इंग्लंडच्या आठवणी (रिडींग / लंडन)

Submitted by निमिष_सोनार on 23 December, 2020 - 12:31

युनायटेड किंगडम (युके) हा उत्तर युरोपातील एक देश (संयुक्त राजतंत्र) आहे. युनायटेड किंगडममध्ये इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स व उत्तर आयर्लंड ह्या देशांचा समावेश होतो. ह्यापैकी इंग्लंड, स्कॉटलंड व वेल्स हे "ग्रेट ब्रिटन" ह्या बेटावर तर उत्तर आयर्लंड हा "आयर्लंड" ह्या बेटावर वसला आहे. युनायटेड किंगडम हा युरोपातील व जगातील एक विकसित देश आहे.

साधारण दहा वर्षांपूर्वी इंग्लंड देशातील लंडनपासून ६० किलोमीटरवर असलेल्या "रीडिंग" या शहरात मला कंपनीच्या कामानिमित्त माझ्या कुटुंबासह एक वर्षभर राहण्याचा योग आला. पत्नी आणि त्या वेळेस तीन वर्षाचा असलेला माझा मुलगा यांचेसह मी तेथे रहात होतो. तेव्हा मुलीचा जन्म झालेला नव्हता.

लंडनला जाण्यापूर्वी देशांतर्गतसुद्धा आम्ही तिघांनी कधी विमानाचा प्रवास केला नव्हता. मात्र लंडनला जातांना "व्हर्जिन अटलांटिक" कंपनीच्या विमानाद्वारे सलग दहा तास न थांबता "मुंबई ते लंडन हिथ्रो विमानतळ" आम्ही प्रवास केला. विमानातील सर्वच सेवा अतिशय चांगल्या दर्जाची होती. तेव्हा मार्च महिना होता. भारतातून दुपारी ४ वाजता निघतांना उन्हाळा सुरु झाला होता पण लंडनला रात्री ८ वाजता पोहोचलो तेव्हा भारतात रात्रीचे २ वाजले होते आणि इंग्लंडमध्ये प्रचंड हाडे गोठवणारी थंडी होती. कॅबमध्ये हिटर्स होते पण विमानतळ ते कॅब जाईपर्यंतसुद्धा थंडीचे कपडे (थर्मल वियर) घालावे लागले.

युकेमध्ये हिवाळा आणि उन्हाळा असे दोनच ऋतू असतात. साधारण जानेवारी ते मार्च मध्ये पाउस किंवा बर्फ पडतो. जून नंतर उन्हाळा सुरु होतो. उन्हाळ्यात दिवस साधारणपणे सकाळी ५ ते रात्री १० आणि उरलेली रात्र असते आणि हिवाळ्यात दिवस साधारणपणे सकाळी ९ ते दुपारी ४ असतो आणि उरलेली रात्र असते. तिथे मार्चमध्ये शेवटच्या रविवारी घड्याळ एक तासांनी पुढे करतात आणि ऑक्टोबरमध्ये शेवटच्या रविवारी घड्याळ एका तासाने मागे करून पुन्हा पूर्वीसारखे करतात. पण मी असं ऐकतोय की ही पद्धत ते लवकरच बंद करणार आहेत.

ग्रीनविच प्रमाणवेळ (Greenwich Mean Time) ही लंडनच्या ग्रीनविच बरोमधील रॉयल ऑब्झर्व्हेटरीमध्ये पाळली जात असलेली एक प्रमाणवेळ आहे. पृथ्वीवरील मुख्य रेखावृत्त (०० रेखांश) लंडनच्या ग्रीनविच ह्या उपनगरामधून जात असल्याचे गृहीत धरले आसल्याने ग्रीनविच प्रमाणवेळेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

गेल्यानंतर पहिल्याच दिवशी ऑफिसला जावे लागले. रीडिंग शहरापासून जवळच असलेल्या थील (Theale) या गावी आमचे ऑफिस होते. थील हा निसर्गरम्य परिसर होता. आमच्या तीन प्रकारच्या शिफ्ट असायच्या. मॉर्निंग जनरल आणि इव्हिनिंग. नाईट शिफ्ट घरूनच व्हायची. ब्रिटिश टेलिकॉमचे इंटरनेट घरी मिळायचे. त्याच्या आधारे नाईट शिफ्टला व्यक्ती करून काम करू शकत असे. आमच्या कस्टमर कंपनीचे आय कार्ड दाखवले की तिथल्या बसमधून ऑफिसपर्यंत प्रवास फ्री असायचा. बसमध्ये सुद्धा हीटर असायचे, त्यामुळे थंडी जाणवत नव्हती.

