मुक्त .... भाग ४

Submitted by abhishruti on 16 January, 2021 - 07:10

मुक्त. 4

पुढे मी परदेशी गेलो. माझ्या रिसर्च वर्क मधे बुडालो,, मेहनत फळाला आली. एकेक महत्वाकांक्षा पूर्ण होऊ लागल्या. लग्न, मुलंबाळं सगळं वेळेत झालं. आईही आनंदात होती. आणि अचानक एक दिवस ही बया ऑफिसमध्ये अवतरली. तिलाही कल्पना नसावी मी तिथे असल्याची! पण इतका आनंद झाला तिला कि त्याभरात तिने सर्वांना सांगितलं कि मी तिचा बेस्ट फ्रेंड आहे. मग तिला घेऊन हॉटेलमध्ये जावंच लागलं, तिला खाऊपिऊ घालताना तिच्या संसाराची कहाणी ऐकावी लागली. ती कोणाकोणा विषयी काहीबाही सांगत होती..."अरे निमा, (आमची कॉमन मैत्रीण), आठवते ना गोरीघारी बाहुली, ... अरे तिचं प्रेमप्रकरण, मग लग्न सगळं माझ्या मदतीने झालं आणि काय सांगू? दुर्दैवाने एक वर्षाच्या आत निमा एका अपघातात गेली रे. त्या धक्क्याने तिचा नवरा,राजा, पार कोलमडला, घरचा विरोध पत्करून लग्न केलेलं त्यामुळे दुःख व्यक्त करणार तरी कोणासमोर, मग मीच त्याला भेटून सावरत राहिले आणि काही कळलंच नाही पण मला त्याची आणि त्याला माझी सवय लागली, एक दिवस धैर्य करुन त्यानी घरी सर्वांसमक्ष मला लग्न करशील का असं विचारलं .... आईचा खरंतर विरोधच होता पण मला काही वावगं वाटलं नाही. पुढे आम्ही रजिस्टर लग्न केलं आणि सिंगापूरला सेटल झालो. तोपर्यंत माझं MBA पूर्ण होऊन करियरची सुरुवात झाली होती. पहिलीच असाईनमेंट सिंगापूर मधे होती. राजा उत्साहाने आला माझ्या बरोबर आणि काही महिन्यात त्यालाही मनासारखा जॉब मिळाला. भारतात येणंही सोप होतं तिथून. पुढे सगळ्यांसारखा सुखी संसार ... हम दो हमारे दो" नेहमीप्रमाणे ती जोरात हसली. "तुझं काय?' , "सेम तुझ्या सारखंच, हम दो हमारे दो" माझं थोडक्यात उत्तर!!

दुसऱ्याच दिवशी तिचं काम आटपून ती परत गेली. पण आता आमच्या ऑफिसातही तिचे गोडवे ऐकायची वेळ आली. Your friend is so dynamic, so lively .... कान किटले माझे. शांत सागरात वादळ उठल्यासारखं झालं. का होतं असं प्रत्येक वेळी? आता तर काय तिच्याकडे माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स ही आहेत. पिच्छा पुरवेल परत.... पण आश्चर्य म्हणजे एखादंदुसरा मेसेजच आला, तो ही सठी सहामासी शुभेच्छेचा वगैरे!

काळ पुढे सरकत राहिला आणि एका इंडिया विजीटमधे माझ्या मुलीचा प्रोब्लेम झाला, ती ज्या कामासाठी गेली होती ते झालं होतं, पण इंटर्नशिप साठी अपेक्षित एक्सटेन्शन मिळालं नाही आणि व्हिसा संपत आलेला, आईही माझ्याकडे असल्याने भारतात मदत करणारं जवळचं कोणी नव्हतं. चंदूला सर्व सांगितलं पण या क्षेत्रातलं बिचा-याला काहीच माहिती नव्हतं पण तो खटपटी! तो FRO ( Foreign Registration Office) मधे माझ्या लेकीला घेऊन गेला. कर्मधर्मसंयोगाने त्याला तिथे शरू भेटली आणि तिने बरोब्बर चक्र फिरवली, काम झालं आणि लेक सुखरुप आमच्या पर्यंत पोचली. तिने लेकीचा दोन दिवस पाहुणचारही केला, इतका प्रेमाने की रोज ते किस्से ऐकून माझ्या बायकोलाही तिचं कौतुक वाटू लागलं. मातोश्री होत्याच भर घालायला. माझी लेकही नवनवीन प्रश्न विचारू लागली डॅडी, तू त्या आंटीच्या फ्रेंड सर्कल मध्ये होतास? तिच्या बरोबर नाटकात काम केलेलस का? का ऑर्केस्ट्रा मधे? She has got a such a wonderful voice! छे, का असं होत माझ्याबरोबर? का छळते ही अशी? काय मिळतं तिला असं करून? आता मला सहनच नाही होत. बस्स! तिला आमोरासमोर जाब विचारायचं ठरवलं मी! पण संधी कशी आणि कधी मिळणार? मी वाटच पहात होतो आणि हा अशाप्रकारे भेटीचा योग आला.... तिच्या मुलाच्या लग्नात मी काय विचारणार होतो कप्पाळ .... ही संधीही गेली. परत तिचं कौतुक, तिचा मोठेपणा पाहून आलो. सगळं छान चाललेलं असून मी खूश नाही हे आईच्या लक्षात आलंच. "एकदा भेटून निचरा कर बाबा सगळ्याचा" ... माझी पंचाऐंशी वर्षाची आई मला सांगत होती. खरंच मलाही हेच करायचं होतं पण.....

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults