ऑन लाईन लाईफ सर्टिफिकेट ...एक सुखद अनुभव

Submitted by मनीमोहोर on 15 December, 2020 - 03:29

ह्या वर्षाची सुरवातच कोरोनाच्या विळख्याने झाली. चांगल्या चालत असलेल्या जीवन शैलीला खिळ बसली. आयुष्य ठप्प झाल्या सारखं झालं. आम्ही तर आज ना उद्या हा काळोखी बोगदा संपेल आणि प्रकाश येईल ह्या आशेवर मार्च पासून जवळ जवळ घरातच राहून दिवस काढतोय. पण कालचक्र थांबत नाही. बघता बघता दसरा संपला ,दिवाळीचे वेध लागले आणि यजमानांच दरवर्षी नोव्हेम्बरमध्ये सबमिट कराव लागणार लाईफ सर्टिफिकेट ह्या वर्षी बँकेत न जाता कसं सबमिट करायचं ही चिंता मला सतावू लागली. यजमानांच पेंशन ठाण्याच्या बँकेत आणि आमचा सध्या मुक्काम साताऱ्यात यामुळे तर हे काम जास्तच कठीण वाटू लागलं.

कोरोनाच्या काळात जेष्ठांनी बाहेर जाणं, बँकेतल्या गर्दीत मिसळण तस धोक्याचं आहे हे ओळखून ह्या वर्षी online submission ची सुविधा उपलब्ध केली गेलीय. त्या साठीची लिंक ही मिळाली होती नेटवर. पण डिटेल्स बघितले तेव्हा कळलं की त्यासाठी नुसता मोबाईल पुरेसा नव्हता, हाताचे ठसे रेकॉर्ड करणार एक छोटंसं डिव्हाईस ही लागणार होतं जे माझ्याकडे नव्हतं. त्यामुळे तो मार्ग बंद झाला. म्हणजे पुन्हा परिस्थिती जैसे थे.

तशातच पोस्टमन घरी येऊन on line life certificate issue करेल अशी बातमी वाचण्यात आली. ते app डाऊन लोड करून तिथे रिक्वेस्ट पाठवली तर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा असं त्यांचं उत्तर आलं. म्हणजे त्या साठी तरी बाहेर पडावं लागणारच होतं जे
मी कोरोनाच्या काळात टाळत होते. आता बँकेत समक्ष जाण्याला पर्याय नाही ह्या विचारापर्यंत मी येऊन पोचले पण तेवढ्यातच आमच्या एका सुहृदानी एका पोस्टमन चा मोबाईल नंबर दिला आणि पुन्हा बाहेर न जाता life certificate मिळवण्याची आशा पल्लवित झाली.

मी पोस्टमन चा मोबाईल नं डायल केला. जनरली समोरून अश्या कॉलला रिस्पॉन्स येत नाही असा पूर्वानुभव असल्याने तिसऱ्याच रिंग ला पलीकडून हॅलो ऐकून आश्चर्याचा पहिला धक्का बसला. अतिशय सौम्य आणि मृदू आवाजात माझा पत्ता विचारला गेला आणि मला काय काय documents तयार ठेवावी लागतील हे सांगून पुढील दोन चार दिवसांत येतो असे आश्वासन ही मिळाले.

आपल्याला गरज आहे तेव्हा पाच सहा दिवसांनी आपणच परत फोन करू या हया विचारात मी असतानाच दोन तीन दिवसांनी दुपारी दीड च्या सुमारास फाटक वाजलं तर पोस्ट मनच दारात उभा. एकाच कॉल मध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर हजर हा दुसरा धक्का होता. हे माझ्यासाठी अगदीच अनपेक्षित होत त्यामुळे जरा गोंधळूनच गेले मी. पण मास्क, सॅनिटायझर इ. आयुधांनिशी सगळी documents घेऊन आम्ही त्याना सामोरे गेलो. आयत्या वेळी टेक्नॉलॉजी नीट वर्क होईल ना , बोटांचे ठसे नीट मिळतील ना अशी शंका मनात होतीच. त्याप्रमाणे पहिल्यावेळी कुठेतरी गडबड झाली आणि काम झालं नाहीच पण त्यांनी काही ही न बोलता परत सगळं पुन्हा केलं आणि तेव्हा मात्र online life certificate मिळवण्यात यश आलं. पोस्टमनने त्याचा स्क्रीन शॉट ही माझ्या मोबाइलवर शेअर केला.