पण मॉर्निंग शिफ्टला जाताना बसची वाट बघत असताना सकाळी साडेपाच वाजता कडाक्याची थंडी वाजायची. त्यामुळे भारतातूनच खरेदी करून सोबत आणलेले थर्मल वियर घालूनच जावे लागे. ग्लोबल वार्मिंग मुळे की काय पण तिथे एक वर्षाच्या वास्तव्यात आम्हाला एकदाच फक्त बर्फवृष्टी बघायला मिळाली. वर्षात एकदाच आम्ही मायनस (उणे) 7 तापमान पाहिले.

तिथल्या बसमध्ये कण्डक्टर नसतो. बससाठी वेगळी लेन असते. प्रवासी चढतांना ड्रायव्हरच तिकीट काढून देतो मग प्रवासी मागे जातो आणि बसतो. त्यानंतर ऑफिस न्यूबरी येथे शिफ्ट झाले. वर्षभर ऑफिसला जातांना घरून पत्नी टिफिन बनवून द्यायची. कारण तिथल्या कँटीन मध्ये कोणत्या पदार्थात कशा प्रकारचे नॉन व्हेज टाकलेले असेल याची खात्री नव्हती. तथापि कधी तरी तिथल्या ऑफिसच्या कँटीन मधले हॅश ब्राऊनी वगैरे सारखे बटाट्याचे पदार्थ मी खाल्ले आहेत. तसेच सेन्सबरीत मिळणारे चॉकलेट फ्लेवरचे क्रोइसंट पण छान लागतात. सेन्सबरी सारख्या ठिकाणी प्रवेशद्वारातून आत जातांना बाजूला किंवा आतमध्ये सुद्धा पेपर आणि मासिक स्टॉल उभे केलेले असते. भाजीपाला आणि खाद्य पदार्थांसोबतच आपण मासिक आणि न्यूजपेपर पण विकत घेऊन कार्ट मध्ये टाकू शकतो.

तिथला "द सन" नावाचा एक न्यूजपेपर आहे ज्यात तिसऱ्या पानावर पान भरून रोज वेगवेगळ्या महिलेचा फक्त कमरेवरचा आणि टॉपलेस फोटो छापलेला असतो. त्या स्त्रिया म्हणजे काही मॉडेल्स वगैरे नसून बरेचदा कुणीही सामान्य घरातील स्त्रियाही असू शकतात म्हणे! आणि त्यात तसा फोटो देणं हे प्रतिष्ठेचं मानलं जातं असं माझ्या एका मित्राने सांगितलं! आणि हा पेपर सहजपणे विविध कंपनीत, ऑफिसमध्ये सहजपणे टेबलवर रिसेप्शनला ठेवलेला असतो. त्या तिसऱ्या पानावरच्या फोटोबद्दल कुणाला काही विशेष असं अप्रूप नसावं! आपल्याकडे मुंबईत मिड डे या दुपारच्या न्यूजपेपरमध्ये तिसऱ्या पानावर "मिड डे मेट" या नावाखाली बिकिनितील फोटो छापून यायचे पण आता बहुतेक ते बंद झाले!

शाकाहारी जेवणाबाबत सांगायचे तर तिथले स्थानिक ब्रिटिश लोक सँडविच, उकडलेली आणि मिरे पावडर फवारलेली फुलकोबी (फ्लावर), फ्रेंच फ्राईज अशा प्रकारचे जेवण जेवतात. मांसाहारी जेवणाबाबत माझा अभ्यास नाही. त्या मानाने मला वाटते की आपले भारतीय जेवण हे खूप श्रीमंत आणि भरपूर पदार्थांनी युक्त असे असते. रिडींग आणि लंडन मध्ये अनेक भारतीय रेस्टॉरंट आहेत ज्यात ब्रिटिश माणूससुद्धा चव बदल म्हणून येत असतो आणि बटर रोटी सोबत मटार पनीरची भाजी खातांना दिसतो. आपले हल्दीरामचे फरसाण पण तिथला ब्रिटिश माणूस आवडीने खातो.

ब्रिटिश जास्त सोशल नाहीत असा एकंदरीत अनुभव आला. झालेच तर रात्री पब्ज मध्ये जमून मजा करणारी तरुण तरुणी दिसतात. अगदी कोवळ्या तरुण वयातच सहजपणे गार्डनमध्ये किंवा मग बस स्टॉपवर म्हणा, आजू बाजूच्या गर्दीची तमा न बाळगता मुलं मुली सहजच एकमेकांचे चुंबन घेतांना सर्रास आढळून येतात.

सहा महिने आम्ही ऑफिसमधील एक सहकारी आणि त्याच्या फॅमिलीसोबत मोठे घर शेअर केले होते. त्यानंतर घर बदलून रीडिंग मध्येच आम्ही त्याच घरमालकाच्या पण दुसरीकडे असलेल्या आणखी एका घरात राहावयास गेलो तेव्हा आम्ही पोलंड देशाची एक शेफ स्त्री आणि तिचा भारतीय (गोव्यातील) बॉयफ्रेंड यांच्या सोबत घर शेयर केले होते. ती आपल्या बॉयफ्रेंड साठी भारतीय पदार्थ बनवायला माझ्या पत्नीकडून शिकली.

अशा घरांत किचन आणि हॉल कॉमन असतो. पैसे वाचावे यासाठी शेअरिंग हा पर्याय तिथे माझ्यासारखे तात्पुरत्या कामानिमित्त आलेले भारतीय कुटुंबे निवडतात. पौंड हे तिथले चलन. त्याची किंमत 80 ते 100 रुपये दरम्यान असते. आम्ही राहिलेल्या दोन्ही घरांचा मालक राजस्थानी होता जो जुन्या काळात आठवीत गावातील शिक्षण सोडून भारतातून काहीतरी जुगाड करून लंडनमध्ये आला आणि तिथे त्याने प्लम्बिंगची कामे केली. आज त्याच्याकडे दहा प्रॉपर्टीज आहेत, त्यापैकी काही तो भाड्याने देतो आणि अजूनही प्लम्बिंगची कामे करतो. अशिक्षित असूनही तिथे कायम वास्तव्यास असल्याने सवयीने तो आमच्यापेक्षाही अस्खलित इंग्रजी बोलतो.

मुलगा रिडींग मधल्या डकलिंग (duckling) या नर्सरी शाळेत जायचा. शिक्षण आणि मेडिकल सेवा तिथे मोफत होती. युके मधील NHS (National Health Service) मध्ये बहुतेक भारतीय डॉक्टर आणि नर्सेस दिसून येतात.

एकूणच इंग्लंड असो की इतर कुठल्या देश युरोपीय देशांमध्ये स्वच्छता चांगली राखलेली असते. रीडिंग या शहरातले फोरबरी गार्डन हे सुद्धा खूप स्वच्छ होते. तीन वर्षाच्या मुलाला आम्ही स्ट्रोलरमधून (बाबा गाडी) सगळ्या रस्त्यांवरून फिरून आणू शकतो कारण तिथे स्ट्रोलरसाठी किंवा पादचाऱ्यांसाठी वेगळा ट्रॅक असायचा. एवढेच काय तर लंडनमधील ट्रेनचे सगळ्यात मोठे जाळे असलेल्या लोकल ट्रेनमध्ये (त्याला तिथे ट्यूब असे म्हणतात) सुद्धा आम्ही सहजगत्या स्ट्रोलर नेऊ शकत होतो.

