त्रिभंग - स्टार्रींग काजोल - तन्वी आझमी - मिथिला पालकर

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 January, 2021 - 16:46

त्रिभंग - स्टार्रींग काजोल - तन्वी आझमी - मिथिला पालकर
त्रिभंग - माझ्या आईने पाहिलेला काजोलचा शेवटचा(?) चित्रपट

कुठे बघाल - नेटफ्लिक्स

स्पॉईलर अ‍ॅलर्ट - चित्रपटाची स्टोरी नाही पण त्यातल्या शिव्या लेखात ऊघड केल्या आहेत!

नवीन वर्षाचे संकल्प केल्याप्रमाणे सध्या रोज रात्री पुर्णी फॅमिली मिळून एखादा चित्रपट बघतो. मुलगी सोबत असेल तर तिच्या आवडीचा चित्रपट बघितला जातो. ती जागी नसते तेव्हा तिने बघायला नको पण आपल्याला बघायचाय असा चित्रपट बघितला जातो. आज ती झोपली असल्याने बायको म्हणाली तांडव लाऊया. पण आई जागी होती. आणि तुम्हाला तर माहीत आहे सध्याच्या वेब सिरीजमध्ये शिव्यांचा किती सुकाळ असतो. तो देखील बरेचदा अनावशयक. त्यामुळे तांडवला नकोच म्हटले.

पण मग बघायचे काय? दर रोज दर रात्री आमचा अर्धा तास काय बघायचे या चर्चेतच जातो. म्हणून मग मीच पटकन त्रिभंग सुचवला. आज फेसबूकवर काही फेमिनिझम जपणार्‍या महिलांकडून याची चर्चा ऐकली होती. म्हटले काही नाही तर यावर मायबोलीवर धागाच काढता येईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे काजोल माझ्या आईची आणि एकूणच आमच्या घरात शाहरूख ईतकीच आवडीची हिरोईन आहे. तसेच ती आहे तर चित्रपटात फुकटच्या फाकट शिव्या नसणार याची खात्री होती. म्हणूनच लावला आणि फकलो !

म्हणजे सुरुवातीच्या एका दृश्यात तीने ड्रायव्हरच्या शेजारी बसून भोसडीके शिवी घातली ती फ्लो मध्ये आईला कळली नाही. पण नंतर कोमामध्ये गेलेल्या आपल्या आईला बघायला ती हॉस्पिटलला जाते तिथे बयेने "फ" ची बाराखडीच सुरू केली. फक, फकर, झाटू, चुतिये, आलटून पालटून दर दुसर्‍याही नाही तर दर वाक्यात शिवी गुंफत गेली आणि माझ्या आईला ईथे जेवताना दर दुसर्‍या नाही तर दर घासाला ठसके बसू लागले. ईथे आमची पोजिशन ऑकवर्ड. अरे देवा, मध्येच हे काजोलचे काय रुप दाखवले हिला. उगाच आईच्या मनातील अंजलीच्या आठवणी तुरट झाल्या असतील.

आईने चपात्या संपवल्या आणि भात खायला आत गेली. म्हटले झाले, आईला बघवल्या नाहीत काजोलच्या तोंडी शिव्या. पण पिक्चर तिला आवडला होता. जनरली बायकांच्या स्टोरया बायकांना आवडतात. त्यामुळे भात संपवून आली पुन्हा बघायला. एका अर्थी बरेच झाले, आमचा ऑकवर्डनेस आणि आलेले गिल्ट जरा कमी झाले.

