अज्ञातवासी! - भाग १९ - वो कौन थी?

Submitted by अज्ञातवासी on 19 December, 2020 - 10:15

भाग १८ -
https://www.maayboli.com/node/77470

"मी इथे आधी आलोय..."
त्या भग्न हवेलीकडे बघत मोक्ष म्हणाला.
"काय?" झोया भांबावली...
"हो, मला ही हवेली प्रचंड ओळखीची वाटतेय."
"कुछ भी." ती हसली.
"नाही झोया. या पडक्या विटांच्या राशी, या पडक्या भिंती, सगळ्यांशी माझं जन्माचं नातं असल्यासारखं वाटतंय..."
झोया चक्रावून गेली.
"मोक्ष, आपण दुसरीकडे कुठे प्रॅक्टिस करायला जाऊयात."
"नाही." मोक्ष गडबडला. "सॉरी, चल सुरू करूयात."
झोयाने गाडीच्या डीक्कीतून बॅग काढली. आणि विविध शस्त्रास्त्रे समोर ठेवलीत.
"लक्षपूर्वक ऐक! जर कुठेही लक्ष विचलित झालेलं दिसलं, तर पुढचीच गोळी तुझ्या डोक्याचा वेध घेईल!" तिने मोक्षकडे रोखून बघितले.
मोक्ष लक्षपूर्वक ऐकू लागला.
"ही रिव्हॉल्वर. सगळ्यात हलकी, सगळ्यात छोटी. हाताळण्यास सर्वात सोपी, पण आता आऊटडेटेड!"
मोक्षने ती हातात घेतली, लक्षपूर्वक हाताळली, व झोयावर नेम धरला.
"मरशील फुकट. तिच्यात गोळ्या नाहीत." झोया कुजकट हसली.
त्यावर मोक्षलाही हसू आवरलं नाही.
"ही तिचीच बहीण, लॉंग बॅरल. ही जरा हाताळायला अवघड, पण हिचा नेम चांगला लागतो."
"ही पिस्तुल. आता आपल्या प्रत्येक पोराकडे ही असते. हाताळायला सोपी, जास्त गोळ्या मावतात. हिच्यात एकदा मॅगझीन टाकली, की गोळ्या संपेपर्यंत चाप ओढत राहायचा. बस!"
मोक्षने ती हातात घेऊन बघितली.
यानंतर झोयाने अनेक प्रकारच्या पिस्तुल दाखवल्या. मोक्ष सगळं लक्षपूर्वक ऐकत होता.
"ही उझी... हिला एका हातात घेऊन चालवायला जिगर लागतं. पण उझी नीट हाताळायला जमली, तर तिच्यापुढे एके ४७. पाणी भरेल."
सर्वात शेवटी तिने रायफली दाखवायला सुरुवात केली.
"ही रायफल क्वीन, एके ४७. ही एकदा सुरू झाली, की सगळं संपलच. मास मर्डरसाठी उपयोगी.
..आणि ही माझी नवीन मैत्रीण. एके १२... हिच्यापुढे कुणीही टिकाव धरू शकत नाही."
मोक्षने दोन्ही रायफली हातात धरून बघितल्या.
"तुला सगळ्या गोष्टींचं शिक्षण मिळेल, पण यातली तुझी डार्लिंग कोणती, हे तू ठरव. जशी अब्बूजानची उझी आहे, माझी ही एके १२, तशीच."
"बाबांची आवडती बंदूक कोणती होती?"
झोया हसली.
"त्यांचं सगळयाच बंदुकांवर प्रेम होतं. एका हातात उझी आणि दुसऱ्या हातात एके ४७ घेऊन एकट्याने नागपाड्यात जाऊन गोळीबार करायची हिम्मत कुणाच्या बापात नसेल..."
मोक्ष तिच्याकडे बघतच राहिला.
"दादासाहेबांनी कायम मला मुलगी मानलं. अब्बूना मला चारचौघींसारखंच वाढवायचं होतं, पण दादासाहेबांनी हट्टाने मला सगळं शिकवायला लावलं.
खान, तुमच्या नंतर हीच माझी सोबती असेल. ते नेहमी म्हणायचे.
चल, मला इमोशनल करू नकोस. ती पिस्तुल आण इकडे."
मोक्षने तिच्या हातात पिस्तुल दिली.
"फक्त माझ्याकडे लक्ष दे."
तिने पिस्तूलात मॅगझीन भरली, चाप ओढला.
आणि धडाधड गोळ्या चालवू लागली...
मोक्ष तिच्याकडे बघतच राहिला...
★★★★★
"शेखावतसाहेब."
"येस."
अप्पासाहेब शेलार आलेत.
शेखावत चरकला. पण त्याने चेहऱ्यावर हास्य आणलं.
"पाठव त्यांना आत."
अप्पा आत आला.
"आप्पासाहेब," शेखावत उठला. "अहो हे काय? आम्ही वाड्यावर आलो असतो. या, या. बसा..."
