.
या घटनेमुळे सद्दाम आणि उदे यांच्या नात्याला कायमचा तडा गेला. सद्दामच्या मनातून उदे इतका उतरला की त्याने सरळ आपला उत्तराधिकारी म्हणून कुसेला जबाबदारी सोपवायचा विचार पक्का केला. उदेला आता आपल्या माथेफिरूपणाची शिक्षा भोगावी लागणार होती....आणि या घटनेमुळे याह्याचं महत्व आपोआप वाढणार होतं.
इथे हा सगळा प्रकार केल्यावर उदे थोडासा भानावर आला. एव्हाना सुझान मुबारक यांना त्यांच्या अंगरक्षकांनी बाहेर काढून एका गाडीतून सुरक्षितपणे त्या महालापासून लांब नेलं होतं. सद्दाम संतापून आपल्या महालाच्या बाहेर आला आणि आपल्या अंगरक्षकांच्या ताफ्यासकट या मेजवानीच्या महालाकडे निघाला.
इथे उदेने घाबरून स्वतःला एका बाथरूममध्ये कोंडून घेतलं. बाहेर उदेच्या अंगरक्षकांनी बाथरूमचा दरवाजा ठोठावायला सुरुवात केली. याह्यानेही उदेला दार उघडायची विनंती केली. आतून उदे जोरजोरात किंचाळत काहीतरी बोलत होता , पण त्याच्या बोलण्याचा अर्थ लागण अशक्य होतं. काही तासांनी त्याचा आवाज क्षीण झाल्यावर सगळ्यांनी दरवाजा तोडायचा निर्णय घेतला. दार तोडून आत प्रवेश करताच त्यांना बेशुद्धावस्थेतला उदे अर्धमेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला. त्याच्या हातात कुठल्याश्या औषधांच्या गोळ्यांची बाटली होती. त्याने सगळी बाटली रिकामी केली होती.
आता पुन्हा एकदा महालात पळापळ सुरु झाली. शाही महालाच्या जवळच बिन सिना इस्पितळ होतं. हे इस्पितळ खास सद्दामच्या आणि हुसेन कुटुंबियांच्या सोयीसाठी सुसज्ज केलेलं होतं....उदे हुसेन तिथे आला तेव्हा तिथल्या डॉक्टर्सची पाचावर धारण बसली. उदे काय चीज आहे हे त्यांना व्यवस्थित माहित होतं....ही ब्याद दुसरीकडे गेली तर बरं असं त्यांना वाटून गेलं, पण आता ते शक्य नव्हतं. वेळीच उपचार केले नाहीत तर उदे दगावेल हे त्यांना समजलेलं होतं...अखेर त्यांनी उदेला थेट शस्त्रक्रिया विभागात नेलं. त्याच्या पोटातून औषधांच्या उरल्या सुरल्या गोळ्या काढल्या. योग्य ते औषधोपचार सुरु केले. कसंबसं उदेला त्यांनी मृत्यूच्या दारातून परत आणलं आणि अतिदक्षता विभागात हलवलं.
आता उदेच्या आयुष्यात त्याच्या तीर्थरुपांच्या एका अशा आदेशाचं वादळ येणार होतं, ज्यामुळे त्याला अत्याचार या शब्दाचा अर्थ नव्याने कळणार होता. प्रसंगी कर्दनकाळ वाटणाऱ्या सद्दामने आपल्या पोटच्या मुलाला ज्या पद्धतीने या कृत्याची शिक्षा दिली होती, ती अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरणार होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users