शिवी 'गाळ'

Submitted by निमिष_सोनार on 23 December, 2020 - 11:44

लेखाच्या सुरुवातीला काही प्रसंग सांगणे आवश्यक आहेत. खालील प्रसंगातील नावे बदलली आहेत. जिथे जिथे ××× आहे, तिथे तिथे त्याऐवजी तुम्ही एखाद्या शिवीची कल्पना करा.

प्रसंग1:

खासगी कंपनी. अमोल लॅपटॉपवर काम करत आहे. खूप वर्क लोड आहे. तो आपला सहकारी विनितशी एका ऑफिसच्या कामासंदर्भात चॅट करतोय. तेवढ्यात चॅट विंडोवर सिनियर कस्टमरपैकी एक असलेला हरमित त्याला मेसेज पाठवतो.

"काल सांगितलेला रिपोर्ट पाठवला नाही का अजून? कालच रात्री पाठवायला सांगितला होता ना? उशीर का झाला?"

हरमितच्या नावापुढे लाल डॉट दिसत होता म्हणजे तो आधीच दुसऱ्या मिटिंग किंवा कॉन्फरन्समध्ये असणार आणि ते अटेंड करता करता त्याने आठवण येऊन अमोलला मेसेज पाठवला असणार.

आजकाल खासगी कंपनीत भरपूर वर्कलोड असतो. मल्टी टास्किंग (एकाच वेळेस अनेक कामं) करावी लागते.

(अरे बापरे, आधीच इतकी कामं आहेत आणि ह्याला आता रिपोर्ट अर्जंट पाहिजे, मनात अमोल चरफडला आणि हरमितला काय उत्तर द्यायचे याचा विचार करू लागला. खूप वर्कलोडमुळे अमोल आधीच नाराज होता.)

मग त्याने आपल्या मनातील खदखद विनितसोबत व्यक्त करायचे ठरवून टाईप करू लागला.

"क्या यार ये ××× हरमित, रिपोर्ट मांग रहा है, उस ××× को समझ नहीं आता क्या, हम लोग आदमी है के गधा मजदूरी करने वाले जानवर?"

टाईप करून त्याने मेसेज सेंड केला आणि डोक्याला हात लावून विनितच्या प्रतिक्रियेची वाट बघू लागला.

बराच वेळ विनितची प्रतिक्रिया आलीच नाही....

कशी येणार?

कारण घाईगडबडीत सगळ्या चॅट विंडो एका खाली एक असल्याने तो मेसेज अमोलकडून विनितऐवजी चुकून पुन्हा हरमितलाच पाठवला गेला. अमोलचे पुढे काय झाले किंवा काय झाले असावे हे वाचकांवर मी सोपवतो. इथे अमोलचे नेमके काय चुकले याचा विचार करा!

प्रसंग2:

पावसाळा. खड्डे. चौकात ट्राफिक जाम. सगळ्यांना घाई. पण कोणत्याच वाहनाला पुढे सरकायला जागा नाही. ट्राफिक पोलीस पण उपलब्ध नाही.

मग एक जण (त्याला आपण राजीव म्हणू) वाहनातून उतरून परिस्थितीचा आढावा घेतो आणि जिथे गॅप असेल तिथून वाहनचालकांना आपली वाहने काढण्यास मदत करू लागतो.

एका कारमधला ड्रायव्हर (दिलीप) त्याचे ऐकतच नाही आणि त्या माणसाच्या सांगण्यानुसार त्याची कार बाजूला घेतच नाही. मग राजीव संतापतो आणि दिलीपला म्हणतो, "ए ×××च्या, घे ना तुझी ××× गाडी थोडी मागे? कानात ××× घातलंय का? ऐकू कमी येतंय का?"

शिवीगाळ ऐकून दिलीप खाली उतरतो आणि दोघांत बोलचाली होऊन एवढी जुंपते की ते एकमेकांचे शर्ट फाडतात, पोलिसांना बोलवावे लागते. ट्राफिक आणखी जाम होतो. इथे कुणाचे चुकले? काय चुकले? याचा निर्णय मी वाचकांवर सोपवतो.

वरील दोन्ही प्रसंगात तुम्ही ××× ऐवजी त्या प्रसंगाला साजेशा शिव्या सहजासहजी आठवू शकलात? मी आशा करतो की याचे उत्तर "नाही" असे आहे.