इतक्या सुरळीतपणे काम झालं म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानले. खूप चांगली सेवा दिल्या बद्दल खरंच खुश होऊन त्यानी जास्त रकमेची मागणी केलेली नसताना ही मीच आनंदाने भरघोस टिप दिली त्यांना. जेष्ठांची काळजी घेण्याची आंतरिक उर्मी, तंत्रज्ञानातील प्रगती आणि ते नीटपणे राबवण्याची इच्छाशक्ती असणारा कर्मचारी वर्ग यामुळेच घरच्या घरी काम झालं ह्या विचारात असतानाच परत फोन वाजला . आपलं काम झालं ना अशी गोड आवाजात चौकशी केली गेली. मी काम झाल्याचं सांगितलं. धन्यवाद दिले. पण बोलत असताना माझ्या लक्षात आलं की मी save केलेला हा नंबर आणि स्क्रिन शॉट पाठवलेला नंबर वेगवेगळे आहेत. त्याच झालं असं होतं की माझ्याकडे नंबर असलेल्या पोस्टमनना वेळ नसल्याने त्यानी दुसऱ्या एका पोस्टमनना आमच्या कडे पाठवले होते आणि म्हणूनच फोन करून ते माझ्या कामाची चौकशी करत होते. म्हणजे आमचं काम केलेले पोस्टमन कुणी दुसरेच होते तर ... हा माझ्यासाठी आश्चर्याचा तिसरा धक्का होता.

ज्यांच्या मुळे माझं काम इतक्या बिनबोभाट पणे झालं होतं त्यांची उतराई होण्यासाठी ह्या वर्षीची दिवाळी घेण्यासाठी सवड मिळेल तेव्हा नक्की या असा मी त्यांना फोन केला तर "अहो मॅडम , कसली बक्षिसी देताय हे तर आमचं कामच आहे " अश्या विनयशील शब्दात नकार देऊन मला आश्चर्याचा आणखी एक सुखद धक्का दिला.

आपण सरकारी यंत्रणे बाबत कधीच समाधानी नसतो. सरकारी काम आणि सहा महिने थांब अश्या म्हणी वगैरे ही आहेत. परंतु मनाची उभारी वाढवणारे , जगातल्या चांगुलपणाची प्रचिती देणारे असे सुखद अनुभव ही येतात कधी कधी आणि मग परत एकदा हे जग सुंदर दिसायला लागत ...आणि मनाला छान , उत्साही वाटतं ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा!
------
फोनमध्ये फिंगर प्रिंट स्क्यानर असतोच मग आम्ही करू शकतो का असं मी बँकेच्या अधिकाऱ्यास विचारलं होतं.
" तेवढ्याने होत नाही हो, uid software फक्त काही अधिकृत संस्थांनाच मिळतं ते कसं मिळणार तुम्हाला?"

साताऱ्यात आपले सरकार ई सेवा केंद्र आहेत तिथे ही हे काम लगेच होऊन जाते. पुढच्या वेळी कधी गरज लागली तर शाहूपुरीत रहात असाल तर शाहूपुरी चौकात आहे केंद्र.

ममो किती छान अनूभव. माझ्या काकुचे करायचे आहे हे काम. जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये चौकशी करु का? की नेहेमी येणार्‍या पोस्टमनलाच विचारु?

ई सेवा केंद्र आहेत तिथे ही हे काम लगेच होऊन जाते

. हो.
आमच्या इथला मागच्या वर्षी तीस रुपये घ्यायचा. आता पन्नास केलेत.

पण आता नियम बदललेत. नोव्हेंबरमध्येच केले पाहिजे असे नाही. जानेवारीला केले तर दरवर्षी जानेवारीलाच करू शकता.

कालच साबांचे लाईफ सर्टीफिकेट नवर्याने घरच्या घरी सबमिट केले.
थोडा खटाटोप पहिल्यावेळी वाटतो पण आता कायमची सोय झाली. थोडक्यात प्रोसिजर अशी आहे.
1. मायक्रोटेकच्या साईटवर जाऊन सर्टीफाइड डिवाईस घेतले.
2. त्यानंतर त्याच्या फोन नंबरने ते डिवाईस रजिस्टर केले.
3. उमंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घेतले.
4. फायनली बोटांचे ठसे घेऊन पेन्शन डीटेल्स टाकून सबमिट केले.

हे उमंग ॲप केवळ केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालेल की राज्य सरकारच्या सेवेतील कर्मचाऱ्यांनी साठी सुद्धा चालेल?

पोष्ट खात हायटेक होत आहे. सगळ्या पोस्टमनला अँड्रॉइड मोबाईल दिलेत.
कोरोना काळातील एक चांगली अनुभव

प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर्वांना.

शाहूपुरीत रहात असाल तर शाहूपुरी चौकात आहे केंद्र. >> @ धीरज , शाहूपुरीत नाही पण माहितीबद्दल धन्यवाद . लागलं काही तर जाता येईल तिथे .

