फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग ८

Submitted by Theurbannomad on 25 January, 2021 - 08:54

भल्या पहाटे मुनेरच्या आवाजाने याह्याला जाग आली.
" याह्या, इराक देशाचे सर्वेसर्वा , सर्वशक्तिमान सद्दाम हुसेन यांनी आज ठीक साडेदहा वाजता तुला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलेलं आहे. हे निमंत्रण खार तर आज्ञा म्हणून तू स्वीकारलं पाहिजेस...का ते मला वेगळ्याने सांगायला नको. सद्दाम वेळेचे पक्के आहेत...तेव्हा आपण पंधरा मिनिटं आधीच त्यांच्या ऑफिसबाहेरच्या बैठकीच्या जागेत हजर राहिलो पाहिजे. "
" ठीक आहे, पुढच्या अर्ध्या तासात मी तयार असेन. काही खास कपडे...."
" होय. याह्या याह्या न वाटता उदे कसा वाटेल, याचा विचार कर.....उदे जेव्हा वडिलांना भेटायला जातो, तेव्हा वडिलांच्या आवडीचेच कपडे घालतो....इटालियन उंची सूट....गडद रंगाचा . वडिलांना प्रत्येक वेळी त्याला हे दाखवून द्यायचं असतं की तो इराकचा पुढचा सर्वेसर्वा आहे. मला वाटतं इतकं पुरेसं आहे तुझ्यासाठी..."
अर्ध्या तासात याह्या बैठकीच्या खोलीत मुनेरसमोर आला, तेव्हा मुनेरने काही क्षण त्याच्याकडे निरखून बघितलं....केसांच्या वळणापासून ते पायातल्या बुटांपर्यंत याह्या उदेची प्रतिकृती वाटत होता.त्याची चालण्याची ढबही उदेसारखी झालेली होती. उदेचा माज मात्र उसना आणलेला जाणवत होता.
मुनेरने बाहेर उभ्या असलेल्या खास ' बुलेट - प्रूफ ' मर्सेडिज गाडीकडे बोट दाखवलं. दोघांनी गाडीत आपापल्या जागा घेतल्या. पंधरा-वीस मिनिटांचा तो प्रवास भयाण शांततेत गेला. मुनेरच्या छातीत धडधड होत होती, पण याह्या मात्र शांत होता. दोघांनी ठरलेल्या वेळेच्या दहा मिनिटं आधीच सद्दामच्या ' मजलिस ' मध्ये प्रवेश केला. तिथल्या एका कर्मचाऱ्याने त्यांना बसायची खूण केली. सद्दामच्या ऑफिसमध्ये वर्दी दिली.
सद्दामने फक्त याह्याला आत बोलावलं.
याह्याने सद्दामच्या ऑफिसमध्ये पाय ठेवल्यावर त्याचे डोळेच दिपून गेले. इतकं उंची ऑफिस त्याने पहिल्यांदाच बघितलेलं होतं. अतिशय महाग फर्निचरने त्या ऑफिसचा एक एक कोपरा व्यापलेला होता. भिंतीवर सद्दामच्या बाथ पक्षाचं चिन्ह , इराकचा भला मोठा झेंडा, सद्दाम हुसेनचं भलं मोठं तैलचित्र असं काय काय लटकवलेलं होतं. दालनाच्या एका बाजूला एक मोठं टेबल, त्यामागे भली मोठी खुर्ची, बाजूला एक मोठी ' कॉन्फरन्स रूम ' अशा सगळ्या गोष्टी दिसत असल्यामुळे सद्दाम तिथेच बसत असावा हे याह्याने ताडलं. त्याने सद्दाम कुठे आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला....आणि अचानक त्याच्या पाठीवर एका दणकट हाताची थाप पडली.
" काय बघतोयस? " आवाजातली जरब जाणवून याह्याने मन खाली घातली. हा आवाज इराकच्या प्रत्येक नागरिकाचा परिचयाचा होता.
