१. घडी आणि दाढी
तिच्या पांढऱ्या ड्रेसवर समोसा खातांना सॉस सांडतो.
तिच्या समोर बसलेला पांढऱ्या दाढीवाला म्हणतो, "चल आपण डाग धुवून येऊ"
ती: "मला आधी पूर्ण समोसा तर खाऊ द्या आणि.."
(तो तिला बोलू देत नाही)
तो: "चल आधी तुला एका डिटर्जंटच्या ऑफिसमध्ये नेतो आणि डिटर्जंट बनवण्याची प्रक्रिया दाखवतो, ती समजून घेतल्याशिवाय डाग धुतला जाणार नाही!"
ती: "अहो पण तोपर्यंत डाग वाळून जाईल आणि आणखी घट्ट होईल आणि माझ्याकडे..."
(ती सारखी सारखी घड्याळाकडे पाहाते)
तो: "चुप! घडी घडी, घडी मत देख! चल माझ्या सोबत!"
(तो तिला डिटर्जंट बनवण्याची प्रोसेस दाखवतो)
ती: "अहो मी इथलीच कर्मचारी आहे, मला हे डिटर्जंट माहीत आहे! मेरे पास भी घडी है!"
तो: "अच्छा, कौनसी है?"
ती: "टाईमेक्स"
तो: "अच्छा? मेरे पास रोलेक्स है!"
ती: "टाईम तो सही बताती है ना?"
तो: "ये टाईम देखने के लिये थोडी है, ये तो दाग धोने के लिए है!"
(पहले इस्तेमाल करो और फिर टाईम देखकर धो डालो)
***
२. केश "क्वीन"
लांब केस प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे!", परिना टीव्हीवर सांगत होती.
"माहितीये मला, तर त्याचं काय?", टीव्ही बघतांना युक्ती म्हणाली.
"त्याचं असं की हे केशवजीर तेल लाव केसांना. म्हणजे केस गळणं थांबतीलच पण नवीन केसपण पटापट उगायला लागतील!"
"अरे वा, पण मग इतके केस सहन होतील का माझ्या डोक्याला? म्हणजे मला म्हणायचं आहे की इतक्या केसांच्या वजनाने डोकं माझ्या मानेच्या आत दाबलं नाही का जाणार? आणि मला असं बोलत फिरावं लागणार: 'आय एम युक्ती द रोबोट, केसांचं वजन 3 टेरा बाईट आणि केस विंचरायचा स्पीड 4 गिगा बाईट!' मला त्यापेक्षा मला नको बाई ते तेल!"
"अगं असं काय करतेस? एवढे केस नाही वाढणार! आणि आम्ही शाम्पू फ्री देत आहोत सोबत! समजा तसं काही वाटलंच तर हा शाम्पू लाव! वजनदार डोकं हलकं करेल हा शाम्पू!"
"अगं बाई, खर्रर्रर्रच??"
***
३. टूथपेस्ट मसाला
एक माणूस धावत्या रेल्वेच्या डब्यात सकाळी बर्थवर उठून बसला आणि बसल्या बसल्या आपल्या ब्रशवर पांढरे पेस्ट टाकले. मग खिशातून त्याने एक डबी काढली आणि जसे आपण कैरीवर मीठ टाकतो तसे त्या पेस्टवर त्या डबीतले तपकिरी दंतमंजन शिंपडले.
तेवढ्यात बाजूच्या डब्यातून शर्टाला "फूल" लावून आणि एका हातात "काटे" घेऊन विजय देवगण सारखा दिसणारा तिकीट चेकर "गोलमाल गोलमाल" असे गाणे म्हणत म्हणत आणि ब्रिजेश खन्ना सारखे हातवारे करत गोल गोल फिरत फिरत त्या ब्रशवाल्या माणसाकडे आला आणि नवीन गाणे म्हणायला लागला, "चुना चुना, काथा काथा!"
ब्रशवाला माणूस हादरला आणि त्याच्या हातातून ब्रश खाली पडला.
टीसीवर तो माणूस चिडून म्हणाला, "हे काय नवीन आता? त्यापेक्षा गोल माल गाणं बरं होतं की! आणि तिकीट चेक करायचं सोडून चुना काथा काय करत बसलात? आणि माझी पेस्ट कॉम्बिनेशन वाया घालवली!!"
विजय म्हणाला, "अरे, ती पांढरी टूथपेस्ट म्हणजे चुना आहे आणि ती तपकिरी दंत पावडर म्हणजे काथा! आणि तुझे दात त्यामुळे खराब होतील राजा! माझ्याकडे त्याऐवजी एक चांगला उपाय आहे!"
"कोणता उपाय? सिमेंट आणि वॉल पुट्टी लावू का मग दातांना? मी आधुनिक आणि पारंपरिक अशा दोन गोष्टी एकत्र करून तो अनोखा संगम दातांना लावत होतो! आणि तुम्ही काय टीसीच्या कामासोबत कोणत्या नवीन टूथपेस्टची एजन्सी घेतली की काय? साईड बिझिनेस म्हणून?"
