फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग ९

Submitted by Theurbannomad on 26 January, 2021 - 09:20

सद्दामच्या भेटीनंतर याह्याचं आयुष्य बदलून गेलं. उदे जवळ जवळ प्रत्येक दिवशी आपल्या धुंदीत असे. पार्ट्या, नशा आणि ऐषोआराम याची चटक लागलेला हा प्राणी हळू हळू सद्दामलाही डोईजड व्हायला लागलेला होता. आंतरराष्ट्रीय पाहुण्यांसमोर आपली आणि देशाची नाचक्की व्हायला नको, यासाठी सद्दाम त्याच्याऐवजी याह्यालाच घेऊन पाहुण्यांसमोर जात असे. सगळ्या महत्वाच्या परिषदांमध्ये याह्याच्या तोंडून सद्दामच्या लोकांनी पढवलेल्या गोष्टी बाहेर पडत. अनेकदा सद्दामच्या कौटुंबिक सोहळ्यांमध्येही उदेऐवजी याह्याच सामील होत असे. याह्याला स्वतःचं असं अस्तित्वच उरलं नव्हतं...तर उदेसाठी याह्याचं असणं म्हणजे ' वरदान ' ठरलेलं होतं. तो चोवीस तास मौजमजा करायला आता मोकळा झाला होता.
हा काळ इराकच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातला अतिशय महत्वाचा काळ होता. सद्दामने या देशावर आपला एकछत्री अंमल बसवलेला असल्यामुळे हळू हळू जगाने इराकला ' सद्दामची खाजगी मालमत्ता ' म्हणून स्वीकारायला सुरुवात केली होती. सद्दामला आस होती आपल्या सत्तेचा खुंटा बळकट करण्याची...ज्यासाठी त्याला गरज होती आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्याच्या शब्दाला मान आहे, अशा एखाद्या तगड्या मित्राची आणि अत्याधुनिक शस्त्रांची. शेजारच्या इराणमध्ये एव्हाना ' इस्लामिक क्रांती ' होऊन तिथे शियापंथीय अयातुल्ला खोमेनींची सत्ता आलेली होती. पलीकडच्या इस्राएलने अरब देशांना सहा दिवसांच्या युद्धात चांगलाच तडाखा देऊन वर अण्वस्त्रांचा कार्यक्रमही जोमाने पुढे नेलेला होता. तेलसंपन्न अरब देशांची ' ओपेक ' जगाच्या तेल - अर्थकारणावर प्रचंड प्रभाव टाकत असली, तरी ओपेकच्या नाड्या सौदीच्या हातात होत्या. सद्दामला स्वतःचं अस्तित्व अधोरेखित करण्याची खुमखुमी असल्यामुळे अशा या वातावरणात त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर बऱ्याच आघाड्यांवर हालचाल करावी लागणार होती.
मागच्या काही वर्षांपासून इराकने आंतरराष्ट्रीय पातळीवर एक जवळचा मित्र बनवलेला होता...युरोपमधला ब्रिटनखालोखालचा महत्वाचा देश फ्रांस. हा देश अमेरिका आणि ब्रिटन या दोन देशांच्या कच्छपी लागलेला नव्हता....सुवेझ कालव्याच्या महाभारतानंतर फ्रांस खरं तर अमेरिका आणि ब्रिटनच्या विरोधातच जायला लागलेला होता. या देशाच्या हक्काच्या तेलसाठ्यांवर गदा आली इराणच्या इस्लामिक क्रांतीनंतर. अखेर इराणच्या जागी तेलसंपन्न असा दुसरा मित्र शोधताना त्यांच्या समोर आला सद्दाम हुसेनचा इराक.
इराकच्या अण्वस्त्र प्रकल्पाला इस्राएलच्या धाडसी मोहिमेमुळे - ऑपरेशन ऑपेरामुळे - आपटी खावी लागली होती. तशात सद्दामच्या जुन्या ' खास मित्राने ' - अयातोल्ला रुहल्ला खोमेनी याने इराणची सत्ता बळकावल्यावर या दोन देशांमध्ये शत-अल-अरब नदीवरून ठिणग्या पडायला सुरुवात झालेली होती. पुढे इराकने इराणशी उभा दावा मांडून या देशावर आक्रमण केलं. इराकच्या बाजूला जवळ जवळ सगळं अरब जग होतं...जुना मित्र फ्रांस होता, इराणच्या इस्लामी क्रांतीमुळे डूख धरून बसलेली अमेरिका होती आणि बऱ्याचशा युरोपीय देशांचंही पाठबळ होतं.....इराकने सुरुवातीला इराणच्या खुझेस्तान भागावर पकड मजबूत करून इराणच्या तेलविहिरींना आपल्या ताब्यात आणलंही होतं....पण इराणच्या सैन्यदलाने अखेर बाजी मारली. इराकच्या तुलनेत इराणकडे सैन्यदलाची भली मोठी संख्या होतीच, पण सोव्हिएत रशियानेही पुढे त्यांना पडद्याआडून मदत केली होती. या युद्धात इराकचा झालेला पराभव सद्दामसाठी अतिशय मोठा धक्का ठरला.
