फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग ५

Submitted by Theurbannomad on 24 January, 2021 - 09:59

१४ जून १९६४. उदेच्या जन्माआधीचा चौथा दिवस. इराकच्या उत्तरेच्या कुर्दिस्तानच्या भागात अरबील शहराच्या एका वस्तीत एक सर्वसाधारण कुर्दिश कुटुंबात एक मुलगा जन्माला आला. कुर्दिस्तानचा भाग हा इराकचा अतिशय महत्वाचा भाग. इथल्या डोंगरांमधूनच तैग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांना पाणी मिळतं. शिवाय नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत हा भाग अतिशय सधन. इथल्या तेलविहिरी भरभरून तेल प्रसवणाऱ्या. इथली हवा बरीचशी युरोपच्या डोंगराळ प्रदेशासारखी. इथे प्राबल्य मुख्यतः कुर्दिश लोकांचं. हे कुर्दिश लोक पट्टीचे लढवय्ये म्हणून इराकमध्येच नाही, तर समस्त अरब जगतात प्रसिद्ध आहेत.

सद्दाम हुसेनच्या उदयापर्यंत हे कुर्दिश लोक इराकमध्ये गुण्यागोविंदाने राहात होते. सद्दाम सत्तेत आला आणि यांचं नशीब फिरलं. १९६१ साली मोहम्मद बर्झनजी याने कुर्दिस्तानाला इराकपासून स्वतंत्र करायचा केलेला प्रयत्न आणि पुढे कुर्दिश लोकांची स्वतंत्र देशाची मागणी इराकच्या सार्वभौमत्वाला नख लावणारी आहे, या भावनेपायी सद्दामने या कुर्दिश लोकांचा प्रचंड नरसंहार केला. या काळात कुर्दिश लोकांपैकी अनेकांनी इराकी सैन्यात सामील होऊन आपण अखंड इराक देशाचे समर्थक आणि सच्चे देशभक्त आहोत, हे दर्शविण्याचा प्रयत्न केला होता.अशाच कुर्दिश लोकांपैकी एक होता एव्हाना तरुण झालेला लतीफ याह्या.

हा लतीफ उदेबरोबर एकाच शाळेत एकाच वर्गात शिकायला होता. तेव्हापासून त्याला सगळे जण उदेच्या चेहऱ्याशी त्याच्या चेहेऱ्याचं असलेलं साधर्म्य बघून ' उदेचं प्रतिरूप ' म्हणून ओळखायचे. पुढे सैन्यदलात काम करत असतानाही त्याला असेच अनुभव येत होते. १९८० साली इराक आणि इराण यांच्यात सुरु झालेल्या प्रदीर्घ युद्धाच्या वेळी नुकतीच मिसरूड फुटलेला याह्या पुढे तीन-चार वर्षांतच सैन्यात सामील झाला, तेव्हा उदे हाही महाविद्यालयीन शिक्षणानंतर सैन्यात रुजू झालेला होता. दोघांनी युद्धात एकत्र कामही केलं. उदेला याह्या आपला ' तोतया ' व्हायला अतिशय सुयोग्य वाटला. शेवटी इराण-इराक युद्ध जसं निवळायला लागलं, तसं वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी याह्याला उदेच्या शाही महालातून बोलावणं आलं.

याह्याच्या कुटुंबाला सद्दामच्या दडपशाहीचा आणि वांशिक नरसंहाराची झळ लागली होती. शिवाय याह्या ज्या वस्तीत राहात होता, तिथल्या लोकांची उदे आणि सद्दाम या दोघांबद्दल फारशी चांगली मतं नव्हती. उदे काय चीज आहे हे तर अख्ख्या इराकला एव्हाना कळून चुकलं होतं. कुर्दिश वस्त्यांमधल्या अनेक सुस्वरूप मुली उदेच्या शयनकक्षात जबरदस्तीने ढकलल्या गेलेल्या होत्या. या सगळ्यामुळे उदेच्या महालातून आलेलं बोलावणं याह्यासाठी धर्मसंकट झालेलं होतं. इकडे आड आणि तिकडे विहीर अशा अवस्थेत अखेर नाईलाजाने तो उदेच्या दालनात त्याच्यासमोर हजर झाला.

