मुक्त .... भाग ३

Submitted by abhishruti on 16 January, 2021 - 02:36

मुक्त 3

हिची त-हाच और आहे यार.... पिच्छाच सोडत नाही.... "कोण रे?" आईने विचारलं.... अरे बापरे, हिला कसं कळलं. नंतर समजलं आई दारावर कोणीतरी आलं होतं त्याविषयी विचारत होती. तसंही आईपासून काही लपत नाही याचा लहानपणापासूनचा अनुभव होता. पण आता वयपरत्वे तिला ऐकुही येत नाही. चार दिवसात मलाही इथली कामं आटपून निघायचं होतं. पण मन सैरभैर झालं होतं. ही बया काही डोक्यातून जात नव्हती. आणि तिचं कौतुकही!! तेवढ्यात चंदू आला, आमचा परममित्र. तो बँकेत कामाला, त्यामुळे हक्काने आईची सगळी कामं आम्ही त्याला सांगायचो. "शरुचं विमान उडालं रे!" मग मी काय करू हे मी मनातच उच्चारलं. "हो का? कसं झालं रे लग्न? तू पण गेला होतास ना?" आईची चौकशी सुरू... "मस्तच झालं.... अजून तेवढाच उत्साह आहे, विचारलं मी तिला "तुझ्या एनर्जीचं रहस्य काय?" , तर म्हणाली "मनमोकळं जगणं!"
.... कसलं काय? या मठ्ठाला पटलंच असणार कारण हे शूरवीर कॉलेजच्या ट्रीपमधे धडपडले तेव्हापासून प्रेमात होते ना, मलमपट्टी करण्यापासून सगळं शरूनी केलं. इतका पाघळला होता तेव्हा .... राग आलेला मला त्याचाही आणि तिचाही. ...हा आधीपासूनचा माझा मित्र! 'अरेच्या मग तू का नाही केलीस ही कामं?' असं आईनी तेंव्हासुद्धा माझी चीडचीड बघून विचारलं होतं... पण शरूला हौस ना सगळ्यांच्या पुढेपुढे करायची! इतकी की दुसऱ्याचा गैरसमजच होईल .... मी तसं हळूच म्हणजे indirectly सांगितलं तर ती म्हणाली तुझं डोकं भलतच चालतं यार! आणि झालंच तस... कॉलेजभर दोघांच्या जोडीची अफवा, चिडवाचिडवी! तिला जरासुद्धा फरक नाही पडला पण चंदूशेठ यडे झाले. तिने स्पष्टपणे त्याला बजावलं हे असं काहीही नाहीये, कॉलेजच्या यड्या लोकांच्या नादी लागून आपली दोस्ती खराब करू नकोस. त्याच्या पचनी पडायला आणि त्याचं डोकं ताळ्यावर यायला बरेच दिवस लागले पण हिला काय त्याचं! आश्चर्य म्हणजे या मधल्या काळात त्यानी एकदाही तिच्याशी भांडण, वाद किंवा दोषारोप केला नाही. पण तो आधी होता त्यापेक्षा थोडा शांत झाला. तिनेही त्याच्याशी बोलणं बंदबिंद नाही केलं .... मला मात्र यातलं काही म्हणजे काहीच पटलं नव्हतं. माझी चीडचीड आईलाही कळत होती. आमच्याकडे ती नेहमीच येत असे. तिच्या आईची आणि माझ्या आईची आधीपासूनच चांगली ओळख! घरी आली की घरभर हिंडून हक्क असल्यासारखी आम्हाला सूचना करत असे. कधी मला आवडे तर कधी राग येई. मी कॉलेजच्या शेवटच्या सेमिस्टर नंतर कायमचं परगावी जायचं ठरवलय हे तिला जाणूनबुजून सांगितलं नव्हतं. पण बहुतेक चंदूकडूनच तिला कळलं असाव. धापा टाकत आली होती घरी, आई देवळात गेली होती, मी घरी एकटाच होतो. मला घट्ट मिठी मारून रडायलाच लागली. क्षणभर मी सुखावलो आणि दुसऱ्या क्षणी भानावर आलो ... असं होताच कामा नये. दूर लोटलं तिला आणि संयमाने सांगितलं "शरू, हे असं काही नाहीये. माझ्या खूप मोठ्या महत्वाकांक्षा आहेत. मला माफ कर!" ढसाढसा रडून घरी गेली ती... तिला जाताना पाहून आईनेही विचारलं, "काय झालं रे? एकदम मलूल दिसली पोर!" मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. त्यानंतरही कधीमधी ती भेटत राहिली, कधी अचानक, कधी ठरवून....पूर्वीसारखीच बडबडत राहिली. ना मी तिला पूर्णपणे टाळू शकलो, ना विसरु शकलो.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults