अगम्य : ५

Submitted by सोहनी सोहनी on 15 January, 2021 - 05:48

अगम्य : ५

मी मनात पक्क केलं होतं कि काही झालं तरीही संधी मिळाली कि बाईसाहेबांच्या खोलीत जाऊन माझ्या मनात आलेल्या सगळ्या शंकांचं निरसन करायचं.
कुठेतरी मला त्यांची काळजी वाटत होती कारण ज्या डोळ्यांना मी घाबरलो होतो ती भीती केव्हाची नाहीशी झाली होती.
सुदैवाने कि दुर्दैवाने माहित नाही पण मला त्या संधीसाठी जास्त वाट पाहावी लागलीच नाही.
आई आणि डॉक्टरसाहेब दोघेही महत्वाच्या कामाने बाहेर गेले, काहीतरी खूपच महत्वाचं असावं कारण आईसाहेब मला खूप काळजीमध्ये आणि घाईत दिसल्या.
संध्याकाळ पर्यंत परत येतो तोवर घरात लक्ष ठेव असं सांगून दोघेही घाईघाईने निघून गेले.
मी मनातल्या मनात खूप खुश झालो कारण मला हवी ती संधी मिळाली होती. मी अर्धा तास असंच बाहेर काम उरकत बसलो आणि मग आत आलो, सगळ्यात आधी घराचं मुख्य दार आतून लावून घेतलं आणि आता मी बाई साहेबांच्या खोलीच्या दारावर उभा होतो.
माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे आता फक्त एक दरवाज्या पलीकडे होती. दाराला कुलूप नव्हतं म्हणून मी त्याला हळूच ढकललं तर कळलं ते आतून बंद, मी हलकेच दारावर टकटक केली आणि चार पाऊले लांब उभा राहिलो, बराच वेळ वाट पाहून देखील दार उघडलं नाही, म्हणून मी पुन्हा टकटक केली तरीही उत्तर नाही म्हणून मी हलकेच आवाज देऊन पहिला पण तेच प्रतिउत्तर नाही.
माझं मन वेगळ्याच विचारांमध्ये होतं, शंका वाढत चालल्या होत्या, काहीतरी भयंकर शिजत होतं ह्या घरात.
पळून जावं तर मन ऐकत नव्हतं,
दार कसं उघडेल ह्या विचारात असताना सहजच म्हणून मी बाजूच्या खोलीत शिरलो.
खोली जरा विचित्रच होती, कुणीतरी राहत नक्की होतं इथे पण कोण?? मी कधी पाहिलं नाही ह्या खोलीत कोणाला, ना आईंना ना डॉक्टरांना. खोली बऱ्याच वस्तूंनी भरली होती, सगळ्या वस्तू अतिशय जुनाट आणि ह्या आधी कधी न पाहिल्या सारख्या होत्या,एकाच खोलीत सहा कपाटं होती. काचेतून आरपार आत काय आहे ते दिसत होतं, दोन कपाटं तर बाटल्यांनीच भरली होती, प्रत्येक बाटली मध्ये काहींना काही भरलं होतं, काय असावं ते आणि हि खोली कोणाची असावी??डोक्यात विचार आला पण मी लक्ष दिलं नाही.
एक कपाट भरून जुनी पुस्तकं, एकात कपडे, दोन बिनकाचेची होती त्यामुळे त्यात काय होतं कळलं नाही आणि सगळी कपाटं बंद होती.
मी त्यांच्या कडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं कारण ह्या खोलीतून बाईसाहेबांच्या खोलीत जायला दरवाजा होता आणि तो उघड होता फक्त लोटून ठेवला होता.
मला अजून वेळ वाया घालवायचा नव्हता म्हणून दबक्या पाउलांनी त्या दारातून बाईसाहेबांच्या खोलीत डोकावलो.
खोलीत एक पाळणा आणि लाकडी पलंग होतं ज्यावर बाईसाहेब होत्या.
मी हिम्मत करून आत शिरलो, त्यांच्याजवळ जायची हिम्मत होत नव्हती पण मी एक एक पाऊल टाकत त्यांच्या बाजूला जवळ उभा राहिलो, आधी वाटलं होतं त्या झोपल्या असाव्यात पण जवळ गेल्यावर जे पाहिलं ते दयनीय होतं.
त्या बेशुद्ध होत्या, ओठांतून काहीतरी पावडर सारखं ओघळून मानेवर साचलं होतं. पलंगाच्या कडेला कितीतरी पुड्या पडल्या होत्या, त्या कसल्या होत्या काय माहित, पण त्यांना बेशुद्ध केलं गेलं होतं हे मला सहज कळलं.
विस्कटलेले कपडे केसं, काळे निळे पडलेले डोळे आणि एका हातावर छोटे छोटे गोल गोल खूप डाग होते, काही काळे झाले होते काही लाल होते तर काहिंवरून कातडी निघाली होती, जवळ जवळ अर्धा हात त्या डागांनी भरला होता.मला ते डाग भाजवल्या सारखे वाटले आणि कसे काय माहित माझे डोळे भरून आले.

