फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग ३

Submitted by Theurbannomad on 24 January, 2021 - 09:28

उदे हुसेन जन्माला आला ती तारीख आणि साल याबद्दल इराकमध्येच अनेक मतमतांतरं आहेत. काहींच्या मते त्याच्या जन्माचा दिवस ९ मार्च, तर काहींच्या मते १८ जून. काहींच्या मते हा जन्माला आला १९६४ साली तर काहींच्या मते १९६५ साली. याचा जन्म तिक्रितचा. सद्दाम हुसेन आणि त्याची पहिली बायको साजिदा तलफा यांच्या पोटी निपजलेल्या हा सद्दामचा पहिला ' मुलगा '.

याच्या जन्माच्या वेळी सद्दाम हुसेन आपल्या राजकीय जीवनाच्या महत्वाच्या टप्प्यावर होता. १९६० च्या दशकाच्या पूर्वार्धात ' रेव्होल्यूशनरी कमांड कौन्सेल ' या नावाने प्रसिद्ध असलेल्या बाथिस्ट पार्टीच्या एका शाखेचा सद्दाम प्रमुख झालेला होता. ही बाथिस्ट पार्टी तेव्हा अहमद हसन अल बक्र यांच्या हातात होती. सद्दाम याच अहमद हसनच्या तालमीत तयार झालेला एक तरुण चळवळ्या क्रांतिकारक होता. आपल्या शौर्याच्या जोरावर तो पार्टीमध्ये अहमद हसन यांच्या खालोखालच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नेतेपदी विराजमान झाला होता.

१९६३ च्या नोव्हेंबर महिन्यात इराकच्या कम्युनिस्ट-धार्जिण्या अब्दुल सलाम आरिफ सरकारच्या विरोधात झालेल्या बंडाच्या वेळी सद्दाम इराकबाहेर होता. परागंदा अवस्थेत इजिप्तमध्ये राहणाऱ्या सद्दामला या बंडामुळे इराकमध्ये परत येण्याची प्रेरणा मिळाली. त्याने इराकमधूनच पुढे अब्दुल आरिफ यांना मारण्याचा कट रचला. याची कुणकुण लागताच आरिफ यांनी सद्दाम यांना त्यांच्या अनेक सहकाऱ्यांसह १९६४ सालच्या ऑक्टोबरमध्ये तुरुंगात डांबलं. या वेळी तिक्रित या सद्दामच्या जन्मगावी असलेली सद्दामची पत्नी गर्भार होती.

अशा हा धकाधकीच्या काळात जन्माला आल्यामुळे उदेला त्याच्या आईने आणि इतर नातेवाईकांनी अतिशय प्राणपणाने जपलं. मृत्यूचं सावट सतत आजूबाजूला घोंघावत असताना आणि सद्दामच्या भविष्याबद्दल काही निश्चितता नसताना इराकमध्येच राहणं म्हणजे मोठी जोखीम होती. तेव्हा सद्दामच्या घरात नक्की काय घडामोडी झाल्या, हे बंद दाराआडचं गुपित कधीच बाहेर आलं नाही, पण हे कुटुंब तिक्रितहून कुठेही गेलं नाही हे मात्र नक्की. पुढे दीडच वर्षात सद्दामने तुरुंगातून शिताफीने पलायन केलं आणि तो शेजारच्या सिरीयात गेला. तिथून वर्षभरातच अहमद हसन यांच्याबरोबर त्याने आपल्या माणसांची जमवाजमव केली आणि १९६८ साली अब्दुल आरिफ यांचं सरकार त्याने अखेर पाडलं. या अब्दुल आरीफांना बंदुकीच्या धाकावर त्याने विमानतळावर आणून इराकमधून कायमचं हाकलून दिलं.

अहमद हसन यांनी इराकची सत्ता हाती घेताच सद्दाम इराकचे उपराष्ट्रप्रमुख झाले. हळू हळू त्यांचं प्रस्थ इतकं वाढलं, की अहमद हसन यांच्या हयातीतच इराकच्या सत्तेची धुरा सद्दाम यांच्या हाती एकवटली. अहमद हसन नावापुरतेच राष्ट्रप्रमुख राहिले आणि सगळे निर्णय सद्दाम यांच्या कार्यालयातून आकाराला येऊ लागले. सद्दाम यांनी आपल्या कुटुंबाला बगदादमध्ये आलिशान महालात आणलं. त्यांनी आपल्या चुलतभावाला - अली हसन अल माजिद याला आपल्या हाताशी घेतलं. बाथिस्ट पार्टीमधले विरोधक आणि सत्तेला आव्हान देऊ शकणारे बडे नेते त्यांनी अतिशय शिताफीने बाजूला केले आणि अखेर १९७९ साली सद्दाम इराकचे सर्वेसर्वा झाले.