अप्पा बसला.
"शेखावतसाहेब, सहा भुतांपैकी तुम्ही एक. तुमचा मान आमच्यापेक्षाही मोठा."
शेखावत हसला.
"आजकालच्या पिढीला मानापानाची कदर नाही अप्पासाहेब. बस, आपण जुनीच माणसं सगळं पाळतो."
"म्हणजे?" अप्पाने प्रश्न केला.
"उगाच बोलून का तोंड खराब करायचं? जाऊ द्या."
"नाही, शेखावतसाहेब, तुम्ही सांगाच."
"आता हे मोक्ष शेलार, त्यादिवशी त्यांच्या खोलीत त्यांना भेटायला गेलो, तर काय म्हणाले माहितिये?"
"काय?"
"शेखावत, माझ्यावर हल्ला करणाऱ्याला शोधून काढ, आणि मारून टाक. डायरेक्ट एकेरी भाषा."
"अरेरे!" अप्पाने खोटी हळहळ दाखवली.
"अहो हे तर काहीच नाही, म्हणतात आमच्या घरातला माणूस असेल तरीही त्याचं काम तमाम करा."
अप्पा मात्र आता हादरलाच.
"असं म्हणाला?"
"तुमची शपथ, अप्पासाहेब!"
"देवा, महादेवा."
"अप्पा, तसाच निघून आलो. तेव्हापासून कानाला खडा लावला, शेलरांच्या भानगडीत पडायचं नाही."
अप्पाचं काळीज हलल्यासारख झालं. तो सावरून म्हणाला.
"शेखावतसाहेब, असं कसं. आता खुर्चीचा वारसदार ठरवायला तुम्ही यायलाच हवं ना?"
"म्हणजे?"
"म्हणजे मीटिंग घ्यायला नको?"
"अहो, पण मोक्षच वारसदार होईल ना? बापाकडून पोराकडे, असंच चालत आलंय." शेखावत साळसूदपणे म्हणाला.
"अहो, त्याला कशाचीही चाड नाही. बापाचं सुतक फिटत नाही, तोवर हा अमेरिकेला जाऊन पळाला. दादाला काय वाटलं असेल." अप्पा हळहळत म्हणाला.
"भोग असतात." शेखावतनेही हळहळ दाखवली.
"म्हणून आता, संग्रामच... किंबहुना दादासाहेबांनाही तोच जवळचा होता सर्वात जास्त. कायम दादाची सावली म्हणून वावरला, आताही सावली म्हणून काम करेन."
"बरं." शेखावत सुस्तपणे म्हणाला.
"बरं?" अप्पाची नजर शेखावतवर रोखली गेली.
"कुणीही होवो खुर्चीचा वारसदार, आम्ही त्याचे ताबेदार." शेखावत हसला.
"नाही, संग्राम म्हणतोय, शेखावतकाकांचा आशिर्वाद घेतल्याशिवाय खुर्चीवर बसायचं नाही."
शेखावत उठला.
"अरे मोतीराम, साहेबांना चहा आण..."
अप्पाही उठला.
"आशीर्वाद आहेच." शेखावत हसला. "चला एक मीटिंग आहे. चहा घेतल्याशिवाय जाऊ नका."
शेखावत तिथून निघून गेला.
अप्पा शेखावतकडे बघतच राहिला.
आणि त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलं...
★★★★★
जुलैलाच्या हवेलीसमोर कॉन्टेसा थांबली.
तिथलाच एक पोऱ्या धावत माडीवर गेला.
"जुलैलाबाई, दादासाहेब आलेत."
निवांत बसलेली जुलैला खडबडून सावरली, आणि तिने पदर नीट केला.
दादासाहेब आणि खानसाहेब तेवढ्यात समोर आले.
"दादासाहेब, तकलीफ का केली? आम्हाला हुकूम केला असता, जी हवी ती मुलगी..."
दादासाहेबांनी हात वर केला.
जुलैला थांबली.
त्यांनी शेजारची खुर्ची ओढली, व जुलैलाकडे रोखून बघू लागले.
जुलैला भेदरली...
अनेक क्षणांनी त्यांचे शब्द असह्य शांतता चिरत गेले...
"वो कौन थी????"

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त खिळवून ठेवणारा भाग!
शस्त्रास्त्रांची बरीच माहिती मिळाली. Happy
आता पुढील भागात कळायला हवे ' वो कौन थी ' !

अहो इतकी वाट पहिली या भागाची आणि इतका छोटा भाग..
ये तो बहुत नाइंसाफी है..
भारीच उत्कंठावर्धक चालू आहे कथा..

ओह आज शनिवार नाही का...आतापासून आठवण करून दिली म्हणजे रात्रीपर्यंत भाग येईल Happy