ती

Submitted by रिना वाढई on 15 December, 2020 - 09:07

पारिजातकाची फुले , त्याचा सुगंध नेहमीच तिला वेडं लावत होत . खाली पडलेली फुले वेचून ओंजळीत घ्यावी आणि त्याच्या अंगावर त्या फुलांचा वर्षाव करावा . सांज वेळ , सगळीकडे दरवळणारा तो पारिजातकाचा सुगंध ... तिच्या मांडीवर झोपलेला तो , त्याच्या कुरळ्या केसांतून हात फिरवणारी ती . अगदीच दूरपर्यंत नजरेस कुणी दिसणार नाही असं स्थळ . कदाचित हेच जीवनातले काही अमूल्य क्षण असावे . जे दोघे एकमेकांसोबत घालवत होते . हिवाळ्याचे दिवस असल्याने जरा लवकरच अंधार पडण्यास सुरुवात झाली , खाली गवतांवर धुके जाणवू लागले . दिवस मावळला आणि एकमेकांची साथ हि आता संपणार होती . या क्षणी तिला त्याच्याबद्दल जे वाटत होते ते शब्दांत मांडता येणारे नव्हतेच . कोणीतरी सांगावे या निसर्गाला कि कधीतरी तू स्तब्ध राहत जा .. तो जवळ असताना असा उगाचच माझे क्षण हिरवण्याचा तुलाही अधिकार नाही . त्या मावळणाऱ्या सूर्याच्या गोळ्याला तू साद घालू नकोस . एक दिवस हा क्षण असाच राहू दे . उरी असलेले प्रेम जरा माझे ओसरू दे . हे मावळलेले क्षण मला तू परतुनी दे .
वेळेत घरी जायला पाहिजे ... त्याच्या शब्दाने ती भानावर आली . हो म्हणून दोघेही उठले .
आज काहीतरी भेट द्यायची आहे तुला .
काय ?
भेट काय आहे हे सांगायचं नसते म्हणत तो तिच्या जवळ गेला .
आकशातून फिरून पाखरेही आपल्या घरट्याकडे जायला निघाली . वेळ आता खरचं परतायची होती . पण त्याच्या त्या शब्दाने ती थांबली , ती हि त्याच्या कुशीत जाण्यासाठी आतुरली होती . आज दोघेही एकमेकांच्या मिठीत विसावणार होते . कित्येक वर्षांचा हा विरह आता एकमेकांच्या कुशीत वीरनार होता .तिने आपले डोळे गच्च मिटले ,त्याने आपले दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले . तो, त्याचा पहिला स्पर्श ती अनुभवणार होती, पण लगेच तिचे डोळे उघडले गेले .
पूर्ण रूममध्ये सलाईन ची वास ,समोर हात टेकून बसून असलेला तिचा नवरा शौर्य आणि त्या बेडवर एक निर्जीव असलेला तिचा शरीर . ज्यामध्ये भावना तर होत्या मात्र त्याही निर्जीव.... तिच्यासारख्याच . रोज ती अशेच एक ना एक स्वप्न बघायची आणि जेव्हा डोळे उघडायचे तेव्हा तिला जाणीव व्हायची कि आपण आज हि अशाच एका स्वप्नामध्ये रमलो होतो . ४० वर्षांपासून तिने असं एक स्वप्न बाळगलं होत , जे तिलाही माहित होत कि त्या स्वप्नाला काही अस्तित्व नाही . वयाची साठी नुकतीच ओलांडली होती आणि आजाराने ग्रासून घेतलं होत . ४० वर्षे सुखाने संसार केल्यावर आता जगायची फार इच्छा उरली नव्हती . कदाचित सगळी कर्तव्ये पार पडली आणि ज्या वयात लोक स्वतःसाठी जगतात ते वय हि तिला नको होत . संसाराच्या नावेवर बसतांना त्यात त्याची सोबत नव्हती, पण जो सोबती होता त्यानेही आपली कर्तव्ये पार पाडलीच होती . शौर्यला तीच मन वाचता येत नसलं तरी तिला कशाची कमी आयुष्यभर त्याने होऊ दिली नव्हती . पण मनातल्या कमीपणाचं काय ???? जे कोणाला सांगूनही कोणी देऊ शकणार नाही आणि वाटूनही आपण मिळवू शकणार नाही . काही अशाच भावना तिने आजपर्यंत जपल्या होत्या . पण वय जस वाढत गेलं तश्या भावनाही जोपासणं कठीण झालं .... आयुष्यभर सगळ्यांचं सगळं करता करता , सगळ्यांची मने जपतांना ती हि आता थकली होती .
कधीही पूर्ण न होऊ शकणाऱ्या अपेक्षा त्याला सांगताना तिला कधीच संकोच वाटला नव्हता . तो हि तिला हसून झेलत आला होताच . कधी कधी वर्षातून एकदा नाहीतर दोनदा भेटणे व्हायचेच त्याला . वाटायचं त्याला जाऊन पटकन मिठी मारावी .... पण ,पण हा शब्द यायचंच समोर आणि मग तीची हि भावना दाबून टाकली जायची .
पण दोघांचं नातं खरचं निर्मळ होत , मैत्री पेक्षा थोडं जास्त आणि प्रेमापेक्षा थोडं कमी ... पण प्रेमापेक्षा काय कमी होत ... फक्त एकमेकांच्या समोर राहणे , दिवसरात्र एकमेकांसोबत बोलणे ... आणि फिजिकल रिलेशन ठेवणे हि प्रेमाची व्याख्या असेल तर हो ... प्रेम नव्हतेच त्यांच्यामध्ये . त्यांच्या प्रेमाची व्याख्या जरा वेगळी होती . वर्षातून एकदा बघितल्यावर मन प्रसन्न होत होते, या जगात आपल्याला जीव लावणार कोणी आहे याची जाणीव होत होती . कठीण प्रसंगी आपसूकच त्याची आठवण होत होती तर सुखाच्या क्षणात तो नाही याचा खेद . महिन्यातून एकदा जरी बोलणे झाले कि वाटायचं अजून काय हवं असत लोकांना जगण्यासाठी . आयुष्यभर दोघांनी एकमेकांप्रती भरपूर आदर बाळगला होता . खरं तर आज हि तिला त्याची खूप आठवण येत होती . स्वप्नात का असेना आज तो तिला आपल्या कुशीत स्थान देणार होता . पण काळाने तो स्वप्न देखील पूर्ण होऊ दिल नव्हतं .
शौर्यने अलगतच तिच्या केसांवरून हात फिरवला . तिला वाटलं कदाचित तिच्या भावना कळल्या असतील त्याला . पण छे आजपर्यंत तर कधी त्याने त्याचा उल्लेख नव्हता केला . तिनेही कधी त्याच्याबद्दल फार सांगितलं नव्हतंच . नातं कितीही निर्मळ असलं तरी आपल्या बायकोच्या मनात दुसऱ्या व्यक्तीला स्थान आहे हे पचवणे नवऱ्यांसाठी जरा अवघडच असेल ना . पण आज या क्षणाला तिला वाटून गेलं कि त्याला भेटायची इच्छा सांगून टाकावी ...
शौर्यने तिला उठवलं , थोडं तिला भरवल्यावर तो हि अजून तिच्या समोर बसला . आयुष्यभर त्यानेही भरभरून प्रेम केलं होत तिच्यावर .तिचे शेवटचे दिवस आपल्यापेक्षा आधीच येतील असं शौर्यला कधीच वाटलं नव्हतं . पण नियतीसमोर कोणाचं काय चालणार . बोलायची शक्ती सुद्धा कमी झाली होती तिच्यात . नेहमी बडबड करणारी ती , शौर्यला तिला या अवस्थेत पाहणे बरेच कठीण झाले होते . तिला बरं वाटायला पाहिजे म्हणून तो सारखा तिला इकडे तीकडेच्या गोष्टी ऐकवत होता . पण तिने ठरवलं कि आज आपल्या शौर्यला सांगायचं . आयुष्याची कोणती पहाट शेवटची ठरेल याचा नेम नव्हताच .
अ हो ... आज मी तुम्हाला एक गोष्ट ऐकवणार . तुम्हाला आवडेल ... तिच्या या वाक्याने शौर्यला जरा आश्चर्य वाटलं पण तिची इच्छा तो मोडू शकत नव्हता ,म्हणून त्याने हो सांग ना . तसेही किती दिवस झाले तुझी बडबड ऐकून . कान आतुरले आहे माझे म्हणत त्याने आपले पाणावलेले डोळे पुसले .
तिने एक गोष्ट तयार केली आणि त्यातले पात्र मात्र स्वतःच्याच जीवनातले ठेवले . ती आपली च स्टोरी त्याला ऐकवत होती . तिची कधीही पूर्ण न होऊ शकणारी ती इच्छा , तिच्या मनामध्ये असलेला तो , पण मात्र आपल्या नवऱ्याला कधीही दगा न देणारी ती .. किंबहूना तिच्या मनात असलेला आपल्या नवऱ्याविषयीचा एक वेगळा आदर . मात्र मनातल्या खोल दरीत एक त्याच्याविषयी असलेली पोकळ .
शौर्यला कळायला फार वेळ लागला नाही कि ती एक स्टोरी नसून तिचंच आत्मचरित्र आहे .
त्याने तिला विचारलं एवढे दिवस तू माझ्यापासून का लपवलेस , एकदा सांगून बघायची होती , कदाचित तुझं थोडं दुःख तरी कमी झालं असतं
तुम्हाला सांगण्यासारखे काय होते . आताही काही कारण नाहीच पण मन आतून शांत नव्हतं . काहीतरी चुकल्या सारखं वाटलं . तुम्हाला सांगून मोकळं व्हायचं होत . हे ऐकून कदाचित तुम्ही मी गेल्यानंतर त्याच्याशी कधी बोलायचा प्रयत्न करणार नाही .पण आम्हच नातं तेवढच निर्मळ होत जेवढं मला तुमच्याबद्दलचा विश्वास आहे . आज मला मोकळं झाल्यासारखं वाटत आहे . आणि लहानपण ते तरुणपण , आणि आता म्हातारपणं ... वय वाढत गेलं पण त्याच्याबद्दल च्या आठवणी पुसट नाही होऊ शकल्या . कदाचित मी त्या आठवणी मिटू नसेल दिल्या ... उभं आयुष्य मी अशेच जगत आली . त्याच्याबद्दल भावना असल्या तरी कधी तुम्हचा विश्वास तोडण्याची हिम्मत नव्हती झाली , आणि हे हि तितकंच खरयं कि माझ्यापेक्षा मला त्याच्यावर जास्त विश्वास होता कारण तो होताच तसा . मला त्याला एकदा बघता यावं म्हणून दहा प्रयत्न त्यानेही केले असेल पण फक्त माझ्यासाठीच . माझ्या मनात त्याच्याबद्दल कितीही भावना होत्या असतील पण त्याच्या मनात मात्र त्या भावना कधी उतरल्या नाहीच . असो ... तिने आपले म्हणणे नि संकोचपणे आपल्या शौर्यसमोर मांडले होते .
या वयात तर आता तुला रागावून हि फायदा नाही.... तिचे दोन्ही हात हातात घेऊन शौर्यने तिला मिठी मारली .
कदाचित आधी सांगिलती असतीस तर .... तो काहीश्या नाटकीपणाने बोलत होता ...तर काय ह्ह्ह तिने त्याच वाक्य अर्ध्यातच तोडत बोलल . हे पाहून तिला खूप बरं वाटलं कि आपला नवरा खरचं जगातला सगळ्यात समजदार नवरा आहे .
आज मात्र शौर्य ला तिची खूप काळजी वाटू लागली होती . कदाचित तिने आज त्याच्याबद्दल सांगून दाखवले म्हणून ... पण त्याला काहीतरी वेगळं जाणवत होत .. आयुष्याच्या वाटेवर ती त्याला आता कधीही सोडून जाणार हे पचवणे त्याला असह्य होते . त्याने मनातच काहीतरी विचार केला आणि आता रात्र झालीच होती ,तिला शांत झोपवून तो हि झोपायला गेला . दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच उठून त्याने देवाला नमस्कार केला . ती अजून झोपेतच होती . तो तिच्या शेजारी येऊन नेहमीप्रमाणे तिच्या केसातून हात फिरविला , पण आज तीच अंग तापाने फणफणत होत . त्याने तिला उठवलं , आणि तिला बरं वाटावं म्हणून तिच्या कानात "तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे सो लवकर औषधी घे आणि बरी हो म्हटलं ".
सरप्राईज माझ्यासाठी ... आजपर्यंत तर कधी वाटलं नाही तुम्हाला आणि आता एकदम या वयात आणि या अवस्थेमध्ये तिने जरा नाटकीपणात च बोललं .
वयाची मर्यादा असायला हवी का सरप्राईज द्यासाठी त्यानेही त्याच नाटकीपणात बोललं . ठीक आहे बाबा देऊन द्या लवकर सरप्राईज नाहीतर काय सांगायचं , कि मी च तुम्हाला मोठं सरप्राईज देऊन निघून जाणार. तिने हसतच त्याला म्हटलं . पण तीच हे वाक्य त्याला आवडलं नाहीच . त्याने लगेच तिच्या ओठांवर आपले हात ठेवले ,"असं सरप्राईज नको मला .. ज्याचं सेलिब्रेशन करायला तू नसशील . एवढी शांतता मिळेल मला ... आणि समोरचे वाक्य त्याच्या तोंडातून निघणे जड झाले ." अश्रूंनी कधीच आपला ताबा मिळवला त्याच्या डोळ्यावर . तिला आपल्या कुशीत घेऊन तो आपले दुःख लपवू पाहत होता तिच्यापासून .. पण ती आता लहान नव्हती ... आयुष्याचं शेवट होत आलं होत तिच्या . दोघेही एकमेकांना सांभाळण्याचा प्रयत्न करत होते . दोघांनीही आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली होती .
तो स्वतःला सावरत , आज दुपारपर्यंत तुला तुझा सरप्राईज मिळणार .
ती कदाचित समजून गेली कि त्याला काय द्यायचं होत . तिला आपल्या मनातल्या भावना उतरवण्यासाठी नेहमी डायरीची गरज भासायची .
मला आज काहीतरी लिहावंसं वाटतंय तुम्ही मला एक पेन आणि माझी डायरी आणून द्याल का ?
त्याने तिला डायरी दिली आणि तो थोडा वेळ बाहेर गेला .
ती आज खूप दिवसांनी त्या डायरीची पाने रंगवत होती . "शौर्य मला माहित आहे तुम्ही काय देणार आहात मला . काल मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगितले , आणि आज तुम्ही मला सरप्राईज देणार आहात . मला कळले नसेल का . पण मी खरचं खूप आभारी आहे तुमची . माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये तुम्ही मला साथ दिली . हे काय कमी होत कि तुम्ही माझ्या असणाऱ्या त्याच्याबद्दलच्या भावना देखील समजून घेतल्या . आयुष्य कमी पडलं बघा तुमच्यासोबत जगायला . लोक म्हणतात कि नवरा-बायकोच नातं हे सात जन्मासाठी असते .. जर हे खरचं असेल तर मी देवाला प्रार्थना करेल कि मला जन्मच नको देउस . कारण तुम्ही खूप चांगले आहात पण मी मात्र त्याला कधी माझ्या मनातून काढू शकले नाही . आजपर्यंत मी प्रे केलं कि पुढच्या जन्मी मला माझं प्रेम मिळू दे .... पण असो .... मला नेहमी वाटायचं कि तो माझ्या शेवटच्या क्षणी माझ्या जवळ असावं . शेवटची मी त्याला बघू शकेन पण कदाचित एवढं भाग्य नाहीच माझं . माझ्यासाठी त्याच्या डोळ्यात मला स्थान बघायचे होते पण बघा राहून गेले ते ".
