परिक्षण - Scam 1992: The Harshad Mehta Story

Submitted by भागवत on 13 December, 2020 - 10:06

परीक्षण - Scam 1992: The Harshad Mehta Story

अलीकडच्या काळात वेब सिरिज म्हणजे अतिरंजित कथा, अति भडक मारामारी, आणि अति भडक दृश्ये असे समीकरण बनले होते. पण या सगळ्यांना छेद देणारी नवीन वेब सिरिज म्हणजे SCAM 1992 आली आहे. IMdB या संकेतस्थळा वर ९.५ मानांकन असलेली एकमेव भारतीय वेब सिरिज आहे. त्यामुळे ही सिरिज बघायचीच असे ठरवले.

“हंसल मेहता” यांनी अगोदर दर्जेदार चित्रपट बनवले आहेत. Scam १९९२ ही जबरदस्त कथा, प्रभावी पटकथा, आणि उच्च उत्पादन दर्जा, आणि कलाकाराची अतिशय योग्य निवड आणि पार्श्वसंगीताचा अत्यंत हुशारीने वापर, कथेवर घेतलेले परिश्रम, दमदार पटकथा, दिग्दर्शकाची कथेवरील पकड या सगळ्यामुळे हंसल मेहता भाव खाऊन जातात. त्यांनी हर्षद मेहता या पात्रा साठी प्रतीक गांधी नावाचा हिरा शोधून काढला आहे.

प्रतीक गांधी पुढील पिढीचा उगवता सितारा आहे. या वर्षीचे सगळे पुरस्कार प्रतीक गांधीच घेऊन जाईल. त्याने काय सुंदर व्यक्तिरेखा वठवली आहे. ज्यांनी हर्षद मेहता खरोखर बघितला नाही त्यांना हाच खरा हर्षद वाटेल इतकी तंतोतंत व्यक्तिरेखा साकारली आहे. अप्रतिम संवाद फेक, उत्तम देह बोली आणि आत्मविश्वास युक्त व्यक्ति चित्रणं त्यामुळे प्रतिकने हे पात्र पडद्यावर जिवंत केले आहे. यात लई भारी संवादाची जुगलबंदी आहे. “रिस्क है तो इश्‍क है”, “लोचा लफडा और जिलेबी फाफडा इसको गुजराती के लाइफ से कोई निकाल नही सकता ”, “देखो मै सिगारेट नही पिता पर जेब मे लायटर जरूर रखता हूं धमाका करणे के लिये”, “जेब मे मनी हो तो कुंडली मे शनि होने से कोई फरक नाही पडता”, ”सक्सेस क्या है? फेल्यर के बाद का चॅप्टर”, “प्रॉफिट दिखता है तो हर कोई झुकता है”, एखाद्या माणसाचे जीवन पट उलगडणे आणि कुठेही त्या व्यक्तीला झुकते माप न देता उलगडणे हे एक दिग्दर्शकासाठी खरी कसब आणि परीक्षाच असते. कारण त्या व्यक्तीला झुकते माप दिले किंवा वाईट दाखवले तर लोकांना कथा आधीच माहीत असल्यामुळे कथा प्रेक्षकांच्या पसंतीला पडत नाही.

दिग्दर्शकाने जुने दलाल स्ट्रीट, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि त्यामधील नाट्यमय घडामोडी रिंग मध्ये कश्या होतात हे उत्तम रित्या दाखवले आहे. जुनी मुंबई, रस्ते, घरे, जागा, परिसर, इत्यादी हे उत्तम रित्या दाखवले आहे. स्टॉक एक्स्चेंज मध्ये स्टॉकची खरेदी, विक्री, आणि अर्थकारण असलेला जड, किचकट विषय सुद्धा प्रेक्षकांना सोप्या भाषेत कळेल असा दाखवलेला आहे. जुन्या काळी एक्स्चेंज मध्ये स्टॉक खरीदी, विक्री, रिंग मध्ये व्हायची. त्यासाठी हाताच्या बोटांचा वापर संकेतासाठी व्हायचा. हा भाग अतिशय जमून आला आहे. हा भाग शीर्षक गीता मध्ये सुद्धा दाखवला आहे.

पार्श्वसंगीत जबरदस्त आहे. प्रतीक गांधी ज्या-ज्या वेळेस संवाद करतो त्या-त्या वेळेस संगीताचा अतिशय खुबीने वापर केला आहे. पार्श्वसंगीत आणि जुन्या काही गाण्याचा योग्य वेळी योग्य वापर केला आहे. त्या मुळे प्रतिकच्या वाक्यांना वेगळीच धार येते. श्रेय धन्वंतरी हिने “सुचेता दलाल” चांगला अभिनय करून व्यक्तिरेखा उचलून धरली आहे. सुरुवातीला ती एक सामान्य व्यक्ति वाटते पण जशी-जशी कथा उलगडत जाते तशी-तशी तिचा कणखरपणा, धडाडी पणा उठून दिसतो. अखंड आणि सतत प्रयत्न केल्या मुळे एक लहान मुंगी सुद्धा हत्तीचे साम्राज्य उद्ध्वस्त करू शकते. याची प्रचिती देते.

इतर कास्टिंग, जसे की बियर गॅंग, प्रणव सेठ, हेमंत खेर यांनी “आश्विन मेहता”, चिराग वोहरा यांनी “भूषण भट्ट”, अंजली भानोत यांनी “ज्योती मेहता”, सतीश कौशिक यांनी “मनू मुंदरा”, रजत कपूर यांनी “माधवण”, अनंत महादेवन यांनी “वेंकटरामन”, फैजल यांनी “देबाशीष” आणि इतर उत्तम सह कलाकारांची फौजच यात आहे. प्रत्येकांनी आप आपले काम चोख बजावले आहे. त्यापैकी रजत कपूर, सतीश कौशिक, प्रणव, अनंत महादेवन यांची वाहवा, तारीफ करावीच लागेल. इतर विभाग जसे की छायांकन, संपादन, सेट सजावट (Set Decoration), पोशाख डिझाइन, आर्ट आणि साऊंड विभाग या सगळ्यानी विभागानी आपले १०० टक्के योगदान दिले आहे.

ही सिरिज बघताना मला हॉलीवुडचा “द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट” या चित्रपटाची जरूर आठवण येते. एखादा माणूस व्यवस्था मधील पळवाटा शोधून, व्यवस्थेला वेठीला धरून, राजकीय वरदहस्त लाभल्या नंतर कोट्याधीश बनतो आणि स्वत:च्या कर्माने तुरूंगाची हवा कसे खातो यांचे सविस्तर वर्णन यात आहे. दिग्दर्शक हे पूर्ण दाखवण्यात आत्यंतिक यशस्वी ठरला आहे. कथेचे सार अगदी स्पष्ट दाखवणे यातच दिग्दर्शकाचे धाडस आणि यश आहे.

दिग्दर्शकाची धाडस, कौशल्य, आणि कथेवरील पकड, प्रतीक ने प्रत्येक फ्रेम ला जिवंतपणा आणल्यामुळे, सह कलाकारांची चोख कामे, अप्रतिम पार्श्वसंगीत आणि जुन्या गीतांचा वापर, पटकथा, संवाद यांच्यातील नाविन्य, वेब सिरिज मधील वेगवेगळ्या अंगांनी आलेले चढ उतार, या सगळ्यामुळे तयार झालेले उत्तम रसायन म्हणजे ही सुंदर scam १९९२ वेब सिरिज. या वेब सिरिजला मी देतो ५ पैकी ४.५ स्टार.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users