लंडन ट्यूब मधून फिरतांना आम्ही एकदा लाईनचा कलर आणि स्टेशन चुकलो होतो तेव्हा प्लॅटफॉर्मवर आम्ही एका ब्रिटिश माणसाला त्याबद्दल विचारले तर त्याने बिचाऱ्याने पाठीवरची सॅक उतरवून त्यातून नकाशा काढला आणि त्यातून पाहून आम्हाला व्यवस्थितपणे मार्गदर्शन केले. ब्रिटिश टेलिकॉमचे कनेक्शन बसवायला घरी आलेला इंजिनिअर पण आम्हाला आस्थेने विचारत होता की आमचा देश तुम्हाला कसा वाटला? म्हणजे ते लोक याबद्दल कायम जागरूक असतात की आपण त्यांच्या देशाबद्दल काय विचार करतो? त्यांच्या देशाची चांगली प्रतिमा घेऊनच आपण आपल्या देशात परत गेलो पाहिजेत असे त्यांना वाटते. असेच आम्हाला एकदा रात्री लंडनहून रिडींगला ट्रेनने परततांना स्टेशनवर उतरायचे होते तेव्हा ट्रेनचा दरवाजा उघडण्याची पद्धतच समजत नव्हती, तेव्हा एका ब्रिटिश स्त्रीने आवर्जून मदत केली. तो दरवाजा का कोण जाणे बाहेरून उघडावा लागत होता.

साऊथाँल म्हणून एक ठिकाण (लंडन मधील एक उपनगर) आहे, तिथे भारतीय लोक राहतात. तिथे आपल्याला सहजपणे धान्याची पोती, पारले जी बिस्किटे, मॅगी, सामोसे असे सगळे भारतीय पदार्थ मिळतात. तिथल्या गर्दीची मानसिकता पण भारतातील गर्दी सारखीच वाटली!

लंडन शहरातील "लंडन आय" या भव्य काचेच्या कॅप्सूल ने बनलेल्या (आपल्याकडच्या यात्रेतील पाळण्यासारख्या भासणाऱ्या) चक्रामध्ये बसून आपल्याला संपूर्ण लंडन शहराचे विहंगम दृश्य दिसते. तिथला थेम्स नदीवरचा मिलेनियम तसेच टॉवर ब्रिज (तोच लहान मुलांच्या गाण्यांमधील "लंडन ब्रीज इज फॉलींग डाऊन" या गाण्यातला) येथे गेलो असता आम्हाला ब्रिज मधोमध दुभंगून त्या मधून जहाज जाण्याचे दृश्य योगायोगाने बघायला मिळाले.

तिथला लोकल एफ एम रेडिओ ऐकायला मजा यायची. व्हर्जिन रेडिओ वगैरे वरची गाणी (जरी त्याची लिरिक्स पूर्ण समजली नाहीत तरी) ऐकायला मजा यायची. वेगळाच फील यायचा!

लंडनमधल्या "टॉवर ऑफ लंडन" मध्ये भारतातील कोहिनूर हिरा संग्रही ठेवलेला आहे. लंडन आणि रीडिंग मधील सगळे म्युझियम बघण्यासारखे आहेत. तिथला हाईड पार्क तर खूपच छान. तिथून निघावेसे वाटत नाही. एकूणच संपूर्ण इंग्लंडमध्ये प्रदूषण पातळी खूप कमी. तिथले मत्स्यालय बघितले, खूप छान राखले आहे.

लंडनच्या थेम्स नदीवरील क्रूज जहाजाची सफर खूप आल्हाददायक होती. तसेच दुमजली (डबल डेकर) बसच्या टपावर बसून लंडन शहर बघण्याची मजाच काही वेगळी होती. ट्रॅफलगर स्क्वेअर पण असेच तासन तास बसून राहण्याचे ठिकाण! लंडन मधले मॅडम तुसाद म्युझियम पण खासच आहे. आमच्या एकूण वास्तव्यात तिथे बाहेर फिरतांना आम्हाला कधीही वर्णभेद वगैरेचा प्रकार दिसला नाही किंवा तसा सामना करावा लागला नाही. एरवी दुपारी रीडिंगच्या गल्लीतून फिरतांना अगदी वर्दळ कमी असते. एखाद दुसराच माणूस रस्त्यावर दिसतो. कौलारू घरांच्या रंगांच्या मधल्या रस्त्यावर रांगेने कार लावलेल्या दिसतात. लंडन आणि रिडींग मध्ये बाईक वापरताना कुणी क्वचितच दिसतं. शक्यतो कुणी दुचाकी वापरतच नाहीत. एखाद्या घरात खिडकीतून सहजपणे नजर गेली असता एखादी एकटी वृद्ध व्यक्ती टीव्ही बघते आहे आणि बाजूच्या टेबलावर मांजर बसलेलं आहे असं दृश्य बरेचदा दिसतं.