या सद्दाम हुसेन यांना साजिदा तलफाकडून उदेपाठोपाठ एक मुलगा आणि तीन मुली झाल्या. हा उदे आणि त्याच्याहून दोन वर्षांनी धाकटा कुसे आपल्या वडिलांबरोबर लहानपणापासूनच अनेक कृष्णकृत्यांमध्ये सहभागी झालेले होते. सद्दाम जेमतेम सहा-सात वर्षाच्या आपल्या मुलांना बरेचदा खास सहलींकरता घेऊन जात असे...आपल्या विरोधकांची आणि बंडखोरांची हत्या होत असतानाचं दृश्य बघण्याची ही ती खास सहल. सद्दामच्या खास माणसांकडून पकडल्या गेलेल्या विरोधकांचा आधी अतिशय क्रूर पद्धतीने छळ होत असे. त्यांचे हालहाल केले जात. अनेकदा हे दृश्य बघण्यासाठी सद्दामबरोबर उदे आणि कुसे जातीने हजर असत. शेवटी मोकळ्या मैदानात अथवा रेताड जमिनीत खड्डे खणून त्याच्या तोंडाशी या गुन्हेगारांना उभं केलं जाई आणि बंदुकीच्या गोळ्यांनी त्या बिचाऱ्यांचा जीव घेतला जाई. या असल्या बाळकडूमुळे दोघे भाऊ लहानपणापासूनच रक्तपाताला आणि अत्याचाराला सरावले होते.

सद्दामच्या स्वभावातला हा विकृतपणा पुढे दोघा मुलांमध्ये चांगलाच उतरला. धाकट्या कुसेने या विकृतपणाचा वापर फक्त राजकारणासाठी आणि शत्रूचा बिमोड करण्यासाठी केला असला, तरी थोरल्या उदेने मात्र विकृतपणाच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. हा मुलगा पुढे सद्दामला अवघड जागेचं दुखणं होऊन बसल्यावर सद्दामला आपला कार्टा आपल्याही हाताबाहेर गेल्याची जाणीव झाले, पण तोवर वेळ निघून गेलेली होती. या बेलगाम उदेच्या लीला आता समस्त इराकवासीयांना भोगाव्या लागणार होत्या.

जगभरातल्या अनेक हुकूमशाही अथवा लष्करशाही राजवटीत त्या त्या राजवटीच्या सर्वोच्च नेत्यांच्या जिवाला कायम धोका असतो. चोवीस तास त्यांना त्या भीतीच्या सावटाखाली जगावं लागतं. जितका नेता मोठा, तितकी त्याची भीतीही मोठी. शिवाय त्या त्या नेत्याच्या घरच्या लोकांनाही हा धोका असतोच....सद्दाम या सगळ्याला अपवाद असणं शक्यच नव्हतं. शिवाय अशा हुकूमशहांच्या घरातच त्यांचे वारससुद्धा जन्मलेले असतातच....थोरला उदे आणि त्यापाठोपाठचा कुसे हे सद्दामचे वारसदार. या सगळ्यांच्या स्वतःला सुरक्षित ठेवण्याच्या अनेक तऱ्हा होत्या. स्वतःच्या सिगरेटपासून कपड्यांपर्यंत सगळ्या गोष्टींची व्यवस्थित खातरजमा करणं, जेवणातला प्रत्येक पदार्थ एखाद्या नोकरांकडून चाखून घेतल्यावरच त्या पदार्थाला तोंड लावणं, सतत सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात राहणं, सभांमध्ये भाषणं देतानाही बुलेट - प्रूफ काचा लावलेल्या बंदिस्त जागेत उभं राहणं, गाडीपासून विमानापर्यंत प्रत्येक वाहन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अभेद्य करणं अशा अनेक गोष्टींचा समावेश या हुकूमशहांच्या सुरक्षा उपायांमध्ये असतोच....

पण या सगळ्यापेक्षा वेगळा आणि काहीसा विचित्र प्रकार होता ' तोतया ' उभा करण्याचा. पानिपतच्या पराभवानंतर पेशव्यांच्या दरबारात सदाशिवराव भाऊंचा तोतया जसा उभा राहिला होता, तशाच प्रकारे या हुकूमशहांचे तोतयाही त्यांच्या आदेशावर अनेक कामांसाठी उभे रहात असत. हे तोतया इतके हुबेहूब आपल्या मालकांसारखे दिसत, की खरा कोण आणि खोटा कोण हे भल्याभल्यांना ओळखता येत नसे. स्टालिनपासून किम-जोंग उन अशा अनेकांचे तोतये होते आणि आहेत अशा चर्चा अनेक वेळा अनेक वृत्तांकनानमधून आणि पुस्तकांमधून सतत कानावर पडत असतातच...फक्त त्यांच्या अस्तित्वाची पुष्टी होणं अशक्य असतं....असे तोतया एक तर आपल्या ' मालकांबरोबरच ' या इहलोकीची यात्रा संपवतात किंवा नशिबाने मालकांच्या पोलादी पकडीतून सुटण्यात यशस्वी झालेच तर कोणत्या ना कोणत्या अज्ञात स्थळी खोट्या नावाने नवं आयुष्य सुरु करतात.