" इराकच्या सर्वेसर्वांना लतीफ याह्याचा सलाम...." याह्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले.
सद्दाम त्याच्या बाजूने चालत चालत आपल्या खुर्चीवर जाऊन बसला. त्याने याह्याला खुणेनेच समोरच्या खुर्चीत बसायला सांगितलं. याह्या खुर्चीपर्यंत गेला, पण बसला मात्र नाही.
" मुनेरने मला सांगितलंय तुझ्याबद्दल....तू उदेची सावली म्हणून वावरायचं आहेस हे तुला माहित असेलच.....यापुढे तुला अनेक समारंभात, परिषदांमध्ये अथवा भाषणांमध्ये उदे म्हणून जावं लागेल...तुझ्याकडून अपेक्षा हीच आहे, की इराकच्या भावी राष्ट्राध्यक्षाची तू सावली नव्हे, तर प्रतिकृती होऊन काम करावंस..."
" होय, मला माहित आहे.....मी तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. "
" ती वेळ येणार नाही...." सद्दामच्या या वाक्याचा अर्थ याह्याला व्यवस्थित माहित होता. " आता तू जाऊ शकतोस..."
बाहेर मुनेर हातातली माळ घेऊन अल्लाच्या नावाचा जप करत बसलेला होता. याह्या बाहेर आल्यावर त्याने सुटकेचा निश्वास टाकला.
" कशी झाली भेट ? "
" ठीक होती...मला कळलं नाही नक्की त्यांच्या मनात काय सुरु आहे ते..."
" ते कोणालाच कळत नाही...अगदी उदे किंवा कुसे यांनाही..."
" मला त्यांनी विशेष काही विचारलं नाही....कारण काय असावं? "
" कुणास ठाऊक...."
तितक्यात मजलिसमध्ये सद्दामच्या भावाने - ज्याला इराकमध्ये केमिकल अली म्हणून ओळखलं जाई - प्रवेश केला. हा बराचसा सद्दामसारखाच दिसत असे. जैविक आणि रासायनिक अस्त्रांच्या साहाय्याने कुर्दांच्या असंख्य गावांना त्याने नष्ट केलं होतं. याह्यासाठी हा केमिकल अली म्हणजे सैतानाच प्रतिरूप होता.....त्याच्या क्रौर्याच्या अनेक कहाण्या याह्याने लहानपणापासून ऐकलेल्या होत्या.
" अरे उदे...आज इथे कुठे? आणि मुनेरबरोबर? " अलीने हसत हसत विचारलं. समोर उभा असलेला आपला पुतण्या खरा उदे नाही, हे त्याच्या जराही ध्यानात आलं नाही.
" उदे, सांगितलं नाहीस तू येणार आहेस ते..." मागून सद्दामचा आवाज आला. " अली, ये. जेवणाची वेळ झालेली आहेच, आज तू, मी आणि उदे - आपण एकत्र जेवू...बऱ्याच गोष्टींवर आज बोलायचं आहे तुमच्याशी...आणि बऱ्याच दिवसांनी तुम्ही दोघे एकत्र आलेला आहात माझ्याकडे..."
मुनेरने चमकून याह्याकडे बघितलं. याह्या थंडपणे तसाच उभा होता.
" इराकचे सर्वेसर्वा सद्दाम हुसेनजी, आपणही ओळखलं नाही? " मुनेरने ओठांवर येत असलेलं हसू दाबत प्रश्न केला.
" कोणाला? " सद्दाम चपापला. अली आणि सद्दाम एकमेकांकडे बघायला लागले.
" आत्ता दहा-पंधरा मिनिटांपूर्वी तुमच्या ऑफिसमध्ये आलेला उदेचा तोतयाचे तुमच्यासमोर उभा आहे...लतीफ याह्या..." मुनेरच्या आवाजात विजयी थाट होता.