एकूण तिथली सलून महाग. भारतीय 700 ते 800 रुपयांत एक वेळा कटिंग करता येते. तसेच तिथल्या भारतीय हॉटेलमध्ये बुफे जेवण करायचे तर 800 ते 900 भारतीय रुपये मोजावे लागतात.

रीडिंग मध्ये किराणा दुकानांमध्ये भारतीय किरण्याचे पदार्थ, फळे आणि भाज्या मिळतात. आम्ही वर्षभर घरी भारतीय जेवण बनवून खाल्ले. आम्हाला कुणालाच पिझा, बर्गर, सँडविच, बियर वगैरे तत्सम सवयी लागल्या नाहीत. काही किराणा दुकानांत आंबे सुद्धा मिळतात, अर्थात आयात केलेले! रिडींग मधील भाजी बाजारात आपल्याकडची बहुतेक भाजी आणि फळे मिळतात!

रिडींगमध्ये इलेक्ट्रॉनिक व इतर वस्तूंसाठी अर्गोस स्टोर, ओरॅकल मॉल तर जीवनावश्यक वस्तूसाठी सेन्सबरी, आसदा आणि कपड्यांसाठी प्रायमार्क अशी दुकाने होती. सेन्सबरी मध्ये कोणत्यातरी कंपनीचे पत्रटी डब्यातले उकडलेले कॉर्नचे दाणे मिळायचे. खूपच भारी चव लागायची! एक विशेष गोष्ट जाणवली की तिथे कडाक्याची थंडी असूनही लोक मस्तपैकी आईस्क्रीम खात असतात!!

रिडींग शहरात एक हिंदू मंदिर पण आहे. तिथे सर्व देव देवता आहेत. मंदिर चांगले मोठे आहे. तिथे महाप्रसाद पण आयोजित केला जातो अगदी आपल्या भारतातील मंदिरांसारखा!

रिडींगचा भरपूर पाने असलेला स्वतःचा एक न्यूजपेपर "रिडींग पोस्ट" निघतो, तो सगळीकडे फ्री वाटला जातो. रिडींग शहरातली लायब्ररी सुद्धा फ्री होती आणि एकाहून एक सरस अशी इंग्रजी आणि मराठी पुस्तके सुद्धा उपलब्ध होती. होय, मराठी पुस्तकांसाठी वेगळा विभाग सुद्धा होता. तिथे मी कधीही न पाहिलेली ऐकलेली अशी मराठी पुस्तके वाचायला मिळाली जसे - फरासी प्रेमीक तसेच लेडीज कुपे. सिडनी शेल्डन या लेखकाची प्रथम ओळख मला तिथेच झाली आणि त्याची बरीच इंग्रजी पुस्तके मी तिथल्या लायब्ररीतून वाचली. ब्रिटिश माणूस वाचनप्रिय आहे हे मला जाणवले आणि आवडले. तिथे ट्रेन, बस आणि गार्डन मध्ये कादंबरी वाचताना लोक दिसून येतात, त्या मानाने भारतात वाचनाचं महत्व कमी झाल्याचे वाटते!

रिडींगमध्ये भरपूर मराठी माणसे रहातात. ऑफिसच्या सहकाऱ्यांव्यतिरिक्त इतर दोन भारतीय कुटुंबांशी (मराठी) ओळख होऊन त्यांचेकडे एक दोनदा भोजनासाठी जाण्याचा योगही आला. मात्र लंडनच्या रस्त्यांवरून सहजपणे फिरतांना लक्षात आले की तिथले काही कायम वास्तव्यास असणारे भारतीय आणि स्थानिक ब्रिटिश लोक हे आपल्याला खोटी खोटी प्लास्टिक स्माईल देतात. जास्त ओळख वाढवत नाहीत.