काजोलचे मात्र चालूच होते. नवर्‍याला शिवी देते, आईला शिवी देते, येणार्‍या जाणार्‍यांना शिवी देते. जो डिजर्व्ह करतो त्यालाही देते, जो नाही करत त्यालाही देते. रागाने देते, प्रेमाने देते. आणि मग एका दृश्यात काजोल आपण ईतके फकफकाट का करतो याचे सुंदर विश्लेषण करते. ताजमहाल समोर उभे राहून लव्ह बोलण्यापेक्षा फक बोलणे कसे रोमांचकारी आहे आणि प्रत्यक्ष आयुष्यातही लव्ह पेक्षा फक कसे जास्त महत्व राखून आहे हे समोरच्या सहकलाकाराला पटवून देते. हे करताना देखील ती आपली फक बोलायची हौस वीस-बावीसवेळा त्या शब्दाचा उल्लेख करून भागवून घेते. गंमत म्हणजे ज्या सहकलाकाराला हे पटवते तो शिवीला अपशब्द आणि स्माईलला मुस्कुराईये बोलणारा तहजीबप्रेमी दाखवला आहे. त्याचे खरे नाव मला माहीत नाही, चित्रपटातलेही आठवत नाही, कारण अख्खा चित्रपट काजोल त्याचा उल्लेख झाटू असाच करते. गंमत म्हणजे क्लायमॅक्सला तो देखील काजोलसारखेच फक बोलत तिला सहभागी होतो आणि तिथेच या चित्रपटाचा शेवट होतो.

बाकी या शिव्यांच्या जोडीला जी तीन स्त्रियांची कहाणी दाखवलीय ती मला छान वाटली. म्हणजे फेसबूकवर जे उगाच काही बायकांनी यातल्या फेमिनिझमवर हल्लाबोल केलेला ती चर्चा चुकीची वाटली. पण हल्ली हे आढळतेच. प्रत्येकीची आपली एक बिनधास्त स्वतंत्र आयुष्य जगायची फेमिनिझमची व्याख्या असते आणि तीच सर्वांची असावी असा हट्ट आढळतो. त्यामुळे मी तरी चित्रपट बघताना यातल्या बायकांचे फेमिनिझम काय दाखवलेय, तेच योग्य की अयोग्य याचा विचार न करता त्यांना एक स्वतंत्र कॅरेक्टर म्हणूनच बघितले आणि चित्रपट आवडला. विशेष म्हणजे जिथे संपायला हवा असे मला वाटले तिथेच तो संपला.

काजोलच्या शिव्या थोड्या कमी चालल्या असत्या, तिला ड्रेसेस जरा आणखी चांगले दिलेले आवडले असते, ती लाऊड जरा कमी झाली असती तरी रुचली असती पण कदाचित तीच तिची स्ट्रेंथ असल्याने तिने त्यावरच बॅटींग केली असावी.. तन्वी आझमीला जरा जास्त बघायला आवडले असते, चित्रपट आणखी अभिनयसंपन्न झाला असता. मिथिला पालकरचा वावर नेहमीच सुखावतो, ती जेवढी दिसेल तेवढ्यातच मी सुख मानून घेतो. ईथेही तिने निराश नाही केले.

तीनही महिलांचे आपल्या मराठी मायबोलीशी कनेक्शन आहे हि चर्चा चित्रपट बघताना करणे कंपलसरी आहे, आम्हीही ती केली. चित्रपटात आलेले सारेच मराठीचे संवाद चांगले वाटले. काजोलच्या भावाच्या भुमिकेतही वैभव तत्ववादी या मराठी कलाकाराला घेतलेले. हिंदी चित्रपटात मराठी मालिकांतला ओळखीचा कलाकार दिसला की आमच्या आईला फार आनंद होतो. अश्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच शिव्यांकडे दुर्लक्ष करून माझ्या आईने चित्रपट पुर्ण बघितला. हा चित्रपट रेणुका शहाणेचा आहे हा शोध आम्हाला शेवटीच लागला. सर्व मराठी माणसांनी एकदा बघायला काही हरकत नाही म्हणून हा लेखनप्रपंच.

तेवढे ते त्रिभंगचा अर्थ कोणाला माहीत असेल तर सांगा. म्हणजे एका दृश्यात काजोल आपल्या आईला अभंग, मुलीला समभंग, आणि स्वत:ला सेक्सी त्रिभंग म्हणवते. पण त्यातून झाट काही कळले नाही Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पिक्चर पाहीन असं नाही, पण एकंदर चर्चा आवडली!

