बबन्या

Submitted by सांज on 20 December, 2020 - 07:25

बबन्या. खूप उनाड. तसं त्याचं बरं चाललंय. त्याचा मजूर बाप त्याला कानफाट्या म्हणतो. बबन्या बारावी काठावर पास आहे. आता त्यानं तालुक्याला काॅलेजात ॲडमिशन घेतलेलं आहे. आर्ट्स ला. तिथे तो अधून-मधून फारच बोअर झालं तर जातो. एरवी तो एकतर उनाडक्या करत असतो नाहीतर शेतावर मजूरी करायला जातो. मिळालेली मजूरी साठवून त्याने पहिल्यांदा काय केलं असेल तर एक सुमार स्मार्टफोन विकत घेतलाय. आता दिवसभर त्याचं व्हाट्सॲप, फेसबूक, इन्स्टाग्राम, यू-ट्यूब इ.इ. चालू असतं. यातल्या सगळ्यांचं स्पेलिंग अजून त्याचं पाठ व्हायचंय. पण त्याने फरक पडत नाही. नेट पॅक संपत आला की तो परत मजूरी करायला जातो आणि नेट पॅक मारतो. फावल्या वेळात पानपट्टीवर बसून नवीन-नवीन गुटखे ट्राय करत घोळत्यात बसून फोनवर टीपी करतो. अधून-मधून गावातल्या दादा, भय्यांच्या मागे मागेही करतो. काही दिवसांपूर्वी पर्यंत त्याच्या शहरातल्या कुठल्याशा मामाने सुचवल्याप्रमाणे त्याला पीएसआय-एसटीआय व्हायचंय असं तो सांगत फिरायचा. पण आता तिथे रिझर्व्हेशन कमी-जागा कमी-स्पर्धा जास्त-वशिला लागतोच असं काहीतरी सांगत त्याने त्याचा मोर्चा सेकंड हॅंड सिक्स सिटर विकत घेऊन व्यवसाय सुरु करावा या विचाराकडे वळवलाय. त्याप्रमाणे फेसबूक मधून वेळ मिळाला कधी तर तो मित्राच्या भावाची रिक्क्षा शिकण्याचा प्रयत्नही करतोय. सणवार, तिथ्या-पुण्यतिथ्यांना हातात झेंडा घेऊन अमक्या-तमक्याची ‘जय’ करत झिंगायलाही तो अलिकडे अलिकडे शिकलाय. तो राजकीय चर्चाही तशा चांगल्या करतो. पण तोंडात एक-दोन पुड्या सोडल्यावरच. एरवी तसा तो शांतच असतो फोनमध्ये डोकं घालून बसलेला. उदास शायऱ्या, मित्रमंडळाचे फोटोशाॅप केलेले फोटो फाॅरवर्ड करायला त्याला आवडतं. त्याच्या तर्हेतर्हेच्या अस्मिताही आता जागायला लागलेला आहेत. त्याप्रमाणे वेळोवेळी तो तसे स्टेटसही ठेवत असतो. तालुक्याहून परवाच घेतलेला गाॅगल घालून काढलेल्या त्याच्या फोटोला तर भरपूर लाईक्स आलेयत त्यामुळे सध्या तो बराच खुश आहे. दिवसाचा दीड जीबी जपून आणि ‘योग्य’ रितीने वापरण्याचं कसबही आता तो चांगलाच शिकलाय. घरचे एक-दोन वर्षात त्याचं ‘उरकायच्या’ तयारीत आहेत, जेणेकरून तो वाया न जाता ‘सुधारेल’. दोन एकर जिरायती, तीन खोल्यांचं सुमार घर, मजुरी, घेतलीच तर एखादी सिक्स सिटर याच्या जीवावर त्याच्या लोकातली एखादी बरी पोरगी त्याला सहज मिळेल.
उद्या बबन्याचा नेटपॅक संपणार असल्याने आज तो गडबडीने मजूरीवर गेलाय. आज रात्रीच रीचार्ज केला की उद्याचा त्याचा प्रश्न सुटेल.
बबन्या. तसं त्याचं बरं चाललंय सगळं.

~ सांज

https://chaafa.blogspot.com/?m=1

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीये ! Proud असे बबन्या असतात गावोगावी आणी शहरात पण. शहरातले बबन्या तसे लकी असतात बापाच्या जीवावर. हा बबन्या निदान कामे तरी करतोय. Proud

छान कथा. दिवसाच्या कोणत्याही वेळेला असे बबन्या रस्त्याच्या कडेच्या रिकाम्या बाकड्यांवर पिंका टाकत मोबाईलमध्ये डोकं खुपसलेले दिसतात.