अगम्य

Submitted by सोहनी सोहनी on 3 January, 2021 - 03:40

अगम्य

आज वाडीतली सगळी माणसं माझ्या दारात जमली होती. माय आणि मोठी बहीण धाय मोकलून रडत होत्या, मी एका कोपऱ्यात बसलो होतो तरीही येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या नजरा माझ्यावरचं येऊन थांबत होत्या.
बहीण लग्न होऊन गेल्याच वर्षी नवऱ्याघरी गेली तेव्हा खूप एकटं वाटलं, मग माय मी आणि आठवड्यातून एक दिवस पिशवी भरून खाऊ आणणारा बा इतकंच माझं आयुष्य आणि आज तोही गेला, कायमचा. आता तो आठवड्यातून एकदाच काय तर केव्हाच नाही येणार ह्या विचाराने मी बधिर झालो.
मला रडायचं होतं खूप पण प्रत्येकाची नजर नकळत मला मोठा आणि जबाबदार करून जात होती. मीच रडलो तर माय ती कोणाकडे बघेल? तिला आता कोण आधार देईल?? बा असा अचानक जाईल याची कुणीच कल्पना नव्हती केली, आठवड्यातून एकदा जरी यायचा तरी माझं खूप म्हणजे खूप प्रेम होतं त्याच्यावर, असं अचानक कसं घडलं?? किती त्रास झाला असेल त्याला?? माझं नाव घेतलं असेल त्याने मदतीसाठी? गाडीच्या आवाजाने मी विचारांतून बाहेर आलो.
डॉक्टरांच्या गाडीतून बा'ला आत आणून झोपवलं, आई आणि बहीण अजूनच जोरात रडायला लागल्या. आजूबाजूच्या बायकांनी देखील डोळ्याला पदर लावला, माझ्या समोर बा' शांत झोपला होता नेहमी आल्यावर झोपायचा अगदीच तसा, तो तसा झोपलेला असला कि मी जाऊन त्याच्या छातीवर डोकं ठेऊन शांत झोपायचो ती झोप खूप गोड़ आणि अवीट असायची, आता ह्या क्षणाला देखील मी तसाच त्याच्या छातीवर पडलो पण ती नेहमी ऐकावीशी वाटणारी धडधड आज माझ्या कानात शिरत नव्हती, मला अस्वस्थ वाटू लागलं,मी त्याच्या छातीवर डोकं दाबलं आणि डोळे गच्च मिटून घेतले.
'बा'चा आवाज दुरून येत होता, तो मला हाक मारत होता, मला वाचव, वाचव म्हणत होता, मी तिथे पोहोचायला त्याचे खोल पाण्यात बुडणारे हात तेव्हढे दिसले, मीही उडी मारणार तोच आईचा केविलवाणा, रडणारा चेहरा दिसला, मला श्वास घेता येईना मी कोंडलो होतो मनाच्या अंधारात खूप खूप खोल कुठेतरी' पाण्याच्या तोंडावर पडलेल्या हबक्याने मी खडबडून जागा झालो.
बा' तिथेच बाजूला झोपला होता आणि मला भोवळ आली असावी, मी कसंबसं स्वतःला सावरून घेतलं आणि पुढच्या विधीला स्मशानात निघालो.
'तुझी इच्छा असेल किंवा तुला वाटलं तर वडिलांच्या जागी कधीही तू कामावर येऊ शकतोस, मी तुझी सगळी सोय करेन आणि काळजी करू नकोस' हातात वीस हजार रुपये देऊन डॉक्टर साहेब घरी गेले.
डॉक्टर साहेबांनी दिलेल्या पैश्याने बा'चं सगळं व्यवस्थित पार पडलं.

तसाही मी आता सतरा वर्षाचा होतो, सातवी पर्यंत कसंतरी बा'च्या हट्टाने शिकलो पण पुढे काही सोय नाही म्हणून इतरांसारखी मी हि शाळा सोडली ती सोडली. काही जबाबदारी नसल्यासारखा जगत होतो, बा' पण लहान आहे पोर अजून म्हणून काम करायचा हट्ट करत नसायचा पण आता मला जबाबदारीने वागावं लागणार होतं, माय साठी मी सगळं करणार होतो. तिच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून मी ठरवलं.
तेरावा झाला आणि दुसऱ्याच दिवशी आईची कशीतरी समजूत घालून कपडे सामान घेऊन डॉक्टर साहेबांच्या वाड्यावर पोहोचलो.
त्यांनी माझं स्वागतच केलं, मला राहायची जागा आणि कामं समजावून ते त्यांच्या कामात व्यस्त झाले.
वाडा खूप भव्य होता, किती खोल्या होत्या आणि किती मोठ्या, मला राहायला बा'चीच खोली दिली तीही खूप मोठी होती, खोलीत बा'च्या खूप वस्तू पडल्या होत्या त्या पाहून मला खूप भरून आलं आणि मी मनभरून रडून घेतलं.
दरवाज्यावर जोरात थाप पडली आणि मी भानावर आलो, मी दार उघडला तर डॉक्टर साहेबांच्या आई जेवण घेऊन होत्या. जेवण उरकून घे मग कामाला लाग म्हणून त्या गेल्या, माझं उरकून मी आधी झाडू हातात घेतला, आणि एक एक करून सगळं साफ करत करत वरच्या मजल्यावर गेलो.
झाडू मारता मारता एका खोलीत काहीतरी जोरात पडल्याचा आवाज आला आणि सहज म्हणून मी फटीतून आत पाहिलं आणि जागीच थिजलो . ..

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults