कधी वळलो न माघारी

Submitted by निशिकांत on 14 January, 2021 - 23:20

निघालो जायला पुढती कधी वळलो न माघारी
अशी मी निश्चये केली तुझी रे विठ्ठला वारी

मुलांचे वागणे झाले अताशा खूप व्यवहारी
कसे आई तुला कळणार? तू मायेत गांधारी

ढिला हातातला सोडून दे ना कासरा देवा!
पहा विणतो कसे ते जीवनाचे वस्त्र जरतारी

कधी केलीच नाही काळजाने काळजी माझी
सखीच्या भोवती फिरते, अशी त्याची तर्‍हा न्यारी

जमाना केवढा गेला पुढे पण आजही आम्ही
कधी जाताच मांजर आडवे, भीतात संस्कारी

जगायाची खरी मुल्ये शिकावी शिक्षकांकडुनी
नको ते मौलवी, पाद्री नको भगवे जटाधारी

जयाला जो दिसे पैलू तशी व्यक्ती दिसे त्याला
मला म्हणती दुराचारी, कुणी म्हण्ती सदाचारी

जशा जमल्या तशा लिहिल्या, टिकेला पात्रही ठरलो
तरी गझलेत नाही मी कधी केली उसनवारी

तुला "निशिकांत "आठवते तरी का स्वप्न पडलेले!
मला ते स्पष्ट ना दिसले, किती ती रात्र आंधारी!

निशिकांत देशपांडे. मो.क्र. ९८९०७ ९९०२

Group content visibility: 
Public - accessible to all site users