दोन्ही प्रसंग आपल्याला एकच गोष्ट सांगतात. शब्द जपून वापरावे. शिवीगाळ करूच नये. कितीही राग, चीड आणि संताप आला तरीही! जसे चाळणीतून आपण अनावश्यक गोष्टी गाळतो तशी शिवी आपल्या नेहमीच्या बोलण्यातून गाळावी. शिवी समोरच्याला चीड आणते आणि त्याचे पर्यावसान काय होईल सांगता येत नाही. केवळ शिव्या दिल्या गेल्याने साधी भांडणं मोठ्या भांडणात रुपांतरीत होऊन नंतर गंभीर गुन्हे घडल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

बरेचजण मला म्हणतात की, दोन मित्र एकमेकांना शिवीगाळ करून जोपर्यंत संबोधत नाहीत तोपर्यंत ते एकमेकांचे खरे मित्र नाहीतच. पण मी हे विधान पण मान्य करत नाही. कधीही नाही.

माझे अनेक मित्र आहेत जे एकमेकांना शिवी देऊनच संबोधतात पण मी मात्र तसे कधीही करत माही आणि त्यामुळे आमच्या मैत्रीत कधीही बाधा आली नाही. शिवी देणे घेणे असा मैत्रीचा विचित्र निकष असूच कसा शकतो? आधी त्यांनी मला तसे गंमतीत संबोधले आणि मीही तसेच करावे अशी ते अपेक्षा करत राहिले पण मी कधीही त्यांना उलटून उत्तर देताना शिवी वापरली नाही. त्यामुळे मग त्यांचे हळूहळू माझ्याशी बोलताना शिवी वापरणे पूर्णपणे बंद झाले.

मित्रा मित्रांमध्ये एखादवेळेस समजू शकते, पण अनोळखी माणसाने किंवा शत्रूने दिलेली शिवी कुणीही सहन करणार नाही. समोरचा त्याला प्रत्युत्तर देईलच.

आपले कार्यक्षेत्र कोणतेही असो, वय कितीही असो परंतु शिवी देऊन बोलणे किंवा अपशब्द वापरणे हे केव्हाही टाळणेच योग्य असते. आपण नेहमी सकारात्मकतेवर बोलतो, सकारात्मक विचार केले पाहिजे असे म्हणतो आणि दुसरीकडे शिव्यांचे समर्थन पण करतो?

एखादे वेळेस मनात काही नसतानाही केवळ शिवी वापरण्याची "सवय" असल्यामुळे ती नकळत बोलली जाते आणि सगळ्या गोष्टींवर पाणी फिरू शकते. होत्याचे नव्हते होऊ शकते!

बरेचजण शिवीचे समर्थन असे करतात की, शिवी हे मनात दबलेली निराशा बाहेर काढण्याचे साधन आहे. पण हे समर्थन माझ्या मनाला तरी पटत नाही. मनातली निराशा घालवण्यासाठी इतर खूप विधायक पर्याय आहेत. मनापासून शोधले तर सापडतील!

आता बघू कथा कादंबऱ्या, वेबसीरिज, टीव्ही सिरीयल आणि चित्रपट यांच्यातील वापरलेल्या शिव्या. सेन्सॉर बोर्ड त्याला आक्षेप घेऊन शिवी ऐवजी "बीप" आवाज वापरायला सांगतात.

मग प्रश्न येतो अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा!

त्यानुसार -

"कादंबरीत किंवा सिनेमात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती असतील, अट्टल गुन्हेगार, दारुडे पात्र असेल तर ते लोक शालीन भाषा तर वापरणार नाही ना? तो शिव्या देऊनच बोलेल ना? मग इच्छा असूनही त्याच्या तोंडी लेखकाला शिव्या टाकाव्यात लागतात, अन्यथा मग त्या कथेला अर्थ काय राहिला?" हे म्हणणे सुद्धा एका अर्थाने बरोबर वाटते.

पण तो भाग वेगळा झाला कारण तो सिनेमा आहे खरे आयुष्य नाही. पण तरीही कुठे ना कुठे प्रेक्षकांवर त्याचा परिणाम होत असतोच. कारण शेवटी सिनेमा मध्ये शिवी वापरायला परवानगी दिली तर शिव्या ग्लोरीफाय केल्यासारखे किंवा त्यांचे समर्थन केल्यासारखे होते. नेहमी सिनेमातून दाखवलेल्या वाईट गोष्टी आधी पसरतात, त्यातले चांगले दाखवलेले कुणी अनुकरण करत नाही. मग सिनेमातून आणखी नवनवीन शिव्यांची माहिती होऊन त्या पसरायला वेळ लागत नाही!