सद्दाम या काळात अतिशय संशयी आणि संतापी झालेला होता. त्याच्या मनात सतत आपल्याविरुद्ध कोणीतरी कटकारस्थान करत असल्याची भावना बळावत चाललेली होती. काही खास आतल्या वर्तुळातले लोक सोडले, तर त्याचा कोणावरही विश्वास उरला नव्हता. याच कळत त्याच्या संपर्कात एक अशी व्यक्ती अली, जिच्यामुळे त्याच्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड मोठं वादळ निर्माण झालं.....
साल १९८३. इराक - इराण युद्धाचा आरंभ होऊन दोन-अडीच वर्षं झाली होती. इराणवर इराकचा सैन्य भारी पडत होतं. सद्दामचा वारू चौखूर उधळलेला होता....अशा या कळत त्याच्या आयुष्यात आली समीरा शाहबंदर. ही लावण्यवती इराकच्या नागरी विमानकंपनीत - इराकी एयरवेजमध्ये हवाई सुंदरी होती. तिचा नवरा त्याचा कंपनीत पायलट म्हणून कामाला होता. एके दिवशी एका समारंभात सद्दामच्या जवळच्या सहकाऱ्याने - त्याचा खाजगी अंगरक्षक असलेल्या कमाल हाना याने - समीराची ओळख सद्दामशी करून दिली.
" सर्वेसर्वा सद्दाम, मला आपल्याशी एका महत्वाच्या व्यक्तीची ओळख करून द्यायची आहे " कमाल अदबीने सद्दामजवळ येऊन बोलला. सद्दामचा खास अंगरक्षक असलेला आणि सद्दाम खाणार असलेल्या अन्नाची चव घेऊन त्या अन्नाच्या सुरक्षिततेची खात्री पटवणारा कमाल सद्दामच्या अतिशय खास विश्वासू व्यक्तींपैकी एक होता. वंशाने असिरियन आणि धर्माने ख्रिस्ती असूनही हा सद्दामच्या आतल्या गोटातला होता.
" कमाल...ये. थोड्या वेळाने जेवण येईल, तुला माहित आहे तुझं काम काय ते..." सद्दाम हसत हसत बोलला.
" सर्वेसर्वा सद्दाम, मला तुमची पाच मिनिटं हवी आहेत..."
" काय झालं ? सगळं ठीक ? "
" होय...मला आपली ओळख इराकी एयरवेजच्या एका हवाई सुंदरीशी करून द्यायची आहे...ही समीरा. हिच्याबद्दल इराकी एयरवेजमध्ये खूप चांगलं बोललं जातं....आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं काम करणाऱ्या काही निवडक कर्मचाऱ्यांमधली ही एक..."
कमालने समीराला जवळ बोलावलं. तिने इराकच्या सर्वेसर्वांना भेटायला मिळणार म्हणून त्या दिवशी चांगलाच नट्टापट्टा केला होता. सुडौल बांधेसूद शरीर, पाणीदार डोळे, लांबसडक सोनेरी केस आणि गोरापान वर्ण असलेली समीरा चटकन कोणाच्याही डोळ्यात भरेल अशीच होती. सद्दामने तिच्याकडे बघितलं आणि त्याला पहिल्या नजरेत ती आवडून गेली. ती या भेटीच्या वेळी चाळीशीच्या आसपास होती, पण तिने स्वतःला इतकं नीटनेटकं ठेवलं होतं की ती आपल्या खऱ्या वयापेक्षा दहा-बारा वर्षांनी तरुण वाटायची...
" कमाल, ही गोष्ट आपल्या दोघांच्या बाहेरच्या तिसऱ्या कोणालाही समजणार नाही याची काळजी घे...."
" ठीक आहे...जशी तुमची आज्ञा..." कमाल हसत हसत बोलला.
त्या क्षणापासून सद्दामच्या आयुष्यात समीरा आली ती आलीच. हळू हळू दोघांमध्ये चांगलीच जवळीक वाढली. सुरुवातीला सद्दामचा समीराला ' अंगवस्त्र ' म्हणून बाळगायचा इरादा असला, तरी पुढे पुढे त्याला तिच्यात ' बायको ' दिसायला लागली. एक तर समीरा अतिशय उच्चभ्रू कुटुंबातली....तिच्या वागण्याबोलण्यात खानदानी अदब होतीच. सद्दामच्या पहिल्या बायकोच्या तुलनेत तिने सुंदर होतीच....शेवटी चार-पाच वर्षांच्या कालावधीनंतर सद्दामने तिच्याशी गुपचूप दुसरं लग्न केलं. त्यासाठी त्याने तिला आपल्या नवऱ्याशी फारकतही घ्यायला लावली आणि तिनेही आनंदाने त्याला तलाक दिला.
