अगम्य : ३

Submitted by सोहनी सोहनी on 7 January, 2021 - 04:59

अगम्य : ३

मी अंधाराचा जराही विचार न करता बाळाच्या आवाजाच्या दिशेने धावत सुटलो, थोडा पुढे आलो आणि मला धाप लागली, अंधाराशिवाय काही दिसत नव्हतं आणि भीतीशिवाय काहीच जाणवत नव्हतं.
माझ्या आयुष्यात मी अश्या प्रसंगात पहिल्यांदाच पडलो होतो, मला काहीच कळत नव्हतं हे नक्की काय होतेय पण मी घाबरलो आहे हे मात्र मला कळून चुकलं होतं.
चार पाच तासांपूर्वी ज्या आंब्यांच्या झाडांना प्रेमाने पाणी घातलं त्याच्याच सावल्या मला घाबरवत होत्या, चार पाच तासांपूर्वी पायांखाली मऊ मऊ वाटणारं गवत जीवघेण्या किड्यांसारखं भासू लागलं.

अचानक प्रचंड थंडी वाजायला लागली इतकी कि माझे दात कुडकुडायला लागले, सोसाट्याचा वारा सुटल्यावर येतो तसा झाडांचा फांद्यांचा आवाज येऊ लागला पण आश्चर्य काय तर थंडी खूप होती पण वारा अजिबात सुटला नव्हता.
माझ्या वयाच्या मानाने सहनशक्तीच्या पलीकडे चाललं होतं सगळं आणि मी माझ्या मनाचा ताबा हरवला,
स्वतःच्या जीवाला धोका आहे हा विचार ज्याक्षणी मनात आला त्याच क्षणाला बाळ खुद्कन हसल्याचा मोठ्याने आवाज झाला.
मी शहारलो, अंगावर काटा आला, पुढे काय वाढून ठेवलं आहे ह्या विचारानेच माझ्या हृदयात कळ यायला लागली.

पुन्हा बाळ खुद्कन हसल्याचा मोठ्याने आवाज येऊ लागला, पुन्हा रडण्याचा आवाज, आता हसण्याचा, एक नाही दोन बाळ होते, एक रडत होतं एक हसत होतं. विशिष्ठ दिशेने नव्हे तर अगदी दाही दिशांनी आवाज यायला लागले, मी पळणार तरी कोणत्या दिशेला होतो??
भीतीने जागेवरून माझा पाय निघत नव्हता, मी रडायचाच काय तो बाकी होतो, मला माईची आठवण आली, बा आठवला आणि नकळत माझ्या डोळ्यांतून पाणी वाहू लागलं जणू मी मृत्यूला शरण आलोय.
एक दोन तीन चार पाच एकसोबत कित्येक बाळांचा एकसोबत रडण्या हसण्याचा आवाज येऊ लागला, आवाज वाढला अजून वाढला, वाढतच गेला, मी कानांवर हात गच्च दाबून डोळे मिटले आणि माझी शुद्ध हरपली.

मी शुद्धीवर आलो तेव्हा भीतीने खडबडून जागा झालो पण आश्चर्य मी माझ्या अंथरुणामध्येच होतो, कसं शक्य होतं ते?? मी आजूबाजूला पाहिलं माझ्या व्यतिरिक्त कुणीच नव्हतं ना कुणी आल्यासारखं वा येऊन गेल्यासारखं वाटलं कारण बाजूला जेवलेलं ताट आणि पाण्याचा तांब्या तसाच होता, दार मी लोटलं होतं तेही तसंच होतं, म्हणजे ते सगळं स्वप्न होतं ??

कसं शक्य आहे ?? इतकं जिवंत स्वप्न मी कधीच अनुभवलं नव्हतं??

पण ते खरं असतं तर मी इथे कसा? आणि जरी मला इथे कुणी आणलं असेल तिथून तर मला बेशुद्ध असंच सोडून कसं कोण जाईल??
पण तो बाळाचा आवाज? तो तर खरा होता, मी खरंच बाहेर पडलो होतो, मी सगळं डोळ्यांनी पाहिलं होतं, अनुभवलं होतं?? कोणताही स्वप्न इतकं जिवंत कसं असू शकेल?? आणि तंतोतंत मला कसं आठवेल?? पण मग मी इथे कसा आलो ??कोण घेऊन आला असेल का मला?? मग मी एकटा कसा?? आणि सगळ्या वस्तू जागेवर कश्या? काय झालं होतं नक्की?? काही सुचत नव्हतं.

एक मन बोलत होतं मी बाहेर गेलो होतो दुसरं बोलत होतं मग इथे कसा झोपलोय??

असंख्या विचाराने आणि भीतीने मला कसंतरीच व्हायला लागलं, शेवटी शेवटी ते एक वाईट स्वप्न होतं, नवीन ठिकाणी झोप लागली नसावी किंवा मनाचे खेळ असावेत असं मी स्वतःला समजावून ओल्या गवतावरच्या चिखलाने माखलेल्या माती भरल्या पायांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून झोपी गेलो.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान

छान चाललीय.

मातीभरल्या पायांचे पुढे स्पष्टीकरण आलेले नाही..