आजकाल सेन्सर बोर्ड नमती भूमिका घेऊन सिनेमामध्ये शिव्यांना यांना परवानगी देत आहे. वेब सिरीजला तर सेन्सॉर बोर्ड सुद्धा नसते. त्यात शिव्यांचा भडीमार असलेले संवाद असतात.

याबद्दल विविध व्यक्तींची विविध मतांतरे असतील पण माझ्या मते सिनेमा असो की कथा कादंबरी, फक्त कथेची गरज म्हणून आवश्यक तिथेच आणि तेवढ्याच शिव्या वापरल्या पाहिजेत, तेही "तथाकथित" वास्तववादी वाटावे म्हणून!

पण केवळ परवानगी मिळाली आहे म्हणून आवश्यकता नसतांनाही संवादात भारंभार शिव्या टाकल्या तर त्याला काही अर्थ राहत नाही. अशा गोष्टींमुळे कथा चांगली असूनही क्लासिक, घरगुती कौटुंबिक प्रेक्षक त्या सिनेमापासून दूर राहतो. याचे उदाहरण मला आठवते: Code M या एका वेब सिरीज मध्ये एका पार्टीत एक गुंड व्यक्ती एका बार मध्ये बार टेंडरला "अर्वाच्य" शिवी देतो. तिथे ती शिवी नसती तरी चालले असते असे मला जाणवले.

अशा "अर्वाच्य" शिव्या ज्या आपल्याकडून ऐकवल्या किंवा वाचल्या जाऊ शकत नाहीत, त्या लोक बिनधास्त निर्लज्जपणे कसे काय बोलतात?

आणि अजून एक! इतरांना उठता बसता शिवी देणारी माणसे समोरच्याने त्यांना शिव्या दिल्या की मात्र भडकून हिंसक होतात!! किती विरोधाभास आहे!

आपले पूर्वज नेहमी सांगतात: "शुभ बोल नाऱ्या!" शुभ बोलण्यासाठी आधी शुभ विचार करणे आवश्यक असते. शुभ विचार करण्याची सवय करण्यासाठी आधी मनात सुद्धा शिव्या येता कामा नयेत. मनात कायम शिव्या आठवत असतील तर त्या कधी ना कधी तोंडातून बाहेर पडणारच!!

आजकाल तर शाळा कॉलेजातली मुलं मुली बस स्टॉपवर, खेळताना जर का आपण त्यांच्या गप्पा ऐकल्या तर दर दोन मिनिटाला कोणाच्या ना कोणाच्या तोंडातून शिवी ऐकू येते. हे चांगले लक्षण नक्कीच नाही!

त्या वेळेस "शुभ बोल नाऱ्या" प्रमाणे त्यांना कळकळून सांगावेसे वाटते: तुझ्या बोलण्यातून शिवी "गाळ" पोऱ्या!! (पण तसे सांगायला मन धजावत नाही कारण असे सांगितल्यावर त्यातला एखादा मुलगा उलटून एखादी शिवी देण्याची शक्यता नाकारता येत नाही, "ओ, ××× अंकल, आपलं काम करा, आमच्याकडे लक्ष देऊ नका!") बघा, विचार करा!

("अर्थ मराठी" दिवाळी अंक 2020 मध्ये छापून आलेला लेख)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही ठिकाणी तुम्ही म्हणता तसं शिव्या घालून बोलणं अगदी सामान्य असतं. तर हे काहींच्या बाबतीत असतं. तर काही जण फक्त चिडल्यावरच शिव्या मिसळतात. वाराणसीचे एकमेकांस ओळखणारे लोक म्हणे चिडल्यावर 'आप'ने सुरवात करतात आणि एरवी शिवीने सुरुवात करतात असं वाचलंय.

प्रत्येक शिवी अपमान करण्यासाठी नसते रे, आपल्या भावना व्यक्त करायचे माध्यम आहे ते आयXXX.
- अभिजित बाबा चव्हाण.

मी ही आपत्ती एका प्रख्यात वेब सिरीज-संगीत क्षेत्राशी संलग्न - बद्दल त्यातील एका प्रख्यात अभिनेत्यासमोर व्यक्त केली होती, तो ओळ खीचा आहे- त्याला यात काहीही वाईट वाटले नाही