फिदायी - कहाणी एका तोतयाची - भाग २

Submitted by Theurbannomad on 24 January, 2021 - 09:25

साल १९९९.
फ्रान्समध्ये जन्माला आलेली आणि ऐन विशीत असलेली कमिले नावाची एक सुसंस्कृत फ्रेंच कलावंत आपल्या घरी आळसावलेली असताना तिला एक संदेश आला. संदेश होता फ्रान्समधून इराकमध्ये जात असलेल्या एका ' सदिच्छादूतांच्या शिष्टमंडळात ' सामील होण्याचा. अगदी शेवटच्या मिनिटाला आलेला. या शिष्टमंडळाचा उद्देश होता १९९२ साली इराक आणि इराण यांच्यात झालेल्या संघर्षानंतर जगाने इराकवर घातलेल्या व्यापारबंदीचा काय परिणाम झालेला आहे, याची माहिती मिळवण्याचा. या निमित्ताने इराकच्या कलासंस्कृतीवर झालेला परिणाम अभ्यासाची संधी समोरून चालून आल्यामुळे कमिले या शिष्टमंडळात सामील व्हायला तयार झाली. इराकमध्ये भटकंती करून तिथल्या कोणाशी थेट संवाद साधायचा आणि राजकीय, सांस्कृतिक आणि इतर माहिती गोळा करायची असा तिचा मनसुबा होता. फ्रान्समधून निघताना तिला आपण एका महत्वाच्या शिष्टमंडळाचा हिस्सा आहोत याचं चांगलंच अप्रूप वाटत होतं.

या बिचाऱ्या शिष्टमंडळाला आपण नक्की कोणत्या विषाची परीक्षा घेत आहोत, याची काहीच माहिती नव्हती. बगदादला आल्या आल्या या शिष्टमंडळाच्या गळ्याशी एक शक्तिशाली ' मायक्रोफोन ' लावण्यात आला. त्यांच्या तोंडून आलेला एक एक शब्द प्रतिध्वनीच्या रूपाने कुठे कुठे उमटेल हे त्यांचं त्यांनाच समजेनासं झालं. त्यानंतर आली सद्दाम हुसेन याचा उल्लेख ' आमचा मित्र सद्दाम हुसेन ' असाच करावा ही धमकीवजा सूचना. इराकी वाहिन्यांच्या काही पत्रकारांनी मुद्दाम या पाहुण्यांना ' व्यर्थ गेलेल्या आर्थिक निर्बंधांबद्दल ' खोदून खोदून प्रश्न विचारायला सुरुवात केली. सांस्कृतिक शिष्टमंडळासाठी हा चांगलाच सांस्कृतिक धक्का होता.

आता पाळी आली उदे हुसेनबरोबरच्या संवाद परिषदेची. रक्ताने माखलेली तलवार हाती घेऊन वीरश्रीयुक्त नजरेने बघत असलेल्या एका अरब योद्ध्याच्या तैलचित्रासमोर हा उदे स्थानापन्न झालेला होता. तीनच वर्षांपूर्वी एका जीवघेण्या हल्ल्यात कायमचा जायबंदी झालेला आणि जवळ जवळ लुळा पडलेल्या उदेचा सूत जळला होता, पण पीळ बाकी होता. कमिले दिसायला सुंदर होतीच. तिला या परिषदेच्या आधी एका इराकी स्त्रीने जबरदस्तीने बोटात हिऱ्याची अंगठी घालायला लावलेली होती. उद्देश हा, की उदेची वासनायुक्त नजर तिच्यावर चुकूनमाकून पडलीच, तर तिचं लग्न झालेलं आहे हे तरी तिला सांगता यावं. इराकच्या लोकांकडून अगदी सहज होत असलेल्या या लहानलहान कृतींनी शिष्टमंडळाला मात्र चांगलाच घाम फुटलेला होता.