"होय! ही घे नवीन हिरव्या कलरची पेस्ट. यात चहापत्ती सहित पस्तीस जडी बुटी आणि अब तक छप्पन मसाले आहेत. यामुळे एकदा याने ब्रश केला तर दात हिरवेगार होतीलच पण आपल्याला चहा प्यायची सुद्धा गरज नाही!"
***
४. "आय्यो" डीन
ती आवेगाने मला म्हणाली, "तुमच्या मिठाला प्रश्न विचारा की त्याच्यात योग्य मात्रेत आयोडीन आहे का?"
मी तर घाबरलोच. म्हणजे आजपर्यंत मी जे मीठ खाल्लं त्यात आयोडीन नव्हतं की काय?
अन्याय आहे हा! घोर अन्याय!
मग मी तडक मिठाची डबी काढली आणि मीठ शिंपडायच्या छिद्रातून ओरडून त्याला जाब विचारलं, "ए खारट मिठा! तुझ्यात आयोडीन आहे का रे?"
मीठ हा प्रश्न ऐकून चवताळलं आणि डबीतल्या डबीत गोल गोल घुसमळून राग व्यक्त करू लागलं आणि मला म्हणलं, "कोणी सांगितलं तुला हा प्रश्न मला विचारायला?"
"ती टीव्हीवरच्या जाहिराती मधली कुणीतरी अभिनेत्री आहे!"
"हो का? मग माझ्याकडून तिला प्रश्न विचार की तिला आयोडीनचा केमिकल फॉर्म्युला तरी माहीत आहे का? आलेय मोठे तुमच्या मिठात हे आहे का आणि ते आहे का विचारणारे!! आणि तिला म्हणावं तिच्या एक तरी सुपरहिट चित्रपटाचं नाव आठवतंय का तिला?"
मी मिठाचा प्रश्न विचारण्यासाठी मान वर करून टिव्हीकडे पाहिले तेव्हा ती मीठ वाली अभिनेत्री घाबरून पळाली होती आणि आता एक नवीन जाहिरात सुरू होती ज्यात आणखी एक अभिनेत्री विचारत होती...
"तुमच्या पेस्टला विचारा त्यात हळद आहे का?"
मग मी टीव्ही बंद केला.
***
५. वरण साखर
आलिया मॅडमची शब्दांचा फेरफार करणारी एक मजेदार जाहिरात पाहण्यात आली, ज्यात ती म्हणते: "दाल से लेकर चिनी तक सब खाना चाहते हो? तो दालचिनी वाला नया टूथपेस्ट इस्तेमाल करो!"
अजून एक लक्षात आले की या जाहिरातीचे मराठी चॅनेल्ससाठी भाषांतर (डबिंग) करायचे तर? शक्यच होणार नाही!
करून पाहा बरं!
वरणसाखर?
***
६. झिंगाट झिनझिण्या
कार्यक्रमात ब्रेक होतो.
टूथपेस्टची जाहिरात लागते.
एक जण फळ खातो आणि त्याच्या दातांना झिणझिण्या येतात....
त्यामुळे त्याचा चेहरा वेदनेने वेडावाकडा होतो....
पाच मिनिटं, दहा मिनिटं होतात.
झिणझिण्या तशाच.
टीव्ही स्क्रीनवरचा चेहराही तसाच.
चेहऱ्यावरच्या सुरकुत्या मोजता येऊ शकतील इतका वेळ तो चेहरा स्क्रीनवर दिसत रहातो.
ही जाहिरात टूथपेस्टची आहे की चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवण्याचा क्रीमची आहे असा संभ्रम पडायला लागतो.
त्या माणसाच्या दातांच्या झिणझिण्या दूर होतील की नाही माहिती नाही, पण ती जाहिरात बघून मेंदूला मात्र झिणझिण्या यायला सुरुवात झाली आहे कारण अजूनही ती जाहिरात संपली नाही आहे!
चॅनेल पण बदलता येत नाही आहे आणि टीव्ही पण बंद होत नाही आहे.
जाहिरात पूर्ण झाल्याशिवाय आता जागेवरून पण उठता येत नाही आहे.
डोळे पण स्विच ऑफ करता येत नाही आहेत. डोळे जखडले आहेत.
वाचवा!
***
७. ठोसर पेस्ट
हिरो आला आणि त्याने व्हिलनच्या तोंडावर ठोसा मारून त्याचे दात पाडले हा सीन टीव्हीवर एका चित्रपटात सुरू होता आणि खाली लगेच एक जाहिरात आली: "दातांच्या समस्यांना ठेवा दूर, आमची टूथपेस्ट वापरा!"
उगाच नाही जाहिरातीला पासष्टवी कला म्हणत!!
***
८. स्वच्छ पोष्टर
"ते बघ स्वच्छ शहर, आपलं शहर!"
"कुठे आहे? मला तर कचरा दिसतोय!"
"अरे कचऱ्याकडे नाही बघायचं!"
