अज्ञातवासी! - भाग २१ - गोळीबार!

Submitted by अज्ञातवासी on 2 January, 2021 - 11:31

भाग २० - https://www.maayboli.com/node/77598

रात्रीची वेळ. किर्र अंधार, आणि शांत वाडा.
खुर्चीवर एक माणूस बसलेला.
"सुरुवात झाली?" त्याने विचारले.
"हो बाबा?" त्याच्यासमोर उभा असलेला माणूस शांतपणे म्हणाला.
तो कणखरपणे उभा होता. हात मागे बांधून. ताठपणे.
"तांडव करा महाराजा..." मागून पिंगळ्याचा आवाज आला...
आणि मोक्ष स्वप्नातून जागा झाला!
ताडकन उठून त्याने आवरायला सुरुवात केली.
"आज जागा बदलूयात मोक्ष!"
मोक्ष गाडीत सामान ठेवत होता. झोया त्याच्याकडे बघत म्हणाली.
"नाही. गरज नाहीये."
"ऐक माझं..."
"गरज नाहीये झोया... ती हवेली मला हवीहवीशी वाटतेय. चल निघूयात."
झोया असहायपणे गाडीत बसली...
मोक्षने भरधाव वेगाने गाडी हवेलीकडे घेतली.
◆◆◆◆◆
मोक्ष गोळ्या चालवत होता. पटापट.
"थांब." झोया मध्येच म्हणाली.
"काय झालं?"
"गोळ्या किती वेगात चालवल्या याला महत्व नसतं, त्यातल्या किती निशाण्यावर लागल्या याला महत्व असतं. तुझा निशाणा चुकतोय..."
"आय थिंक मी पुन्हा ट्राय करायला हवं."
"दुसराच दिवस आहे... जास्त ताण घेऊ नकोस."
"हम्म."
मोक्षने पुन्हा गोळ्या चालवण्यास सुरुवात केली.
एकही गोळी निशाण्यावर लागली नाही...
"सोड ती पिस्तुल. सोड..." झोया ओरडली.
मोक्षने पिस्तुल खाली ठेवली.
"आधी ना, डोक्यात काय चालुये ते बंद कर. मग प्रॅक्टिस करूयात."
"अग काही नाही चालू डोक्यात." मोक्ष आशाळभूतपणे म्हणाला.
"मी आजपर्यंत कुणालाच शिकवलेलं नाहीये, पण मी चुकत नाहीये."
तिने त्याच्या डोक्यावर टपली मारली.
"इथलं काढून टाक. नाहीतर मन मोकळं कर कुणाजवळ, तेव्हाच निशाणा लागेल कळलं?"
मोक्ष तिच्याकडे बघतच राहिला.
"काय झालं?" ती ओशाळून म्हणाली.
"मी काय करतोय झोया, तेच कळत नाहीये. मी कशासाठी आलो होतो, काय करतोय, काय शोधतोय, डोकं भंजाळून गेलंय."
"म्हणून सांगितलं होतं ना, इथे प्रॅक्टिस नको म्हणून."
"नाही, उलट ही जागा मला हवीहवीशी वाटतेय." मोक्ष शांतपणे म्हणाला.
"एक सांगू? ऐकशील?" झोया त्याच्याकडे बघत म्हणाली.
"काय?"
"ज्या गोष्टी तुला त्रास देतायेत ना, किंवा सैरभैर करतायेत ना, त्यांची एकदा ओळीने संगती लाव. मग प्रत्येक गोष्टीसाठी तू काय करू शकतोस, याचा विचार कर."
"असं नाही जमत ग झोया, असं नाही जमत."
"सगळं जमतं. कळलं? चल आजची प्रॅक्टिस संपवूयात. उद्या जर तू ओके असशील तर पुन्हा चालू करू."
"वेळ नाहीये झोया आपल्याकडे."
"म्हणून मला वेळ नाही घालवायचा. मला पाया पक्का हवाय. ज्याक्षणी तू गोळी चालवशील ना, त्याक्षणी तुझ्या डोक्यात फक्त तुझं लक्ष्य असायला हवं."
मोक्षने फक्त मान हलवली...
◆◆◆◆◆
दादासाहेब खुर्चीवर बसले होते.
"दादा, कसला विचार करतोय?" मागून आवाज आला.
"अण्णा, अहो काही नाही. दादासाहेब खुर्चीवरून उठत म्हणाले."
"बस रे. ही खुर्ची नको आता मला. बरं, कसला विचार करत होता?"
"नाही अण्णा कशाचा विचार. सगळं नीट चाललंय."
"तू जे सहाजण निवडलेत ना दादा, जबरदस्त काम केलं."
"अण्णा, ते सहाहीजण माझे हात पाय आहेत. ते जोपर्यंत माझ्यासोबत असतील ना, तोपर्यंत आपल्याला कुणीही हात लावू शकणार नाही."
"आणि जर कधी विरोधात गेले तर...?" अण्णा म्हणाले.
"तर समजायचं, महादेवाची आपल्यावर अवकृपा झाली, आणि लढायला तयार रहायचं."
अण्णा हसले. "माझगावमधून आपला माल येत नाहीये. काय करायचं ठरवलंय?"
"जाधवला कामाला लावलंय."
"जाधवला जमेल?"
"बिलकुल नाही. तो फक्त माहिती काढेल."
"मग?"
दादासाहेब उठले.
"बरेच दिवस झालेत अण्णा, स्वतः लढाईत उतरलो नाही."
"उतरा, उतरा...पण माणसं घेऊन उतरा."
"जी अण्णा!" दादासाहेब हसले, आणि शांतपणे त्यांनी खुर्चीवर मान टेकवली.
◆◆◆◆◆
माझगावला दादासाहेबांची गाडी एका गोडाऊनसमोर थांबली.
जाधव तिथेच उभा होता.
"दादा, या गोडाऊनमध्ये आपला सगळं माल दाबून ठेवलाय."
"कुणी, काही कळलं?"
"माहिती नाही. कुणी रहमान आहे असं कळलं. दुबईचा आहे, मुंबई घ्यायचीय त्याला."
"घे की म्हणावं. नाशिकच्या आड कशाला येतोय?"
"दादासाहेब, बहुतेक त्याला ताकद दाखवायची असेल. पण आज आपणही गोडाऊन उडवायचंच... बाकीची माणसं कुठे आहेत."
"आपण दोन्ही माणसं नाहीत?" दादासाहेब हसले.
"दादा, विनोद करू नका. आत शंभर माणसं तरी असतील."
दादासाहेब गाडीतून उतरले, व त्यांनी डिक्की उघडली.
जमेल तितक्या मॅगझीन त्यांनी खिशात भरल्या. डाव्या हातात उझी व उजव्या हातात एके 46 त्यांनी घेतली. दोन्ही ऑटोमॅटिक वर सेट केल्या.
"माझ्याकडे शंभरपेक्षा जास्त गोळ्या आहेत." ते जाधवला म्हणाले...
व गोडाऊनच्या दिशेने चालू लागले...

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच!
पुढील भागाच्या प्रतिक्षेत........

छान लिहित आहात. वाचतोय.
<मोहनने पुन्हा गोळ्या चालवण्यास सुरुवात केली.>> इथे मोक्ष हवे का?

सलग 4 भाग आज वाचले, मस्तच चाललीय! लेखन कौशल्याला मनापासून दाद! Interesting!
अज्ञात, एक sincere request, please मोक्ष, मोहन आणि सायलीला वाऱ्यावर सोडू नका... त्यांच्याकडे नियमीत लक्ष द्या.. Happy