सरासरी ब्रिटिश माणूस किंवा स्त्री भारतीयांपेक्षा उंच असतात. उन्हाळा सुरू होताच तिथे नव्या पिढीतील स्त्रिया, मुली अंगावर फारच कमी कपडे घालतात आणि तशाच सहजगत्या बाहेर फिरत असतात. एकूणच तिथल्या स्त्रीचं सौंदर्य काही वेगळंच! इंग्लंडमध्ये बाऊनमाऊथ हा न्यूड बीच आहे पण जाण्याचा योग आला नाही. साधारणपणे असा अनुभव आहे की, आपण काही काळासाठी वास्तव्यास गेलेले भारतीय लोक तिथल्या उन्हाळ्यात सुद्धा थंडीचे कपडे घालून फिरतो कारण तिथल्या उन्हाळ्यातले तापमान आपल्याकडच्या हिवल्यारल्या तापमानाएवढे असते. टायटॅनिक मधली अभिनेत्री केट विन्सलेटचे आजोळ रिडींगलाच आहे. आम्ही होतो तेव्हा ती तिथे एकदा येऊन गेली होती पण तिला प्रत्यक्ष बघितले नाही.

एका वर्षाचेच वास्तव्य असल्याने आणि आम्हाला पैशांची सेव्हिंग करायची असल्याने आणि त्याच्या आधारे भारतात घर घेण्यासाठी पैसा हवा असल्याने आम्ही जास्त पर्यटन केले नाही. तिथे अनेक वर्षांपासून रहात असलेले आमचे काही भारतीय सहकारी फ्रांस, स्वित्झर्लंड, स्कॉटलंड येथे जाऊन आले पण त्यासाठी पैसा भरमसाठ खर्च होतो. इंग्लंड ते फ्रांस डायरेक्ट रेल्वेने जाता येतं आणि या रेल्वे मार्गाचा बराचसा भाग चक्क समुद्रखालून असलेल्या बोगद्यातून जातो म्हणे!

एकूणच इंग्लंड मधील वास्तव्याचा अनुभव खूपच अविस्मरणीय होता.

- निमिष सोनार, पुणे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लंडन प्रेमात पडावे असेच शहर आहे. UK मधिल समर (उन्हाळा) मस्त असतो. जरा तापमान 30C च्या वर गेले की मेट्रो पेपरमध्ये बातमी होते इंडियन समर होणार आहे. ब्रिटिश लोक इतके वर्षे राज्य करुन आणि भारत स्वतंत्र होऊन सुद्धा भारतातील उन्हाळा विसरत नाहीत.

नवऱ्याचे वास्तव्य लंडन नजीकच्या स्विंडन जवळ होते. तोही तिकडे एका वर्षासाठी होता.
तो एका वर्षाच्या वास्तव्यात फक्त एकदा (च ) जीवाचं लंडन करून आला.
तिकडे जमेल तितके पैसे वाचवणे हा उद्देश आणि मुळातच पैसा खर्च करण्याची आवड नसल्याने तो कुठेही गेला नाही.
तो प्रागला (prague) ही तीन वेळेस जाऊन आला. तिकडून switzerland तर अगदी जवळ होतं पण तो कुठेच गेला नाही.
मी त्याला म्हणत असते मी तूझ्या जागी असते तर नक्कीच फिरून आले असते.

आपल्या लेखामुळे त्या आठवणी जाग्या झाल्या.

मी_रुचा अगदी खरे आहे. 1 वर्ष जरी राहिले तरी होम लोन खूप लवकर फिटते. त्यामुळे बायकोने मुलांसाठी करियर ब्रेक घेतला तरी परवडते.

होय रुचा, लेख म टा च्या पुरवणीत आला होता! जागेअभावी त्यांनी बरीच काटछाट केली होती.