मी पुढे होऊन पाळण्यात पाहिलं तर त्यात बाळ नव्हतं.
बाळ त्या दोघांनी सोबत नेलं नाही ना इथे आहे ना अजून कुणी नेलेलं मी पाहिलं मग बाळ कुठेय??
मला आलेले आवाज?? बाईसाहेब कोणाला खेळवत होत्या मग??
म्हणजे बाईसाहेब वेड्याच्या झटक्यामुळे तश्या वागतात, त्यांना बाळ नाहीच आहे, तेव्हाच आई आणि डॉक्टरांकडे कधी बाळ नव्हतं.
म्हणजे ह्या घरात बाळाचं नाहीये तर, एक प्रश्न सुटला खरा पण मग त्यांची अशी स्थिती कुणी केली?? आणि का??
आईंनी कि डॉक्टर साहेबांनी ?? कि अजून कुणी??

माझं डोकं ठार वेडं व्हायला आलं, नक्की काय घडत आहे इथे?? ते दोघेही इतके चांगले वागतात, चांगलेच आहेत मग ते असं का करतील???
माझ्या वयोमानाने मला हे विचार झेपत नव्हते, एक विचार येत होता कि आताच्याआता इथून पळून जावं आणि एक विचार होता कि बाईसाहेबांना वाचवावं, किमान ह्यामागे कोण आहे हे तरी कळावं.

उठवू का त्यांना?? बघू शुद्धीत येतात का?? असा देखील विचार येत होता पण तसं करणं म्हणजे खूप मोठी जोखीम होती, त्या कश्या वागतील याची मला काहीच कल्पना नव्हती.

काय करू विचारांनी डोकं चक्रावून गेलं होतं, तितक्यात दार जोरात वाजल्याचा आवाज आला खालून, मी इतका घाबरलो कि धावत बाईसाहेबांच्या खोलीतून बाहेर पडलो आणि दुसऱ्या खोलीतून बाहेर पडताना मी जोरात बिनकाचेच्या एका कपाटाला आदळलो आणि ते उघडून आतून पांढऱ्या कापडात काहीतरी गुंडाळलेलं माझ्या डोक्यावरून हातात पडलं, ते तसंच त्या कपाटात कोंबून कपाट लावून बाहेर पडलो आणि दार होतं तसं बंद करून धावतात मुख्य दार उघडलं.
समोर आई आणि डॉक्टर साहेब उभे होते, इतका वेळ का रे दार उघडायला आणि मुळात दार आतून का बंद केला होता??
त्यांच्या प्रश्नांची काय उत्तरे द्यायची याच्या भीती पेक्षा मला माझ्या दोन्ही हातांना काहीतरी विचित्र चिकट चिकट जाणवत होतं त्याची वाटत होती.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भारीच..
येऊ द्या पुढचा भाग पण लवकर.

ह्या पुढे काही सुचलं नव्हतं, वेळ ही मिळत नव्हता, चालू कथा पूर्ण झाली की ही देखिल पूर्ण करेन नक्कीच..