असे ठरवले होते

Submitted by निशिकांत on 29 December, 2020 - 10:52

मिळते जुळते घेत जगावे असे ठरवले होते
तारेवरची कसरत करता, अर्थ बहरले होते

कशास काळे मणी उगाचच? अपुले ठरले होते
लग्नाविन एकत्र रहाणे, किती भावले होते!

पुन्हा एकदा वर्ष संपले, वळून बघता कळले
माझे वय एका वर्षाने पुन्हा वाढले होते

विध्वंसक लोकांना नंतर लपावयाचे असते
म्हणून वादळ कहर करोनी लगेच शमले होते

गंगाजमनी कशी संस्कृती? बघण्या शहरी जाता
झोपडपट्टीच्या शेजारी उंची इमले होते

क्रत्रिम ढग पेरून एकदा प्रयत्न केला असता
झाला असफल, तरी बिचारे मोर नाचले होते

तरंग आनंदाच्या डोही, आनंदांचे उठती
आनंदाचे संत तुक्याने मार्ग दावले होते

नका एकही प्याला घेऊ राम गडकरी म्हणती
अनेक सिंधू, सुधाकरांचे प्रपंच बुडले होते

कलंदरीचा उगाच का "निशिकांत' मुखवटा घ्यावा?
कुणी आपुले नसल्याचे का पाश काचले होते?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--लवंगलता
मात्रा--८+८+८+४=२८

Group content visibility: 
Public - accessible to all site users