सद्दाम आणि अली यांनी पुन्हा एकदा एकमेकांकडे बघितलं. अलीला तर काय बोलावं तेच सुचलं नाही....इतक्या वर्षांपासून आपण आपल्या पुतण्याला बघत आलेलो आहोत तरीही या तोतयाने आपल्या डोळ्यांना बेमालूमपणे फसवलं यावर त्याचं विश्वासच बसत नव्हता.
सद्दाम आता हसत हसत याह्याच्या समोर येऊन उभा राहिला. याह्या या वेळी खाली न बघता ताठ उभा राहिला. त्याने सद्दामच्या नजरेला नजर भिडवली. सद्दामने त्याच्या दोन्ही खांद्यांवर हात ठेवले आणि मुनेरकडे बघितलं. मान हलवून त्याने मुनेरला शाबासकी दिली. अलीसुद्धा याह्याजवळ आला. त्याला आपादमस्तक न्याहाळत अलीने मुनेरची पाठ थोपटली.
" माझे दोन नाही, तर तीन मुलगे आहेत...एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जे हवं ते मिळेल, फक्त मला राग येणार नाही याची आजी घे..." सद्दामचा घोगरा जड आवाज मुनेरला पहिल्यांदाच गोड वाटला.
मागाहून आलेल्या कुसेला सद्दाम आणि अली अभिमानाने याह्याबद्दल सांगायला गेले. कुसेने शांतपणे सगळं ऐकून घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर विशेष आनंद न दिसल्यामुळे अखेर सद्दामने त्याला विचारलं, " काय झालं? तुला काहीच नाही वाटलं? कधी विचार केला होतास का की तुझ्या मोठ्या भावाचा हा असा तोतया इराकमधेच आपल्याला मिळेल? "
" डॅड , हा तोतया आहे हे मला माहित होतं....मी इथे पाऊल टाकल्या टाकल्या मला समजलेलं होतं की हा उदे नाही..."
" कसं? " सद्दामला आश्चर्य वाटलं. आपल्या नजरेलाही न जाणवलेली अशी कोणती गोष्ट कुसेला दिसलेली आहे, हे त्याला समजत नव्हतं...पण वस्तुस्थिती वेगळी होती.
" मी आत्ताच उदेच्या महालातून आलेलो आहे....तो अजून काल रात्रीच्या नशेत आहे...आणि त्याच्या महालातून मी चार मुलींना त्यांच्या घरी पाठवून दिलं थोड्याच वेळापूर्वी...चारींना त्याने काल रस्त्यातून उचलून आणलं होतं....बगदाद महाविद्यालयातल्या विद्यार्थिनी आहेत त्या मुली.... त्यांनाही जबरदस्तीने नशा करायला लावली होती उदेने. त्या तिघींवर रात्री काय अत्याचार झाले असतील हे मी वेगळ्याने सांगायला नको.... " कुसेने थंडपणे उत्तर दिलं.
अचानक मजलिसमधलं वातावरणच बदलून गेलं. सद्दामच्या डोळ्यात एकवटलेला संताप सगळ्यांना स्पष्ट दिसत होता. आपल्या दिवट्याच्या कृत्यांमुळे त्याला अनेकदा मनस्ताप झालेला होता, त्यात अजून भर पडली. अली आणि सद्दाम सद्दामच्या ऑफिसमध्ये गेले. कुसेने जाता जाता याह्याच्या आणि मुनेरच्या खांद्यावर थाप मारली....
त्या दिवशी सद्दामच्या कार्यालयातून बाहेर पडताना मुनेर आणि याह्या ताठ मानेने बाहेर पडले. मुनेरच्या ओठांवर बऱ्याच दिवसांनी हसू आलेलं होतं आणि याह्याच्या मेंदूला उदेच्या लीला ऐकून मुंग्या आलेल्या होत्या. आपल्याला पुढे काय काय करावं लागणार आहे याचा विचार त्याला त्रास देत होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users