उदे आपल्या जागी स्थानापन्न झाल्यावर त्याने शिष्टमंडळावर एक ' नजर ' फिरवली. आपल्या मागे असलेल्या तैलचित्रातल्या योद्ध्याप्रमाणे लाखो योद्धे इराकच्या भूमीवर असल्याची बढाई मारली. अमेरिकेच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहिली. शिष्टमंडळाला उद्देशून त्याने एक जोरदार भाषण ठोकलं. मुद्दे तेच - पाश्चात्यांनी कितीही प्रयत्न केले तरी इराकला काहीही कसं झालं नाही याचे तथाकथित पुरावे. ऐन विशीतल्या कमिलेसाठी हा चांगलाच हादरवणारा अनुभव होता. शिष्टमंडळाच्या बाकी सदस्यांच्या चेहेऱ्यावरही ' झक मारली आणि इथे आलो ' चे भाव होते.

कमिलेच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी. तिला आणि शिष्टमंडळातल्या इतर तीन सुंदर दिसणाऱ्या स्त्री-सदस्यांना थेट उदेकडून मेजवानीचं खास आमंत्रण आलं. मनाई करणं शक्य नव्हतंच. या चौघींना रात्री नऊच्या सुमारास अल रशीद हॉटेलमध्ये नेण्यात आलं. तिथे उदेच्या मदतनीसांनी त्यांना उंची कपडे घालायला लावले. एका आलिशान गाडीतून हा लवाजमा नंतर थेट उदेच्या शाही महालात आला. काळ्या रंगाच्या उंची ' मार्बल ' ने मढवलेल्या एका आलिशान दालनात उदेने या चौघींना मेजवानी दिली. हा महाल होता तैग्रिस नदीच्या काठावर. उदेबरोबर त्याची काकू , तिचा फ्रेंच नवरा आणि त्या दोघांची पौगंडावस्थेतली मुलगी या मेजवानीत सामील झाले होते.

कमिलेने आपल्या या भेटीचा तपशीलवार वृत्तांत पुढे फ्रान्सला आल्यावर काही दैनिकांना आणि वर्तमानपत्रांना दिला. तिच्याच शब्दात सांगायचं झालं, तर उदेबरोबरची ही भेट तिच्या आयुष्यातला एक भीतीदायक अनुभव होता.....
" आम्हाला त्या मेजवानीत खाण्यासाठी जगभरचे सगळे पदार्थ वाढले गेले होते....पण पिण्यासाठी पाणी मात्र दिलं गेलं नव्हतं. माझ्या बरोबरीच्या तिघींनी यथेच्छ मद्यपान केलं, पण मी मात्र तहानलेलीच राहणं पसंत केलं. पहाटे १ वाजता आम्हाला उदेने शेजारच्या त्याच्या खास दालनात नेलं. तिथे आम्हाला ' अराक ' नावाचं इराकचं खास मद्य आग्रहाने हातात दिलं गेलं. मी मुद्दाम मद्यपानाला नकार दिला. उदे आपल्या चुलतबहिणीच्या शरीराशी खेळत मला आग्रह करण्याचा प्रयत्न करत होता. त्या मुलीचा बाप डोळ्यासमोर चाललेल्या त्या सगळ्या प्रकारानंतरही घाबरून गप्प होता.
उदेने काही वेळाने अतिशय कमी कपड्यातला कामुक हावभाव करत नाचणाऱ्या नर्तिकांना पाचारण केलं. त्याच्या या सगळ्या प्रकाराला विरोध करणारं कोणी तिथे हजर नव्हतंच. त्याच्या तोंडून निघणारा एक एक शब्द उपस्थितांसाठी आदेशासारखा होता...अगदी या फ्रेंच पाहुण्यांसकट.....काही वेळाने कमिलेबरोबरच्या तिघींपैकी एक जण त्या दालनातून गायब झाली. "