या पुढच्या प्रकरणांमध्ये सद्दाम हुसेन याच्या थोरल्या चिरंजीवांच्या - उदे हुसेन याच्या तोतयाची कहाणी मांडायचा प्रयत्न केला आहे. या तोतयाबद्दल जगभरातल्या जाणकार लोकांमध्ये अनेक मतमतांतरं आहेत. काहींच्या मते हा तोतया मुळात प्रति - उदे म्हणून कधी इराकमध्ये वावरलाच नाही, तर काहींच्या मते त्याने त्याच्या खऱ्या कहाणीला अनेक कपोलकल्पित कहाण्या जोडून स्वतःला जगापुढे ' बळीचा बकरा ' म्हणून सादर केलं....त्याच्या स्वतःच्या कहाणीनुसार त्याने इराकमध्ये उदेबरोबर अनेक वर्षं त्याचा ' तोतया ' म्हणून वावरताना अतिशय वाईट अनुभव घेतले आहेत....आणि केवळ नशीब बलवत्तर म्हणून सद्दामच्या तावडीतून सुटून तो इराकबाहेर पळू शकलेला आहे.

लतीफ याह्या हे या तोतयाचं नाव. आज हा मायभूमी इराकपासून दूर आयर्लंडमध्ये राहतो आहे. पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला इराकमध्येच कुर्दिस्तानच्या प्रांतात पकडलं गेलं होतं आणि तिथे सुरुवातीला त्याला उदे हुसेन समजून कुर्दिश लोकांनी ताब्यातही घेतलं होतं...पण पुढे हा उदे नाही हे समजल्यावर त्याला ऑस्ट्रिया देशामध्ये राजनैतिक आश्रय दिला गेला. तिथून हा लंडनमध्ये पळून गेला एका हल्ल्यातून वाचल्यावर. पुढे जर्मनीमध्ये काही काळ घालवून शेवटी तो आयर्लंडमध्ये स्थायिक झाला.

ही कहाणी आहे याह्याची...या कहाणीमध्ये खरं काय आणि खोटं काय, हे याह्याशिवाय कोणालाही माहित असणं अशक्य आहे. प्रसिद्ध नाट्यगुरू स्तानिस्लावस्की यांच्या प्रसिद्ध ' If I was there ' या पद्धतीला अनुसरून ही कहाणी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. या कहाणीमध्ये येणारी काही पात्रं खरी आहेत, काही ऐकिवात तर काही काल्पनिक.....पण या सगळ्यातून समजणारी एक गोष्ट मात्र शाश्वत आहे...ती ही, की मूठभर लोकांच्या हाती सत्ता एकवटली की अनेक लोकांची आयुष्य उध्वस्त होतात...आणि सरतेशेवटी एक असा दिवस उगवतो, जेव्हा हे सर्वशक्तिमान वाटणारे हुकूमशहा एखाद्या सांदीकोपऱ्यात जीव मुठीत धरून दडून बसलेले आढळतात....उदे आणि कुसे अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात ठार झाले, तर सद्दाम स्वतः एका बिळात लपलेला सापडल्यावर लोकांनी त्याला अर्धमेला होईपर्यंत मारून शेवटी अमेरिकन फौजांच्या हाती सोपवला...पण हे सगळं घडेपर्यंत इराकमध्ये सुरु असलेल्या हुकूमशाहीची, आणि त्यातही उदेसारख्या माथेफिरू वेडगळ माणसाच्या मनमानीची कहाणी म्हणजे ' तोतया ' .... सद्दाम, उदे, कुसे, याह्या आणि त्यांच्या आजूबाजूच्या अनेकांची ही रक्तरंजित आणि अंगावर काटा आणणारी कहाणी म्हणजेच ' तोतया ' चा मुख्य विषय. लोकशाही देशात जन्माला आल्याबद्दल विधात्याचे आभार आपल्यासारख्या लोकांनी मानले पाहिजेत, हे महत्वाचं सत्य या कहाणीतून पुन्हा पुन्हा अधोरेखित होतं राहातं.....

“ Under a dictatorship, a nation ceases to exist. All that remains is a fiefdom, a planet of slaves regimented by aliens from outer space “ – Wole Soyinka

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्कंठावर्धक लेखमाला लिहीली आहे... सद्दाम हुसेन आणि इराकच्या रक्तरंजित राजकारणावर...
तिन्ही भाग लागोपाठ वाचले..!!

आपल्याकडील वृत्तपत्रात सद्दाम हुसेनच्या मुलाचे नाव "उदय" असे छापुन येत असे त्यावेळी आश्चर्य वाटायचे की इराकच्या हुकुमशहाच्या मुलाचे नाव भारतीय कसे? आता कळाले की ते "उदे" असे होते.

@पॉपकॉर्न
इराकी अरबी भाषेत तो उच्चार उदाय असा आहे. धाकट्याचं नाव होतं कुसाय. यात य २५% उच्चारायचा फक्त.