सद्दामच्या घरात या सगळ्या प्रकाराचा उलगडा झाल्यावर मोठठं वादळ आलं. त्याच्या बायकोने - साजिदा तलफाने - चांगलीच आदळाआपट केली. आपल्या नवऱ्याने आपल्याला अंधारात ठेवून हा जो काही प्रकार केला होता, त्याचा तिला भयंकर राग आलेला होता. सद्दामच्या महालात कधी नव्हे तो उंच आवाजात वादविवाद झाले. सद्दामने आपल्या देशाच्या जनतेसमोर आपल्या दुसऱ्या बायकोला आणण्याचा निर्णय घेतल्यावर मात्र उदे, कुसे, तलफा आणि काही जवळच्या नातेवाईकांनाही या सगळ्याला कडाडून विरोध केला. उदे कसाही असला तरी आईच्या जवळचा होता. त्याचा आपल्या आईवर निरतिशय प्रेम होतं. त्याच्या मनात या सगळ्या प्रकाराने बापाविषयी प्रचंड अढी निर्माण झाली.
आपल्या महालात उदे सोफ्यावर रेलून बसला होता. समोर याह्या त्याच्याकडे एकटक बघत होता. त्याला याआधी कधीही उदे इतका अगतिक वाटला नव्हता. समोरच्या टेबलावरच्या कोकेनच्या पावडरमध्ये नाकपुड्या खुपसत त्याने एक दीर्घ श्वास घेतला. पावडर त्याच्या नाकपुडीतून आत गेली आणि त्याच्या मेंदूला ' किक ' लागली. काही सेकंद ती किक अनुभवत तो डोळे मिटून तसाच पडून राहिला आणि अचानक त्याने पुढे होतं याह्याकडे नजर टाकली. तांबारलेले डोळे याह्याकडे रोखत त्याने मनातली मळमळ बाहेर काढायला सुरुवात केली.
" याह्या, मित्रा....माझा बाप...माझा सख्खा बाप....इराकचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेन....सर्वशक्तिशाली सद्दाम हुसेन...असा का वागला असेल? माझ्या आईला सोडून दुसऱ्या बाईशी लग्न का केलं असेल त्याने? आम्हाला त्याने फसवलं....मित्रा, माझ्या बापाने मला फसवलं...."
" युवराज उदे, यावर बोलून काहीही उपयोग नाही...जे झालं ते झालं....आता वस्तुस्थिती स्वीकारा..."
" नाही...कधीच नाही...आणि हे कोणामुळे झालं हे मला माहित आहे...त्याला मी सोडणार नाहीच....तो हरामखोर कमाल....तोच अस्तनीतला साप आहे....त्यानेच माझ्या बापाला फितवलेलं आहे...मला माहित आहे....माझ्या समोर तो आला तर त्याचा जीव घेईन मी..."
" युवराज, तो कसाही असला तरी सर्वेसर्वा सद्दाम हुसेन यांचा खाजगी अंगरक्षक आहे. त्यांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. आततायीपणा कराल तर..."
" मी इराकचा भावी सर्वेसर्वा आहे...विसरू नकोस....मला कोण अडवणार? तो कमाल कोणीही असला तरी त्याची लायकी माझ्या बुटांइतकीही नाही...." पायातल्या बुटांकडे बोट दाखवत उदे किंचाळला " ज्या दिवशी तो समोर येईल, त्या दिवशी त्याला समजेल हा उदे हुसेन काय चीज आहे ते...."
कोकेनची पुढची मात्रा जास्त होऊन उदे टेबलावरच ग्लानी येऊन पडला. तोंडातली सिगार खालच्या कार्पेटवर पडल्यावर याह्याने ती उचलून विझवली आणि उदेच्या अंगरक्षकांना बोलावलं. त्यांनी नेहेमीच्या सवयीप्रमाणे उदेला उचलून त्याच्या शयनकक्षात नेलं. तिथे भल्या मोठ्या गादीवर त्याला ठेवून ते अंगरक्षक तिथून निघून गेले. उदेच्या ' सेवेसाठी ' सतत हजर असलेल्या तरुणींनी उदेची अवस्था बघितली. काही तासांची निश्चिती झाल्याची खात्री पटल्यावर त्याही आपापल्या कक्षात निघून गेल्या.
उदेच्या महालातून आपल्या निवासस्थानी जात असलेल्या याह्याच्या डोळ्यांसमोर उदेची अवस्था सतत पिंगा घालत होती. बाकी वर्तणूक जनावराची असली, तरी उदेच्या मनात आईबद्दल असलेली कणव त्याला कोड्यात टाकत होती. उदेसारख्या माथेफिरू माणसाच्या मनातला एकमेव हळवा कोपरा दुखावला गेल्यामुळे आता यातून पुढे काय होणार आहे, याची त्याला काळजी लागून राहिलेली होती. इराण युद्धानंतर सद्दामच्या कुटुंबात हा नवा गृहकलह सुरु झाल्यामुळे इराक आता कोणत्या दिशेला भरकटणार हेही त्याला समजत नव्हतं.
अर्थात या सगळ्याची उत्तरं त्याला लवकरच मिळणार होती. निमित्त असणार होतं एका मेजवानीचं, जिथे इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांसमोर सद्दामच्या इज्जतीची लक्तरं उदेकडूनच वेशीवर टांगली जाणार होती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users