कमिले या सगळ्या प्रसंगांची माहिती पत्रकारांना देताना शब्दशः थरथरली होती. उदेची काकू, काका आणि बाकी सगळे जण तिला उदेच्या आदेशाचं पालन करण्याची विनंती करत होते. आपला हा दिवटा पुतण्या डोकं फिरलं तर काहीही करू शकतो हे तिला पुरेपूर माहित होत. तशात मद्य, अमली पदार्थ आणि त्याच्या जोडीने येणारी नशा उदेच्या आधीच भडक असलेल्या मेंदूला केव्हा कशा पद्धतीने चेतावेल याचाही नेम नव्हता. शेवटी सूर्य उगवायची चाहूल लागल्यावर उदेने पाहुण्यांची निघायची विनंती मान्य केली. कमिले या अनुभवानंतर पॅरिसच्या आपल्या घरी परत येईपर्यंत आतून हादरलेल्या अवस्थेत होती.

सद्दाम हुसेनच्या या थोरल्या चिरंजिवांच्या अनेक सुरस कहाण्यांपैकी एक असलेली ही कहाणी त्याच्या व्यक्तिमत्वाची साक्ष द्यायला पुरेशी आहे. हे सगळं घडलं, तेव्हा हा उदे पंगू अवस्थेत होता हे विशेष. यावरून जेव्हा त्याचं शरीर धडधाकट होत, तेव्हा या सैतानाच्या लीला कशा असतील, याची कल्पना करता येऊ शकते. इराकच्या जनतेसाठी आणि खुद्द सद्दामच्या घरच्यांसाठीही अशा या सैल आणि भडक मनुष्याला सांभाळणं किती अवघड होत असेल याचा अंदाज या एका प्रसंगावरून बांधता येऊ शकतो.

सद्दाम तुरुंगात असताना जन्माला आलेल्या या सैतानाचे पाय पाळण्यात कोणाला दिसले होते कि नाही, हे कळायला मार्ग नसला, तरी पुढे त्याने जगभरात चांगलंच नाव कमावलं. हे नक्की. याच्या नंतर जन्माला आलेला कुसे हा आपल्या मोठ्या भावासारखा आग्यावेताळ निघाला नाही, हे सद्दामचं सुदैव, कारण थोरल्याच्या कृष्णकृत्यांमुळे वैतागून शेवटी धाकट्याच्या हातात इराकची धुरा देण्याचा निर्णय सद्दामला घ्यावा लागण्याइतकी प्रगती या उदेने करून दाखवली होती.....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयानक आहे हे. शिष्टमंडळ पाठवण्याआधी फ्रान्सला इराकमधील परिस्थितीची माहीती नव्हती असं कसं?

आता कशी आहे परिस्थिती
नवऱ्याला एक ऑफर अली आहे पेट्रोलियम कंपनी मधून
मला खूपच असुरक्षित वाटते हि कंट्री
नवरा मात्र ठाम आहे कि जॉब ऑफर झाला तर जाणार म्हणतोय

@ नाविन्या सध्या इराक हा देश पूर्णपणे अमेरिका आणि नाटो फौजांच्या हातात गेलेला आहे. भ्रष्टाचार, रक्तपात आणि ISIS सारख्या संघटनांनी पोखरला गेलेला हा देश म्हंटला तर सुरक्षित आहे, म्हंटला तर असुरक्षित. कुर्दिस्तान भागात विशेष रक्तपात नाही, बगदाद आणि दक्षिण - पश्चिम भागात अजूनही बॉम्बस्फोट वगैरे होत असतात.

@मामी इराकच्या बाकी कोणत्याही व्यक्तीकडून , अगदी सद्दाम कडूनही असेल प्रकार कधी झाले नव्हते, पण उदे सगळ्यांच्या वरताण होता. तो कोणाच्याही नियंत्रणात राहू शकत नसल्यामुळे हे असले प्रकार घडत होते. या काळात सद्दाम आणि उडे यांच्यातून विस्तवही जात नव्हता.