"मग कुठे बघायचं?"
"जिकडे तिकडे भिंतींवर लिहिलेले स्वच्छतेचे पोश्टर दिसत नाहीत का तुला?"
"ते होय?"
"हो तेच!"
"पण त्या पोश्टरच्या बाजूला जे कचऱ्याचे ढीग आहेत ते?"
"त्याकडे दुर्लक्ष करायचं! ते जणू नाहीतच असे समजायचे!"
"पण असं कसं?"
"हो! तसंच! कल्पनाशक्ती वापरायची!"
"वापरली!"
"गुड बॉय! दिसतंय ना आता स्वच्छ शहर, आपलं शहर?"
"दिसलं!"
"मग चला, निघा आता!"
***
९. अगर तुम ना रहोगे...
आजकाल टीव्ही लावला की हमखास खालील वाक्य ऐकू येतं: "मान लो, कल को अगर आप नही रहें तो आपके बच्चो की स्कूल फिस कौन भरेगा? अरे अब तो करवा लो टर्म इन्शुरन्स, पॉलिसी दरबार डॉट कॉम से!"
आधीच सध्याच्या वातावरणामुळे घाबरलेल्या जनतेला आणखी घाबरवण्याचे काम तो दरबारी माणूस सोफ्यावर बसून रोज न चुकता करत होता. एकदा त्या अतरंगी हेयरस्टाईल असलेल्या पॉलिसीवाल्या माणसाचा, त्या तिन्ही मित्रांना खूप राग आला, ते चिडले.
मागच्या खिडकीतून चढून ते तिघे पॉलिसीवाल्याच्या घरात चुपचाप शिरले आणि त्याच्या सोफ्यामागे गेले, त्याच्या अंगावर चुपचाप चादर टाकली आणि त्याला उचलून घरी आणलं. मग त्याच्या अंगावरची चादर काढली आणि त्याला तिघांनी खुर्चीवर दोरीने बांधून ठेवलं.
मकरंद अनासपुरे: "कशाला रोज टिव्हीवर येऊन रोज आमचं डोकं खातोस रे? कशाला घाबरवतोस आम्हाला? वाजवू का? कानाखाली?"
पॉलिसी दरबार: "तुम्हाला घाबरवायचे मला पैसे मिळतात! सोडा मला. पॉलिसी दरबार मध्ये हजेरी लावायला जायचंय मला! सोडा मला!"
अशोक सराफ: "किती वेळा सोडा मागतो रे हा? सोडा तर बिलकुल देऊ नका याला! मला एक सांग पॉलिसीवाल्या, तू स्वतः किती पॉलिसी घेतल्या रे पॉलिसी दरबार मधून? आलाय मोठा लोकांना शहाणपणा शिकवायला? व्याख्या विखी वाख्खा!"
पॉलिसी दरबार: "मी एकही पॉलिसी नाय घेतली. कोल्ड्रिंकचे जाहिरात करणारे हिरो हिरोईन स्वतः कधी कोल्ड्रिंक पितांना पाहिले का? मग मला कशाला पॉलिसी घ्यायला सांगता? मला तर बाल बच्चे पण नाही. माझं लग्न पण नाही झालं!"
भारत गणेशपुरे: "मग आम्हांले शहाणपणा काहून शिकवतो रे?"
पॉलिसी दरबार: "अरे, सोडा मला, मी तर छोटासा नन्हासा प्यालासा राजपाल यादव आहे. मी पॉलिसी दरबारचा वेश घालून सोफ्यावर बसतो!"
मकरंद अनासपुरे: "च्यायला, आसं हाय व्हय? तू रस्ता चुकला का काय? तुझी प्रियदर्शन वाट पाहतोय, चल व्हय तिकडं हेरा फेरी करायला! तरीच म्हणतो मी, सुनील शेट्टीच्या आवाजात "कबिरा स्पिकिंग" म्हणत मला प्रियदर्शनचा फोन येऊन गेला तीन चार येळा, की तू फरार झालाय म्हणून!"
(मी पॉलिसीच्या विरोधात नाही, पण लोकांना एकसारखे पॉलिसीच्या नावाखाली मृत्यूचे भय दाखवून घाबरवून सोडण्याची जाहिरात वाल्यांची जी पॉलिसी आहे त्याच्या विरोधात आहे!)
***
मजेदार लिहिलय..
शेवटची जाहिरात भारीच...माझी लेक तर, पॉलिसी दरबार वाला शेवटचे वाक्य बोलायच्या आधीच म्हणते "महंगा नहीए" !
आय्यो डीन ....हहगलो
आय्यो डीन ...
! ही घे नवीन हिरव्या कलरची
! ही घे नवीन हिरव्या कलरची पेस्ट. यात चहापत्ती सहित पस्तीस जडी बुटी आणि अब तक छप्पन मसाले आहेत. यामुळे एकदा याने ब्रश केला तर दात हिरवेगार होतीलच पण आपल्याला चहा प्यायची सुद्धा गरज नाही!">>>>
हे मस्त होते