<<बहुतेक आई आलीये म्हणजे आईचा उल्लेख केला गेला आहे असं असावं ते >> अर्रर्रर्र, मी उगाच हुरळून गेलो!>>
आणि मी अस्मिताच्या पोस्टमधल्या 'आई'सब्रेक वर अडखळून पडले Lol

सीमंतिनी, ती फुलराणीच्या स्वगतासाठी धन्यवाद! भक्ती बर्वे यांच्या अभिनयातलं हे स्वगत पाहिलं आहे तसं बऱ्याच वेळा. पण वाचलं आत्ताच पहिल्यांदा. वाचायलाही ते इतकं भारी आहे हे त्यामुळे प्रथमच जाणवलं. माझ्या एका मैत्रिणीने माय फेअर लेडी बघितला होता आणि मी ती फुलराणी नाटक. (अमृता सुभाषचं, जिचा अभिनय मला खूप लाऊड वाटल्याने आवडला नाही) तेव्हा मजा आली होती ते संवाद एकमेकींना सांगताना. यू वैट एन्री ईगन्स.. हे एवढंच आता आठवतंय. Happy

अस्मिता, अनुचे पात्र मला प्रोतिमा बेदीवरून बेतलेले वाटले. तर मिथीला स्वतः रेणुका शहाणे आणि तन्वी आझमी अर्थातच शांता गोखले यांच्यावरून बेतलेले वाटले.
वावे, माय फेयर लेडीची लिंक होती. शोधावी लागेल. तो पण कधीही, कुठल्याही मूडमध्ये असताना बघावा असा गोड सिनेमा आहे.

फार नाही आवडला पण खटकलेल्या दोन गोष्टी म्हणजे, 
इतक्या संस्कारी घरात लग्न करून गेलेली मुलगी आत्याआज्जी आणि आजोबांना घरातून निघतांना वाकून नमस्कार करत नाही! सर्व मराठी घरात अजून हे संस्कार पाळले जातात. मोडलेल्या घरातून आली म्हणून तिला ते संस्कार लहानपणी मिळाले नाहीत असा म्हणलं तरी, आता तर ती अगदी डोक्यावरून पदर संस्कारी घरात जाऊन ते नियम पाळते आहे, मग हे कसं नाही? 
दुसरी म्हणजे, अशा इतक्या मोडलेल्या घरातून आणि दुभंगलेल्या मनस्थितीतून बाहेर येऊन, स्वाभिमान जागा ठेवून बॉलिवूड मध्ये मोठी ऐक्ट्रेस होणे सोप्पे नाही. ती  मोठी ऐक्ट्रेस आहे आणि निष्णात नर्तकी आहे असे दाखवले आणि प्रेक्षकांनी ते स्वीकारले असं नसतं ना? तिचा तो प्रवास प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष रित्या दाखवायला हवा होता! 

>>तिने ओडिसी न्रुत्य केले नाही याचे समाधान वाटले. कारण तिचे ते कपडे घालून चालणे सुद्धा खराटा घेऊन अंगण झाडणार आता असे वाटले.
Lol अस्मिता अगदी अगदी!

काजोल रिअल लाईफ मधे पण अशी फद्क फद्क च चालते. कित्येक विडीओ मधे ती पडलीये आणि बॉडीगार्ड्स सावरताय्त असं बघितलं (बॉडी शेमिंग नाही करत पण ) तिने कॅरेक्टरच्या बॉडी लँग्वेज साठी काडीची मेहेनत नाहि घेतलीये.

बहुतेक आई आलीये म्हणजे आईचा उल्लेख केला गेला आहे असं असावं ते
>>>>>
अर्थात तसेच होते ते...

पण यातही गंमत मला एका गोष्टीची वाटली की आजही आपल्या समाजात खटकण्याची जबाबदारी आणि पोरांना संस्कार लावायचा ठेका आई मंडळींच्या खांद्यावरच ठेवला जातो, व्हाई शूल्ड बाबा हॅव ऑल द फन ?
जोपर्यंत हे चित्र बदलत नाही तोपर्यंत त्रिभंग सारखे चित्रपट बनत राहणार...

Pages