ही भेट ठरली होती उदेच्या आतल्या गोटातल्या लोकांच्या समक्ष. याह्या त्या सगळ्यांसमोर उभा राहिला तेव्हा त्याला पुढे काय वाढून ठेवलं आहे, याची कल्पना आली. उदेने सवयीप्रमाणे त्याची सुरुवातीला तोंडदेखली विचारपूस केली.
“ याह्या, दोस्ता...कसा आहेस? "
याह्याने हसल्यासारखं करून उदेच्या नजरेला नजर न मिळवता प्रथेप्रमाणे उत्तर दिलं, " युवराज उदे, मी छान आहे...इन्शाल्ला....आपण कसे आहात? आणि आज कोणत्या कामासाठी माझी आठवण आली आपल्याला? "
" दोस्ता, इतकी कसली घाई? ये बस..." उदेने याह्याला समोरच्या खुर्चीवर बसायची खूण केली.
याह्या उदेच्या आज्ञेप्रमाणे त्या खुर्चीवर बसला. उदेने खूण करताच दोन उफाड्याच्या तरुणी हातात उंची मद्याच्या बाटल्या, खाण्यापिण्याचं जिन्नस वगैरे घेऊन आल्या. उदेने त्यांना नीट आपादमस्तक न्याहाळलं...त्यांच्या हातातून मद्याचा ग्लास घेतला आणि याह्याला त्याच्यासाठी भरलेला ग्लास उचलायला सांगितला. याह्याने अवघडल्यासारखं वाटून कसंबसं उदेला थांबवलं.
" काय झालं दोस्ता....हा उदेचा दरबार आहे. इथे संकोच कसला करतोस? "
हे बोलल्यानंतर उदे ज्या पद्धतीने हसला, ते त्याच्या आजूबाजूच्या त्याच्या खुशमस्कऱ्यांना गमतीशीर वाटलं असलं आणि त्यावर तेही हसले असले तरी याह्याला मात्र ते हास्य भेसूर वाटलं.
" युवराज...आपण सांगणार होता मला इथे आपण का बोलावलं ते..." त्याने पुन्हा एकदा मुद्द्याला हात घातला.
उदेने आजूबाजूच्या आपल्या चमच्यांकडे बघितलं. ते सगळे पुन्हा हसले. उदे एकदम हसायचं थांबला आणि त्याने ग्लास समोरच्या टेबलावर ठेवला आणि तो खुर्चीत रेलून बसला.
" मिस्टर उदे...कसे आहात? "
याह्या गोंधळला. त्याने उदेकडे निरखून बघितलं. आज बहुदा कोकेनची मात्रा जास्त झाली की काय, अशी शंका त्याच्या मनाला चाटून गेली.
" नाही कळलं? " उदे पुन्हा एकदा भेसूर हसला.
" नाही..." याह्या उद्गारला.
" तू माझा ' तोतया ' होण्यासाठी अगदी सुयोग्य व्यक्ती आहेस.....आणि तू आजपासून माझा तोतया व्हायच्या कामगिरीवर रुजू होणार आहेस...." उदे पुढे झुकत याह्याकडे बघून हसत हसत बोलला. याह्याला धक्का बसलेला आहे हे कळल्यावर तो मागे रेलला आणि त्याने सिगार तोंडात ठेवली.
" म्हणजे? मला नाही समजलं..." याह्या जरी हे बोलला असला, तरी त्याला सगळं काही व्यवस्थित समजलेलं होतं. त्याला काळजी होती पुढे आपल्यापुढे काय ताट वाढून ठेवलंय याची...उदेची 'ख्याती' त्याला पूर्णपणे माहित होती.
उदेने आजूबाजूच्या आपल्या ' चमच्यांकडे ' नजर फिरवली. सगळे जण एकदम मोठमोठ्याने हसायला लागले.
" याह्या, दोस्ता, तू आजपासून उदे हुसेन....युवराज उदे हुसेन होणार आहेस. माझा तोतया. तू दिसायला माझ्यासारखा आहेस अगदी...आठवतं का, आपले यार दोस्त कसे तुला उदे हुसेनचा जुळा भाऊ म्हणून चिडवायचे? मग आता तूच सांग....तुझ्याशिवाय दुसरा कोण माझा तोतया होऊ शकेल? "
" पण...युवराज....मी....मला...." याह्या चाचरत चाचरत बोलायचा प्रयत्न करत होता. " मला विचार करायला....थोडा वेळ हवाय...म्हणजे...मी या जबाबदारीसाठी तयार आहे की नाही...मला माहित नाही...."
" याह्या, तू काळजी नको करूस....ते माझ्यावर सोड. तुला काही दिवसात माझे लोक कसे बदलतात बघ....तू स्वतः बघशील तुझ्यातला बदल...." उदेने दात विचकत हसून दाखवलं.
" युवराज....माफ करा...मला नाही वाटत इतकी मोठी जबाबदारी मी घेऊ शकेन....मला...मला खात्री नाही या गोष्टीची..." याह्याने पुन्हा एकदा सौम्य शब्दात आपला नकार सांगितला.
उदेच्या चेहेऱ्यावरचं हसू हळू हळू मावळत गेलं. त्याने सिगारचे खोल झुरके घेत याह्याकडे एकटक बघायला सुरुवात केली. त्याला नकार ऐकणं कोणी शिकवलेलं नव्हतं....त्यामुळे त्याच्या डोळ्यात आता हळू हळू एक प्रकारचा खुनशीपणा प्रकट व्हायला लागला. अचानक त्याने सिगार समोरच्याच ट्रेमध्ये विझवून टाकली. खुर्चीवर पुन्हा रेलत त्याने याह्याकडे बघितलं. याह्याने त्याच्या नजरेला नजर भिडवायचं धाडस केलं नाही.
" ठीक आहे दोस्ता....जा. तुला मी अभय दिलं...." त्याने याह्याला आपला निर्णय सांगितला.
याह्याचा आपल्या कानांवर विश्वास बसला नाही. त्याने चमकून वर बघितलं. उदे त्याच्याकडे बघून फिदीफिदी हसत होता.
त्या दिवशी उदेच्या त्या आलिशान महालातून बाहेर पडताना याह्याच्या छातीत धडधड होत होती. आजवर उदेला ज्या ज्या व्यक्तीने नकार दिला त्या त्या व्यक्तीला उदेने एक तर संपवलं तरी होतं किंवा त्या व्यक्तीचं जगणं मरणाहूनही वाईट करून ठेवलेलं होतं. आपल्याला उदेने इतक्या सहजासहजी कसं सोडून दिलं हे त्याला समजत नव्हतं. तो मनातल्या मनात स्वतःला भाग्यशाली समजत होता. त्याला हे माहित नव्हतं, की लतीफ याह्या हा 'दुसरा' उदे हुसेन होण्यासाठी खास निवडला गेला असल्यामुळे त्याच्या भाग्याची रेषा त्याच्या हातावर उदे हुसेनने नव्याने कोरली होती....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users