पाटील v/s पाटील - भाग २६!

Submitted by अज्ञातवासी on 30 December, 2020 - 11:16

भाग 25 https://www.maayboli.com/node/77573

"तर डॉक्टर, अशी ही कहाणी."
मला रडू आवरत नव्हतं. ज्याला मी भटकती आत्मा समजलो, तो तर महात्मा निघाला.
"तो परत येईल का नाही, माहिती नाही. पण आमची सोनी, त्याच्याशिवाय नाही जगू शकणार?"
"पण त्याचंही सोनीवर प्रेम होतं ना?"
"हो, पण आता कन्फ्युजन आहे, ते प्रेम होतं की नाटक."
"मग, कॉल लावून मोकळं व्हा ना. विचारा त्याला?"
मिनेने कपाळावर हात मारला.
"ताई जाऊदे." सोनी शांतपणे म्हणाली. "माझं नशीबच वाईट."
"सोनी... असं बोलू नकोस."
"कुणी इतकं वाट बघायला लावतं का ग?"
"हो ना." मी मध्येच म्हणालो.
मिनेने एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकला.
"तर डॉक्टर, आता कोपऱ्यावरची खोली पकडायची, आणि नीट गुमान राहायचं, कळलं? विनाकारण अण्णांनी खायला काळ आणि भुईला भार बोलावलाय."
माझा स्वाभिमान जागृत झाला...
"आणि लाज वाटत असेल ना, तर ते पैसे माझ्याकडे देऊन ठेवा."
माझा स्वाभिमान झोपला...
मी हळूच खोलीची वाट धरली. माझ्या कानात बापाचे शब्द घुमत होते...
'शिरपा, येड्यांचा डॉक्टर होऊ नको!'
◆◆◆◆◆
"सर, मी नाव बोलावतो."
मोहन नर्मदेच्या किनारी उभा होता.
तेवढ्यात नावाडी आला, व त्याने नाव किनाऱ्यावर लावली.
मोहन शांतपणे होडीवर चढला.
त्याच्याबरोबर व्यासही बसले.
"साहब, संभाल के बैठेयेगा. मगरमच्छ रहते है पानीमै." नावाड्याने सूचना दिली.
मोहन त्याच्या तंद्रीतच होता.
नाव हळूहळू पुढे जात होती.
'पाटीलवाडी, अण्णा, सोनी...
आजी...'
सगळ्या गोष्टी त्याच्या डोळ्यांपुढे पुन्हा पुन्हा येत होत्या.
"सर हे भांड्याचं वरच कवर उघडेन ना वेळेवर?"
"हो व्यास. डोन्ट वरी." मोहन शांतपणे म्हणाला.
तेवढ्यात होडीला जोरात हिसका बसला ...
आणि तो तांब्या नदीत खाली पडला...
"अरे ये..." मोहन प्रचंड हादरला, व तो नदीत उडी मारण्याच्या पवित्र्यात उभा राहिला.
ते बघून व्यासही हादरले.
"सर, थांबा." त्यांनी मोहनला घट्ट धरले.
"व्यास... अहो तो तांब्या कित्येक वर्षे उघडणार नाही. आणि कुणाला सापडलाच, तर अस्थी फेकून द्यायला नको. सोडा मला, माझ्या आजीची शेवटची इच्छा आहे."
तो तांब्या प्रचंड प्रवाहाच्या वेगाने दूरवर जात होता.
मोहन जीवाचा आकांत करत होता.
◆◆◆◆◆
घाटाच्या एका पायरीवर मोहन बसला होता.
व्यासही त्याच्या शेजारी होते.
कुणीही कुणाशी बोलत नव्हतं.
"व्यास, जीवन जितकं क्षणभंगुर तितक्या माणसाच्या इच्छाही, नाही का?
ऐनवेळी, शेवटच्या क्षणी हुलकावणी मिळावी, असं कोणतं पाप मी केलं? माझ्या आजीची हीसुद्धा इच्छा माझ्याकडून पूर्ण होऊ नये."
"सर, तुम्ही केल्यात सगळ्या इच्छा पूर्ण. असा अविचार नका करू." व्यास कळकळीने म्हणाले.
"नाही व्यास, नाही. तुम्ही नसता, तर आजीची तीही इच्छा पूर्ण झाली नसती."
"नाही सर! ते सगळं तुम्ही केलं. त्याचं श्रेय मला नको."
"अहो व्यास, पण मी शेवटच्या क्षणी का बेशुद्ध पडलो? का आजारी राहिलो. एवढं चार्टर प्लेनने आलो, आणि इथे येऊन शेवटच्या क्षणी का दगा मिळावा. मी काय वाईट केलंय कुणाचं?"
"कुणाचंही नाही मित्रा, पण कधीकधी नर्मदाच आपलं गर्वहरण करते..."
मागून आवाज आला.
मोहनने चमकून मागे वळून बघितले...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users