डा सा णू

Submitted by निमिष_सोनार on 28 December, 2020 - 23:06

एक ग्राहक साबणाच्या दुकानात जातो.

"एखादा चांगला साबण दाखवा बरं जरा!"

साबण विक्रेता एक साबण हातात घेऊन सांगतो-

"हा ऑलकिल साबण घ्या!"

"अहो, हा तर तोच जुना साबण आहे, फक्त कव्हरची डिझाईन बदललेली दिसते!"

"हो, पण आता हा पूर्वीपेक्षा खूप चांगला झाला आहे. आतापर्यंतचा सर्वोत्तम, परिपूर्ण म्हणजे 99.9%. हा फक्त किटाणू, जिवाणू, विषाणू यांनाच मारत नाही तर भडाणू, गाऱ्हाणू, टीकाणू यांना सुद्धा मारतो!"

"हो का? बरं, मग आतापर्यंत आमच्या मागच्या पिढीने वापरलेला हाच साबण अपूर्ण होता?"

"अं हो म्हणजे नाही!"

"मला सांगाच आता! ग्राहक म्हणून माझा अधिकार आहे जाणून घ्यायचा की यापूर्वी हा साबण किती टक्के अपूर्ण होता?"

"99.3% पूर्ण होता फक्त! पण आता 99.9% झाला आहे!"

"आँ, मग साबणाचा उरलेला 0.6% तुकडा कुठे आहे! तुम्ही दुकानदारांनी वापरला तो, नाही का?"

"अहो, तसे नाही! पूर्वी हा साबण भडाणू, गाऱ्हाणू, टीकाणू यांना मारत नव्हता पण आता त्यांनाही मारतो!"

"मग पूर्वीच्या पिढीचे 0.6% चे पैसे परत करा, नाहीतर आम्ही ग्राहक मंचाकडे तक्रार करू!"

"अहो ग्राहक राजे, पण हे तिघे तेव्हा होते कुठे? त्यामुळे त्यांना मारण्याचा प्रश्न येतो कुठे?"

"प्रश्न मनात येतो दुसरीकडे कुठे येणार? बरं ते जाऊ द्या! कुठे असतात हो हे तिघे: भडाणू, गाऱ्हाणू, टीकाणू?"

"ते व्हॅय? ते आकाशात असतात! चायनीज वाफेपासून बनलेल्या ढगातून पाऊस पडला की पडतात ते तिघे आपल्या अंगावर?"

"आणि हा साबण हे सगळे किडे मकोडेच मारत फिरतो की शरीराची स्वछता पण करतो?"

"करतो करतो. स्वच्छता पण करतो! चांगलं चाटून पुसून लख्ख करतो तुम्हाला! यांच्यात दोनशे लिंबाची शक्ती आहे!"

"आसं का? मी ऐकलंय अजून वेगवेगळे काणू येणार आहेत भविष्यात! त्यांनाही मारेल का हा?

"भविष्यात धक्काणू, फेकाणू, शॉकाणू येतील. त्यांनापण आमचा साबण मारेल. 99.100% आणि हो, आमचा हा साबण डासाणू पण मारतो?"

"डासाणू???"

"डासाणू म्हणजे तो नाही का तो, घरभर उडत फिरतो, चावतो, नांगी मारतो आणि संजय उर्मिला सारखा गुण गुण गुण गुण करत इकडे तिकडे दौडतो! तोच तो डासाणू!!"

"बरं बरं! लाय भारी आहे हो तुमचा साबण! हा फक्त साबण नाही तर जणू बेबॉन स्प्रे झाला! मी आता असं करतो! मी मस्तपैकी बेदाणू सॉरी बेदाणे खाऊन येतो, मग घेतो तुमचा साबण!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users