मुक्त .... भाग १

Submitted by abhishruti on 15 January, 2021 - 10:43

मुक्त

ती आजही इतकी सहजतेने सगळ्यांच लक्ष वेधून घेत होती. तिची गुलबक्षी रंगाची डिझायनर साडी, त्यावर शोभतील असे मोहक, मोजकेच दागिने, हेअरस्टाईल आणि हलकासा मेकप.... दिलखुलास हसणं! तिची लोकप्रियता ठायीठायी जाणवत होती. सगळ्यांनाच तिचा हेवा वाटत होता, कसं जमतं हिला हे सगळं!! खरंतर मी ही हुशार, स्मार्ट पण मितभाषी आणि सिलेक्टिव! पण ती म्हणजे नुसता खळाळता झरा, सर्वांना आपल्या तुषारांनी चिंब भिजवणारा किंवा धबधबाच म्हणा ना, माझ्यासारख्या संयमी व्यक्तीला श्वास रोखून भिजायची शिक्षा देणारा! अगदी शाळाकॉलेजपासून हे असंच! हो खरं, सांगायचंच राहिलं, उद्या तिच्या मुलाचं लग्न आहे आणि आता इथे साग्रसंगीतपणे सीमंतपूजन आणि संगीतचा कार्यक्रम चालू आहे. परदेशातून येऊन एवढा सगळा घाट घातलाय या भवानीनं! आणि कोणीतरी मीही इथेच आहे ही बातमी दिल्यावर बया डायरेक्ट घरीच आली आमंत्रणाला!

'नक्की ये बरं का' असं तिने निघताना दहा वेळा बजावलं. माझ्या आईची ती लाडकी, "लाघवी आहे पोर आणि कर्तबगारही!, मोठमोठ्या पदावर काम करुनही पाय जमिनीवर आहेत. म्हणूनच तर वेळात वेळ काढून आवर्जून आली घरी! नाहीतर हल्ली तुमचं फोनवर नाहीतर त्या वॉटसँपवरच चालतं सगळं" इति मातोश्री .... याच, याच गोष्टीसाठी मला हीचा राग येतो. समोरच्याला किती सहजपणे खिशात टाकते ही! हिला हौसच आहे या सगळ्याची! हेच कारण होतं मी तिच्यापासून लांब रहाण्याचं पण ते तिला आजवर उमगलेलंच नाही. ती कायम आपल्याच दुनियेत, आपल्याच धावपळीत, आपल्याच आनंदात मग्न. तिचं स्टेजवर निवेदन करणं, नाचगाणं दाद मिळवणं चालूच होतं आणि त्याच बरोबर माझ्या डोक्यातलं हे न संपणार काहूर! का आलोय आपण इथे? नुसती formality म्हणून का अजूनही काही? हा प्रश्न मला अगदी वयाच्या अठरा-विसाव्या वर्षापासून आजपर्यंत म्हणजे साठी ओलांडतानाही पडतोय. "Meet my dear friend Viru, sorry Viraj Sathe, an award-winning scientist, whose research has benefitted the entire humanity. the CEO of world famous research institute .... still so Simple n humble" ती माझी ओळख करून देत होती का कौतुकाचा वर्षाव करत होती का मोठेपणाचा, चांगुलपणाचा दिखावा? मला आत्ताही गुदमरल्यासारखं होतय.

क्रमशः ...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults