रात्र अंधारी किती?

Submitted by निशिकांत on 10 January, 2021 - 11:19

संपता संपेचना ही रात्र अंधारी किती?
एक शोधाया कवडसा, रोज बेजारी किती?

पांगळा ठेचाळतो मी, मार्ग क्रमिता जीवनी?
धष्टपुष्टांना सजवली, खास अंबारी किती?

वस्त्र माझ्या आवडीचे, हुंदक्यांनी बेतले
रंग पक्का वेदनांचा, पोत जरतारी किती?

आठवेना जन्मलो मी, तारखेला कोणत्या
श्वान सजले वाढदिवशी, जश्न शेजारी किती?

पुण्य का धास्तावलेले, वळचणीला बैसले?
पापियांची चाल झाली आज सरदारी किती?

चावडीवर का न यावे, सांगण्या अन्याय तू?
व्यर्थ डोळेझाक करती, मूक गांधारी किती?

धाड भुंग्याची बघोनी भ्यायली कोमल फुले
गंधकोषा राखण्या घ्यावी खबरदारी किती?

शोषितांच्या फायद्यास्तव, योजना बनल्या तरी
अल्प पदरी दुर्बलांच्या, खर्च सरकारी किती?

"वाव द्यावा नवपिढीला", वृध्द नेते सांगता
"वारसांना द्याच संधी" ही तरफदारी किती?

आमदारांना विचारा, आज मतदाना अधी
मांडले तू प्रश्न अमुचे, राज दरबारी किती?

कोण येइल चार गजला ऐकण्या "निशिकात"च्या?
पण तमाशाच्या दिशेने सांग रहदारी किती?

निशिकांत देशपांडे, पुणे.  
मो.क्र. ९८९०७ ९९०२३

Group content visibility: 
Public - accessible to all site users