Mazeman डिटेल माहिती बद्दल धन्यवाद. पुढच्या वर्षी उपयोग होईल.

पण आता नियम बदललेत. नोव्हेंबरमध्येच केले पाहिजे असे नाही. जानेवारीला केले तर दरवर्षी जानेवारीलाच करू शकता. >> बरोबर आहे srd.

रश्मी आधी नेहमीच्या पोस्टमनला विचारून बघ, होऊन जाईल पटकन तुझं काम एखाद वेळेस.

माबोवाचक , माझ्या मते चालत स्टेट साठी ही उमंग app. पण 100% sure नाही.

छान अनुभव. आणि छान केलेय. ज्येष्ठ मंडळींना कोरोना असो वा नसो अशी सुविधा हवीच होती.

आम्हालाही घ्यायचा आहे हा अनुभव. परवाच आईच्या मैत्रीणीने या माहितीची पीडीएफ शेअर केली. त्यांनी या दारात पोस्टमन सेवेचा लाभ घेतला आहे. ॲप डाऊनलोड करून त्यावरूनच रिक्वेस्ट टाकायची आहे. दोनेक दिवसात जवळच्या पोस्ट ऑफिसमधून माणूस दारात येतो. पैसे घेतील हे त्यात लिहिलेले. किती ते दिले नव्हते. पण आईच्या मैत्रीणीने सांगितली रक्क्कमही तुलनेत क्षुल्लकच होती.

गंमत म्हणजे आई आणि तिच्या काही मैत्रीणी या सेवेचा लाभ न घेता या निमित्ताने दरवर्षी जसे भेटणे होते ते जमवायला प्रत्यक्षच भेटूया म्हणत होते. अन्यथा सगळ्या जणींची मुद्दाम ठरवून भेट होत नाही. पण आम्हीच म्हटले या वर्षी राहू द्या.

तशातच पोस्टमन घरी येऊन on line life certificate issue करेल अशी बातमी वाचण्यात आली. ते app डाऊन लोड करून तिथे रिक्वेस्ट पाठवली तर जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा असं त्यांचं उत्तर आलं >>>>

कुठलं अ‍ॅप ते शेयर कराल का?

ऋ, अंजू , king_ of_ नेट thanku.

पैसे घेतील हे त्यात लिहिलेले. किती ते दिले नव्हते >> 70 रुपये रेट आहे आणि ते सुद्धा online certificate down load झालं म्हणजे काम झालं तरच द्यायचे आहेत.

कुठलं अ‍ॅप ते शेयर कराल का? >> हे app आहे. https://play.google.com/store/apps/details?id=info.indiapost

माझ्याकडे हा जीवनप्रमाणचा सर्व सेटअप आहे. माझी बायको रिअल इस्टेटची सर्विसेस व लिगल कामे करत असल्याने तिच्याकडे रजिस्टर्ड बायोमेट्रिक डिव्हाईस आहे. मी तो वापरुन जीवनप्रमाण वेबसाईटवर रजिस्टर केले व त्या आधारे सोसायटी व परिचितांची पेन्शनसाथी लाईफ सर्टिफिकेट करुन दिली. काही लोकांना बॅंकेतून फोन आले की त्यांची आधार कार्ड बॅंकेकडे नाहीत म्हणून त्यांना परत बॅंकेत जाउन ते सादर करावे लागले. खर तर सर्व पेन्शनर खातेधारकांचे केवायसी ही बॅंकेची जबाबदारी आहे. ज्यांचे ठसे मॅच होत नाहीत त्यांना मात्र फिजिकली जाउन करावे लागते. किंवा आयरिस स्कॅनर वर होते.

श्री प्रकाश घाटपांडे, मला माझ्या आई साठि हे करायचे आहे.. वय - ८५
वयोमानानुसार ठसे नीट येत नाहीयेत आणि जवळपास जी ई केंद्रं आहेत त्यांच्या कडे आयरिस स्कॅनर नाहियेत..
ह्या परीस्थितीत काय करता येईल?

ह्या परीस्थितीत काय करता येईल?>>> प्रत्यक्श बँकेत जाणे हाच पर्याय . कधी कधी आधार अपडेट केल्यास ( तिथेही सेंटरला जावे लागतेच) मॅच होतात ठसे.

मनीमोहोर, छान सकारात्मक लेख. अशी छोटीशी छान घटना वाचली तरी मस्त वाटतं. अगदी positive positive Happy

तुमचं या लिखाणासाठी विशेष कौतुक कारण तक्रार किंवा नकारात्मक घटना जेवढ्या पटकन सांगितली जाते तेवढा वेळ काढुन postive feedback दिला जात नाही.

Pages