तिने एवढं लिहून आपली डायरी उशाशी ठेवली . तापाची गोळी घेतली आणि झोपी गेली ...
शौर्य थोड्या वेळाने आला . त्याला वाटलं कि आज तो जगातली सगळ्यात मोठी भेट देणार तिला . शौर्य ने त्याला काल रात्रीच फोन करून तिच्याबद्दल सांगितलं होत . आणि तिला एकदा भेटायला या म्हणून विनवणी केली होती .
खूप दिवसांपासून संपर्कात नसल्याने त्याला तिच्याबद्दल काहीच माहित नव्हते .तिच्याबद्दल ऐकून मन स्तब्धच झालं . कधी तिला एकदाच भेटतो असं वाटत होत . तो तिच्या खोलीत शौर्यसोबत आला . ती शांत झोपली होती , शौर्य ने तिला आवाज दिला पण त्या आवाजाला प्रतिसाद नव्हताच . शौर्य घाबरून जाऊन तिच्या डोक्यातून हात फिरवून तिला उठवायचा प्रयत्न करू लागला पण ... ती गेली होती कायमची शौर्य ला सोडून .
तो तर फक्त उभा राहून तिला बघत होता . पायाखालची जमीन सरकणे कदाचित यालाच म्हणतात , त्याच्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघू शकत नव्हते . मी येणार माहित असून मला न भेटताच कशी गेली तू असं त्याला वाटायला लागलं . नेहमी मी तूला नाही भेटलो कि तू खूप कासावीस व्हायची . फक्त मला बघण्यासाठी तू तुझ्या सुट्ट्या नेहमी extend करायची . पण माझं नेहमीच होत , मी तुला कधी वेळेवर भेटू शकत नव्हतो . माहित होत कि तू वाट बघत असशील पण तरीही तूला थोडा त्रास द्यायला आवडत होत . तुझ्याकडून जेव्हापर्यंत फोन नाही येणार मी स्वतःहून कधी करत नव्हतो . तुझ्याशी बोलावं वाटलं तरी मनाला आवर घालत होत कारण कुठेतरी आपल्यामुळे अजून तुझ्या मनात ते प्रेम फुलायला नको म्हणून .
पण याचा अर्थ असा नव्हता कि तू अशी अचानक मला न सांगताच सोडून जाशील .मलासुद्धा तुझी शेवटची इच्छा पूर्ण करायची होती , एकदा तुला मिठीत घेऊन तुझं प्रेम तुला द्यायचं होत ... पण नाही जमलं . वाटलं आपण आपल्याच जोडीदाराला दुखावणार म्हणून आपणच आपल्या वाटा वेगळ्या केल्या होत्या . पण तुझ्यासाठी मला एकदा तुला कुशीत घ्यायचं होत . कदाचित ती वेळ आपण म्हातारे झाल्यावर आली असती . पण तू नाही थांबलीस ..... तुझं मन मला कळत असूनही तुझं दुःख मला वेचता येत नव्हतं . पण आज या क्षणी त्या दुःखाची चाहूल माझ्या मनाला झाली आहे . विरह काय असते ते मला भास होत आहे . आजपर्यंत तू माझी वाट पाहत आलीस आणि आज मला अशी प्रतीक्षा करायला लावत आहेस कि माझ्या प्रतिक्षेला अंतच नाही .
तो आपल्या भावना फक्त मनातच व्यक्त करू शकत होता . ती तर आज खूप सुख घेऊन गेली होती .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users